“Pratapgad Fort” – A Symbol of Chhatrapati Shivaji Maharaj’s power and cunning (Creation – 1656)

Pratapgad Fort

“प्रतापगड” – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्ती आणि युक्तीचे प्रतिक (निर्मिती – इ.स. १६५६)

महाराष्ट्रातील जनता आणि येथील गड-किल्ल्यांचं एक अतूट नातं आहे. महाराष्ट्रातील बहुतेक गडाशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांचे शूर मावळ्यांच्या शौर्याविषयी, त्यांच्या बुद्धीचातुर्याशी निगडीत एखादी तरी घटना जोडलेली गेलेली आहे. प्रतापगड हा असाच एक गड, जो महाराजांनी अत्यंत युक्तीने अफलझलखानाच्या केलेल्या वधामुळे आजही तितकाच प्रसिद्ध आहे. महाबळेश्वरपासून जवळच असणारा हा गड कायम पर्यटकांनी फुललेला असतो.

Pratapgad Fort

प्रतापगडाविषयी भौगोलिक माहिती – (Geographical information about Pratapgad Fort )

महाराष्ट्रातील हा एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील महाबळेश्वरच्या नैऋत्येस १३ किमी.वर हा गड उभा आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १,०८१ मी आहे. दोन्ही बाजून २०० ते २५० मीटर खोल दरी आहे.

Pratapgad Fort

प्रतापगडाविषयीची ऐतिहासिक माहिती – (Historical information About Pratapgad Fort)

शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांना इ.स. १६५६ मध्ये हा किल्ला बांधून घेण्यास सांगितले. मुख्य किल्ला आणि बालेकिल्ला असे या गडाचे  दोन भाग आहेत. या गडाचे सर्वात प्रसिद्ध असे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे अफलझलखान आणि शिवाजी महाराज यांची भेट ( इ.स. १६५९) आणि त्या प्रसंगी अफलझनखानाचा झालेला वध ही घटना होय. या एका घटनेमुळे या गडाचे  महत्त्व कायमस्वरूपी वाढले. त्यानंतर काही वर्षांनी, छत्रपती राजाराम महाराज जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगड (Pratapgad Fort) येथे आले होते.

Pratapgad Fort

त्यानंतर पेशवाईत नाना फडणवीस यांनी (इ.स. १७७८) सखाराम बापूस काही दिवस नजरकैदेत येथेच ठेवले होते.पुढे ज्यावेळी नाना फडणीसांविरूद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले, तेव्हा नाना फडणवीस यांनी १७९६ मध्ये काही काळ या गडाचा आश्रय घेतला. १८१८ च्या ब्रिटीश मराठे युद्धानंतर मात्र हा गड ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.

Pratapgad Fort

प्रतापगडाची रचना –  (Structure of Pratapgad Fort)

प्रतापगडाचे  मुख्य किल्ला आणि बाले किल्ला असे दोन मुख्य भाग आहेत. दोन्ही भागात तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंनी भक्कम तटबंदी  व बुरूज आहेत. यापैकी अफजल, रेडका, राजपहारा, केदार या काही बुरूजांचे अवशेष टिकून आहेत.

या गडावर  शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते स्थापन करण्यात आलेले तुळजा भवानीचे सुंदर मंदिर आहे. या देवालयासमोर दोन उंच दीपमाळा आहेत. त्याजवळच नगारखान्याची इमारत आहे. तिचा १९३५ मध्ये जिर्णोद्वार करण्यात आला. भवानी देवीचे हे मंदिर फक्त दगडी गाभाऱ्याचे होते. औरंगजेब दक्षिणेत आल्यावर या मंदिरालाही काही उपद्रव झाल्याचे सांगितले जाते. भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफलझल बुरूजाच्या आग्नेयेस अफझलखानाची कबर आहे. तेथे दर वर्षी उरूस भरतो.

भवानी देवी मंदिराविषयी – (About Bhavani Devi Temple )

भवानी मातेची प्रतापगडावर  (Pratapgad Fort) अगदी सालंकृत मूर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली.या मूर्तीशेजारीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार – देवीच्या गाभाऱ्याच्या समोर एक खिडकीवजा दरवाजा आहे. समोरच सरसेनापती श्री हंबिरराव मोहिते यांची भव्य तलवार ठेवण्यात आलेली आहे. आजही या तलवारीचे चांगले जतन करून ठेवण्यात आलेले आहे. समोर देवी आणि मागे शौर्याचे प्रतिक असा हा अनुभव घेणे रोमांचकारक ठरते.

Pratapgad Fort

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याविषयी – हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती होते. त्यांचे मुळ नाव हंसाजी मोहीते हे होय. हंबीरराव मोहीते हे महाराजांच्या सैन्यात सन १६७४ पर्यंत पाच हजार फौजेवरील सरदार होते. विजापूरच्या लढाईत मुख्य सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा लढाईत मृत्यू झाला, तेव्हा हंसाजी मोहीते यांनी शत्रूच्या सैन्यावर हल्ला करून मोगलांचा पराभव केला. त्यावर खूश होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना हंबीरराव हा किताब बहाल करून सरसेनापतीपदी त्यांची नेमणूक केली. पुढे स्वराज्याच्या विस्तारासाठी त्यांनी अनेक लढाया जिंकल्या.

महाराजांच्या लष्करी विभागात जरी त्यांचे महत्त्वाचे स्थान असले तरी फक्त तेवढेच ते सीमित नव्हते. याशिवाय हंबीरराव मोहिते यांचे राजांशी कौटुंबिक संबधही जवळचे होते. शिवाजी महाराजांचे ते नात्याने मेव्हणे होते. महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई यांचे ते बंधू होत. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई या हंबीरराव मोहीत्यांच्याच कन्या होत्या. अशा या शूरवीर सरसेनापतीची तलवार या प्रतापगडावर आपल्याला पहायला मिळते. हेसुद्धा प्रतापगडाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

किल्ल्याचा बाकी परिसर –

देवीच्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे जाताना उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडताच केदारेश्वर महादेवाचे मंदिर आहे. येथिल शिवलिंग भव्य आहे. या मंदिराशेजारी प्रशस्त सदर आहे. केदारेश्वर मंदिराच्या मागिल बाजूस राजमाता जिजाबाई वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे मधोमध शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात प्रतापगडावर  छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ मी उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केले. याच्या बाजूने छानसा बगिचा वसवण्यात आला आहे. पर्यटकांना विसावण्यासाठी चांगल्या बेंचची व्यवस्था आहे. पुतळ्याशेजारीच शासकिय विश्रामगृह असून येथिल बागेतून उजव्या बाजूला गेल्यास बूरूजांचे दर्शन होते. तेथून खालचा अप्रतिम निसर्ग देखावा दिसतो. एकुण संपूर्ण गड निवांत फिरायचा असेल तर तुमच्याकडे चार पाच तास तरी असायला हवेत.

Pratapgad Fort

या किल्ल्यावरच एक हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आहे. लाकडी खेळणी, धातूच्या वस्तू, दागिने अशा अनेक वस्तू येथे विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. याशिवाय गडावर पायऱ्यांच्या बाजूने असणाऱ्या ओसऱ्यांवर ठिकठिकाणी खाण्यासाठी, खरेदीसाठीच्या दुकानांची गर्दी आहे. येथे येऊन पर्यटक पिठलं-भाकरी, भरीत, भजी, मसाला तार, दही अशा गावरान मेन्यूवर ताव मारताना दिसतात. गडावर खाण्यासाठी रानमेव्यापासून साग्रसंगीत जेवणाची सोय असल्यामुळे सोबत खाण्यासाठी काही ठेवण्याची अजिबात गरज पडत नाही. थोडया सामानासह प्रतापगडाच्या (Pratapgad Fort) पायऱ्या चढणे सोयिस्कर ठरते.

लहाणपणापासून एकत आलेल्या अफजलखानाच्या वधाची गोष्ट येथे प्रत्यक्षात कशी घडली असेल याची कल्पना करतच आपण हा संपूर्ण प्रतापगड फिरतो.. कसा केला असेल बरं महाराजांनी इतक्या अवाढव्य खानाचा वध ? हा विचार करतानाच गडाच्या शेवटी आपण महाराजांच्या भव्य पुतळ्यापाशी येतो आणि स्तिमीत होत, इतिहासात बूडून जातो. खरं तर ऐतिहासीक दृष्ट्‍या हा गड खूप महत्त्वाचा ठेवा आहे. मात्र संपूर्ण गड फिरताना येथे अनेक पर्यटनदृष्ट्‍या सुविधांचा अभाव जाणवतो. फक्त व्यावसायिकीकरण करून ऐतिहासीक पर्यटन वाढत नसते. त्या जोडीला या स्थानाला असणारे ऐतिहासीक महत्त्व, त्या त्या ठिकाणांचे जतन करणे महत्त्वाचे वाटते. त्यासाठी बराच वाव आहे. तरीही महाराष्ट्रातील हा महत्त्वाचा प्रतापगड (Pratapgad Fort) नक्की भेट द्याव्या असाच आहे.

Author ज्योती भालेराव.

याठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?

2 thoughts on ““Pratapgad Fort” – A Symbol of Chhatrapati Shivaji Maharaj’s power and cunning (Creation – 1656)”

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!