Bharosa Cell Pune : सध्या शहरातील ‘भरोसा सेलकडे’ ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची संख्या वाढत आहे. मुख्यतः महिला व बालकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी हा कक्ष 2019 मध्ये स्थापन कऱण्यात आला. मात्र आता या कक्षाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचीही योग्य दखल घेऊन,त्यांना सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याची एक नवी उमेद दिली जात आहे. भरोसा सेलकडून सोडवण्यात आलेल्या काही केसेस बघून, अशा संकटात असणाऱ्या समाजातील इतर ज्येष्ठांना निश्चितच मार्गदर्शन आणि नवी उमेद मिळू शकते. कौटुंबिक उपेक्षा, शोषण, सायबर फसवणूक, घरगुती हिंसाचार अशा विविध आर्थिक, मानसिक त्रासाला कंटाळलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे हक्क समजावेत यासाठी ‘मिसलेनियस भारत’चा हा विशेष लेख.
पुणे : 28-11-2026
सोशल मीडियाच्या या काळात अनेकदा आपण व्हिडिओ पहातो,, ज्यात जन्मदात्या माता-पित्यांना मुलं वृद्धाश्रमात सोडत आहेत. किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यात घरातील वृद्ध व्यक्तीला मारहाण होत आहे. त्यांना घरात अपमानास्पद वागणूक मिळत आहे. आपण हे व्हिडियो बघतो, स्क्रोल करतो, हळहळ करून पुढे जातो. मात्र स्वतःच्याच अपत्यांकडून शोषण सहन करणाऱ्या अशा वृद्धांना कोणाचा कायदेशीर आधार मिळू शकतो ? हा प्रश्न पडतो. पोलीस प्रशासनाचा एक विभाग ‘भरोसा सेल’ नावाने कार्यरत आहे. इथे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न योग्यरित्या सोडवण्यात येत आहेत.
आज अनेक कुटुंबांमध्ये, संपत्ती, घरदार हे या वृद्धांचे आहे, मात्र मुलं-सुनांकडून त्यांची जबाबदारी घेणे टाळले जाते. अशावेळी अनेक वृद्धांना काय करावे हे समजत नाही. आपल्याच अपत्यांविरोधात कुठे आणि काय तक्रार करावी ? हे त्यांना समजत नाही. आपण अशी तक्रार पोलिसांमध्ये केली तर, आपलीच नाचक्की होईल या भीतीने समाजातील हा अत्यंत महत्त्वाचा घटक कुठेतरी कुढत आपले उर्वरीत आयुष्य कंठित रहातो.
आजघडील ‘भरोसा सेल’ (Bharosa Cell Pune ) सारखे प्रशासकीय विभाग अशा पीडित वृद्धांना जगण्याचे बळ देत आहेत. येथे कौटुंबिक कलह सामोपचाराने सोडवण्यास मदत केली जाते. आजघडील येथे येणाऱ्या तक्रारींची संख्या वाढत आहे. मात्र तरीही येथून त्यावर योग्य तो तोडगा काढत, समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सुरू आहे. भरोसा सेलने गेल्या काही दिवसात अनेक वृद्धांची तक्रार दाखल करून, त्यांना न्याय दिला आहे. त्यांची माहिती इतर पीडितांना मिळाली तर नक्कीच त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते.
Table of Contents
भरोसा सेलकडून सोडवण्यात आलेले तंटे ( सुरक्षेच्या कारणास्तव नाव, ओळख सांगण्यात आलेली नाही) (Bharosa Cell Pune )
- 1 एका वृद्ध जोडप्याच्या सुनेने आणि तिच्या भावाने या वृद्धांच्या घराला तारण ठेवून एचडीबी या फायनान्स कंपनीकडून 3,00,000 रूपये परत फेडीने कर्ज घेतले होते. परंतु, सुन आणि तिचा भाऊ हे कर्ज फेडत नसल्याने या वृद्धांना त्यांच्या घरावर टांगती तलवार असल्याचे वाटत होते. मात्र त्यांनी भरोसा सेल कक्षाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर येथील अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन, अर्जदार आणि गैरअर्जदार यांना बोलावून, गैरअर्जदार म्हणजे सून आणि तिच्या भावाला ज्येष्ठ नागरिक कायदा समजावून सांगितला. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. याचा परिणाम होऊन आता त्यांनी ते कर्ज एकरक्कमी फेडले आहे. यामुळे वृद्ध जोडप्याचे समाधान झाले असून, त्यांनी भरोसा सेल कक्षाचे आभार मानले आहेत.
- 2 भरोसा कक्षाकडे आलेली दुसरी केसही अशीच सख्ख्या नातूने एका वृद्धाला त्याच्यात घरातून बेदखल केले होते. या प्रकरणात सुद्धा भरोसा कक्षात दोन्ही पक्षांना बोलावून, नातवाला ज्येष्ठ नागरिक कायदा समजावून समूपदेशन करण्यात आले. त्यानंतर नातवाने आपल्या आजोबांना त्यांचे घर परत दिले. तसेच वृद्ध अर्जदारांनासुद्धा त्यांची मुलगी आणि नातू यांचा सांभाळ कऱण्यास सांगितले आहे.
- 3 आणखी एक केस अशीच मुलं आणि सुना वृद्ध दांपत्या व नातू यांच्याविरूद्ध तक्रार आली होती. एका वृद्ध दांपत्याचा ते सांभाळ करत नव्हते. मात्र भरोसा कक्षाकडून त्यांना समज देऊन, ज्येष्ठ नागरिक कायदा समजावून सांगितला. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. परिणामी त्यांच्याकडून आता आई-वडिलांचा योग्य सांभाळ केला जात आहे, त्यांना दरमहा 10,000 रुपये महिना दिला जात आहे.
- 4 एका केसमधील वृद्धाचे मुलगा आणि सून त्यांच्या स्वतःच्या घरात राहून त्यांनाच त्रास देत होते. या केसमध्येही कक्षाकडून त्यांना ज्येष्ठ नागरिक कायदा समजावून दिला. त्यांचे समुपदेशन केले. शेवटी मुलगा आणि सून आता भाडेतत्वावर दुसरीकडे रहायला गेले आहे. त्यामुळे वृद्धांचे जगणे सुसह्य झाले आहे.
याशिवाय कोणाच्या मुलांनी पैसे, दागीने घेतले होते, तर कोणी भाडेकरी भाडे भरत नव्हते, कोणाची सायबर फसवणूक झाली होती. अशावेळी त्या ज्येष्ठ नागरिकांचे पैसे, दागीने मिळवून देण्यात आले आहे. अशा अनेक कौटुंबिक फसवणूकी भरोसा सेलकडून सामोपचाराने सोडवल्या जात आहेत.
काय आहे भरोसा सेल कक्ष ? (Bharosa Cell Pune )
सामान्य माणसाला पोलीस, कोर्ट कचेरी या भानगडीत पडायची सहसा भीती वाटते. त्यात म्हातारपणी आपल्याला न्याय मिळेल का ? हा प्रश्न वृद्धांपुढे असतो. म्हणूनच पुणे पोलीसांनी एक विशेष विभाग सुरू केलेला आहे. ‘भरोसा सेल’ नावाने हा विभाग चालवला जातो. जिथे महिला, बालके आणि जेष्ठ नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेऊन, कोटुंबिक वाद, भाडणं सामोपचाराने सोडवण्यास मदत केली जाते.
या विभागाविषयी जास्तीत जास्त नागरिकांना माहिती असणे आज काळाची गरज बनली आहे. 2019 ला भरोसा सेलची स्थापना करण्यात आली होती. भरोसा सेल हा विभाग गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखील आहे. पोलीस, मानसोपचार तज्ञ, विधी तज्ञ, वकील,महिला बालकल्याण खाते अधिकारी, समुपदेशक, घरगुती हिंसाचार कायदा अभ्यासक या सर्वांना एकत्र घेऊन भरोसा सेलची यंत्रणा काम करते.
2019 पासून या विभागाकडून महिला आणि बालके यांच्यासाठी काम केले जात होतेच, मात्र आता वृद्धांकडून येणाऱ्या तक्रारींमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या विभागाकडून गेल्या काही दिवसात अशाच काही तक्रारींची यशस्वीरित्या दखल घेऊन, वृद्धांना न्याय देण्यात आला आहे. भरोसा सेलकडे येणाऱ्या वृद्धांच्या तक्रारींमध्ये त्यांचे कुटुंब, भाडेकरू किंवा सायबर गुन्हेगारांकडून झालेल्या फसवूणीच्या तक्रारी आहेत. या तक्रारी पहाता त्यात वृद्धांच्या झालेल्या आर्थिक फसवणूकीचे प्रमाण जास्त आहे.
भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसमोरील महत्त्वाच्या समस्या ? (Bharosa Cell Pune )
भरोसा सेलकडे येणाऱ्या तक्रारींवरून ज्येष्ठ नागरिकांपुढे आज कोणकोणत्या समस्या आहेत ते समजते.
काही ज्येष्ठ नागरिकांची मुले नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दुसऱ्या शहरात अथवा परदेशात राहतात. त्यामुळे ते एकटे राहतात. काहींच्या बाबतीत कुटुंबातील व्यक्तींकडून दुर्लक्ष केले जाते. काहींना अपमानास्पद वागणूक, मानसिक त्रास किंवा धमक्यांचा सामना करावा लागतो.
काही वेळा ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेवर, घरावर किंवा निवृत्तिवेतनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. काहींची आर्थिक फसवणूक ओळखीच्या व्यक्तींकडून होते, तर काहींची अनोळखी व्यक्तींकडून. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कुटुंबातील व्यक्तीने त्रास दिला म्हणून तो सहन करणे बंधनकारक नाही. आणि मदत मागितली म्हणून आपण आपल्या कुटुंबाविरुद्ध जात आहोत, असेही समजण्याची गरज नाही. आपली सुरक्षितता आणि आपला सन्मान महत्त्वाचा आहे.
भरोसा सेल च्या अधिक्षक उत्तरा जाधव म्हणतात, ” प्रत्येक कौटुंबिक मतभेद हा गुन्हा असेलच असे नाही; मात्र मारहाण, धमकी, फसवणूक, आर्थिक शोषण किंवा अन्य कोणताही गुन्हा घडत असेल, तर योग्य यंत्रणेची मदत घेणे आवश्यक आहे”.
ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क समजून घ्या (Bharosa Cell Pune )
ज्येष्ठ नागरिकांविषयीची सर्वात महत्त्वाचा हक्क म्हणजे, पालक व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याण अधिनियम, 2007. या कायद्यामध्ये पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडून किंवा कायद्यात नमूद केलेल्या संबंधित व्यक्तींकडून देखभाल मिळण्याबाबत तरतुदी आहेत. परिस्थितीनुसार देखभालीसाठी संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करता येतो.
ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधाराची गरज असेल आणि कुटुंबाकडून आवश्यक मदत मिळत नसेल, तर त्यांनी आपल्या जिल्ह्यातील संबंधित देखभाल न्यायाधिकरण किंवा समाजकल्याण विभागाकडे मार्गदर्शन घ्यावे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मालमत्तेचे संरक्षण – आपण आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून घर घेतले असेल किंवा मालमत्ता निर्माण केली असेल, तर त्यासंबंधी कोणताही दस्तऐवज समजून न घेता त्यावर सही करू नये. विशेषतः घर, जमीन, बक्षीसपत्र, विक्रीखत किंवा मुखत्यारपत्र यांसारख्या कागदपत्रांच्या बाबतीत योग्य कायदेशीर सल्ला घ्यावा.
आपण मुलांवर किंवा नातेवाइकांवर विश्वास ठेवत असलात, तरी आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेच्या कागदपत्रांबाबत आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मालमत्तेचे हस्तांतरण देखभालीच्या अटीवर केले असेल आणि संबंधित अटींचे पालन झाले नसेल, तर काही परिस्थितींमध्ये वरील कायद्यानुसार हस्तांतरण रद्द करण्याची मागणी करता येऊ शकते. मात्र, त्यासाठी संबंधित कायदेशीर अटींची पूर्तता आवश्यक असते.
तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे सुरक्षिततेचा अधिकार – कोणी मारहाण करत असेल, धमकावत असेल, फसवणूक करत असेल किंवा आपल्या जीविताला अथवा मालमत्तेला धोका निर्माण करत असेल, तर पोलिसांशी संपर्क साधण्यास संकोच करू नका. कायद्याची माहिती असणे म्हणजे प्रत्येकाशी संघर्ष करणे नव्हे; तर अन्याय झाल्यास योग्य मार्गाने स्वतःचे संरक्षण करता येणे होय.
सायबर फसवणुकीपासून सावध राहा (Bharosa Cell Pune )
आजच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे सायबर गुन्हे. तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सोपे झाले आहे. बँकेचे व्यवहार, बिल भरणे, पैसे पाठवणे या गोष्टी घरबसल्या करता येतात. पण याच तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूकही करतात. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी याचे काही प्रकार समजून घेणे आवश्यक आहे.
एखादी व्यक्ती फोन करून सांगते की, ती बँकेतून बोलत आहे आणि आपले बँक खाते बंद होणार आहे. आपले KYC अपडेट करायचे आहे. किंवा आपल्याला OTP सांगण्यास सांगते. काही जण पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी किंवा तपास यंत्रणेतील अधिकारी असल्याचे भासवतात.
आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे, आपल्या कुटुंबातील व्यक्तीला अटक होणार आहे किंवा पैसे भरल्यास प्रकरण मिटेल, असे सांगून घाबरवतात. काही वेळा व्हिडिओ कॉलवर एखादी व्यक्ती पोलीस गणवेशात दिसते आणि अटकेची भीती दाखवून पैशांची मागणी करते. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका.
भरोसा सेल कडून करण्यात आलेल्या सूचना : (Bharosa Cell Pune )
– कोणालाही OTP, UPI PIN किंवा ATM PIN सांगू नका.
– अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
– पैसे मिळवण्यासाठी UPI PIN टाकण्याची गरज नसते.
– अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करू नका.
– अटक किंवा कायदेशीर कारवाईची भीती दाखवून पैसे मागितले, तर घाबरून त्वरित पैसे पाठवू नका.
– बँकेशी संपर्क साधताना अधिकृत क्रमांकाचाच वापर करा.
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास 1930 या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर तातडीने संपर्क साधा आणि अधिकृत सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार नोंदवा. जितक्या लवकर तक्रार केली जाईल, तितक्या लवकर संबंधित व्यवहारावर आवश्यक कार्यवाही करण्याची संधी मिळू शकते. मात्र, पैसे परत मिळण्याची हमी नसते. लक्षात ठेवा, फसवणूक झाल्यानंतर लाज वाटून किंवा आपली चूक झाली असे समजून गप्प बसू नका. तातडीने मदत मागा.
एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? (Bharosa Cell Pune )
पुण्यासारख्या शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. मुलं नोकरीसाठी बाहेर असतात किंवा कुटुंबातील इतर सदस्य वेगळे राहतात.
- अशा परिस्थितीत काही साध्या सवयी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकतात.
- आपल्या शेजारी राहणाऱ्या विश्वासू व्यक्तींशी संपर्क ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करता येईल अशा दोन-तीन व्यक्तींचे फोन क्रमांक जवळ ठेवा.
- घरात अनोळखी व्यक्तीला सहज प्रवेश देऊ नका. घरकामासाठी किंवा दुरुस्तीसाठी कोणी आले असल्यास त्याची ओळख तपासा.
- बँकेचे व्यवहार किंवा महत्त्वाची कागदपत्रे याबाबत अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
- आपल्या कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला आपण कुठे आहोत, आपली तब्येत कशी आहे, याची नियमित माहिती द्या.
- महत्त्वाचे म्हणजे, स्वतःला समाजापासून दूर ठेवू नका. सामाजिक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक मंडळे आणि मित्रपरिवार यांच्याशी संपर्क ठेवा.
- एकटेपणा जाणवणे ही लाज वाटण्याची बाब नाही. आपल्याला संवादाची किंवा मदतीची गरज वाटत असेल, तर ती व्यक्त करणे आवश्यक आहे.
भरोसा सेल आणि पोलीस यंत्रणा आपल्यासाठी कशी मदत करू शकते? (Bharosa Cell Pune )
भरोसा सेलच्या अधिक्षक उत्तरा जाधव सांगतात की, “संकटात असलेल्या व्यक्तीने योग्य यंत्रणेपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे.”
त्या म्हणतात की, भरोसा सेलमध्ये प्रामुख्याने महिला व बालकांशी संबंधित तक्रारी आणि समस्यांवर काम केले जाते. तक्रारीचे स्वरूप आणि अधिकारक्षेत्र लक्षात घेऊन समुपदेशन, संबंधित पोलीस ठाण्याशी समन्वय आणि आवश्यक मदतीसाठी मार्गदर्शन केले जाते.
मात्र ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक त्रास, धमकी, फसवणूक किंवा सुरक्षिततेसंबंधी समस्या असल्यास त्यांनी योग्य पोलीस ठाण्याशी किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा. तातडीचा धोका असल्यास ‘ 112 ‘ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधता येतो.
ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित तक्रारींचे स्वरूप पाहून योग्य यंत्रणेपर्यंत पोहोचविणे आणि कायद्यानुसार आवश्यक मदत मिळवून देणे महत्त्वाचे आहे. मात्र, प्रत्येक समस्या भरोसा सेलच्या थेट कार्यक्षेत्रात येईलच असे नाही. त्यामुळे आपल्या तक्रारीच्या स्वरूपानुसार योग्य कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
आपण मदत मागायला आलात, तर आपले म्हणणे शांतपणे मांडावे. उपलब्ध कागदपत्रे, संदेश किंवा इतर पुरावे असल्यास ते सोबत ठेवावेत. पोलिसांचे काम केवळ गुन्हा दाखल करणे एवढेच नाही, तर नागरिकांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देणे आणि आवश्यकतेनुसार त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कार्यवाही करणे हेही आहे, असा विश्वास त्या ज्येष्ठ नागरिकांना देतात.
भरोसा सेल कडून कुटुंबीयांना आणि समाजाला आवाहन (Bharosa Cell Pune )
आपल्या तरुण पिढीला आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती कधी कधी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असतील. एखाद्या निर्णयाबद्दल त्यांचे मत आपल्यापेक्षा वेगळे असेल. नवीन तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी त्यांना वेळ लागत असेल. पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे विचार महत्त्वाचे नाहीत. त्यांना वेळ द्या. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या आरोग्याची चौकशी करा. त्यांना आर्थिक व्यवहार समजावून सांगा. त्यांची मते ऐकून घ्या.
भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक ‘उत्तरा जाधव’ यांचे समाज आणि ज्येष्ठांना आवाहन (Bharosa Cell Pune )
आज समाजात ज्येष्ठांप्रती वाढलेला अनादर आणि त्यांचे वाढलेले प्रश्न पाहून त्यांच्या साठी पोलीस खात्यातील या वरीष्ठ अधिकाऱ्याने मोलाचा सल्ला दिला आहे. त्या म्हणतात की, आपण लहान असताना आपल्या आई-वडीलांनी आपल्याला चालायला शिकवले. आज त्यांना आधाराची गरज असेल, तर त्यांना आधार देणे ही केवळ आपली नैतिक जबाबदारी नाही, तर आपल्या संस्कारांचीही परीक्षा आहे.
त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांनाही माझी विनंती आहे की, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, आर्थिक व्यवहारांबाबत जागरूक राहा, कायदेशीर हक्कांची माहिती घ्या आणि कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करणे अपरिहार्य आहे असे समजू नका. मदत मागणे म्हणजे कमजोरी नाही. योग्य वेळी मदत मागणे म्हणजे स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक असणे होय.
आपले वय वाढले असेल, पण आपले महत्त्व कमी झालेले नाही. आपल्या केसांचा रंग बदलला असेल, पण आपल्या अनुभवाची किंमत कमी झालेली नाही. आणि आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्याला कोणाची मदत लागली, म्हणून आपला स्वाभिमान कमी होत नाही. कौटुंबिक त्रास सहन करत राहू नका. परिस्थितीनुसार योग्य पोलीस यंत्रणा किंवा संबंधित प्राधिकरणाची मदत घ्या.
सायबर फसवणुकीपासून सावध राहा. OTP, PIN आणि बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. स्वतःचा सन्मान आणि सुरक्षितता जपा. मदत मागणे ही कमजोरी नाही.
त्या सर्व ज्येष्ठांना एक प्रश्न विचारतात की, “आपण आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आयुष्यभर काळजी घेतली. आता आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी आपण किती जागरूक आहोत?”
आपण समाजासाठी खूप काही केले आहे. आपल्या अनुभवातून पुढची पिढी घडत आहे. त्यामुळे आपण सुरक्षित राहणे, सन्मानाने जगणे आणि आनंदी राहणे हे आपल्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचे आहे.
आपल्या मनात कोणतीही समस्या असेल, तर ती मोकळेपणाने मांडा. योग्य माहिती घ्या. आवश्यकतेनुसार मदत मागा.
पोलीस यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठीच भरोसा सेल कार्य करते. यासाठी फक्त तुमच्या मदतीची हाक आम्हाला अपेक्षित आहे.
- उत्तरा जाधव पोलीस निरीक्षक, भरोसा सेल, पुणे शहर.
कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागतच, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. मात्र जर या कुटुंबामध्ये नेहमीच्या कुरबुरींपेक्षाही काही जास्त घडत असेल, घरातील वृद्ध, ज्येष्ठांच्या आत्मसन्मानाला गृहीत धरून त्यांचे आर्थिक, मानसिक शोषण केले जात असेल, तर ही धोक्याची घंटा असते. तेव्हा आपल्या आजूबाजुला असे कोणी वृद्ध आहेत का ? हे ओळखून त्यांना भरोसा सेल साऱख्या शासकीय यंत्रणांची मदत मिळवून देणे हेच आज प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. आयुष्याच्या संध्याकाळी सुदृढ आयुष्य जगणे हा प्रत्येक वय झालेल्या व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे.
- ज्योती भालेराव