Table of Contents
ज्ञानेश्वरीचा (Dnyaneshwari) पैस खांब (इ.स. १२९०) – नेवासा, अहमदनगर
संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील, पैठणमधील (Paithan) आपेगाव या ठिकाणी झाला. लहाणपण त्यांचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी (Devachi Alandi) याठिकाणी गेले. संन्यासी आई-वडिलांची मुले म्हणुन ज्ञोनोबा आणि त्यांची तीन भावंडांनी अनेक हालअपेष्टांचा सामना केला.
अशाच एका प्रसंगी आपल्याला शुद्धीपत्र मिळावे यासाठी ही भावंडे पैठण येथे गेली होती. तेथून पुढे ती नेवासे याठिकाणी येऊन राहिली. पुढे सुमारे दोन वर्षे ते येथेच वास्तव्यास होते. या दोन वर्षातच ज्ञानोबांनी अवघ्या मराठीसाठी गौरवशाली असणाऱ्या ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) सारख्या ग्रंथांची निर्मीती केली.
संत ज्ञानेश्वरांची अलौकिक निर्मिती असणारा ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ (Dnyaneshwari Grantha) नेवासे या गावी निर्माण झाला. ज्या खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरीचे निरूपण केले तो खांब आजही याठिकाणी आपले स्थान टिकवून आहे. एका साध्याशा दगडी खांबाला या अलौकिक संताचा स्पर्श झाला आणि त्याला आजच्या जगात देवत्व प्राप्त झालेले आहे. या खांबाला पैस खांब असेही संबोधले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा हे गाव प्रवरा नदिच्या तिरावर वसलेले आहे. माऊली याठिकाणाचे वर्णन करताना म्हणतात, “त्रिभूवनैक पवित्र, अनादी पंचक्रोळ क्षेत्र जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे”.
याठिकाणी त्याकाळी श्री करविरेश्वराचे (महादेवाचे) मंदिर होते. त्यामुळे ही भावंडे येथे राहिली. येथे राहून या पैस खांबाला टेकून ज्ञानोबांनी भावार्थदिपीका (Dnyaneshwari) (Bhavarthadipika),अमृतानुभव अशा अलौकिक ग्रंथांची निर्मिती केली.
पैस खांबाचे वैशिष्ट्ये –
पैस खांब कातिव, काळा आहे. त्याचे साधे पाषाणरूप आपल्याला खिळवून ठेवते. हाच तो खांब त्याचा टेकू घेऊन अवघ्या सोळा सतरा वर्षांच्या ज्ञानोबा माऊलींनी ग्रंथ निर्मितीचे अलौकिक काम केल्याचे आठवून आपण शहारून जातो.
या पैस खांबाची उंची चार फूट पाच इंच आणि रूंदी सोळा इंच आहे. मध्यम उंची असणाऱ्या माणसापेक्षासुद्धा कमी उंचीचा हा खांब आहे असे म्हणता येईल. ना कुठले कोरीव काम, ना कुठले शिल्प चितारलेले, मात्र तरी अवघ्या वारकरी संप्रदायासाठी या पैस खांबाचे महत्त्व अपार आहे.

एका साध्याशा खांबाचे मंदिर असणे हीच एकमेद्वितीय अशी गोष्ट म्हणावी लागेल. प्रत्येक वारकरी बांधवाला याचे दर्शन घेऊन माऊली भेटल्याचा साक्षात्कार होतो.
ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख पैस म्हणजे अवकाश अशा अर्थाने येतो. जणूकाही अवघ्या मानवजातीच्या जगण्याचा अर्थ सांगणारा असा अवकाश म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आणि तो ज्याच्या साक्षीने लिहिला गेला तो खांब म्हणजो पैस खांब.
ज्ञानेश्वर महाराजलिखित ज्ञानेश्वरी आणि इतर ग्रंथसंपदा
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ (Dnyaneshwari Grantha) त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांच्याच आदेशावरून लिहिला होता. तेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने – ६.१४) (Dnyaneshwari Adhyay 6.14)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषे विषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० (Dnyaneshwari 1290) मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ हा आहे. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. हे दोन्ही ग्रंथ नेवासे याच ठिकाणी पैस खांबाला टेकून ज्ञानोबांनी सांगितले आहेत.
चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
ज्ञानेश्वरीच्या (Dnyaneshwari)ओव्या लिहून घेणारे सच्चिदानंदबाबा –
नेवासा या गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत आहे. अशा या पुराणकालीन गावातून सुमारे आठशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे मार्गक्रमण करत होती. त्यांच्या समोरून एक प्रेतयात्रा जात असताना काही कारणाने या चार भावंडांपैकी ज्ञानोबा माऊलींनी त्या प्रेताला जिवंत केल्याची आख्यायिका सांगितली जाते. ज्यांना जिवंत केले तेच हे सच्चिदानंदबाबा ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखिताचे लेखक. या ग्रंथाच्या निर्मितीत त्यांचा सहभाग मोलाचा मानला जातो. त्यांच्याच हस्ताक्षरातून हा ग्रंथ प्रथम लिहिला गेला.
ज्ञानेश्वर माऊलींची भगवदगीतेवरील टीका म्हणजे अर्थात ज्ञानेश्वरीचा शेवट या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने होतो.
शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें ||
सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला ||
खरं तर देशाला स्वातंत्र्यमिळे पर्यंत हे ठिकाण दुर्लक्षित राहिले. याला खरी उर्जितावस्था प्राप्त करून देण्यात मोलाची भूमिका बजावली ती ‘कै. बन्सी महाराज तांबे’ यांनी. त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य खर्च केले, ते पैस खांबाच्या निर्मितीच्या ध्यासापायी. इ.स. १९३९ ते १९४७ पर्यंतचा काळ त्यांनी या पैस खांबाविषयीच्या जनजागृतीसाठी व्यतित केला. मामासाहेब दांडेकर यांच्या मदतीने २५ मार्च १९४९ मध्ये या मंदिराची कोनशिला बसवण्यात आली. पुढे लोकाश्रय आणि राजाश्रयातून २२ मार्च १९६३ ला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

विकासप्राधिकरणाच्या माध्यमातून आता येथे पर्यटनाच्या दृष्टीने काही विकासकामे करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मागे संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहून घेणारे सच्चिदानंदबाबा यांचा भव्य पुतळा आणि उद्यान उभारण्यात आले आहे. अहमदनगरमधील अनेक चांगल्या वारसास्थळांप्रमाणेच याठिकाणीही आणखी चांगल्या सोयीसुविधांची आणि पर्यटन जागृतीची मात्र गरज असल्याचे जाणवते.
ज्योती भालेराव.
Leave a Reply