World Theatre Day – (Started – 27 March 1962 )

World Theatre Day

जागतिक रंगभूमी दिन – (२७ मार्च १९६२)

जगात जेव्हा चलचित्रांद्वारे मनोरंजनाच्या माध्यमाचा म्हणजे चित्रपटांचा शोध लागला नव्हता, तेव्हा जगभर माणसं नाट्याच्या द्वारे मनोरंजन करत असत. ते नाटक रंगमंचावर सादर करून मोठ्या समूदायाचे मनोरंजन साधले जाई आणि नाटकाद्वारे संवादसूद्धा होई. नाट्य सादर करण्याच्या या कलेला ‘रंगभूमी’ (नाटक) असे म्हणतात.  अशा या रंगभूमी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २७ मार्चला ‘जागतिक रंगभूमी दिन’ ( World Theatre Day ) साजरा करण्यात येतो. जगभरातील रंगकर्मींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या या दिवसाची माहिती मिसलेनियस वर्ल्डच्या या भागात आपण घेणार आहोत.

कधी सुरू करण्यात आला जागतिक रंगभूमी दिन ( World Theatre Day )  –

२७ मार्च हा दिवस ‘जागतिक रंगभूमी’ ( World Theatre Day )  दिवस म्हणून साजरा केला जातो. १९६१ मध्ये पहिल्यांदा युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने (ITI) हा दिवस साजरा करण्याचे जाहिर केले. त्याच्या पुढच्या वर्षापासून म्हणजे २७ मार्च १९६२ पासून दरवर्षी जगभरातील रंगकर्मी हा दिवस ( World Theatre Day )  साजरा करतात. प्रथम हेलसिंकी येथे आणि नंतर व्हिएन्ना येथे जून १९६१ मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टीट्यूट च्या ९ व्या जागतिक बैठकीत अध्यक्ष्य ‘अर्वी किविमा’ यांनी आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्थेच्या फिनिश क्रेंद्राच्यावतीने जागतिक रंगभूमी दिनाची ( World Theatre Day )  स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट (आयटीआय) विषयी माहिती –

इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युट ही जगातील सर्वात मोठी कला सादर करणारी संस्था आहे, ज्याची स्थापना १९४८ मध्ये नाट्य आणि नृत्य क्षेत्रातील तज्ञ आणि युनोस्को संस्था यांनी मिळून केली. या संस्थेने १९५६ पासून १९८० पर्यंत विविध देशांमध्ये थिएटर ऑफ नेशन्स हा जगभरातील कलाकारांचा आंतरराष्ट्रिय महोत्सव सादर केला.

यासाठी ही संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असे. ही संस्था दरवर्षी पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय नृत्य दिन आणि जागतिक रंगमंच दिनाचे आयोजन करते.

आयटीआय संस्थेचे ध्येय –

  • ही संस्था कलेसाठी समर्पित असणाऱ्या कलाकारांसाठी काम करते. युनेस्कोच्या परस्पर समंजसपणा आणि शांततेच्या उद्धिष्टांना समोर ठेवून कार्य करते. वय, लिंग, पंथ किंवा वांशिकतेच्या बाबतीत भेदभाव न करता, सांस्कृतिक अभिव्यक्तिंचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही संस्था पुढाकार घेते.
  • कला शिक्षण, आंतरराष्ट्रिय देवाणघेवाण आणि सहकार्य आणि प्रशिक्षण या मुद्यांवर आंतरराष्ट्रिय आणि राष्ट्रिय स्तरावर काम करण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे.
  • आयटीआय संस्था राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय दोन्ही प्रकारच्या सादरिकरणासाठी कला शाखा आणि संघटनांमध्ये सहकार्य वाढवण्याचे काम करते. त्यासाठी आंतरराष्ट्रिय कार्यालयांची स्थापना केली जाते.
  • नाट्यगृहांच्या विकासासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाते. सर्व स्तरांवर नाट्य परिषदा, कार्यशाळा आणि तज्ञांच्या बैठका तसेच महोत्सव, प्रदर्शने आणि स्पर्धा आयोजित करते.
  • नाट्य क्षेत्रातील व्यावसायिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही ही संस्था पार पडत असते.

आयटीआय ही एक संघटना आहे. त्यांच्या जवळपास ९२ शाखा विकसित आहेत. एक शाखा हे एका देशातील नाट्य क्षेत्रासाठी सक्रिय असते. त्यांचे उपक्रम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रिय पातळीवर आयोजित केले जातात. त्यांनी अनेक समित्या, गट, मंच स्थापन केले आहेत. नाट्यप्रसारासाठी मीडिया कम्यनिकेशनच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी ‘ द कम्युनिकेशन कमिटी’ (कॉमकॉम), ‘द इंटरनॅशनल मोनोड्रामा फोरम’ (आयएमएफ) किंवा ‘द इंटरनॅशनल डान्स कमिटी’ (आयडीसी).

आयटीआय दर दोन वर्षांनी विविध देशात नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी इतर देशांना अर्ज करण्यास सांगते. पॅरिसच्या बाहेर आयोजित केलेला पहिला महोत्सव ‘वॉर्सा’ येथे आयोजित करण्यात आला होता. २०२१ चा हा महोत्सव ‘चायना थिएटर’ असोसिएशनने आयोजित केला होता. जगभरातील नाट्यकर्मींसाठी हि संस्था  विविध प्रकारे कार्य करत असते.

कसा साजरा होतो जागतिक रंगभूमी दिन ( World Theatre Day )  –

दरवर्षी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा होतो. या दिनाचे निमित्तसाधून जगभरातून नाट्यजगतातील एखादी दिग्गज व्यक्ती एक संदेश दरवर्षी देत असते. हा उपक्रम जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

१९६२ मध्ये जीन कॉक्च्यो यांना हा संदेश देण्याचा मान मिळाला होता. मागच्या वर्षी २०२४ ला हा संदेश देण्याचा मान नॉर्वेजियन लेखक आणि नाटककार जॉन फोसे यांना मिळाला होता. “कला ही शांतता आहे” असा मोजक्या शब्दात त्यांनी त्यांचा संदेश दिला होता.

हे संदेश एकणं आणि आत्मसाद करणं हासुद्धा रंगभूमी दिन ( World Theatre Day ) साजरा करण्याचा एक भाग आहे. जगभरातील रंगकर्मींमधून हा संदेश दिला जात असल्याने तो ऐकण्यासाठी World Theatre Day या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता.  

रंगभूमी म्हणजे काय ?

व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून घडणाऱ्या सामूदायिक कलाविष्काराला इंग्रजीत थिएटर आणि मराठीत रंगभूमी म्हणतात. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूमी, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टींनी मिळून रंगभूमीचा पाया तयार होत असतो.

जे कोणी रंगकर्मी एखादी नाटकाची कलाकृती उभारण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालतात, त्यासर्व कलाकार, रंगकर्मींसाठी ‘रंगभूमीदिन’ साजरा करणे महत्त्वाचे ठरते.

जागतिक रंगभूमीदिनाच्या ( World Theatre Day )  निमित्ताने भारतीय रंगभूमीची ओळख –

भारतासारख्या विशालप्राय देशातील एखाद्या कलाप्रकाराचे मूळ शोधणे तसे अशक्य म्हणता येईल. कारण विविध भाषा, धर्म, प्रांत यांच्यानुसार प्रत्येक कलाकृतीत वैविध्य दिसून येते. तसेच कलानिर्मीतीचा आणि वाढण्याचा काळही वेगवेगळा असू शकतो.

मात्र भरतमुनींचा ‘नाट्यशास्र’ हा भारतातील प्राचीन रंगभूमीवर भाष्य करणारा आद्यग्रंथ मानला जातो. खरं तर जेव्हा कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागला नव्हता तेव्हाही आणि आजही नाटक हे मानवी जीवनाचा केंद्रबिंदू राहिले आहे.

रंगभूमीचे स्वरूप बदलत गेले मात्र त्याचे महत्त्व नक्कीच आहे. इ.स. बारा तेराव्या शतकाच्या सुमारास संस्कृत नाट्य निर्मीतीला सुरूवात झाली. त्याच्या बरोबरीनेच भारतातील हिंदी, मराठी, बंगाली अशाकाही आधुनिक भाषांमध्येही साहित्यनिर्मीती होऊ लागली होती.  हा प्रकार उदयास येत होता. लोककलांतून एकप्रकारचे नाटकच सादर होत असे. यक्षगान, दशावतार अशा काही लोककला सादर होत.

मराठी रंगभूमीची सुरूवात –

विष्णूदासी परंपरा मराठी रंगभूमीची सुरूवात ठरली. ५ नोव्हेंबर १८४२ ला सीता स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीला झाला. म्हणून ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.

हिंदी रंगभूमीची सुरूवात –

हिंदी रंगभूमीची सुरूवात रामलीला आणि रासलीला यांच्या इतिहासापासून होते. हिंदी रंगभूमीवर संस्कृत रंगभूमीचा प्रभाव जाणवतो. भारतेन्दु हरिश्चंद्र हे हिंदी रंगभूमीचे उद्गाता समजले जातात. ३ एप्रिल हा हिंदी रंगभूमीदिन म्हणून साजरा केला जातो. ३ एप्रिल १८६८ ला बनारस मध्ये पहिला हिंदी नाटकाचा प्रयोग झाला. त्याचे निर्मीतीकार होते शीतलाप्रसाद त्रिपाठी.

जगभरात ब्रिटीश रंगभूमीला बराच मान आहे. शेक्सपियरची नाटके हा जगभरातील रंगकर्मी, लेखक यांच्यासाठी अभ्यासाचा विषया समजला जातो. शेक्सपियरसह इंग्रजीत अनेक महान नाट्य लेखकांची परंपरा आपल्यासा पहायला मिळते. बर्नॉड शॉ, आर्थर मिलर ही काही ठळक नावे.

भारतालाही अनेक चांगल्या नाट्यकर्मींचा वारसा मिळालेला आहे. मराठीत विजय तेंडूलकर, सतीश आळेकर, विजया मेहता, जब्बार पटेल, पु.ल.देशपांडे, कोंकणीतून पुंडलीक नायक, प्रकाश थळी, श्रीधर बांबोळकर,  बंगालीतून बादल सरकार, मनोज मित्रा, शंभू मित्रा, उत्पल दत्त, गुजरातीतून गोवर्धन पांचाळ, जयवंत ठाकर, मार्कंड भट्ट, हिंदीत हबीब तन्वीर, बी.व्ही. कारंथ. इब्राहिम अलकाजी, सत्यदेव दुबे, प्रसन्ना, बन्सी कौल, कन्नड मध्ये चंद्रशेखर कंबार, गिरीश कर्नाड, के.व्ही सुबण्णा, बी. व्ही. कारंथ, मल्याळममधून जी. शंकर पिल्ले, के.एन. पण्णीकर, मणिपुरीतून कनव्यालाल, रतन थिय्यम अशा अनेक रथीमहारथींचा समावेश करता येईल. जागतिक रंगभूमीदिनाच्या ( World Theatre Day )  निमित्ताने या सर्वांना अभिवादन.  

भारतीय भाषांमधील नाटकांचा अभ्यास करून जागतिक रंगभूमीच्या स्पर्धेत भारतीय भाषांच्या रंगभूमीची अवस्था कुठे आहे ? हे अभ्यासणे काळाची गरज आहे. आजच्या सोशलमीडियाच्या विळख्यात अडकलेली तरूण पिढी खरोखर नाटकांकडे वळत असेल का ? तिला आशयगर्भ मात्र मनोरंजनात्मक काहितरी देण्यासाठी काय करावे लागेल ?, कशा प्रकारची नाटकं निर्माण करावी लागतील, याचा अभ्यास व्हायला हवा. यावर्षीच्या जागतिक रंगभूमी दिनाच्या ( World Theatre Day )  निमित्ताने हा संकल्प भारतीय रंगकर्मींनी करण्यास हरकत नाही. समस्त रंगकर्मींना मिसलेनीयस भारतकडून मानाचा मुजरा आणि शुभेच्छा !

 -ज्योती भालेराव

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!