Invincible Daulatabad Fort / Devgiri Fort (Built in AD 1187).

Daulatabad Fort
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

महाराष्ट्रातील औरंगाबाद शहर हे पर्यटनाच्याबाबतीत खास शहर म्हणता येईल. येथे जागतिक आश्चर्य म्हणून गणल्या जाणाऱ्या वेरूळ आणि अजिंठाचे लेणी सौंदर्य तर आहेच. त्यासोबत अनेक लहानमोठी ठिकाणंही आहेत, ज्यांचे इतिहासात एक वेगळं स्थान आहे. येथे महाराष्ट्रातील ‘ताजमहाल’ अशी ओळख असणारे ‘बीबीका मकबरा’ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यासह दौलताबादचा किल्ला (Daulatabad Fort) आहे, जो आजही काळाच्या ओघात टिकून आहे.

हा किल्ला अनेक गड प्रेमींना कायमच भूरळ पाडत असतो. या काही महत्त्वाच्या ठिकाणांशिवाय सुलीभंजन येथील बादशहा औरंगजेबाची कबर, पाणचक्की, वेरूळ अजिंठा शिवायच्या अनेक ठिकाणच्या लेण्या, शिवाजीमहाराजांवरील एक संग्रहालय असा बराच एतिहासिक ऐवज आजही या शहराने टिकवून ठेवलेला दिसून येतो.

औरंगाबाद शहरावर जागोजागी मुघलकालीन वास्तूंचा ठसा जाणवतो. मोठमोठ्या वेसवजा दरवाजांमुळे तर जणू या शहराला मुघलकालीन ‘फिल’ असल्याचे सतत जाणवत रहाते. आजच्या धकाधकीच्या जीवनातही या शहरात एक आश्वस्त, संथ गती जाणवते हे विशेष. औद्योगिक नगरी अशा ओळखीसह  येथील जागतिक दर्जाच्या वारसास्थळांमुळे औरंगाबादला जागाच्या नकाशावर एक आगळे स्थान आहे. देशीपरदेशी पर्यटकांचा येथे कायम राबता असतो.

अजिंक्य असा दौलताबाद किल्ला / देवगिरी किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort)

औरंगाबाद या ऐतिहासिक शहराच्या वारसास्थळांची सफर ‘मिसलेनियस भारत’च्या माध्यामातून आपण करणार आहोत. या वारसास्थळांच्या मालिकेतील पहिले वारसा स्थळ आपण पाहणार आहोत ते दौलताबादचा किल्ला/ देवगिरी किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort).

औरंगाबादला जाण्यासाठी तुम्ही शासनाची लालपरी अर्थात एसटी बस, रेल्वे, विमान, टॅक्सी अथवा स्वतःची गाडी अशा अनेक पर्यायांचा विचार करू शकता. औरंगाबादमधील तसेच अजिंठा,वेरूळ आदी जेवढी काही पर्यटन स्थळे बघायची आहे त्यासाठी तुम्ही मुक्कामासाठी औरंगाबादचा विचार केलेला चांगला. तेथून प्रत्येक स्थळाला भेट देणे सोयीस्कर होते. औरंगाबादपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर दौलताबादचा किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort) आहे.

Daulatabad Fort

येथे पोहोचल्यावर तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक दुकानं, हॉटेलं यांची गर्दी दिसून येते. गाडी पार्किंचीही येथे उत्तम सोय आहे. एका लोखंडी तंटबंदी आणि भव्य भिंतीच्या बाजूने आपली दौलताबादची सैर सुरू होते. सुरूवातीला तिकिट खिडकी आहे. तेथून तिकिट काढून पुढे जावे लागते. येथे तुम्हाला तुमचे फोटो काढून मिळतात. फिरून खाली आल्यावर हे फोटो प्रिंट करून मिळण्याची उत्तम सोय येथे आहे. मागे किल्ल्याचा भव्य व्ह्युव आणि तुमचा फॅमिली फोटो ही संधी तुम्ही नक्कीच घेऊ शकता तेही अगदी मोजक्या पैशात. तिथून पुढे काही अंतर जाताच आपल्याला उजव्या बाजूला किल्ल्याचा भव्य दरवाजा दृष्टीस पडतो.

येथे पोहोचताच तिकीट दाखवावे लागते.त्यानंतर तुमच्याकेडे किती पाण्याच्या बाटल्या आहेत अथवा इतर प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत यांचा हिशोब घेतला जातो, आणि त्यावस्तूंच्या प्रमाणात काही रक्कम तुमच्या कडून जमा करून घेतली जाते. जर तुम्ही संपूर्ण किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort)

फिरताना तुमच्या कडील बाटल्या तिथेच फेकून आलात तर तुमची ही रक्कम परत केली जात नाही, जर बाटलीसह तुम्ही किल्ला फिरून परत आलात आणि किल्ला प्लॅस्टिक मुक्त करण्यात हातभार लावला तर तुमचे पैसे  तुम्हाला परत मिळतात. पर्यटन विभाकडून दौलताबाद (Daulatabad Fort / Devgiri Fort) येथील हा उपक्रम सगळीकडे राबवायला हवा. ही प्रक्रिया पार पाडल्यावर तुम्ही किल्ला निवांत पाहण्यासाठी मोकळे होता.

आत जाताच कधी अगदी थंड वातावरण अनुभवायला मिळते तर कधी अगदी रणरणत्या उन्हात तुम्हाला फिरावे लागणार असते.त्याकाळच्या दगडी बांधकामामुळे आजही अनेक वास्तूंमध्ये थंडगार वातावरण टिकून असते.  मोठमोठे रस्ते, त्याकाळच्या बांधकामाचे उत्तमोत्तम नमुने पहात, मजलदरमजल करत दिड ते दोन तासात तुम्ही हा किल्ला पाहू शकता.

दौलताबाद किल्ल्यावरील महत्त्वाची ठिकाणं –  (Daulatabad Fort / Devgiri Fort)

भव्य दरवाजे – शत्रूपासून संरक्षण मिळावे यासाठी अनेक भव्य दरवाजांची निर्मीती हे अनेक गडकिल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. दौलताबादचा (Daulatabad Fort / Devgiri Fort) हा गडही त्याला अपवाद नाही. येथेही तुम्हाला अनेक भव्य दरवाजे दिसतील. प्रत्येकाची रचना विशेष म्हणता येईल.

महाकोट – (Daulatabad Fort / Devgiri Fort)  किल्ल्याच्या सभोवती असणारी भिंत ही ३ मैल आहे. त्यालाच महाकोट असे म्हणतात. महाकोटातून पुढे जाऊन एका भव्य दरवाजातून प्रवेशासाठी मार्ग आहे. हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी त्यावर खिळे, टोकदार पाती ठोकण्यात आलेली आहेत. त्याच्यामागे एक मोकळे पटांगण आहे. येथे पूर्वी पहारेकऱ्यांसाठी खोल्या होत्या. सध्या काही अवजारे, सामान ठेवण्यात आलेले आहे.

Daulatabad Fort

मूर्ती कला, वस्तू – गडावर प्रवेश केल्यापासून तुम्हाला अनेक मूर्ती, कोरीव काम केलेले दगड, अनेक छोट्या मोठ्या आकारांच्या तोफा अशा अनेक वस्तू, शिल्पकामाचे नमुने जागोजागी बघायला मिळतात.

Daulatabad Fort

कुप्पीकुमा मिनार – येथे एक विशाल निमुळता नळकांडीसारखा दिसणारा मिनार बांधलेला आहे. या मिनारच्या बाल्कनीत एक खिडकी आहे. त्याच्या वरच्या भागात सिंहाची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. येथून संपूर्ण शहर दिसत असावे. सध्या तिथ पर्यंत पोहोचता येत नाही. येथील बराचसा भाग हा भग्नावस्थेत आहे. त्याला लागूनच दीपमाळ बांधण्यात आलेली आहे.  

हत्ती हौद – दौलताबाद (Daulatabad Fort / Devgiri Fort) किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणते येथिल चांद मिनार ही वास्तू. या चांदमिनार पासून जवळच उजव्या हाताला काही पायऱ्या आपल्या नजरेस दिसतात. त्या चढून गेलो की हा भव्य हौद नजरेस पडतो. हा हौद ११५ फूट चौरस आकाराचा आहे. त्याची खोली २५ फूट खोल आहे. अशा या मोठ्या हौदात जमिनीखालून पाणी भरण्याची आणि ते काढून टाकण्याची सोय करण्यात आलेली होती. जर कोणाला पोहोता येत नसेल तरी त्या व्यक्तीलाही या हौदात डुंबण्याचा आनंद घेता येई अशी त्याकाळी त्याची रचना करण्यात आली होती. सैनिकांना पोहोण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी तसेच जलक्रिडा करण्यासाठी याचा उपयोग होत असावा.

Daulatabad Fort

जैन मंदिरं – हत्ती हौदाच्या लगतच्या बाजूने पुढे गेलात की तुम्हाला मंदीरांचा रस्ता लागतो. पूर्वी येथे मंदिरे असल्याच्या खाणाखुणा आढळतात. आज त्यांचे अनेक अवशेष पहायला मिळतात. मंदिरांचे खांब, तुळ्या, छताचा काही भाग आजही बघता येतो. या मंदिराच्या आतील मैदानात दोन्ही कडे दोन आणि समोर एक अशी एकुण तीन दालने आहेत. आज जे काही अवशेष, आराखडा उरलेला आहे तोही इतका लाजवाब आहे की आपली नजर जाईल तिकडे शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने दिसतात. या मंदिराचा एक मोठा कक्ष आज टिकून आहे. अनेक खांबांच्या रांगा आणि त्याचे बांधकाम फार मोहक आहे. एकुण या १५० खांबांवर या कक्षाचे छत उभारण्यात आलेले आहे.

१३१८ ते १३१९ या दरम्यान कुतुबुद्दीन मुबारक खिलजी येथे वास्तव्यास होता. त्याकाळात त्याने हे भव्य मंदिर तोडून येथे मशिद बांधली होती. सध्या तेथे भारतमातेची प्रतिकात्मक मूर्ती बसवण्यात आलेली आहे. या भागात तुम्ही शांतपणे बराच काळ घालवू शकता. या संपूर्ण परिसरावर नुसती नजर फिरवली तरीही त्याकाळच्या देवगिरी साम्राज्याच्या वैभवसंपन्नतेची आपल्याला कल्पना येते.

चांद मिनार – भारत मातेच्या मंदिरातून बाहेर पडल्यावर आपण चांदमिनारपाशी येऊन पोहोचतो. येथे अल्लाउद्दीन ने बांधून घेतलेला २१० फूट उंचीचा एक गोलाकृती मीनार आहे. इ.स. १४३५ मध्ये बांधण्यात आलेल्या या मिनारच्या मध्यभागातील दालन हे खणांवर आणि लहान लहान खांबांवर उभारण्यात आलेले आहे. मिनारच्या शिखरावर जाण्यासाठी एक वतृळाकृती शिडी आहे. चौकोनी भुयाराच्या एकीकडे मशिद तर दुसरीकडे नगारखाना आहे.

चांदमिनारच्या पुढे काला कोट प्रवेशद्वारानजिक हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष सापडतात. यात समतल छत आणि खांब असलेला एक मोठ्ठा कक्ष आहे. येथे कोणत्याही देवदेवतांच्या मूर्ती नाहीत हे विशेष. ही मिनार दगडांनी बांधलेली असून सिमेंटचा वापर न करताही हे दगड बसवण्यात आलेले आहेत. नंतरच्या काळात येथील मंदिरांच्या जागांचा मशिदींसारखा उपयोग होत असे.

कालाकोट (मृत्युद्वार )  – दौलताबाद(Daulatabad Fort / Devgiri Fort)  किल्ल्याला जी भिंत बांधलेली आहे, त्यापासूनचा हा तिसरा भाग आहे. कालाकोटचे हे प्रवेशद्वार हे पुढे एका डोंगरावर आहे. तिथे जाण्यासाठी येथून सुरूवात होते. येथे पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. येथे तीन दरवाजे आहे. आजही चांगल्या स्थितीत असणारे हे दरवाजे भव्य आहेत. प्रत्येक दाराला अनेक छिद्र करण्यात आलेले आहेत. त्या छिद्रातून शत्रूवर मागून, पुढून हल्ला करण्यात येत असे. याच्यावर चिनी महालाचे अवशेष आहेत. या महालासाठी चिनी टाईल्सचा वापर करण्यात आल्याने त्याला हे नाव दिल्याचे सांगण्यात येते.

निजामशाहीचा महाल – येथे बरेच भग्न अवशेषच आपल्याला बघायला मिळतात. येथील खांब आणि खणांमधील लाकडांवर केलेलं नक्षीकाम पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारं आहे.

मेंढा तोफ  – दौलताबाद (Daulatabad Fort / Devgiri Fort) किल्ल्यावरील अनेक तोफांमधील ही एकमेव प्रचंड आकाराची तोफ आहे. ही तोफ निझामशाही महालाच्या समोर एका बुरूजावर ठेवलेली आहे. या तोफेचं मुळ नाव ‘शिकन तोफ’ म्हणजेच किल्ला उद्धवस्त करणारी तोफ असे होते. या तोफेवर काही मजकूर कोरलेला आहे. त्यात दोन उल्लेख असून एकात संपूर्ण खिताबांसहित औरंगजेबाचा नामोल्लेख आहे तर दुसरीकडे तोफनिर्मात्याचे नाव ‘मुहम्मद हसन अमल ए अरब’ लिहिण्यात आलेले आहे.

तोफ अशा प्रकारे ठेवण्यात आलेली आहे की तोफधारी सैन्य शत्रूसैन्यावर विस्तिर्ण क्षेत्रात हल्ला चढवू शकत असे. बुरूजाच्या मध्यभागी तोफांचे तोंड फिरवण्यासाठी भक्कम व्यवस्था करण्यात आलेली आहे. तोफेला बघूनच आपल्याला मोगल साम्राज्याच्या युद्धबळाची प्रचीती येते.

दरी – आपण किल्ला पहात, अनेक दरवाजे पार करत पुढे येतो तसे आपल्याला एक खोल दरी आणि मधोमध दोन पुल  विशिष्ट अंतरवार बांधलेले दिसतात. यातील सध्याचा आधुनिक पद्धतीने बांधलेल्या पुलावरूनच पुढील किल्ला पाहण्यासाठी जा ये केली जाते. मात्र पूर्वीचा बांधलेला पुल हा थोडा खाली दगड आणि विटांनी बांधण्यात आलेला आहे. बाजूला धरणसदृश्य बांधारे बांधलेले आहे. पूर्वी याच पूलावरून जाण्यासाठी मार्ग होता.

Daulatabad Fort

दरीतील पाणी कमीजास्त करण्यासाठी त्याकाळी बांधाऱ्यावरून सोय होती हे मोठे आश्चर्य म्हणता येईल. धोक्याच्या प्रसंगी शत्रूसैन्याला थोपवून ठेवण्यासाठी एका धरणातून पाणी सोडण्यात येई. त्यामुळे पुल पाण्याखाली लपवण्यात येई. या पुलावरून पुढे जाताना किल्ल्याचा  (Daulatabad Fort / Devgiri Fort)

 रोमांचकारी भाग सुरू होतो. पुढे एक मोठा भुयारी मार्ग जातो जेथे अनेक ठिकाणी अंधार, पाणी यांचा सामना करत आपल्याला चढ उतार करत मार्गक्रमण करावे लागते. हा भूयारी मार्ग पार करताना पर्यटकांची खरी दमछाक होते. येथून बाहेर पडल्यावर पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर एक रंगदार कमान लागते, जिथे बाजूला एक गणेशाचे छोटे पण सुंदर मंदिर आहे. येथिल गणेशाची मुर्ती फारच प्रसन्न आणि सुंदर आहे. या मंदिराच्या अलिकडून मोठ्या पायऱ्यांचा एक मार्ग लागतो.

बारादारी – येथपर्यंत येई पर्यंत आपण खुप दमलेलो असतो, कुठेतरी विसावा घ्यावा वाटतो आणि तरीही आपण मार्ग चढत असतो आणि एका वळणावर बारादरीतला एक महाल समोर दिसताच आपल्याला फार सुखद धक्का बसतो. स्थापत्यकला ज्याच्या काळात बहरली, त्याला वावा देण्यासाठी प्रसिद्ध असणारा बादशहा शाहजहाँच्या काळात त्याने हा महाल बांधून घेतल्याचे सांगतात. एका उंच ओट्यावर हा महाल बांधल्यासारखा हा महाल दिसतो. तिथून आत जाताच अरूंद रस्त्यावरून पुढे गेल्यावर मोठ्या जिन्यांवरून वर हवेशीर चौरस पटांगणावर आपण पोहोचतो. मध्यभागी उभे राहिल्यावर चहूबाजूंनी मोठ्या खिडक्यांची दालनं आहेत.

याच्या पूर्वबाजूला अष्टकोनी खोल्या आहेत. या खोल्यांची छतं ही घुमटाकृती आहेत. या महालाच्या कोणत्याही खिडकीतून बाहेर पाहिले तर निसर्गाचे मनोहारी दर्शन आपल्याला होते. संपूर्ण किल्ला चढून जो काही थकवा आलेला असतो तो या महालात येऊन नाहीसा होतो. थंडगार हवा, बाजूला उंचावरून दिसणारा निसर्ग आणि शांत, भव्य दालनं, घुमट यामुळे तुम्ही येथे कितीही वेळ घालवू शकता. या संपूर्ण महालाचं बांधकाम हे दगड आणि चुना यांच्या जाड थरापासून करण्यात आलेलं आहे. आतील नक्षीकामही चुन्याच्याच थरापासून करण्यात आलेलं आहे. याच्या पुढे गेल्यावर शिखर बुरूज आहे.

या बुरूजाखाली डोंगर पोखरून उभारलेल्या गुहा आहेत. येथे संत एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामींच्या एका दगडावर पाऊलखुणा आहेत. येथे ही एक तोफ ठेवलेली असून त्याला ‘काला पहाड ‘असे म्हटले जाते.

हा किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort) तुम्ही जितका निवांत बघाल तेवढे चांगले. अनेक जागा, वास्तू, शिल्प आहेत जे पाहण्याच्या राहून जाऊ शकतात.

दौलताबाद किल्ल्याचा इतिहास – History of Daulatabad Fort/Devgiri Fort

आजचे दौलताबाद किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort) एकेकाळी देवगिरी नावाने प्रसिद्ध होते. या देवगिरीचा (Devgiri )इतिहास खरोखर फारच रोमांचकारी आहे.  हा सगळा भाग एकेकाळी कल्याणमधील चालुक्यवंशीयांच्या अधिपत्याखाली होता. इ.स. ११९० नंतर कल्याणच्या या ‘चालुक्यवंशीय’ साम्राज्याचे तीन भागात विभाजन झाले. देवगीरीचे ‘यादव’, वारंगलचे ‘काकतिय’ आणि द्वार समुद्रच्या ‘होयसाल’ अशा वंशांमध्ये मुळ चालुक्यवंशीय साम्राज्य विभागले गेले. पूर्वी ‘स्यून’ देश म्हणून ओळखला जाणारा नाशिक ते देवगिरीपर्यंतचा भूभाग हा अत्यंत वैभवसंपन्न होता. येथील बिल्लमा, जैत्रपाल, सिंघाना हे यादव राज्यकर्ते उत्तम राज्यकर्ते होते.

त्यांच्या छत्रछायेखाली भास्कराचार्यांचे ज्योतिर्विज्ञान, हिमाद्री आणि भोपदेव यांची साहित्यकला आणि ज्ञानेश्वरांच्या दर्शनशास्राने त्यावेळी उत्कर्षाचा चरमबिंदू गाठला होता. हा प्रदेश सोने, चांदी, मोती, जडजवाहि‍रे आणि इतर मौल्यवान वस्तूंनी समृद्ध होता.   देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्याचा विस्तार अगदी महाराष्ट्रातील खान्देशापर्यतं झालेला होता. यापूर्वी बदामीचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल, शक, क्षत्रप, सातकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना,राष्ट्रकूट यांच्यानंतर म्हणजे बाराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रातील खान्देशासह मराठवाड्यात आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता.

कृष्णा नदीच्या उत्तरेकडे या यादवांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांच्या वंशातील दुसरा भिल्लमा या राजाने ‘देवगिरी’ या शहराची स्थापना केली होती.  तेथूनच तो आपले राज्य चालवत असे. पुढे या यादवांच्या पुढील पिढ्यांनी महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ आणि काही परिसर आपला साम्राज्यात आणण्याचे काम केले. मात्र इ.स. १२९६ मध्ये ‘अल्लाउद्दीन खिलजची’ या समृद्ध प्रदेशावर नजर गेली. त्या वैभवासाठी त्याने केलेल्या आकस्मिक आक्रमणाला तोंड तर दिले मात्र नुकसान आणि लुट रोखू शकले नाहीत. इ.स. १३२७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने दख्खन प्रातांवर अनेक आक्रमणे केली. त्यातील अनेक लढाया यादव जिंकले.

त्यामुळे खिलजीला त्याची ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. मात्र या सगळ्या लढायांमध्ये खिलजीने ‘देवगिरी’ किल्ल्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लुटमार केली होती. पुढे खिलजीचे हे काम ‘मुहम्मद बिन तुघलक’ (इ.स. १३२४ ते इ.स. १३५० ) या दिल्लीच्या दुसऱ्या एका सरदाराने केले. त्याने आपली सत्ता वाढवत थेट दक्षिणेतील मदुरेपर्यंत नेली होती. सत्ताविस्ताराचा भाग म्हणून त्याने आपली राजधानी ‘देवगिरीवर’ आणली होती. त्यानेच या किल्ल्याचे ‘देवगिरी’हे नाव बदलून त्याला ‘दौलताबाद’ (Daulatabad Fort / Devgiri Fort) हे नाव दिले. मात्र दिल्लीहून राजधानी देवगिरीला आणण्याचा त्याचा प्रयत्न फसल्याने,  त्याला परत आपली राजधानी दिल्लीला न्यावी लागली. त्यानंतर पुन्हा या किल्ल्याचे नाव ‘देवगिरी’ करण्यात आले. मुहम्मद तुघलकच्या काळात ‘देवगिरीला’ राजधानीचे शहर म्हणून एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते.

अशा प्रकारे यादवांनी निर्माण केलेल्या या देवगिरी वर प्रथम तुघलकांचे आक्रमण झाल्याचे दिसते. देवगिरी ते औरंगाबाद हा प्रवास कसा झाला हे आता आपण समजून घेऊ. इ.स. १३४७ ते इ.स. १५०० हा काळ तुघलकांची सत्ता क्षीण होण्याचा काळ समजला जातो. तुघलकांची सत्ता अस्ताला जाताना अल्लाउद्दीन हसन बहामनी याच्या अधिपत्याखाली दक्षिणेत इ.स. १३४७ ला बहामनी घराण्याची स्थापना झाली. पुढे सुमारे १५० वर्षे हे राज्य टिकून राहिले. बहामनींच्या काळातही काही काळ ‘देवगीरी’ हे राजधानीचे ठिकाण होते. पुढे याही सत्तेची पाच विभागात शकले झाली. गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची/विदर्भाची /एलिचपूरची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बिरीदशाही.

या पाच विभागात ही सत्ता विभागली गेली. पुढे १४९९ मध्ये दौलताबाद म्हणजेच देवगीरीचा भाग हा अहमदनगर सल्तनतीचा भाग झाला. अहमदनगरचा लष्कर प्रमुख मलिक अंबर जो एक सिद्दी (अफ्रिकन वंशाचा ) होता त्याने अहमदनगरच्या कारभारासाठी सध्याच्या औरंगाबादच्या जवळ इ.स. १६१० मध्ये खडकी नावाचे नवीन शहर स्थापन केले. पुढे त्याचा मुलगा फतेह खान याने त्याचेच नाव बदलून फतेहनगर केले.

सतराव्या शतकाच्या शेवटी अहमदनगरच्या निजामशाहीसह ही पाचही शाही सत्ताकेंद्रे मोगल साम्राज्यात विलीन झाले. त्यासुमारास १६३६ मध्ये औरंगजेब जो त्यावेळी मुगलसाम्राज्याचा मोगल व्हॉयसरॉय होता. त्यानेच या दौलताबादला मोगल साम्राज्याला जोडले. १६५३ मध्ये औरंगजेबाने शहराचे नाव बदलून ‘औरंगाबाद’ केले आणि या शहराला मुगल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशाची राजधानी बनवली होती. पुढे या शहराने आणखीही अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहिली. मात्र देवगिरी ते औरंगाबाद हा त्याचा प्रवास रंजक म्हणता येईल.

दौलताबाद किल्ल्याची वैशिष्ट्ये –

महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैंकी एक म्हणून या किल्ल्याची (Daulatabad Fort / Devgiri Fort) गणना होते. देवगिरी किल्ला म्हणजेच दौलताबादचा किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort) हा यादवांच्या काळात बांधला गेल्याचे त्याच्या इतिहासावरून समजते.

हा गिरीदूर्ग प्रकारातील किल्ला आहे. औरंगाबादमधिली ‘दौलत’ या गावामध्ये हा किल्ला आहे. शंकूच्या आकाराचा किंवा शंकराच्या पिंडीसदृश्य या किल्ल्याचा आकार असल्याचे सांगण्यात येते. या किल्ल्यावर अनेक शासकांनी आपली सत्ता चालवली परंतु बळाचा वापर करून किंवा युद्ध करून हा किल्ला कोणीही त्यावेळी जिंकू शकलेला नाही. असा हा अजिंक्य किल्ला म्हणता येईल.

दौलताबाद हा किल्ला बांधण्याचे काम यादव वंशातील पाचवा भिल्लम राजा यांनी केले. देवगिरी नगराची स्थापना करून तेथे इ.स. ११८७ मध्ये हा किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort) बांधण्यात आला. इ.स. १२९६ त्यांनी या किल्ल्याला आपली राजधानी बनवली.

दौलताबाद किल्ल्याच्या  आकाराविषयी –

(Daulatabad Fort / Devgiri Fort) दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलत या गावात असून औरंगाबादपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. गिरीदूर्ग प्रकारातील या किल्ल्याची उंची २९७५ फुट असून हा किल्ला २०० मीटर उंच असणाऱ्या एका डोंगरावर बांधण्यात आलेला आहे. संपूर्ण किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ९४ एकर आहे. येथे अनेक छोट्या मोठ्या आकारातील वास्तू आजही चांगल्या स्थितीत आपल्याला पहायला मिळतात. चांदमिनार, तीन पदरी सुरक्षात्मक घेरा, तोफांचे संग्रहालय, चीनी महाल, किल्ल्याचे बुरूज,भद्रा मूर्ती मंदिर, पायरी विहीर, गुहा, विविध वाड्या, बरादरी, जलाशय अशा अनेक वास्तू काळाच्या कसोटीवर आजही टिकून आहेत.

दौलताबाद किल्ल्याविषयीची आवश्यक माहिती.

दौलताबाद किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort) हे भारताचं एक सुरक्षित राष्ट्रीय एतिहासिक स्थळ आहे.

दौलताबादचा किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort) पर्यटकांसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत खुला असतो.

औरंगाबादपासून १५ किलोमीटर अंतरावर वेरूळ लेण्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort) लागतो. संपूर्ण किल्ला निवांत बघण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.

किल्ल्याच्या (Daulatabad Fort / Devgiri Fort) आतील भागातील लेण्या बघण्यासाठी तसेच मुख्य भुयारी मार्गातून जाण्यासाठी सोबत टॉर्च नेणे सोयीचे ठरू शकते.

किल्ल्याच्या (Daulatabad Fort / Devgiri Fort) मोकळ्या भागांमध्ये, झाडांवर येथे वानरांचा भरपूर वावर आढळून येतो. त्यामुळे येथे सावध राहून फिरावे लागते. खाद्यपदार्थ हातात घेऊन चालणे धोक्याचे ठरते.

किल्ल्याच्या पायथ्याला पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. मात्र किल्ल्यावर कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नाही, विक्रेतेही वर थांबत नाही. त्यामुळे किल्ला सर करताना तुम्ही आवश्यक सामान घेऊनच किल्ला सर करा.

महाराष्ट्रात अनेक लहान मोठे गड किल्ले आहेत, त्यातील हा दौलताबादचा किल्ला (Daulatabad Fort / Devgiri Fort) जो तुम्हाला पर्यटनाचा आनंद तर देतोच, तसेच एका मोठ्या ऐतिहासिक काळाचीही तुम्हाला सफर घडवतो ज्याच्यात देवगिरी, निजामशाही, मुघल असा मोठा कालखंड सामावलेला आहे. तेव्हा औरंगाबादला गेलात तर दौलताबादला (Daulatabad Fort / Devgiri Fort) नक्की भेट द्या.

ज्योती भालेराव.

8 thoughts on “Invincible Daulatabad Fort / Devgiri Fort (Built in AD 1187).”

  1. Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do it Your writing style has been amazed me Thank you very nice article

    Reply
  2. Hi Neat post Theres an issue together with your web site in internet explorer may test this IE still is the marketplace chief and a good component of people will pass over your fantastic writing due to this problem

    Reply
  3. I am not sure where youre getting your info but good topic I needs to spend some time learning much more or understanding more Thanks for magnificent info I was looking for this information for my mission

    Reply

Leave a Reply