Revolutionary Chapekar Brothers Monument, established in year 2005 (Pune, Chinchawad, Maharashtra)

Chapekar Brothers

क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र)

पुणे शहराला जशी सांस्कृतिक ओळख आहे, तसेच हे शहर पारतंत्र्याच्याकाळात अनेक क्रांतिकारकांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या साहसी घटनांनी पुनीत झालेले म्हणूनही या शहराची ओळख सांगता येईल.  देशासाठी हौतात्म्य पत्क़रणाऱ्या चापेकर बंधूंच्या (Chapekar Brothers) वास्तव्याने पुनीत झालेला चापेकर वाडा म्हणजे अलौकिक अनुभव देणारी वास्तु आहे. इतिहासच्या पानातील हे एकमेव कुटुंब की,ज्या घरातील तीन मुले देशासाठी फ़ासावर गेली. अशा या महापुरुषांच्या आठवणींचे स्मरण करूण देणारा हा वाडा…

Chapekar Brothers

दामोदर हरी चापेकर (फ़ाशी : १८ एप्रिल १८९८),  बाळ कृष्ण हरी चापेकर ( फ़ाशी : ९ मे १८९९),  वासुदेव हरी चापेकर ( फ़ाशी : १२ मे १८९९) या तीन बंधुंचे (Chapekar Brothers) जन्म या वाड्यात झाले आणि बालपणही याच वाड्यात गेले. याच वाड्यात त्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने पाहिली, त्यासाठीची खलबतही येथेच पार पडली. त्यांच्या फ़ाशीनंतर दामोदर चापेक़रांच्या वीरपत्नी दुर्ग़ाबाई चापेकर, त्यांच्या अन्य दोन जावा व मुलांना सोबत घेऊन चिंचवड़ येथील या वाडयात राहिल्या.चिंचवड़ येथे  राममंदिराच्या समोर हा वाडा आहे. चापेकर समितीने १९७२ मध्ये या वाड्याचा ताबा मिळवून वाड्याच्या विकासकामांना सुरूवात केली.

हा वाडा सव्वाशे वर्षापूर्वीच्या वास्तुची प्रतिकृति असलेला परंतु पुनर्रचित स्वरूपात आहे. वाडयात आत प्रवेश करताच मोठा चौक लागतो, त्याच्या मधोमध तुळशी वृंदावन आहे. चौक चढून वर जाताना उजवीकडे दामोदर चापेकरांचा पुतळा दृष्टीस पडतो. वरच्या मजल्यावर अनेक क्रांतिकारकांची आणि त्यांच्या नातलग स्त्रियांविषयीची माहिती व छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. एकूण २०० क्रांतिकारक व १२५ शूरवीर स्त्रियांची छायाचित्र व माहिती येथे आहे. 

या दालनाच्यावर मोठा दिवाणखाना आहे. वाड्याच्या परसदारी मोठी विहीर आहे. काही वर्षात टप्प्याटप्प्याने   वाड्याचा विस्तार करून ग्रंथालय, संग्रहालय करण्यात येत आहे. वाड्याला भेट देण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. सकाळी ९ ते १२ व संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत पर्यटकांसाठी हा वाडा खुला असतो. चापेकर बंधूंचा (Chapekar Brothers) देशाभिमान,  इतर अज्ञात क्रांतिकारकांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या वाड्याला आवश्य भेट द्यायला हवी.

Chapekar Brothers

चापेकर बंधूंचा इतिहास, बालपण आणि क्रांतिकारी आयुष्याविषयी –

वासुदेव चापेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाल्याचे सांगण्यात येते. वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चापेकर बंधूंच्या (Chapekar Brothers) शिक्षणात खंड पडला.  

वासुदेव चापेकर यांनी दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले होते. त्याकाळातील पुण्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ (Chapekar Brothers) क्रांतिकारक चळवळीकडे ओढले गेले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्‍या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन करण्यास सुरुवात केले. 

याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी ‘वॉल्टर चार्ल्स रॅंडला’ भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या (Chapekar Brothers) मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.

रॅंडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. पुणे युनिवर्सिटीजवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली. आजही या ठिकाणी असणाऱ्या रिजर्व्ह बँकेच्या आतील परिसरात एक मोठे वडाचे झाड या चाफेकर बंधुच्या शौर्याची गाथा आठवत मूकपणे उभे आहे. 

त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर यांनी टांगा गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅंडवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅंड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. चापेकर  बंधु (Chapekar Brothers) त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी तिघांनाही नंतर पकडण्यात आले. 

रँड प्रकरणी हत्या करणाऱ्यांची नावे इंग्रज सरकारला कळवणाऱ्यास  रू. २०००० चे बक्षीस देण्यात येईल असे इंग्रज सरकारने जाहीर केले होते. चापेकर बंधूंना (Chapekar Brothers) द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. रँडची हत्या केल्या प्रकरणी चाफेकर बंधूंची नावे गणेश व रामचंद्र द्रविड यांनी इंग्रज सरकारला कळवली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. 

त्यानंतर त्यांनाही अटक झाली. दामोदर चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव चापेकर यांना ८ मे १८९९ तसेच बाळकृष्ण चापेकर यांना १२ मे १८९९ रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. 

अशाप्रकारे तीनही चापेकर बंधू शहीद झाले. रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे वय होते अवघे २७ वर्षे, बाळकृष्ण यांचे वय होते २४ वर्षे व वासुदेवरावांचे वय होते १८ वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरुणांचा त्याग व शौर्य पाहून आजही ऊर अभिमानाने भरून येतो! राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी (Chapekar Brothers) केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे ! त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन.

क्रांतितीर्थ चापेकर वाडयाविषयी – 

हा वाडा जरी नव्याने बांधून प्रतिकृती रूपात बांधला असला तरी त्याचा भव्यपणा, पावित्र्य जाणवत रहाते. वाड्यात आता प्रवेश करताच त्याचा चौक आपल्याला भुरळ घालतो. वाड्याच्या खिडक्या, तावदाने आपल्याला अनेक वर्ष मागे त्याकाळाची सैर करून आणतात. वयाच्या वरच्या मजल्यावरील मोठमोठ्या खिडक्या फार सुंदर आहेत. त्याच्या बाजूला असणाऱ्या मेघडंबरी सदृश्य खांब, त्याची रंगरंगोटी सर्वकाही फारच आकर्षक पद्धतीने बांधण्यात आलेले आहे.

या वाड्याच्या मागील अंगणाच्या भागात एक मोठी विहीर आहे. बाकीचा परिसरही बराच ऐसपैस आहे. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर समोरच एक मोठा चौक लागतो, मध्यभागी तुळशीवृदांवन आहे. चौकाच्या समोरच दगडी दोन पायऱ्या आहेत, त्या चढून गेल्यावर चारी बाजूच्या ओट्यावरून संपूर्ण वाडा बघता येतो. वर जायला एक जिना आहे. त्यावरून वर गेल्यावर मोठया लाकडी खिडक्या आहेत. त्याच्या बाजूने जे लाकडी खांब आहेत त्याचे नक्षीकाम फार सुंदर आहे. हा वाडा पुनर्बांधणी केलेला आहे, त्यामुळे मुळ काळाच्या बऱ्याच नंतरच्या काळात बांधलेला असूनही सर्व काम अगदी त्याकाळाप्रमाणे करण्यात आले आहे.

वाड्याच्या भव्यपणाला आणि सौंदर्यात कुठेही कमी राहिलेली नाही. १९९८ ते २००५ या दरम्यान या वाड्याचे पुनर्रचनेचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर या वाड्याला ‘क्रांतीतीर्थ चाफेकर वाडा’ असे नाव देऊन हा वाडा जनसामान्यांसाठी खुला करण्यात आला. 

आज चिंचवडगावातील हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. चिंचवड गावातील गांधी पेठेत राम मंदिराच्या जवळ हे स्मारक आहे. याठिकाणी इतिहासप्रेमी आवर्जून भेट द्यायला येत असतात. हा संपूर्ण वाडा फिरताना सतत या तीनही क्रांतिकारी भावांच्या (Chapekar Brothers) आयुष्याचा आपण विचार करत राहतो. इथली पायरी न पायरी, प्रत्येक जागा फिरताना आपल्याला त्यांच्या त्यागाची, देशप्रेमाची आणि त्यांच्या धाडसाची अनुभूती येत रहाते. इतिहासातील ही तीन भावंड आणि त्यांचे कुटुंबीय आज प्रत्येक भारतीयांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या या देशप्रेमाला, शौर्याला उजाळा देण्यासाठी येथे एकदातरी नक्की भेट द्यायला हवी.

याठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?

Author ज्योती भालेराव.

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!