MPSC Paper Leak Case : अन्न व औषध प्रशासनातील निरीक्षक,गट-ब पदासाठी एमपीएससीमार्फत भरती मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र आज त्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे.
मुंबई : 27-08-2026
सध्या सर्वत्र एकच चर्चा असते, ती विविध शैक्षणिक परीक्षांमधील घोटाळ्यांची असते. देशासह महाराष्ट्र पेपरफुटीची (MPSC Paper Leak Case) प्रकरणे सातत्याने समोर येत असताना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाही पेपरफुटीच्या प्रकरणाने मोठा धक्का बसला आहे. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी एमपीएससीचे सचिव अभिजित लेंडवे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी यापूर्वी एमपीएससीचे दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही अटक कऱण्यात आली आहे. तसेच परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि कथित सूत्रधार अमृत पाटील याला अटक केली आहे.
या प्रकरणात प्रेमप्रकरणाचा ॲंगलही समोर आला आहे. प्रेमसंंबंधातून औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा दावा केला जात असला, तरी तपास यंत्रणांकडून या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता तपासली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी हा पेपर तब्बल 40 लाख रुपयांना विकल्याचा आरोप केला आहे.
22 मार्चला झाली होती परीक्षा (MPSC Paper Leak Case)
अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब-पदासाठी एमपीएससीमार्फत भरती मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाईन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली . या परीक्षेचा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला. त्यानंतर 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. पात्र उमेदवारांपैकी 488 जणांच्या मुलाखती 1 ते 22 जुलैदरम्यान घेण्यात आल्या. त्यानंतर 485 पात्र आणि तीन अपात्र उमेदवारांसाठी अशी एकूण 488 उमेदवारांसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध कऱण्यात आली.
उमेदवारांना पुन्हा अर्ज कऱण्याची गरज नाही (MPSC Paper Leak Case)
MPSC आता ड्रग इन्स्पेक्टर पदांसाठी नवीन स्क्रिनींग परीक्षा घेणार आहे. आधीच अर्ज उमेदवारांना नव्याने अर्ज कऱण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याकडून अतिरिक्त परीक्षा शुल्कही आकारले जाणार नाही. नव्या परीक्षेची तारीख आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.