Bibi ka Maqbara (Established in 1657 to 1661 ) बीबी का मकबरा-( निर्मितीकाळ इ.स. १६५७ ते १६६१ )

Bibi ka Maqbara
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

औरंगाबाद शहरावर मुघलकालीन वास्तूंचा मोठा प्रभाव जाणवतो. चालुक्यवंशीयांच्या सत्तेपासून सुरू झालेल्या या शहराचा प्रवास मुघलांच्या सत्तास्थापनेपर्यंत येऊन ठेपला आणि शहराला ‘औरंगाबाद’ हे नाव मिळाले. आधुनिक स्वतंत्र भारताच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी पर्यंत येथे मुघलकालीन स्थापत्यशास्राचा मोठा प्रभाव जाणवतो. महाराष्ट्राची ‘पर्यटन राजधानी’ अशीही एक औरंगाबाद शहराची ओळख आहे. बावन्न मुघलकालीन दरवाजांचे शहर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. याशिवाय येथे सोनेरी महल,वेरूळ, अजिंठा लेणी,बुद्ध लेणी अशी अनेक  जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं  आहेत. अशीच एक महत्त्वाची वास्तू म्हणजे येथील बीबीका मकबरा (Bibi ka Maqbara) होय.

Bibi ka Maqbara

कोणी बांधला आहे हा मकबरा ? ( Bibi ka Maqbara)

‘बीबी का मकबरा’ ( Bibi ka Maqbara) वास्तू मुघल बादशहा औरंगजेब याचा मुलगा ‘आझम शहा’ याने आपली आई ‘राबिया दुर्रानी’ उर्फ ‘दिलरास बानो’ हीच्या स्मरणार्थ बांधून घेतला होता. इ.स. १६५७ मध्ये ‘दिलरास बानो’ हिचा बाळंतपणात मृत्यू झाला होता.त्यानंतर प्रथम या मकबऱ्याच्या ठिकाणी तिचे दफन करण्यात आले होते.जिथं तिला दफन करण्यात आले तेथेच पुढे जाऊन तिच्या मुलाने हा मकबरा बांधला. खाम नदीच्या जवळ हा मकबरा बांधण्यात आलेला आहे. औरंगाबाद पासून तीन किलोमीटर अंतरावर ही वास्तू आहे. देशविदेशातून हा मकबरा पहायला पर्यटक येतात.

अशी आहे बीबीका मकबराची वास्तूशैली.

ही कबर ( Bibi ka Maqbara) सत्ताकाळात त्याची पत्नी राबिया हिच्या मुलाने आझम शाहने इ.स. १६५७ ते १६६१च्या दरम्यान बांधून घेतली. हा मकबरा लाल आणि काळ्या दगडांबरोबर संगमरवर आणि पांढऱ्या मातीपासून बांधण्यात आलेला आहे. अतउल्लाह यांनी या मकबऱ्याची रचना केली आहे. त्यांचे वडिल उस्ताद अहमद लाहोरी यांना जगप्रसिद्ध ताजमहालाचे रचनाकार म्हणून ओळखले जाते. गुलाम मुस्तफा यांनी लिहिलेल्या ‘तारीख नाम’ या ग्रंथानुसार याच्या निर्मितीसाठी ६ लाख ६८ हजार २०३ रुपये इतका आला होता. हा ( Bibi ka Maqbara) २५ एकर इतक्या विस्तिर्ण परिसरात बांधलेला आहे. याचा मुख्य घुमट आणि बाजूचे चार मिनार हे ३ हजार ९४ वर्ग मीटर इतक्या आकराने व्यापलेले आहेत.

Bibi ka Maqbara

या मकबऱ्याचा ( Bibi ka Maqbara) घुमट हा संगमरवराने बांधण्यात आलेला आहे. त्यासाठी खास जयपूरहून मार्बल आणण्यात आले होते. त्यासाठी दिडशेहून जास्त वाहनांचा वापर करण्यात आला होता. एका मोठ्या बागेच्या मधोमध या मकबऱ्याची रचना केली आहे. ही भव्य बाग हे या मकबऱ्याचे विशेष आकर्षण होते.मात्र आज या बगिच्याकडे पर्यटन विभागाचे बरेच दुर्लक्षच असल्याचे जाणवते. ताजमहाल सारखी वास्तू बांधण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले हे बांधकाम त्याच्या तोडीचे करण्यात मात्र आझम शहाला यश आले नाही. त्याला ही वास्तू ताजमहालापेक्षा भव्य बांधायची होती. मात्र औरंगजेबाने दिलेल्या तोकड्या खजिन्यामुळे ते शक्य झाले नाही.

Bibi ka Maqbara

संपूर्ण ताजमहाल हा  संगमरवरी दगडाने बांधलेला आहे. त्यामुळे तो इतका सुंदर आहे,मात्र बिबी का मकबऱ्याचा ( Bibi ka Maqbara) घुमट हा संगमरवरी दगडात बांधलेला असल्याने त्याची रचना जरी ताजमहालप्रमाणे झाली असली तरी त्या दर्जाचे बांधकाम व कलाकुसर बनवण्यात वास्तूकारांना यश आलेले नाही. घुमट सोडून बाकी मकबऱ्याचे काम हे विशिष्ट अशा पांढऱ्या माती चुन्याच्या मिश्रणाचा गिलावा देऊन करण्यात आले आहे. या मिश्रणाला स्टको प्लॅस्टर असे म्हणतात.  

Bibi ka Maqbara

मकबरा ( Bibi ka Maqbara) भव्य चौथऱ्यावर बांधलेला असून, त्यात मधोमध ‘बेगम राबियाची’ कबर आहे. ही कबर चौथऱ्याच्याखाली तळघरात आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे. हा चौथरा ८ चौरसमीटर चा (७२ चौ.फूट ) असून सहा मीटर उंचीचा आहे. घुमट सोडून बाकी मकबरा हा माती, दगडांचा असला तरी चौथऱ्याचा पाया हा २ मीटर उंचीपर्यंत संगमरवरी आहे. भव्य चौथऱ्यावर चारही बाजूंनी उंच मिनार बांधलेले आहेत. कधी काळी या मिनारांवर जाता येत होते. आता मात्र हे  बंद आहेत. प्रत्येक मिनारावर दगडी छत्र्या आहेत.

मुख्य मकबऱ्याचा ( Bibi ka Maqbara) हा मुघल वास्तूशिल्पाचा उत्तम नमुना आहे. या वास्तूची उंची ४५.७२ मीटर ( १५० फूट ) इतकी आहे. मकबऱ्याच्या हद्दीतच एक छोटी मशीद आहे. मकबऱ्याच्या आत तळघरात बेगमची कबर आहे. ती तुम्हाला चौथऱ्याच्या वर पहिल्या मजल्यावर आत एक मोठे राजेशाही दालन तिथून पहाता येते. तळघराचा मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. दालनाच्या मधोमध खालची कबर पाहण्यासाठी मोकळी जागा आहे. त्याच्या मधे चहुबाजूने कठडे बांधून सुरक्षित करण्यात आले आहेत. वरून खालची कबर ( Bibi ka Maqbara) पाहता येण्याची गॅलरीसारखी सोय आहे. या दालनवरील संपूर्ण नक्षीकाम हे पाहण्यासारखे आहे.

पहिल्या नजरेत हे संगमरवर भासते,मात्र हे सर्व काम चुना आणि मातीनेच करण्यात आलेले आहे. भींतीवर एकसारख्या आकारातील आयताकृतीत रेखाटण्यात आलेले नक्षीकाम लाजवाब आहे. प्रत्येक कोरीव काम सुंदरच आहे. प्रत्येक नक्षीकाम हे निसर्गाशी जोडलेले आहे. पक्षी, फुलं, पानं यांचे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. मकबऱ्याला जर तुम्ही सकाळी सहा वाजता किंवा संध्याकाळी पाच च्या दरम्यान भेट दिली तर तुम्हाला या चौथऱ्यावरून सुंदर सुर्योदय किंवा सुर्यास्त पहाता येईल. मकबऱ्याच्या ( Bibi ka Maqbara) सर्व बाजूला मोठे चौथरे बसण्यासाठी आहेत. बाकीचा परिसरही विस्तिर्ण आहे. बाजूला मोठे हौद बांधून त्यात कारंज्यांची सोय आहे. आज मात्र हे सर्व बंद आहेत.

 परीसरातील हिरवळ, जाळीदार, नक्षीकामाच्या भिंती या सर्व ठिकाणी पर्यटक बराच काळ रेंगाळतात, फोटोशुट करतात. त्यासाठी अनेक फोटोग्राफरही येथे उपलब्ध आहेत.त्याकाळी मकबऱ्याला ( Bibi ka Maqbara) पुरेसा नव्हता. त्यासाठी परिसरात एकुण पाच विहिरी बांधल्या गेल्या. या विहीरीच्या तळाशी बोगदे होते. त्याद्वारे जवळच्या ‘खाम’ नदिचे पाणी येथे आणून त्याचा साठा करण्याची योजना होती. मकबऱ्याच्या पूर्व व पश्चिमेस जे मोठे हौद आहेत त्या हौदांना जोडणाऱ्या भूमीगत कालव्याचीही व्यवस्था केली गेली. यावरून त्यावेळचे स्थापत्य विशारद बांधकामाबरोबर जलसंवर्धनाच्या बाबातीत कसे जाणकार होते हे समजते.

राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा मान

हा मकबरा ( Bibi ka Maqbara) राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे. ही राबिया दुर्रानीची कबर २८ नोव्हेंबर १९५१ ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली.

बीबी का मकबराविषयीच्या विशेष गोष्टी

आग्रामधील ‘ताजमहाल’ ही देशातील अनेकानेक सुंदर मंदीरं, वास्तूं पैकी एक सुंदर वास्तू समजली जाते. जगातील आठ आश्चर्यांपैकी एक हा मानही या वास्तूला दिला जातो. अशा जगातील सुंदर वास्तूची केलेली नक्कल किंवा प्रतिकृती म्हणजेच हा बीबीका मकबरा( Bibi ka Maqbara). आपल्या आजोबांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधलेली इतकी सुंदर वास्तू बघूनच औरंगजेबाचा मुलगा मुहम्मद आझमशहा याला हा मकबरा बांधण्याचे सुचले.

त्याने आपली प्रिय आई रबिया उल दौरानी च्या आठवणीत बीबीका मकबरा ( Bibi ka Maqbara) ठरवून ते कृतीतही आणले हे विशेष. मात्र अपुरा खजिना, कुशल कामगारांचा आभाव अन्य तांत्रिक बाबी यांमुळे त्याला ताजमहालप्रमाणे सुंदर करण्यात यश आले नाही.

ताजमहाल हा उत्तर प्रदेशात बांधण्यात आलेला आहे, तर बिबिका मकबरा ( Bibi ka Maqbara) महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात आहे, त्याचमुळे त्याला ‘दखणी ताज’ असेही संबोधण्यात येते.भारताचा दुसरा ताजमहाल अशीही त्याची ओळख आहे. दखणी ताज अशी ओळख जनमानसात रुजल्यामुळे सहाजिकच या दोन्ही वास्तूंची तुलना कायमच केली जाते.

ताजमहाल आणि बीबी का मकबऱ्यातील (Bibi ka Maqbara) साम्य

या दोन्ही वास्तू अतिशय भव्य अशा चौथऱ्यावर बांधण्यात आलेल्या आहेत. ताजमहालात शहाजहानच्या पत्नीची कबर तर बीबीका मकबऱ्यात (Bibi ka Maqbara) औरंगजेबाच्या पत्नीची कबर आहे. या दोन्ही वास्तूंचा आराखडा अगदी साऱखा आहे. ताजमहाल आणि मकबरा (Bibi ka Maqbara) या दोन्ही पर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावर सुंदर उद्यान बनवण्यात आलेले आहे.संपूर्ण रस्त्याच्या कडेने जाळीदार नक्षीकाम केलेल्या अर्ध्या उंचीच्या भिंती आहेत. बाजूने हिरवळ, मधे अनेक छोट्या मोठ्या आकाराचे कारंजे अशा अनेक गोष्टींनी हा मार्ग सुशोभित करण्यात आला आहे. बरेच अंतर चालून गेल्यावर समोर मोठ्या चौथऱ्यावर मुख्य वास्तूचे जवळून आपल्याला दर्शन होतं.

बीबी का मकबरा (Bibi ka Maqbara) बांधण्यासाठी करण्यात आलेला खर्च

बीबीका मकबरा (Bibi ka Maqbara) ही वास्तू बांधताना त्यासाठी जो खर्च करण्यात आला तो ताजमहालाच्या तुलनेत फारच अल्प असल्याचे लक्षात येते. त्याकाळी ताजमहाल बांधण्यासाठी सुमारे ३.२ करोड इतका खर्च आला होता. मात्र त्यानंतर कितीकरी वर्षांनी बांधण्यात आलेल्या या बीबी का मकबऱ्यासाठी फक्त सात लाख रुपये इतका खर्च आलेला आहे. त्याच्या खर्चात केलेल्या कपातीमुळेच हा मकबरा ताजमहालाच्या तोडीचा होऊ शकला नाही. तसेच असेही सांगण्यात येते की, औरंगजेबाच्या मनात ही वास्तू बांधण्याचे नव्हते,त्यामुळे त्यासाठी ताजमहालाच्या तोडीचे साहित्य तसेच कुशल कामगार उपलब्ध होऊ शकले नाही.

Bibi ka Maqbara

ताजमहालाच्या संपूर्ण वास्तूसाठी देशविदेशातून अप्रतिम दर्जाचे साहित्य वापरले, येथे मात्र खर्चात हात आखडता घेतल्याचे दिसते. जर तुम्ही आग्र्याचा ताजमहाल बघितलेला असेल तर तुमची नजर बीबी का मकबरा बघताना या दोन्ही कलाकृतीची तुलना सतत करत रहाते. प्रत्येक काळात ही तुलना होत राहिल्याने, ही वास्तू दुर्लक्षित राहिल्याचे वाटते.

असे असले तरी आईच्या आठवणी प्रित्यर्थ अशी वास्तू बांधण्याचा जो काही त्यावेळी विचार झाला त्याला दाद देत ही वास्तू आणखी चांगल्या रितीने जपता येईल असे वारंवार वाटत रहाते. बीबी का मकबऱ्याच्या (Bibi ka Maqbara) चौथऱ्यावर चढून गेल्यावर तुम्हाला बाजूचे जे भव्य मिनार आहेत ते कितीतरी वेळ तुम्हाला खिळवून ठेवतात. संपूर्ण मकबरा फिरून बघताना त्याचा भव्य आवाका निश्चितच डोळे दिपवणारा आहे. प्रत्येक भिंतीवरची नक्षी वेगळी आहे.

बीबी का मकबरा ला भेट देण्याची वेळ

हा मकबरा (Bibi ka Maqbara) ६ ते रात्री १० वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. हवामान आणि ऋतुमानानुसार या वेळेत तत्कालीन बदल केले जातात.

बीबी का मकबराचे प्रवेशशुल्क

येथे भारतीय पर्यटकांसाठी २५ रुपये प्रवेशशुल्क आहे. तर विदेशी पर्यटकांसाठी २५० रुपये दर आकारला जातो. जर तुम्हाला आत डिजीटल कॅमेरा न्यायचा असेल तर त्यासाठीचे वेगळे २५ रुपये भरावे लागतात.

कसे पोहोचाल बीबी का मकबराला

औरंगाबादला बस, रेल्वे, प्रायव्हेट कार ने जाऊ शकतात. औरंगाबादच्या मध्यवर्ती भागात हे ठिकाण आहे. तुमची स्वतःची गाडी नसेल तर तुम्ही रिक्षानेही येथे पोहोचू शकतात.

ताजमहालाची आठवण करून देणारा, तिच्यासारखाच भव्य असा हा बीबी का मकबरा (Bibi ka Maqbara) अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ताजमहालप्रमाणे  यावास्तूलाही चांगली सुविधा, संरक्षण दिले गेले, तर निश्चितच या वास्तूला आणखी महत्त्व प्राप्त होईल. आजही हा मकबरा चांगल्या अवस्थेत आहे. फक्त त्यावर जाणवणारी मरगळ, प्रशासनाचा उदासिन कारभार जर हटवला तर येथे एक नवी झळाळी नक्की मिळेल.

एका मुलाने आपल्या आई वरील प्रेमापोटी बांधलेली ही वास्तू एकमेवाद्वीतीय अशीच आहे. आई आणि मुलाच्या प्रेमाचे प्रतिक असणारा हा ‘बीबी का मकबरा’ (Bibi ka Maqbara) काळातील वास्तूशैलीपासून ते औरंगजेबाच्या सत्ताकाळापर्यंतच्या मुघल वास्तूशैलीचे बदलत गेलेले स्वरूप आपल्याला दाखवतो. हा सर्व इतिहास जाणून घेण्यासाठी औरंगाबादला गेला की येथे आवश्य भेट द्या.

ज्योती भालेराव !

10 thoughts on “Bibi ka Maqbara (Established in 1657 to 1661 ) बीबी का मकबरा-( निर्मितीकाळ इ.स. १६५७ ते १६६१ )”

  1. सुंदर लेख आणि तसेच सुंदर फोटोस. प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करून हा लाख लिहिला आहे.
    पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

    Reply
  2. Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job

    Reply

Leave a Reply