Dr. Babasaheb Ambedkar Museum, Pune -Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Special – (December 6, 1956)

Dr. Babasaheb Ambedkar
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, पुणे -डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष – (६ डिसेंबर १९५६)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या (Dr. Babasaheb Ambedkar) महापुरूषाच्या स्पर्शाने पावन झालेल्या अनेकानेक वस्तूंचे संग्रहालय पुण्यनगरीत आहे. भारतीय  राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि मानवतेचे पुजारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याची ओळख करून देणारे  चिरंतन स्मारक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची छायाचित्ररूपी मालिका आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचा आठवणीरुपी ठेवा येथे आहे, हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचा परिसस्पर्श झालेल्या वस्तू, त्यांचा पवित्र अस्थिकलश, भारतरत्न पदक व मानपत्र हे सगळे संग्रहालय उभे कारण्यासाठी दान केले. आणि त्यातूनच हे भव्यदिव्य संग्रहालय उभारण्यात आले आहे.

Babasaheb Ambedkar

बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या इमारतीविषयी –

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर ही वास्तू आहे. या संग्रहालयाची वास्तू बुद्धवास्तुकलेच्या शैलीतील आणि स्तूपाच्या आकारात बांधलेली आहे. सिंबायसीस सोसयटीने १४ फेब्रुवारी १९९०ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या (Dr. Babasaheb Ambedkar) हे संग्रहालय आणि स्मारकाची स्थापना केली.

२६ नोव्हेंबर १९९६ ला तत्कालिन उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते याचे उद्धाटन करण्यात आले. सिंबायसीस महाविद्यालयाच्या बाजूलाच हे संग्रहालय आहे. बाबासाहेबांच्या पांढऱ्याशुभ्र संगमरवरी अर्धपुतळयाच्या दर्शनाने या स्मारकाची सुरुवात होते. संग्रहालयाच्या बाहेरील परिसर निसर्गरम्य आहे.

संग्रहालयाविषयी –

येथे बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंतची, तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांची दुर्मिळ छायाचित्र पाहून ते ज्या तत्त्वांसाठी जगले त्याचा समर्पक परिचय आपल्याला होतो. एका निमुळत्या मार्गाने छायाचित्रांचा संग्रह पहात पहात आपण संग्रहालयाची सफर करण्यास सुरुवात करतो. एक एक छायाचित्र हे बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचा, त्यांच्या बुद्धीमत्तेचा आणि संघर्षाचा परिचय करून देणारे आहे. तुमच्या हाती असणाऱ्या वेळेनुसार तुम्ही हा छायाचित्रांचा ठेवा न्याहाळू शकता.

बाबासाहेबांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा या संग्रहालयात आहे. त्यामुळे त्याचा आवाकासुद्धा फार मोठा आहे. हे संग्रहालय वेगवेगळ्या दालनांमध्ये विभागलेले आहे. एक एक दालन बघताना बराच वेळ हाताशी असायला हवा.

बाबासाहेबांनी (Dr. Babasaheb Ambedkar) मिळवलेल्या पदव्या, परदेश भ्रमण करीत असताना त्यांना मिळालेल्या भेटी याचे खास असे दालन आहे. दुसऱ्या दालनात राज्यघटना लिहिताना त्यांनी वापरलेल्या विशिष्ट खुर्च्या आहेत. याच ठिकाणी बाबासाहेब राज्यघटना लिहीत असतानाच्या अवस्थतेतील पुतळा आहे. ज्या खुर्चीत बसून त्यांनी राज्यघटनेची प्रत समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली ती खुर्चीही येथे पहायला मिळते.

बाबासाहेबांचे (Dr. Babasaheb Ambedkar) निधन ज्या पलंगावर झाले तो पलंग, त्यावर लावलेले घड्याळ त्यांच्या निधनाची वेळ दाखवत आजही येथे पहायला मिळते. बाबासाहेबांच्या रोजच्या वापरातील भांडी, कपडे असा मोठा ऐवज येथे संग्रहित आहे. एका डायनिंग टेबलर ते व्यवस्थित मांडून ठेवण्यात आलेले आहे. एक एक वस्तू म्हणजे बाबासाहेबांची आठवण आहे, त्यांच्या टापटीपीची जाणीव करणारी आहे.येथील खरे आकर्षण आहे ते म्हणजे बाबासाहेबांना मिळालेले भारतरत्न हे पदक.

हे पदक येथे डीजीटल स्वरूपात  पहायला मिळते. फक्त १४ एप्रिलला त्यांच्या जयंतीदिनी प्रत्यक्ष पदक येथे पर्यटकांसाठी ठेवण्यात येते. सुरक्षेच्या दृष्टीने एरवी डीजीटल स्वरूपातच हे आपल्याला येथे पहायला मिळते.  याशिवाय बाबासाहेबांच्या अनेक वस्तू आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत. त्यांच्या चष्म्याच्या फ्रेम, सिगारेट केस, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू अशा अनेक वेगळ्या वस्तू आहेत. या पदकाच्या जवळ ठेवण्यात येणारी बुद्धाची मुर्ती आकर्षणीय आहे. बाबासाहेबांच्या वापरातील ही मुर्ती असल्याचे सांगण्यात येते.

येथील वस्तूंचे चांगल्याप्रकारे जतन करण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. ज्यावस्तू खुप जुन्या आहेत त्यावर वातावरणाचा कुठलाही परिणाम होऊन त्या खराब होऊ नये याची पुरेपर काळजी घेण्यात येत असल्याचे सिंबायसीस सोसायटीकडून सांगण्यात येते. त्यावरील धुळ, आदींची वेळेवेळी स्वच्छता करण्यात येते. संग्रहालयातील वस्तू त्यांच्या जन्मापासून मृत्युपर्यंतच्या कालक्रमानुसार लावण्यात आलेल्या आहेत.

आंबेडकरांची (Dr. Babasaheb Ambedkar) बरीच पुस्तके, इतर लेखकांची पुस्तके असणारे ग्रंथालय या संग्रहालयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. संग्रहालयाच्या इतर भागात कॉन्फरन्स हॉल, सभागृह, संग्रहालयाचे दुकान आणि विश्रामगृह आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी –

डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे पूर्ण नाव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे आहे. (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६) हे भारतीय न्यायशास्रज्ञ, अर्थशास्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्तज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. महिलांच्या, कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ब्रिटिश भारताचे ते मजूरमंत्री होते. स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे संबोधले जाते.

बाबासाहेबांचे शिक्षण –

बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी कोलंबिया विद्यापिठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनिमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदव्या मिळवल्या. त्यांनी कायदा, अर्थशास्र आणि राज्यशास्र या विषयांवर संशोधन केले. त्यांनी सुरूवातीला अर्थशास्रज्ञ, प्राध्यापक आणि वकिल होते. नंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. त्यांनी काही वृत्तपत्रे सुरू केला. चळवळी उभारल्या. आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान दिले आहे. इ.स. १९५६ मधे त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. इ.स. १९९० मधे त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

कधी भेट देऊ शकता ?

हे संग्रहालय आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सकाळी ९ :३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते. मोठ्या माणसांसाठी १० रुपये आणि लहान मुलांसाठी ५ रुपये शुल्क आकारण्यात येते. छायाचित्रणासाठी कॅमेरे न्यायचा असल्यास त्यासाठीचे वेगळे शुल्क आकारले जाते. प्रत्येक कॅमेरासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. हे संग्रहालय त्यातील प्रत्येक वस्तू पहाताना जाणवते की, बाबासाहेबांचे (Dr. Babasaheb Ambedkar) जीवन कितीही संघर्षाचे असले तरी त्यांचा जीवन जगतानाचा दृष्टीकोन किती कलासक्त होता. त्यांचा वस्तू, कपडे याची ते साक्ष देतात. त्यांनी तळागाळातील समाजाला संदेश दिला तो त्यांच्या वागणुकीतून.

Babasaheb Ambedkar

त्यांची ग्रंथसंपदा पाहून समजते माणसाणे किती ज्ञानपिपासू असले पाहिजे. त्यांच्या वस्तू पाहून समजते की टापटीप राहणीमान असणे किती महत्त्वाचे आहे. त्यांनी दलित, गांजलेल्या समाजाला हाच संदेश, शिकवणूक दिली की, ज्ञान मिळवा, शिका कारण त्यातून आपले जीवनमान उंचावणार आहे. एकदा का तुम्ही शिकला की तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. संपूर्ण संग्रहालय पहाताना त्यांचा हाच संदेश आपल्याला खुणावत राहतो.

ज्योती भालेराव.

आपण या संग्रहालयात कसे पोहोचाल

6 thoughts on “Dr. Babasaheb Ambedkar Museum, Pune -Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Special – (December 6, 1956)”

Leave a Reply