Last fort construction in Maharashtra – Malhar fort, Pune district (built from 1757 to 1760)

Malhar Fort

महाराष्ट्रातील शेवटची गडनिर्मिती- मल्हार गड, पुणे जिल्हा ( निर्मिती इ.स. १७५७ ते इ.स. १७६०)

जगात अस्तित्वात आलेली पहिली गोष्ट अथवा शेवटची गोष्ट कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात रहाते. त्याचे पहिलेपण किंवा मग शेवट असणं हेच त्याचे वैशिष्ट होऊन जाते. याच वैशिष्ट्याचा एक गड पुणे जिल्ह्यात आहे. आज मी महाराष्ट्रातील शेवटची गडनिर्मिती म्हणून गणल्या गेलेल्या गडाविषयीची माहिती सांगणार आहे. या शेवटच्या बांधण्यात आलेल्या किल्ल्याचे नाव आहे ‘मल्हार गड’ (Malhar fort) . यालाच सोनेरी गड म्हणूनही ओळखले जाते. आपला महाराष्ट्र गडकिल्ल्यांसाठी कायमच प्रसिद्ध राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महारांजांच्या कार्यकाळात तर अनेक किल्ल्यांची निर्मीती करण्यात आली. मराठा साम्राज्य वाढवताना गड निर्मीतीची ही परंपरा कायम राहिली ती छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांच्या कारकिर्दीपर्यंत. पेशव्यांनी बांधून घेतलेला ‘मल्हार गड’ (Malhar fort) हा शेवटचा गड ठरला. कारण त्यानंतर गडकिल्ल्यांचे दिवस जाऊन जमिनीवरील ब्रिटीशांचे राज्य आलं होतं. त्यामुळे मल्हार गडानंतर कोणत्याही नविन गडाची निर्मिती पुढे झाली नाही. कारण होते तेच गडकिल्ले ब्रिटीशांनी उद्धवस्त केले आणि त्यांची नविन युद्धनीती अंमलात आणण्यास सुरूवात केली. त्यामुळे पेशवेकाळाच्या अंतिम पर्वानंतर महाराष्ट्रात गडनिर्मिती झाली नसल्याचे दिसून येते.

Malhar Fort

असा हा शेवटची निर्मिती असणारा मल्हार गड (Malhar fort) तसा फिरण्यासाठी बराच लहान आहे. अगदी तीन ते चार तासात तुम्ही येथील भ्रमंती पुर्ण करू शकता. पुण्याच्या आसपास तुम्ही असाल, तर सकाळी लवकर निघालात तर दुपारी बारा एक वाजेपर्यंत तुमची गड भ्रमंती पुर्ण होते.

मल्हार गडाविषयीची माहिती :

मल्हार गड (Malhar fort) हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर डोंगररांगेतील मल्हारगड किल्ला हा ट्रेकिंगच्या दृष्टीने सुरूवात करणाऱ्यांसाठी उपयोगाचा आहे. कारण हा चढणीसाठा अत्यंत सोपा असा गड आहे. पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील वेल्हे तालुक्यात सह्याद्री रांगेला दोन फाटे फुटतात. त्यातील एका रांगेवर  तोरणा आणि राजगड विसावलेले आहेत तर दुसरी रांग ही भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाते. पुरंदर, मल्हारगड, वज्र गड, सिंहगड हे किल्ले याच डोंगर रांगेच्या कुशीत वसलेले आहेत.

पुर्वी अहमदनगर, पुणे, चाकण, जुन्नर, सासवड अशा मार्गांवर मोठ्या बाजारपेठा होत्या. या बाजारपेठांकडे जाताना वाटेत दिवेघाट लागतो. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी या मल्हार गडाची निर्मिती करण्यात आली. या किल्ल्याचा निर्मीतीकाळ, शेवटची निर्मीती असल्याने अगदी अलिकडची म्हणजे इ.स. १७५७ ते इ.स. १७६० या काळातली आहे. पायथ्याशी असणाऱ्या सोनेरी गावामुळे याला सोनेरी गड म्हणूनही ओळखले जाते.

Malhar Fort

मल्हार गडाचा इतिहास

मल्हार गडाची (Malhar fort) निर्मिती पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. इ.स. १७५६ ते इ.स. १७६० च्या काळात या गडाचे बांधकाम करण्यात आले. याठिकाणी थोरले माधवराव पेशवे येऊन गेल्याचे इतिहासकालीन कागदपत्रात उल्लेख आढळतात. सरदार पानसेंचा सोनेरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे. तो वाडाही पाहण्यासारखा आहे.

मल्हार गडावरील (Malhar fort)आकर्षण

हा गड (Malhar fort) खरंतर त्रिकोणी आकारात आहे. आणि आतील बाजूस प्रवेश करताच आपल्याला चौकोनी आकाराची दगडी तटबंदी बांधण्यात आलेली दिसते. तटबंदीच्या बाजूने पाहिल्यास खोलवर दरी नजरेस पडते. वरून दिसणारे सह्याद्रीचे हे रुप आपल्याला खिळवून ठेवते. महाराष्ट्रातील इतर गड किल्ल्यांप्रमाणेच या गडाचीही बरीच पडझड झालेली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी बरूजं, तटबंदी, दरवाजे यांचे चांगल्या अवस्थेतील काही अवशेष बघायला मिळतात.

पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी  आपल्याला एका वाड्याचे आवशेष दिसतात. त्याच्या बाजूलाच एक विहिर आहे. याठिकाणी दोन विहिरी आहेत मात्र त्यांना पाणी नाही. तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच दगडी पायऱ्या आणि तटबंदी बांधलेले एक तळे आहे. या तळ्याच्या पायऱ्यांवर बसण्यात एक वेगळीच मजा आहे. येथे निवांत बसून त्यात फिरणारे मासे पाहत, फोटो काढत लोकं बसलेले असतात. पावसाळ्यात हे तळे पुर्ण क्षमतेने भरते. त्यामुळे त्याचे जास्त आकर्षण पर्यटकांना वाटते. येथे मुबलक पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही.

थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्यात आपण प्रवेश करते होतो. लांबूनच आपल्याला दोन मंदिरांचे कळस खुणावत असतात. एक महादेवाचे तर दुसरे खंडोबाचे अशी ही दोन मंदिरं आहेत. इथून पुढे जाताना एका पायवाटेने जावे लागते. आणि आपल्याला नजरेस पडते भले मोठे प्रवेशद्वार. या एका दरवाजावरून आपल्याला त्यावेळच्या भरभक्कम बांधकामाची चुणूक दिसते. हा दरवाजा ओलांडताच समोरच आडवी तटबंदी आणि समोरच दरीचे दर्शन होतं. येथे फिरताना रस्ता निसरजा आणि खुप उंचावर असल्याने सावधगीरी बाळगावी लागते. इथून पुढचा गड तुम्ही उजव्या आणि डाव्या बाजूने हिंडत पाहू शकता. उजव्या बाजूला बराच मोठा एसपैस परिसर आहे. मधोमध बसण्यासाठी झाडाभोवती बांधलेले पार आहेत. त्याच्या पुढे चालत गेल्यावर दगडी पायऱ्या आणि बरूजे आहेत. अनेक भग्न अवशेष आहेत जिथे थांबून पर्यटक फोटोंचा आनंद घेतात.

डाव्या बाजूला चिंचोळ्या रस्त्याने जात गडाचा (Malhar fort) पुढचा भाग पाहता येतो. याबाजूला अनेक लहान मोठे बुरूजं, कडे, तटबंदी, दगडी भिंतींचे अवशेष असल्याने येथे ट्रेकिंगसाठी बराच वाव आहे.  या वाटेने वर शेवट पर्यंत गेल्यास उंचावर भगवा झेंडा डौलाने फडकताना दिसतो. याठिकाणी बसून खालचा परिसर न्याहाळताना मस्त शांतता अनुभवायला मिळते. याच्या पुढेही रंगीत रानफुलांचे ताटवे आपल्याला आकर्षीत करतात. याच पायवाटेने चढ,उतार करत आपण गडाच्या उतरणीला लागतो.

संपुर्ण गड फिरण्यासाठी कितीही निवांत फिरलात तरी दोन तीन तासाच्यावर वेळ लागत नाही. गडाच्या पायथ्याशी रानमेवा विक्रेते, एखादी चहा, पाण्याची टपरी सोडली तर कोणतीही सोय नाही. मात्र खालपर्यंत अनेक झाडी आहेत, परिसर स्वच्छ असल्याने तुम्ही येथे वनभोजनाचा आनंदही घेऊ शकता. खाणं आणि पाणी जवळ बाळगल्यास हाल होणार नाहीत. बाकी इतर गडांपेक्षा इथे अजुनतरी येथील पर्यटनाला कमर्शियल रूप आलेले नाही. त्यामुळे येथे मनसोक्त भटकता येते. म्हणावी तेवढी गर्दीही नसते त्यामुळे निसर्गाचा आनंद घेता येतो.

गडावर जाण्याचे मार्ग –

याठिकाणी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट लागतो. तो संपल्यावर झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. पुढे २ किमीवर झेंडेवाडी गाव आहे. पुढे एक खिंड लागते. येथून पुढे गेल्यावर आपल्याला मल्हार गडाचं (Malhar fort) दर्शन होतं. येथून गडावर जायला अर्धा तास लागतो. तर फाट्यापासून खिंडपार करून दीडतास लागतो. दुसरा मार्ग आहे, सासवडपासून ६ किमी अंतरावर आहे सोनेरी गाव. या गावातून समोरच मल्हारगड दिसतो. या गडावर राहण्यासाठी कुठलीही विशेष सोय नाही. पायथ्याशी असणाऱ्या गावांमधे तशी सोय होऊ शकते.

या गडाचे नाव मल्हार गड (Malhar fort) असे का ठेवण्यात आले असावे ?

असा विचार केला तर असे वाटते की, खंडोबाच्या नावावरून आणि जेजुरीचा शेजार असल्याकारणाने तर हे नाव दिले नसेल. अशा या मल्हार गडाच्या (Malhar fort) उंचावरून कऱ्हा नदी, जेजुरी, कडेपठार असा विस्तिर्ण परिसर आपल्याला दिसतो. आजकाल अनेक गड किल्ल्यांवर निसर्गापेक्षा तेथील खाद्यपदार्थांच्या क्रेझ मुळे तिथे जास्त गर्दी होताना आपल्याला पहायला मिळते. पर्यटनाच्या विकासासाठी, तेथील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ते जरूरीचेही आहे. मात्र हळूहळू मुख्य ठिकाणाचा इतिहास, तेथील निसर्ग लोप पावणार असेल तर तेथिल पर्यटन विकासाच्या आराखड्याचा फेरविचार व्हायला हवा. मल्हारगड याला अपवाद ठरतोय असे वाटते. कारण येथे जागोजागी अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, ट्रेकर्स ठिकठिकाणी स्वच्छता, डागडुजीची कामं करताना दिसतात. दुकानांची, फेरीवाल्यांची कसलीही वर्दळ नसल्याने या गडाची सैर खऱ्या अर्थाने निसर्ग सहल सुद्धा ठरते. हेच याचे विशेष म्हणता येईल. चढण्यासाठी अतिशय सोपा, शांत, रम्य परिसरात असणारा हा मल्हार गड ट्रेकिंग एन्जॉय करण्यासाठी अगदी मस्त ठिकाण आहे.

याठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?

– ज्योती भालेराव

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!