Table of Contents
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पवित्र दीक्षा भूमी (Deekshabhoomi) ( नागपूर,१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ )
नागपूर शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. ‘ऑरेंज सिटी’ अशी या शहराची ओळख. एक निवांत, ऐसपैस शहर, जिथे आपण शांततेने, मनसोक्त हिंडूण्याचा आनंद घेऊ शकतो. इथल्या खास नागपुरी तिखट पदार्थांचा आणि संत्राबर्फीचा आस्वाद घेत आपण येथील अनेक पर्यटनस्थळ फिरतो. मोठे शहर असूनही या शहराने जो एक निवांतपणा जपला आहे त्याला खरच तोड नाही. नागपूर शहर फिरण्याचे माझे अनेक कारणं होते , त्यातील महत्वाच मुख्य कारण होतं ते येथील दीक्षा भूमीला (Deekshabhoomi) भेट देण्याचं. दीक्षा भूमीचं महत्त्व वाचून माहीत होतच, मात्र त्याला भेट देणं हा खरोखर एक अपूर्व अनुभव होता. एखाद्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार असणारी भूमी लोकांमध्ये इतकी लोकप्रिय असू शकते हे इथे आल्यावर समजते. दीक्षा भूमीचं (Deekshabhoomi) पावित्र्य आणि भव्यता प्रवेशद्वारपासुनच जाणवते. आपण येथून आत जाताच समोरच एक भव्य स्तूप आपल्यानजरेस पडतो. मुख्य दरवाजापासून त्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण अर्धा किमीचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. अर्धा रस्ता पार केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक मोठा वृक्ष नजरेस पडतो. महा बोधीवृक्ष (Maha bodhi vriksha) असे त्यावर लिहिण्यात आलेले आहे. गौतम बुद्ध आणि बोधी वृक्ष याचे अतूट असे नाते आहे. याच ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्ध धर्म (buddha dharma) स्वीकारत आपल्याला अनुयायांनाही बुद्ध धर्माची दीक्षा दिली. त्या गौतम बुद्धाची स्मृती जागवण्यासाठी हा बोधी वृक्ष येथे असावा.
समोरच मुख्य स्तूपाचे प्रवेशद्वार येते. येथे बरीच कडक सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. आत प्रवेश करताच भव्य असा गौतम बुद्धाचा पुतळा एका गोलाकार कठड्यांच्या आत विराजमान केलेला आहे. त्याच्या बरोबर समोर आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) पवित्र अस्थींचा कलश एका सुंदर काचेच्या आवरणात ठेवण्यात आला आहे. याठिकाणी एक असीम गूढ शांतता अनुभवायला मिळते. या मुख्य जागेच्या बाजूने गोलाकार आकारात बाबासाहेबांच्या जीवनातील ठळक घडामोडींचा चित्ररूपी आलेख मांडण्यात आलेला आहे. एक एक छायाचित्र आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांनी ज्यावेळी येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या अनमोल क्षणांची अनुभती करून देतात. याठिकाणी छायाचित्रण करण्यास सक्त मनाई आहे.
या भव्य स्तूपातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला गौतम बुद्ध आणि डॉ.आंबेडकर यांचे भव्य पुतळे उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी बौद्ध अनुयायी, पर्यटक अगदी भक्तिभावाने फोटो काढताना दिसतात. या संपूर्ण परिसराचे वातावरणच शांत, गंभीर आहे. बराच वेळ येथे पर्यटक रेंगाळतात. बाबासाहेबांनी ज्यावेळी धर्मांतर केले त्यावेळची त्यांची वैचारिक अवस्था, कारणं, भूमिका याचा प्रत्येकाने अभ्यास करायला हवा.
दीक्षा भूमीचा इतिहास – History of Deekshabhoomi
दिक्षाभूमी हे भारतीय बौद्धांसाठीचे एक महत्त्वाचे स्थान आहे. आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ (Deekshabhoomi) म्हटले गेले.
काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाच्या आकारामुळे याला ‘धम्मचक्र स्तूप’ असेही म्हटले जाते. दीक्षाभूमीला (Deekshabhoomi) वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबरला यांच्या संख्येत लक्षणिय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे भेट द्यायला येतात.
भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट देत असतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.
दीक्षा भूमीची रचना – Architecture of Deekshabhoomi
दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे. दीक्षाभूमीचे ऐतिहासिक जेव्हढे महत्त्व आहे तेव्हढेच कलेचा एक उत्तम नमुना म्हणून याकडे पाहिले पाहिजे. दीक्षाभूमीच्या ( Deekshabhoomi ) बांधकामासाठी पाच हजार लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर येथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे. या स्तूपाची रचना आर्किटेक्ट शेओ डॅन माल आणि शशी शर्मा यांनी केलेली आहे. जुलै १९७८ ला याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि १८ डिसेंबर २००१ ला याचे उदघाटन करण्यात आले.
धर्मांतराची पार्श्वभूमी –
सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणना केला गेला. विसाव्या शतकात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सपत्निक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्या ५ लाख अनुयायांना दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी सोहळ्याला उशिरा आलेल्या उर्वरित ३ लाख अनुयायांना धम्म दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गांनी घडून आलेले हे बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर या जागेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. एक प्रमुख बौद्ध क्षेत्र म्हणूनही या स्थानाला ओळखले जाते.
आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याची काही ठोस कारणे होती. त्यांनी हिंदू, मुस्लिम,ख्रिश्चन,जैन या सर्व धर्मांचा सांगोपांग अभ्यास केला होता. मात्र हे तीनही धर्म त्यांना आपलेसे करावे वाटले नाही. त्यांना जवळचा वाटला तो बौद्ध धर्म. त्यांनी हा धर्म स्वीकारला कारण त्यांना तो सम्यक, निरीश्वरवादी, विज्ञानवादी, कर्मवादी, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय्य वाटला. त्यामुळे त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांच्या मते, बुद्ध हा मोक्षदाता नसून मार्गदाता आहे. हा झाला बाबासाहेबांचा बौद्ध धम्म स्वीकारण्याविषयीचा दृष्टिकोन.
बाबासाहेबांनी नागपूरला बौद्ध धर्म का स्वीकारला ?
नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या ५ लक्ष अनुयायांसोबत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर १५ ऑक्टोबर १९५६ रोजी परत ३ लक्ष अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. बाबासाहेबांची कर्म भूमी मुंबई आणि दिल्ली असताना त्यांनी नागपूर या शहराची निवड धर्मांतरासाठी का केली असावी असा प्रश्न सहज पडतो. याचे उत्तर त्यांनीच त्यावेळी केलेल्या आपल्या ऐतिहासिक भाषणात दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहर निवडण्याचे कारण सांगताना म्हटले की, ‘आर्यांचे भयंकर शत्रू असलेल्या नाग लोकांनी भारतात बौद्ध प्रसार केला. आर्य लोकांचा अत्याचार सहन करणाऱ्या नाग लोकांना गौतम बुद्धांच्या रूपाने महापुरुष भेटला. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी ‘नाग’ नदी आहे. म्हणून त्या शहरास नागपूर म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे.’’ अशा रीतीने या महामानावाच्या पदस्पर्शाने नागपूर शहराला एक अनोखे महत्त्व प्राप्त झाले.
बाबासाहेबांच्या पहिल्या नागपुर भेटीविषयी –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३० मे १९२० याच दिवशी नागपुरात पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. या नागपूरभेटीची शतकपूर्ती झाली आहे.बाबासाहेब नागपुरात आले होते, अखिल भारतीय बहिष्कृत समाजाच्या परिषदेसाठी. ३०, ३१ मे आणि १ जून १९२० असे तीन दिवस ही परिषद कस्तूरचंद पार्क येथे झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. बाबासाहेब ३० मे रोजी नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे वय होते अवघे २९ वर्षे. ‘हिंदुस्तानातील सर्व भागांतील बहिष्कृत समाजांतून स्त्रीपुरुष प्रतिनिधींचा सारखा लोट वाहून राहिला होता’, असे या परिषदेविषयी बाबासाहेबांनी लिहिले होते. कालीचरण नंदागवळी हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते.
राजर्षी शाहू महाराजांच्या स्वागतासाठी त्यावेळी आबालवृद्ध, स्त्री-पुरुषांचा प्रचंडजनसमुदाय लोटला होता. महाराज एका सजविलेल्या रथात विराजमान होते. ढोल ताशे आणि बँडच्या गजरात त्यांची मोठ्ठी मिरवणूक एम्प्रेस मिल, जुम्मा तलाव, महाल, चितारओळ, इतवारी, हंसापुरी या मार्गाने स्वागत स्वीकारत कस्तूरचंद पार्कला पोहचली’, असे स्वत: बाबासाहेबांनी ५ जून १९२० रोजीच्या ‘मूकनायक’च्या अंकात नमूद केले आहे.
धर्मांतराची आवश्यकता का आहे याचे विवेचन –
बाबासाहेब म्हणतात ‘‘जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानला आहे तितकीच धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे. स्वराज्याचे महत्त्व जितके देशाला आहे तितकेच धर्मांतरांचे महत्त्व अस्पृश्यांना आहे. धर्मांतर आणि स्वराज्य या दोन्हींचा अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती आणि स्वातंत्र्य. ज्या धर्मांतरापासून स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही..’’ ‘‘धर्मांतर हे राजकीय हक्कांना विरोधक नसून राजकीय हक्कांचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे.’’
‘माणूस धर्माकरिता नाही. धर्म माणसांकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संघटन करावयाचे असेल तर धर्मांतर करा. समता, स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.’’ असे विचार मांडून त्यांनी धर्मांतराचा आपला निर्णय सांगितला होता.
अनेक वर्ष अन्याय, अत्याचाराच्या ओझ्याख़ाली दबलेल्या दलितांच्या आयुष्याला कलाटनी देणाऱ्या, त्यांना मानानी कस जगायचं हे शिकवणारी अशी ही बाबासाहेबांच्या धर्मांतराची घटना होती. त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
अशा ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार असणारी अशी ही दीक्षा भूमी (Deekshabhoomi). तुम्ही कोणत्याही जाती,धर्माचे, पंथांचे असाल मात्र येथे एकदातरी भेट द्यायलाच हवी. कारण ज्या महामानवाने माणूस म्हणून जगण्याचा हक्क दलित बांधवाना मिळवून दिला आणि जात कशी आपल्या प्रगतीचा अडसर आहे हे पटवून दिले, अशा या महामानवाचे हे स्मृतीस्थळ आहे. एकदातरी येथे नतमस्तक व्ह्यायलाच हवे.
याठिकाणी भेट द्यायला कसे जाल ?
ज्योती भालेराव .