जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असणारा असा ‘ताज महाल’. या वास्तूविषयी इतक्या अख्यायिका, वाद,कथा आणि दंतकथा प्रसिद्ध आहेत की, येथे भेट देण्यापूर्वी आपली उत्सूकता शिगेला पोहोचलेली असते. आणि खरोखर या भव्य वास्तूच्या समोर जेव्हा आपण उभे रहातो तेव्हा आपण स्तब्ध होतो. ही वास्तू म्हणजे एका बादशहाच्या बेगमचा मकबरा आहे. अशा या स्मारकाला देशविदेशातून लोकं पहाण्यासाठी का येत असावेत ? याचं उत्तर तुम्हाला या भव्यदिव्य ताज समोर उभे राहिल्यावरच समजते.
म्हणूनच आज मिसलेनियस भारतच्या माध्यमातून आपण या अलौकिक वास्तूची सफर करणार आहोत.

Table of Contents
कोठे आहे ताजमहाल ?
भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील ‘आग्रा’ या शहरात ही सुंदर वास्तू आहे. खरं तर आग्रा आणि ताजमहाल हे जोडशब्दच म्हणावे लागतील. इतकी आग्रा या शहराची ओळख ताजमहालाशी जोडली गेलेली आहे. हे शहर यमुना नदीच्या किनारी वसलेले आहे. उत्तर प्रदेशातील ‘आग्रा’ हे सर्वात मोठे शहर आहे. आग्रा येथे फक्त ताजमहलच नाही तर आग्राचा लाल किल्ला आणि तेथून काही अंतरावर असणाऱ्या फत्तेपूर सिक्रीचा किल्ला या ऐतिहासिक वास्तू अशा आहेत, ज्यांची गणना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केली जाते. त्यामुळे भारतातील ‘आग्रा’ हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
वर्षातील बाराही महिन्यात येथे पर्यटन सुरू असते. देशविदेशातून येथे कायम पर्यटकांचा राबता असतो. वर्षभरात सुमारे २० ते ४० लाख पर्यटक फक्त ताजमहालाला भेट देत असल्याचे सांगतात.इ.स. १९८३ ला युनेस्कोने ताजमहाल वास्तूला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला.
ताजमहलला भेट देताना !
आपण आग्रा शहराला भेट देतानाच आपल्या मनात सतत ताज महालाचे विचार सुरू असतात. येथे आल्यावर तुम्ही येथील लाल किल्ला आधी पहायचा की ताजमहाल या संभ्रमात असाल तर तुम्ही वेळेचे योग्य नियोजन केले तर जास्त बरे. कारण दोन्हीही वास्तू अलौलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तेव्हा हाताशी भरपूर वेळ असतानाच दोन्हींकडे भेट देण्याचे ठरवावे.
जेव्हा आपण या वास्तूच्या परिसरात पोहोचतो तेव्हा बाहेरील बाजारपेठेतील दुकानदारांच्या, गाईडच्या आणि फोटोग्राफरच्या गराड्यातून वाट काढतच आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागतो.प्रवेशद्वारापाशी तिकिट काढून आपण आत प्रवेश करतो खरे, मात्र आपल्या मनात असणाऱ्या ताजमहलचा मागमूसही सुरूवातीच्या परिसरात आपल्याला लागत नाही, इतका आतील परिसर भव्य आहे.

आत जाताच भव्य असे लाल कमानींचे आपल्याला दर्शन होते. तेथून बरेच अंतर चालत गेल्यावर अनेक दरवाजे, बगीचे , मशिदी पार केल्यावर कुठे आपल्याला दुरवर असणाऱ्या ताजमहलची झलक दृष्टीस पडते. समोर लांबलचक असणारा बगिचा, त्याबाजूचा रस्ता आपल्याला ताजमहालाच्या भव्य वास्तूसमोर नेऊन सोडतो. मात्र या रस्त्याच्या प्रत्येक टप्प्यावर दृष्टीस पडणारा ताजमहाल पहात जाणे हा रोमांचकारी अनुभव म्हणता येईल.

ताज महाल कधी बांधला ?
या भव्य आणि सुंदर वास्तूचे बांधकाम इ.स. १६३१ च्या दरम्यान सुरू झाले. पुढे अथक २१ वर्षे काम सुरू राहिल्यावर सुमारे इ.स. १६५३ला ही कबर बांधून पूर्ण झाली.
ताज महालाचा निर्माता कोण ?
भारताचा पाचवा मुघल सम्राट शहाजहान यांनी हा महाल आपल्या अनेक पत्नींपैकी सर्वात प्रिय पत्नी असणाऱ्या ‘मुमताज महल’च्या स्मरणार्थ ही वास्तू बांधून घेतल्याचे इतिहासकार सांगतात. शहाजहान हा मुघल बादशहा अकबराचा नातू आणि जहांगिरचा मुलगा होता.
ताज महालाची वास्तुकला !
ताज महाल हा यमुनानदीच्या काठावर बांधण्यात आला. ही संपूर्ण वास्तू पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात बांधण्यात आलेली आहे. यासाठीचा संपूर्ण दगड भारतभरातून तसेच मध्य आशियातून आणण्यात आला होता. ही इमारत संपूर्णपणे सममितिय बांधकामशैलीने बांधण्यात आलेली आहे. मूघल वास्तूशैलीचा अत्युच्च्य नमुना म्हणजे ताज महाल होय. ताज महालाच्या बांधकामासाठी एकुण २२ हजार मजूर आणि १००० हजार हत्तींचे सहाय्य घेण्यात आले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वास्तू निर्माण करण्यात आली. मात्र स्वतः शहाजहान यांचाही निर्मीतीप्रक्रियेत सहभाग होता. शहाजहानला वास्तू निर्मीतीमध्ये रस होता, त्यांच्या कारकिर्दीत मुघल सम्राज्यातील अनेक सुंदर वास्तूंची निर्मिती झाल्याचे दिसून येते.




ताज महालाचे वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वार .
‘द्वावाजा ए रौझा’ असे या मुख्य द्वाराला संबोधले जाते. याची संरचना हेही एक स्थापत्यशास्रातील एक आश्चर्य म्हणता येईल. हे प्रवेशद्वार १६३२ ते १६३८ मध्ये बांधण्यात आले. ताज महालाचे वास्तूविशारद उस्ताद अहमद लाहौरी यांनी त्याची रचना केली आहे. त्याचा आकार ९३ फूट उंच आणि १५० फूट रूंद इतका आहे. लाल सँडस्टोन वापरून बांधण्यात आलेली एकप्रकारची ही दुमजली इमारतच आहे. सममितीचे वेड असणाऱ्या शहाजहानने या संपूर्ण वास्तूत त्याचा पुरेपुर वापर करण्यात आलेला दिसतो. ताज महालापर्यंत जाण्यासाठी एकुण पाच प्रवेशद्वार आहेत त्यापैकी हा सर्वात भव्य आणि महत्त्वाचा दरवाजा आहे.
हे प्रवेशद्वार ऑप्टिकल पद्धतीने बांधले आहे की आपण या दरवाजाच्या जवळ गेल्यास ताज महाल लहान भासतो आणि दरवाजापासून लांब गेलात तर ताज महालाचा आकार वाढतो. या दरवाजावर अनेक हिंदू संस्कृतीची चिन्हे, फुले, आकार कोरलेली आहेत. या दरवाजाच्या सर्वात वरच्या भागावर एकुण ११ घुमट बांधण्यात आलेले आहे. या दरवाजाच्या लगत अनेक खोल्या बांधलेल्या आहेत, विशेष म्हणजे इतक्या वर्षात त्यांचा उपयोग कशासाठीही करण्यात आलेला नाही. हा दरवाजा प्रत्यक्ष ताज महालाची प्रतिकृतीच आहे.

ताज महालाचा पाया.
मुख्य मकबराचा पाया बांधण्यासाठी नदीतून अशा प्रकारचे लाकूड वापरण्यात आले आहे, की यमुनेचे पाणी हे लाकूड भक्कम राखण्यासाठी सहाय्यक ठरते. त्यावर पुढील बांधकाम करण्यात आले. याचा पाया म्हणजे बहुकक्षीय रचना आहे. पायाची प्रत्येक बाजू ५५ मीटर आहे. याच्या एका बाजूला किनाऱ्याजवळ एक भव्य प्रवेशद्वार आहे, ज्याला मुघल वास्तूशैलीच्या भाषेत पिश्ताक संबोधतात.
ताज महालाची मुख्य कमान.
ताज महालाचा मुख्य मकबरा हा एका भक्कम भव्य चौकोनी पायावर बांधलेला आहे. या मकबऱ्याची उंची सुमारे ७३ मीटर (२४० फूट) आहे. याच्या मुख्य कमानीच्या दोन्ही बाजूला एकात एक गुंफल्याप्रमाणे भव्य खुल्या कमानी आहेत ज्या प्रवेशद्वाराप्रमाणे असतात (पिश्ताक) त्या बांधण्यात आल्या आहेत. अशी रचना संपूर्ण मकबऱ्याच्या सर्व बाजूने सममितीय रचनेत बांधण्यात आलेली आहे.यामुळे मकबऱ्याचा आकार चौकोनी न वाटता अष्टकोनी भासतो.
मात्र चारही कोपऱ्याच्या बाजू या इतर खुल्या दरवाजांपेक्षा छोट्या असल्याकारणाने या मकबऱ्याचा खरा आकार चौकोनीच आहे. ही एक सममितीय इमारत आहे. डावी आणि उजवी बाजू समसमान आकारत बांधण्यात आलेली आहे. या मुख्य मकबऱ्याच्या सर्वात वर एक मोठा घुमट बांधण्यात आलेला आहे. याची मुळ शैली पर्शियन आहे. मकबऱ्याच्या भोवती असणारे चार मिनारे (खांब) या सर्व मकबऱ्याला एका चौकोनात बांधण्याचे काम करतात.

मुमताज महल आणि शहाजहानच्या कबरी.
ज्यासाठी केला हा अट्टाहास, त्या मुमताज महलची कबर म्हणजेच या संपूर्ण ताज महालाच्या मुख्य कक्षातील मध्यभागी असणारी जागा. मात्र या मकबऱ्याच्या मुख्य कक्षात ज्या वरील सज्ज्यातून दिसतात त्या मुमताज महल आणि बादशहा शहाजहान यांच्या मकबऱ्यांच्या प्रतिकृती आहेत. त्याच्याच बरोबर खाली तळघरात खऱ्या कबरी बांधण्यात आलेल्या आहेत. कारण मुस्लिम धर्मपरंपरेनुसार कबरींवर मोठी सजावट करण्यास मनाई आहे, त्यामुळे मुळ कबर ही अत्यंत साधी आहे. मात्र कबरींच्या प्रतिकृतींवर मात्र अत्यंत सुंदर, बारीक नक्षीकाम आहे. त्याच्याभोवतीची संगमरवरी जाळीची नक्षीदार भींत मुघलकालीन कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. त्या दोघांच्या थडग्यांवर त्यांच्यासाठीचे काही शब्द कोरण्यात आले आहेत.
ताज महालाचा मुख्य घुमट.
या संपूर्ण कलाकृतीतील सर्वात भव्य, आकर्षक आणि आश्चर्यकारक भाग म्हणजे याच्यावरील भव्य घुमट होय. याची उंची ताज महालाच्या संपूर्ण उंचीच्या प्रमाणात म्हणजे ३५ मीटर इतकी आहे. हा इतका भव्य घुमट ७ मीटरच्या गोलाकार पृष्ठभागावर तोलून धरण्यात आलेला आहे. या घुमटाचा आकार पेरू किंवा कांद्याप्रमाणे दिसतो. त्यावर उलट्या कमळाचे उत्कृष्ट नक्षीकाम करण्यात आले आहे.

ताज महालाच्या आवारातील चार छत्र्या.
ताज महाल ज्या भव्य चौथऱ्यावर बांधण्यात आला आहे त्याच्या चार कोपऱ्यात चार मनोरे (खांब ) आहेत. त्यांच्यावर मुख्य घुमटासारखा मात्र आकाराने छोटा घुमट आणि त्याखाली संगमरवरी छत्री बांधलेली आहे. अशा रचनेमुळे मुख्य भव्य घुमटाला एक स्थैर्य देण्यात आले आहे. या छत्र्या आतून खुल्या ठेवण्यात आलेल्या आहे त्यामुळे या मनोऱ्यांमध्ये भरपूर प्रकाश खेळता रहातो. या छत्र्या, त्यावर कोरलेल्या फुलदाणी आणि धातुचे कलश त्यांच्या सौंदर्यात भरच घालतात.
किरीट कलश.
मुख्य घुमटाच्या मुकुटावर कलश आहे. हे शिखर कलश १८०० च्या दरम्यान सोन्याचे होते. मात्र आक्रमणांमुळे ते नाहीसे होऊन आता ते पितळेच्या धातूत बनवण्यात आले आहे. हा कलश हिंदू आणि पर्शियन वास्तूकला शैलीतून निर्माण करण्यात आला आहे. या कलशात चंद्राची प्रतिमा आहे ज्याचे टोक स्वर्गाकडे असल्याचे दर्शविते. खरं तर या कलशाचे टोक आणि चंद्राचा आकार मिळून एकसंध पाहिल्यास त्रिशूळाचा आकार तयार होतो. जे हिंदूंची देवता भगवान शंकरांचे शस्र आहे.
ताज महाल बांधताना विविध धर्मांचे अनेक मजूर काम करत होते, तेव्हा या संपूर्ण वास्तूच्या नक्षीकामात आपल्याला हिंदू, पर्शियन, मुघल संस्कृतीतील चिन्हांचा वापर करण्यात आल्याचे दिसते. मकबऱ्याच्या आत प्रवेश करताच कोपरानकोपरा, त्यावरील नक्षीकाम आपल्याला खिळवून ठेवते.
ताज महालाचे आधारस्तंभ असणारे चार मनोरे.
मुख्य मकबऱ्याच्या प्रांगणात असणारे चार भव्य मनोरे ताज महालाच्या एकुण सममितीय रचनेला स्थैर्य देतात. यांची उंची ४० मीटर उंच आहे. मशिदीत अजान देण्यासाठी जसे मनोरे असतात तशीच रचना या मनोऱ्यांची आहे. प्रत्येक मनोरा तीन भागात विभागण्यात आला आहे. या भागांमध्ये प्रत्येकी दोन सज्जे आहेत. सर्वात वरच्या भागातील सज्ज्यावर मुख्य घुमटावरच्या छत्रीसारखी छत्री आहे. यावरसुद्धा तशीच कमळाची आकृती आणि किरीट कलश निर्माण आहेत. हे चारही मनोरे मुख्य मकबऱ्यापासून बाहेरील बाजूस झुकलेले आहेत.

ताज महालाच्या बाहेरील बाजूची सजावट.
ताज महालाचा पाया, मुख्य मकबराची इमारत, बाहेरील मनोरे हे सर्व जितक्या भव्यतेने निर्माण केले आहे, त्याच प्रमाणे संपूर्ण मकबऱ्याच्या बाहेरील बाजूसही अत्यंत बारीक नक्षीकाम करून सजवण्यात आले आहे. भींतीवर संगमरवरी दगडात कोरण्यात आलेल्या पाना फुलांच्या नक्षी बघत रहाव्या अशा आहेत. अनेकदा ही फुलं खरे वाटतात इतके सुंदर कोरीव काम आहे. अनेक ठिकाणी फारसी भाषेतीस संदेश कोरण्यात आले आहेत. येथील नक्षीकामांमध्ये त्याकाळी अनेक रत्ने जडवण्यात आले होते. ब्रिटीश राजवटीत ते काढून घेण्यात आले.
शहाजहानला हा मकबरा सर्वात सुंदर, भव्य अपेक्षित असल्याकारणाने त्यांनी संपूर्ण देशभरातून रत्ने आणून त्यांचा वापर केला होता. विनारत्नांच्या या भिंती इतक्या सुंदर दिसतात, तर त्याकाळी हा मकबरा किती सुंदर असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. कुराणातील आयत,संदेश अशा प्रकारे कोरण्यात आले आहेत, की खालून वर पाहिले तरी अक्षरं तिरकी दिसत नाहीत हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. त्याकाळातले फारसी लिपिक अमानत खां यांनी या मजकूराची निवड केली. या मकबऱ्याला गोल फिरून तुम्ही चक्कर मारली की त्याच्या भव्यतेचा, सुंदरतेचा आपल्याला अंदाज येतो.
कितीतरी वेळ आपण या आवारात फिरत रहातो. यमुनानदिच्या पलिकडचा आग्र्याचा लालकिल्ला दिसतो. बादशहा शहाजहानला त्याचा मुलगा औरंगजेबाने कैद केल्यानंतर तो तेथील एका खिडकीतून दिवसरात्र या ताज महालाकडे पहात दिवस कंठत असे. तो किल्ल्याचा परिसरही ताज महालाच्या मागच्या भागात गेल्यावर दृष्टीपथात येतो. तुम्ही त्या किल्ल्याला भेट दिल्यावर शहाजहानच्या नमाजाची जागा आणि तो जेथून ताज महाल पहात असे ती खिडकी तुम्हाला दाखवण्यात येते. किल्ल्याच्या त्या खिडकीतून खरोखर आपल्याला झाडींमधून ताज महाल दिसतो.

इतर इमारती.
या मुख्य मकबऱ्याच्या बाजूनेच डावीकडॉ बाहेर पडल्यावर अनेक लाल दगडातील सुंदर इमारती दिसतात. यांचे दरवाजे नदीच्या बाजूला खुले असून येथे शहाजहानच्या अन्य पत्नी तसेच मुमताज महलच्या एका खास दासीला दफन करण्यात आले आहे. लाल बलुआ दगडात निर्माण करण्यात आलेल्या या इमारती पांढऱ्या शुभ्र ताज महालाच्या सौंदर्यात भरच घालतात. या इमारतींची वास्तूशैली हिंदू मंदिरांसारखी आहे. या सर्व वास्तू निवांत पहाण्यासाठी तुमच्याकडे तेवढा वेळ असायला लागतो.
चारबाग–
मुख्य मकबऱ्याच्या बरोबर समोरच ही बाग आहे. याच्या मधोमध एक सुंदर तलाव बांधण्यात आला आहे, ज्याच्या पाण्यात ताज महालाचे सुंदर प्रतिबिंब दिसते. मुख्य प्रवेशद्वारापासून या तलावापर्यंत येताना मधोमध अनेक कारंज्यांची रांग आहे. त्याच्या दोन्ही बाजूने संगमरवरी वाट असून दोन्ही बाजूंना झाडे आहेत. या बागेची रचना फारसी बगिच्यांच्या शैलीवरून घेण्यात आली आहे, पुढे अनेक मुघलकालीन वास्तूंमध्ये अशा बागांची निर्मीती करण्यात आली आहे.
प्रवेशद्वारापासून मुख्य मकबऱ्यापर्यंतच्या चौथऱ्याकडे जाताना यामार्गात ठराविक अंतरांवर दगडी चौथरे आहेत. सध्या पर्यटक, येथील गाईड, व्यावसायिक फोटोग्राफर या चौथऱ्यांचा उपयोग ताज महालासमोर पर्यटकांचे फोटो काढण्यासाठी करतात. प्रत्येक अंतरावरून लाडक्या ताजसोबतचा फोटो काढण्याचा आनंद पर्यटक घेतात. खरं तर यातील योग्य फ्रेम पकडून ताज महालाचे रूप फोटोत पकडण्यासाठीचे कसब येथील फोटोग्राफरला जमले असल्याने त्यांच्याकडून फोटो काढून घेतला तर हे फोटो तुमच्यासाठी कायमची सुंदर आठवण ठरते.
मजूरांचे हात कापल्याची अख्यायिका
ताज महाल बांधून पूर्ण झाल्यावर शहाजहान अतिशय खुश झाला.मात्र ताज महालाइतकी सुंदर वास्तू परत कोणीही निर्माण करू नये म्हणून ज्या मजूरांनी ही वास्तू बांधली त्या मजूरांचे हात बादशहा शहाजहानने कापण्याचे आदेश दिले होते अशी अख्यायिका पसरली, मात्र ही एक अफवाच असावी कारण याचे कोणतेही सबळ पुरावे इतिहासात उपलब्ध नाहीत.
ताज महालाचे बदलणारे रंग
ताज महाल दिवसाच्या प्रत्येक प्रहराला वेगळ्या रंगात दिसतो. पांढऱ्या शुभ्र संगमरवरात बांधण्यात आलेला हा महाल सकाळी सुर्योदयावेळी कोवळ्या सुर्याच्या किरणांमध्ये लालसर रंगाचा दिसतो. जेव्हा सुर्य माथ्यावर आला असतो तेव्हा ताज महालाचे पांढरे शुभ्र संगमरवर झळाळून जाते आणि संपूर्ण मकबरा पांढराशुभ्र दिसतो. तर संध्याकाळी या संगमरवरावर सुर्याची पिवळी किरणे पडतात त्यामुळे त्यावर पिवळसर सोनेरी छटा चढते.
पौर्णिमेच्या रात्री पुर्ण चंद्र प्रकाशात ताज महाल पहाणे पर्यटकांसाठी पर्वणी ठरते. पौर्णिमेपासून पुढचे तीन दिवस ताज महाल रात्री ठराविक वेळ खुला असतो. त्यावेळी छायचित्रण करणे हे पर्यटकांसाठी विशेष संधी असते.
काळ्या ताज महालाचे स्वप्न
ताज महाल ज्या यमुनानदीच्या किनाऱ्यावर वसला आहे, त्याच्या पलिकडील किनाऱ्यावर शहाजहानला असाच दुसरा ताज महाल स्वतःसाठी काळ्या संगमरवरी दगडात बांधायचा होता. मात्र त्याच्या मुलाने औरंगजेबाने त्याला कैद केल्यानंतर त्याचे हे स्वप्न अधुरेच राहीले. शहाजहानला सममिती वास्तूंची आवड असल्याकारणाने त्याला सफेद ताज महालाचे प्रतिबिंब जसे दिसेल, तशाप्रकारचा काळ्या रंगातील ताज महाल बांधायचा त्याचा मनसुबा होता.
येथील सुरक्षाव्यवस्था
ताज महालाच्या आवारातील शाही चार बगीच्यात पोहोचल्यावर आपण मधले अंतर पार करून मुख्य कबरीच्या चौथऱ्यापर्यंत पोहोचतो. येथून पुढे अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था आणि स्वच्छता आपल्याला अनुभवास येते. चौथऱ्यावर चढून जाण्यापूर्वी आपल्याला आपल्या चप्पल, शूजच्यावर एक प्लास्टिक चढवून मगच आत प्रवेश देण्यात येतो.
येथे कसे जाल ?
ताज महाल खरोखर मुघलांनी बांधला आहे की हे एक भगवान शंकराचे मंदिर तेजोमहल होते हा वाद अनेक वर्षांपासून डोके वर काढत असतो. परंतु मी सांगेल की तुम्ही ही वास्तू बघायला जाताना इतकेच लक्षात ठेवा की आपण जगातील एक अद्वितीय, सुंदर कलाकृती बघणार आहोत जीची निर्मीती आपल्या भारत देशात झालेली आहे आणि या वास्तूचे निर्माणकर्ते हातसुद्धा भारतीयच होते. मला तर ताजमहलसमोर उभे राहिल्यावर या मकबऱ्याने स्तिमित केले होते. ज्याची कोणाची ही कल्पना असेल त्याला सलाम.