Table of Contents
सणांचा राजा दिवाळीचा सण – (२०२१)
दिवाळी (Diwali) हा सण म्हणजे हिंदू सणांमधील सर्वात लाडका भव्यदिव्य सण आहे. खरं तर हिंदू धर्मासह इतर धर्मीयांमधेही संपूर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरात, दारात तेलाचे दिवे, अंगणात रांगोळ्या, आकाशदिवे लावून या दिवसात सर्वत्र वातावरण प्रसन्न आणि प्रकाशमय करण्यात येते. अशा या मंगलमयी सणाच्या प्रमुख दिवसांविषयी अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. या सणाविषयीची पौराणिक, पर्यावरणीय आणि आधुनिक माहिती आपण पाहणार आहोत.
खरं तर फार पूर्वी पावसाळा संपत आल्यावर सर्वत्र नवीन पिके आलेली असतात. शरद ऋतूच्या मध्यावर, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. अश्विन व कार्तिक या महिन्यांच्या दरम्यान साधारण पाच किंवा सहा दिवस दिवाळी (Diwali) साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमधे दिवाळी हा सण येत असतो. खरं तर दसऱ्यानंतर येणारा हा सणही वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक म्हणूनच हा सण साजरा केला जातो.

दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व !
दिवाळीची (Diwali) सुरूवात होते ती वसूबारस या दिवसाने. अश्विन कृष्ण द्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे दिवस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारतासारख्या कृषीप्रधान देशात हा दिवस फार मनोभावे साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. याचा अर्थ घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून ही पूजा केली जाते.
ज्यांच्याकडे गाई-गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे गोडाधोडाचे करून, पुरणाचा स्वयंपाक करून हा दिवस साजरा केला जातो. घरातील बायका गायीची साग्रसंगीत पूजा करतात. तिला ओवळतात. हा दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस असल्याने यादिवसापासून घराच्या अंगणात रांगोळी काढली जाते, दिवे लावले जातात. अनेक ठिकाणी स्रीया उपवासही करतात. यादिवशी गहू, मूग खात नाही, तर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊनच हा उपवास सोडला जातो.आपल्या मुला बाळांचे आरोग्य चांगले रहावे म्हणूनही ही पूजा करतात असे मानतात.
धनत्रयोदशी.
अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशीस हा सण साजरा केला जातो. या दिवसाबाबत अनेक कथा प्रचिलीत आहेत. आजच्या दिवशीच इंद्रदेवांनी समुद्रमंथन केले आणि त्यातून एक धन्वंतरी हे रत्न बाहेर काढले. त्यामुळे यादिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. यादिवशी कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असा प्रसाद लोकांना देतात. या दिवशी वस्र -अलंकार खरेदी करणे शुभ मानले जाते. धनाची पूजा केली जाते.

नरक चतुर्थी.
यादिवसाची एक आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेची त्याच्या जुलुमी राजवटीतून सुटका केली होती. कृष्णाच्या या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चुतुर्दशी हा सण साजरा केला जातो. . या दिवशी अभ्यंगस्नानला फार महत्त्व दिले जाते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाने मालिश करून स्नान केले जाते.
लक्ष्मीपूजन.
अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन केले जाते. यादिवशी प्रदोषकाळी लक्ष्मीचे पूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी अभ्यंगस्नान करतात. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला लाह्या, बत्तासे,भेंड यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. याच दिवशी नव्या केरसुणीची लक्ष्मीच्या रुपाने पूजा करतात. घरातील अलक्ष्मीच्या रूपातील केरवारा काढून लक्ष्मी यावी, दारिद्र्य दूर व्हावे असे मानले जाते. प्राचीन काळी कुबेराची पूजा केली जायची.
कुबेर हा संपत्तीचा अधिपती मानला जातो. पूर्वी त्याची पूजा करणे हेच या दिवसाचे महत्त्व होते. परंतु काही काळानंतर वैष्णव पंथाचे प्रस्थ वाढल्यानंतर कुबेरासह लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली.

बलीप्रतिपदा.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी (Diwali) पाडवा म्हणूनही ओळखला जातो. यादिवशी बळीराजाची पूजा केली जाते. साडेतीन मूहूर्तापैकी एक म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. व्यापारीवर्ग यादिवसापासून आर्थिक दृष्टया या दिवसापासून नवीन वर्षाची सुरूवात मानतात. हिशेबाच्या वह्यांची पूजा केली जाते. या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे पत्नी पतीला औक्षण करते व पती तीला ओवाळणी घालतो.
गोवर्धन पूजा.
मथुरेकडील लोक बालिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूज करतात. इतर ठिकाणचे लोक गोवर्धन पर्वताची प्रतिकृतीची पूजा करतात. विविध प्रकारचे पक्वान्न करून श्रीकृष्णाला ते नैवेद्य म्हणून दाखवतात. यालाच अन्नकुट म्हणतात.

भाऊबीज.
कार्तिक शुद्ध द्वितियेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. यादिवशी यम आपली बहिण यमी हिच्या घरी जेवायला गेला असे मानतात म्हणून याला यमद्वितीया असेही म्हणतात. भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून या दिवसाला फार महत्त्व आहे. यादिवशी बहिण भावासाठी गोडाधोडाचे करते,त्याला औक्षण करते.

भारताच्या प्रत्येक प्रांतात दिवाळी (Diwali) हा सण अत्यंत उत्साहाने, आनंदाने आणि विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो. मात्र दिवाळी मधे धार्मिक विधींपेक्षांही आनंद साजरा करण्याला सगळीकडेच जास्त महत्त्व असल्याचे आपल्याला दिसते. छान छान पदार्थ करून खाणे, रोषणाईचा आनंद घेणे हे सर्व उत्साहाने केले जाते. महाराष्ट्रात तर फराळाचे पदार्थ करणे, आपल्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींना तो खाण्यासाठी आमंत्रित करणे ही एक सांस्कृतिक रित आहे.
याशिवाय आपल्या घराच्या अंगणात छत्रपति शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या विविध प्रतिकृती तयार केल्या जातात. आपला ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी ही पद्धत सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय दिवाळी (Diwali) अंकांची एक जुनी समृद्ध परंपरा महाराष्ट्रात आहे. अनेक दर्जेदार साहित्या यामुळे वाचकांना मिळते. दिवाळीचे हे एक खास आकर्षण असते. याशिवाय दिवाळी (Diwali) पहाट हा सुद्धा एक असाच लोकप्रिय सांस्कृतिक उत्सव असतो.
अशी ही दिवाळी सर्वांच्या मनात, आयुष्यात एक नवचैतन्य देते. आनंद, उत्साह, समृद्धी आणते.
ज्योती भालेराव.
* सर्व छायाचित्रे – साभार गुगल वेबसाईट.
Leave a Reply