एतिहासिक शहर अशी अहमदनगर शहराची ओळख आहे. निजामशाहीतील अनेक राज्यकर्त्यांनी या शहराला घडवले आणि येथे राज्य केले. मलिक अहमद निजाम शहा यांनी इ.स. १४९० मध्ये हा भुईकोट किल्ला बांधण्यास सुरूवात केली. त्यानंतर हुसेन निझाम शहा यांनी १५५९ ते १५६२ या कालावधीत याची पुर्नबांधणी केली. पठारावर बांधण्यात आलेला हा किल्ला अंडाकृती आकारात बांधण्यात आलेला असून एकुण १ मैल ८० यार्ड परिघात बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याला दोन मुख्य दरवाजे आहेत. एकुण २२ बुरूजे असणारा हा किल्ला भक्कम तटबंदी आणि बांधकाम यांमुळे अनेक परकिय हल्ल्यांना तोंड देत आजही उभा आहे.
या किल्ल्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे, इ.स. १९४२च्या चलेजाव आंदोलनाच्या वेळी अनेक भारतीय नेत्यांना या किल्ल्यात बंदी करून ठेवण्यात आले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, डॉ. पी.सी घोष आदी नेत्यांच्या खोल्या या ठिकाणी आहेत.या ठिकाणी राहुनच पंडित नेहरूंनी डिसकव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन केले. आजही या ठिकाणी या ग्रंथाची हस्तलिखित पाने पहायला मिळतात. नेहरू, पटेल आदी नेत्यांच्या वास्तव्याच्या खुणा त्यांनी वापरलेल्या वस्तूंच्या रूपात जतन करून ठेवलेल्या बघायला मिळतात.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे १९४७ पासून अत्ता पर्यंत हा किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे.
निजामशाही,मुघल, शिवाजी महाराज,पेशवे अशा सत्ताधार्यांच्या काळातील अनेक शुरवीरींचा तसेच ब्रिटीश राजवटीविरोधात लढणार्या अनेक भारतीय नेत्यांचा सहवास या किल्ल्याने अनुभवला आहे. या किल्ल्याच्या दगडी भिंतींनी, बुरूजांनी अनेक राजकीय स्थित्यंतरे अनुभवली आहेत. सत्तेसाठी चालणारी कट-कारस्थाने, हत्या, वैभव अशा रक्तरंजीत इतिहासाचा साक्षीदार हा किल्ला राहिलेला आहे. आज आपण पहात असलेल्या या शहराला त्याकाळी मोठे वैभव प्राप्त होते.
व्यापार आणि राजकारणाचे केंद्रबिंदु असणार्या या शहरातील हा भुईकोट किल्ला मिळवण्याची आस मुघलांसह अनेक सत्ताधार्यांना होती. हा किल्ला जसा आकाराने मोठा आहे तसाच त्याचा इतिहास सुद्घा अनेक शतकांचा आहे. तेव्हा आशिया खंडातील आकारांनी मोठ्या असणार्या किल्ल्यांपैकी एक अशी ओळख असणार्या या किल्ल्याचा संपुर्ण इतिहास, त्याची वास्तुशैली आपण पुढील भागांमध्ये जाणून घेणार आहोत.
क्रमशः
ज्योती भालेराव.