Christmas : Traditions & Festival of Lights and Gifts – ( 2024 )

Christmas
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

ख्रिसमस: परंपरा आणि दिवे, भेटवस्तूंचा उत्सव – (२०२४)

जगभरात साजरा होणारा असा ख्रिश्चन धर्मियांचा उत्सव म्हणजे ‘ख्रिसमस’. डिसेंबर महिन्याच्या २५ तारखेला संपूर्ण जगात ख्रिश्चन धर्मीयांमध्ये मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. भारतासारख्या मिश्र धर्म संस्कृती असणाऱ्या देशातही हा सण साजरा होतो. शाळांना दिवाळीच्या सणाप्रमाणेच ख्रिसमस (Christmas) साजरा करण्यासाठीसुद्धा पंधरा दिवसांची मोठी सुट्टी देण्यात येते यावरूनच या सणाचे महत्त्व दिसून येते. चला तर मग मिसलेनियस भारतच्या आजच्या या लेखात आपण ख्रिसमस सणाविषयी आणि देशाविदेशातील त्याच्या साजऱ्या करण्याच्या पद्धतीविषयी आपण जाणून घेऊ.

Christmas

का साजरा केला जातो हा दिवस ?

खिश्चन धर्मानुसार भगवान येशूच्या जन्मदिवसाच्या आनंदाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील सर्वात लहान दिवस असणारी तारीख आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी सांगितले आहे की, भगवान येशू सर्वात लहान दिवशी जन्माला आले, म्हणजे त्यामागचा अर्थ असा आहे की, त्यांच्या जन्मानंतर पुढचा प्रत्येक दिवस हा मोठा होत जातो.

याचा अर्थ असाकी, येशूने आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी लीन होऊन सर्वात लहान दिवशी जन्म घेतला आहे. म्हणूनच यादिवशी ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थना स्थळांमध्ये म्हणजे चर्चमध्ये सकाळ संध्याकाळ प्रार्थना केली जाते. ख्रिश्चन बांधव यासाठी भक्तीभावाने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.

ख्रिश्चन धर्म आणि येशू.

हा धर्म लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास या धर्माला आहे. जगातील सुमारे २.६ अब्ज लोक ख्रिस्ती धर्माचे पालन करतात. पॅलेस्टाईन येथील बेथलहेम या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचा उगम झाला. येशू ख्रिस्त हा या धर्माचा संस्थापक मानला जातो.

काय महत्त्व आहे येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाचे ?

बायबल या ख्रिस्त धर्माच्या ग्रंथामध्ये ख्रिस्ताच्या जन्माची गोष्ट वर्णन करण्यात आलेली आहे. या ग्रंथात लूक आणि मत्तय असे दोन भाग आहेत. त्यालाच ग्रंथीय भाषेत त्यांचे शुभवर्तमान असेही म्हणतात. या ग्रंथानुसार येशूचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावी झाला. एका गोठ्यात मरियाने त्यांना जन्म दिला. लूकने मरिया आणि येशूचे वडिल योसेफ यांनी बेथलेमच्या यात्रेचे केलेले वर्णनही दिले आहे. येशूला मसिहा संबोधले जाते असेही या वर्णनात आहे. पुढे जाऊन हा दिवस नाताळ किंवा ख्रिसमस (Christmas) म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

निसर्गाशी निगडित असणारा सण ख्रिसमस (Christmas).

खरं तर जवळ जवळ संपूर्ण युरोप खंड हा ख्रिश्चन धर्माचा उपासक म्हणता येईल. आणि युरोप खंडातील डिसेंबर महिना म्हणजे भरपूर थंडी असणारा काळ. त्याकाळातील संक्रमण लक्षात घेतां, त्याकाळी लोक जास्त निसर्गपूजक होते. याकाळात येथे शेतीविषयक कामे कमी असतात. बर्फ किंवा थंडीमुळे शेतकरी निवांत असतात. या सगळ्या मोकळ्या वेळाचा उपयोग लोक धार्मिक कार्यसह आनंद, उत्सव साजरे करू लागले आणि त्यातूनच ख्रिसमस (Christmas) या सणाला आजचे आधुनिक रूप आले आहे.

युरोपातील ख्रिसमस (Christmas) बाजार –

युरोपमध्ये ख्रिसमस सणाच्या काही दिवस आधीपासून विविध शहरांमधील विविध भागांमध्ये ख्रिसमस साठीचे बाजार भरवले जातात. हे बाजार म्हणजे एकप्रकाच्या जत्राच असतात. अनेक ठिकाणि विविध प्रकारचे पाळणे, इलेक्ट्रिक गाड्या, रोषणाई यांनी सजवलेले उत्सव भरवले जातात. विविध प्रकारच्या खाद्यप्रकारांची रेलचेल येथे आपल्याला पहायला, चाखायला मिळते.

चॉकलेट्स आणि वाईन्सचे इतके प्रकार येथे असतात की, लहान मुले आणि मोठी माणसे या सर्वांचीच येथे चंगळ असल्याचे दिसून येते. याशिवाय विविध प्रकारचे ब्रेड, केक, पिझ्झा, पास्ता असे अनेक खाद्यपदार्थ असतात. विक्रिसाठी आकर्षक कँडल्स, लाकडी खेळण्या असतात.

ख्रिसमसच्या (Christmas) महिन्यात म्हणजे डिसेंबर मध्ये असे बाजार भरवण्याची प्रथा सर्वप्रथम जर्मनी या देशात सुरू झाल्याचे दिसून येते. डेट्रेन या शहरात याची सुरूवात करण्यात आली. जर्मनीतील न्युमबर्ग, फ्रँकफर्ट, कोलोन, व्हिएन्ना या ठिकाणी लागणारे हे ख्रिसमस मार्केट विशेष लोकप्रिय आहेत. कोणत्याही शहराच्या मध्यवर्ती भागात, एखाद्या ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या असपास हे मार्केट भरवले जातात.

Christmas

स्थानिक संस्कृतीची ओळख करून देणे आणि युरोपमधली कडक थंडीत लोकांना काहीतरी विरंगुळा मिळवून देणे हा या ख्रिसमस मार्केट भरवण्याचा उददेश दिसून येतो. कारण युरोपमधील थंडीच्या दिवसांमध्ये संपुर्ण वातावरणात मरगळ भरून राहिलेली असते. अशा अंधाऱ्या, निराशाजनक वातावरणात ख्रिसमसच्या (Christmas) तयारीसाठी लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो तो येथे भरणाऱ्या अशा ख्रिसमस मार्केट मुळे.

ख्रिसमस (Christmas) हा सण जरी धार्मिक असला तरीही हा सण साजरा करताना ख्रिस्ती बांधवांनी तो साजरा करताना अनेक जुन्या नव्या प्रथांचा अंगिकार केल्याचे दिसून येते. यातील काही प्रथा या लहान मुलांसाठी विशेष आवडीच्या असल्याचे दिसून येते. अशाच काही प्रथा परंपरांची आपण माहिती घेऊ.

Christmas

नाताळबाबा म्हणजेच लहानग्यांचा आवडता “सांताक्लॉज”

सांताक्लॉज हे ख्रिसमस (Christmas) या सणाचे विशेष आवडीचे आकर्षण म्हणता येईल. सांताक्लॉज किंवा संत निकोलस असेही त्याला म्हणतात. ख्रिसमस सणासाठी निर्माण करण्यात आलेले हे एक काल्पनिक पात्र आहे. जे लहान मुलं चांगली वागणूक ठेवतात त्यांना सांता ख्रिसमसच्या आदल्या रात्री येऊन भेटवस्तू देऊन जातो असे सांगितले जाते. लहानमुलांना चांगल्या वर्तणूकीची शिकवण देण्यासाठी आणि त्यांना आनंदी करण्यासाठी सांता हे पात्र निर्माण करण्यात आल्याचे दिसून येते.

एक लठ्ठ, बुटका पण गोंडस माणूस पांढऱ्या शुभ्र दाढी मिशांमध्ये, लाल कपड्यांमधील ही व्यक्ती मोठ्या पिशवीतून एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात गिफ्ट वाटत असल्याचे आपल्याला नेहमी दाखवण्यात येते तोच हा सांताक्लॉज होय. घराघरांत मात्र आपल्या मुलांना ख्रिसमस (Christmas) च्या आदल्या दिवशी रात्री एक नवीन पायमोजा (सॉक्स) उशाशी घेऊन झोपायला सांगितले जाते. त्यात रात्री सांताबाबा येऊन गिफ्ट ठेवतो असे त्यांना सांगून ठेवले जाते. लहान मुले या रात्रीची आतुरतेने वाट पहात असतात. घरातीलच मोठी माणसे यात काही गिफ्ट ठेवतात. ही प्रथा युरोपमधील ख्रिस्ती बांधवांमध्ये फार आवडीने पाळली जाते.

Christmas

ख्रिसमस आणि संगीत.

ख्रिसमस (Christmas) या सणाला येशूच्या जीवनाशी निगडीत अनेक सुंदर गाणी गायली जातात. यावेळी विशेष संगीत सुरावटींनी ख्रिसमसच्या संध्याकाळ साजऱ्या केल्या जातात. इसवीसनाच्या चौथ्या शतकात रोम मध्ये या संगीताचा उगम झाल्याचे सांगीतले जाते. पुढे जाऊन विविध देशांमधील स्थानिक भाषांमध्ये ही गाणी म्हटली जाऊ लागली. या सणाच्या दरम्यान अशी भक्तीमय गाणी म्हणणाऱ्यांचा एक समूह तयार केला जातो आणि तो घरोघरी जाऊन नाताळची गाणी सादर करतो.

ख्रिसमस (Christmas) आणि भेटवस्तू.

ख्रिश्चन बहुल विविध देशांमध्ये ख्रिसमस (Christmas) हा सण साजरा करण्याच्या विविध पद्धती दिसून येतात. मात्र हा सण साजरा करताना एक समान धागा दिसून येतो तो म्हणजे भगवान येशूचे स्मरण करणे आणि आपापसात आनंद वाटणे. त्यासाठी आप्तस्वकिय एकमेकांना विविध तऱ्हेच्या भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाल्याचे दिसून येते. या भेटवस्तू कशा स्वरूपात द्याव्या, कोणी कोणाला द्याव्यात याच्या विविध पद्धती दिसून येतात.

भेटवस्तू देण्याच्या या प्रथेमुळे लहान मुलांना या सणाचे विशेष अप्रुप आहे. युरोपातील शाळांमध्येही भेटवस्तूंची ही प्रथा आवर्जून पाळली जाते. काही ठिकाणी सांताक्लॉज चे रूप घेऊन घरातील लोक आपल्या लहानग्यांसाठी भेटवस्तू देतात. गिफ्टस् मध्ये शुभेच्छापत्रांचाही खास मान असतो. येशूच्या संदेशांचे किंवा प्रेमविषयक संदेशांचे शुभेच्छापत्र देणे हे सुद्धा ख्रिसमसच्या सणाचे विशेष म्हणता येईल.

ख्रिसमस (Christmas) ट्रि –

ख्रिसमस ट्रि सजवणे ही पद्धतीही सर्वप्रथम जर्मनीमध्ये उदयास आल्याचे पहायला मिळते. थंड प्रदेश आणि सूचीपर्णी वृक्ष यांचे नाते आहेच. हा वृक्ष युरोपीय देशांमधील थंड वातावरणात जास्त दिसून येतो. ख्रिसमस सणासाठी हा वृक्ष सजवणे हा एक निसर्गपूजेचाच प्रकार म्हणता येईल. दिव्यांच्या माळा, छोट्या भेटवस्तूंच्या प्रतिकृती, चॉकलेटस, घंटा यांनी हा वृक्ष सजवला जातो. इ.स. १८३५ मध्ये याला ख्रिसमस (Christmas) ट्रि म्हणण्यास सुरूवात झाल्याचे सांगतात.

गोठ्याच्या प्रतिकृती –

भगवान येशूचा जन्म गायीच्या गोठ्यात झाला असल्याने, त्याची आठवण म्हणून ख्रिस्ती लोकांमध्ये आपल्या घरात किंवा परिसरात गोठ्याची प्रतिकृती निर्माण करण्याची प्रथा असते. ही प्रथा साधारण १२२३ मध्ये सुरू झाल्याचे समजते. संत फ्रांसिस असिसिकर हे या प्रथेचे जनक म्हणून ओळखले जातात. इटली मधील एका चर्चमध्ये त्याने १२२३ च्या नाताळ सणात प्रथम असा गोठा बनवला आणि पुढे त्याचा रिवाजच पडला.

काहीजण या गोठ्यांच्या प्रतिकृतीमध्ये येशू आणि मरियाच्या मूर्ती, गायींच्या मूर्ती ठेवतात. चर्चमध्ये अशी प्रथा सुरू झाल्यामुळे भाविकांना या गोठ्याचे फार आकर्षण निर्माण झाले. आणि पुढे लोक आपल्या घरीही त्याचे अनुकरण करू लागले. ही प्रथा जगभर पाळण्यात येऊ लागली. ही प्रथा इतकी जुनी आहे की २०२३ या वर्षी या प्रथेला ८०० वर्षे पूर्ण झाले आहेत.

ख्रिसमस आणि खाद्यपदार्थ.

खरं तर जसा देश तशी या सणाच्यावेळची खाद्यपदार्थांची संस्कृती असे म्हणता येईल. भारतातील ख्रिस्ती बांधव यादिवशी करंजी, लाडू असे पारंपरीक पदार्थ करून त्यादिवशी सकाळी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. युरोपीय देशांमध्ये विविध केक, चॉकलेटस, ब्रेडचे पदार्थ तयार केले जातात. जिथे जिथे हा धर्म विखुरलेला आहे त्या देशाच्या खाद्यसंस्कृती प्रमाणे खाद्यपदार्थ तयार करून हा सण साजरा केला जातो.

थोडक्यात धर्म कोणताही असो सण म्हंटल की आनंद वाटणे महत्त्वाचे. सण साजरा करण्याचा उद्देशच आपल्या देवतेचे स्मरण करत, प्रार्थना करणे, आप्तस्वकियांसह खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत, भेटवस्तूंची देवाणघेवाण करणे हा असतो. ख्रिसमसच्या या प्रथा परंपराही आपल्याला हिच शिकवण देत असल्याचे दिसून येते.

Christmas

ज्योती भालेराव.

Leave a Reply

Christmas : Traditions & Festival of Lights and Gifts – ( 2024 )