World Tuberculosis Day 24th March – (Started – 24th March 1882)

Tuberculosis

जागतिक क्षयरोग (Tuberculosis) दिवस २४ मार्च – (सुरूवात – २४ मार्च १८८२  )

जगभरात असे काही आजार आहेत ज्यांच्याविषयी समाजात अनेक समज-गैरसमज असतात. अशा काही आजारांविषयी समाजात जागृती घडावी, लोकांना त्या माहितीचा उपयोग व्हावा, यासाठी त्या आजाराच्या जागृतीसाठी ते दिवस साजरे केले जातात. असाच एक महत्त्वाचा जागतिक दिन म्हणजे जागतिक क्षयरोग दिवस. दरवर्षी जगभरात २४ मार्चला जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो.

२४ मार्चला जागतिक क्षयरोग (Tuberculosis) दिवस का साजरा होतो ?

सन १८८२ ला डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्याविषयीचा प्रबंध त्यांनी जागतिक शास्रज्ञांच्या परिषदेत मांडला होता. त्या प्रबंधास दिनांक २४ मार्चला जगभरातून मान्यता मिळाली. म्हणून त्यांच्या या योगदानाबद्दल २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.

क्षय रोग म्हणजे काय ?

पूर्वी क्षय रोग (Tuberculosis) हा अत्यंत दुर्धर, कधीही बरा न होणारा आझार मानला जात असे. त्यावरील उपचारांचीही बरीच कमी होती. मात्र क्षय रोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यावरील उपचार व्यवस्थित घेतले तर क्षय रोग हा पूर्णपणे बरा होतो.

क्षय रोगाला संक्षिप्त स्वरूपात टीबी म्हणूनही ओळखले जाते. टिबी (क्षय रोग ) एक घातक संक्रमण करणारा रोग आहे. हा रोग माइकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसीस जिवाणूमुळे होतो. या जिवाणूचे संक्रमण जास्तकरून मानवी शरीराच्या फुफुस्सांवर होते. मात्र शरिराच्या इतर भागांवरही या जिवाणूंचा प्रभाव पडू शकतो. हवेच्या माध्यमातून पसरणारा हा आजार, वेळीच ओळखून त्यावर योग्यते उपचार केले पाहिजे.

क्षय रोग (Tuberculosis)  कसा पसरतो ?

जेव्हा एखादा क्षय रूग्ण खोकतो किंवा शिंकतो किंवा बोलतो तेव्हा या आजाराच्या जिवाणूंचे संक्रामक ड्रॉपलेट न्युक्लीआय उत्पन्न होतात, जे हवेच्या माध्यमातून इतर निरोगी व्यक्तीलाही संक्रमित करतात. हे ड्रॉपलेट न्युक्लीआय अनेक तास वातावरणात सक्रिय रहातात.

सुप्त अवस्थेतील टीबी आणि सक्रिय अवस्थेतील टीबी –

क्षय रूग्णांच्या किंवा क्षय रोगाच्या (Tuberculosis) दोन अवस्था मानल्या जाता. एक सुप्त अवस्थेतील क्षय आणि दुसरा सक्रिय अवस्थेतील क्षय. यातील सक्रिय अवस्थेतील क्षय जास्त घातक आहे. सुप्त अवस्थेतील क्षय रूग्णांमध्ये रूग्णाला टीबीच्या जिवाणूंचे संक्रमण होते मात्र हा जिवाणू निष्क्रिय अवस्थेमध्ये असतो.

त्यामुळे रूग्णामध्ये क्षय रोगाविषयीचे कोणतेही लक्षणं दिसत नाहीत. मात्र सुप्त अवस्थेतील क्षय रूग्णाने योग्य उपचार केले नाहीत तर हाच क्षय रोग सक्रिय होण्यास सुरूवात होते. त्यामुळे अनेक दिवस टिकून राहिलेला खोकला यांसारख्या लक्षणांकडे दूर्लक्ष न केलेलेच बरे.

सक्रिय अवस्थेतील क्षयामुळे (Tuberculosis) व्यक्ती आजारी पडते. त्यांच्या शरिरावर अनेक लक्षणे आढळून येतात. सक्रिय क्षय रोग असणाऱ्या व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीला संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळेच अशा रूग्णांनी खोकताना, शिंकताना, बोलताना तोंडावर रूमाल धरावा. त्यामुळे हा रोग आटोक्यात रहाण्यास मदत होते.

क्षय रोगाची लक्षणे –

  • १ सलग तीन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला येणे आणि तो त्याच तिव्रतेने टिकून रहाणे
  • २ खोकताना रक्त पडणे
  • ३ छातीमध्ये दुखणे आणि श्वास (धाप) लागणे
  • ४ रूग्णाचे वजन कमी होणे, थकवा जाणवणे
  • ५ संध्याकाळच्यावेळेस ताप येणे आणि थंडी वाजणे
  • ६ रात्री घाम येणे

तुम्हाला जर अशी काही लक्षणे असतील तर त्वरीत डॉक्टरकडून योग्य त्या तपासण्या करून घ्या आणि वेळेत उपचार सुरू करा.

क्षय (Tuberculosis) रोगाचे प्रकार –

१ पल्मोनरी टीबी ( फुफ्फुसिय क्षय )

जर टीबीच्या जिवाणुंचा हल्ला रूग्णाच्या फुफुस्सांवर झाला असेल तर त्या टीबीला पल्मोनरी टीबी असे म्हणतात. बऱ्याचदा हे जिवाणू फुफुस्सांनाचा संक्रमित करतात. बराच छातीत दुखणे, अनेक दिवस खोकला येणे, छातीत कफ होणे ही याची लक्षणे असतात. कधी कधी खोकताना रक्त ही दिसते. मात्र अनेकदा लक्षणे दिसत नाहीत. टीबी हा एक जुना आजार आहे.

त्यामुळे फुफुस्सांच्या वरच्या भागांवर ते आघाच करू शकतात. फुफुस्सांच्या वरच्या भागावर होणाऱ्या संक्रमणाला कॅविटरी टीबी म्हटले जाते. बहुतांशः वरच्या भागाला संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. जर स्वर नलिकेवर या जिवाणूंचा प्रभाव झाला तर त्याला लेरिंक्स टीबी संबोधले जाते.

२ एक्स्ट्रा पल्मोनरी टीबी ( इतर फुफुस्सिय क्षय )

जर फुफुस्सांशिवाय शरिराच्या इतर भागांवर संक्रमण झाले असेल त्याला एक्स्ट्रा पल्मोनरी टीबी म्हटले जाते. एकस्ट्रा पल्मोनरी टीबी हा पल्मोनरी टीबीसोबतही होऊ शकतो. म्हणजेच एकाचवेळी फुफुस्सांसह  शरिराच्या इतर भागांवर क्षयाच्या जिवाणूंचे संक्रमण होऊ शकते.एकस्ट्रा पल्मोनरी टीबी हा ज्याचीं रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना आणि लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.

एचआयव्ही बाधीत रूग्णांमध्ये या प्रकारचा टीबी होण्याचे प्रमाण जास्त दिसून येते.

क्षय रोगाची तपासणी कशी केली जाते ?

क्षय रोगाचे (Tuberculosis) लक्षण दिसून आल्यावर डॉक्टरांद्वारे क्षय रोगासाठीच्या काही चाचण्या करण्यास सुचवले जाते. त्यानुसार क्षयाचा प्रकार जाणून घेऊन उपचार सुरू केले जातात.

क्षय रोगाला प्रतिबंध घालण्यासाठीच्या उपाययोजना –

  • क्षय रोगावर (Tuberculosis) नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा तो नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यतः बालकांमध्ये बैसिलस कैल्मिट ग्यूरिन (बीसीजी) चे लसीकरण केले जावे. बालकांमध्ये क्षयाची लागण होण्याचा धोका यामुळे जवळजवळ २० टक्क्यांनी कमी होतो.
  • सक्रिय क्षय रोगाच्या रूग्णांची माहिती मिळताच त्यांच्यावर त्वरित उपचार केले जावेत. क्षय रोगाचे उपचार जितके लवकर सुरू करण्यात येतात, तितक्या लवकर त्या रोगापासून सुटका होते.
  • क्षय रोगाने (Tuberculosis) संक्रमित असणाऱ्या व्यक्तिंनी कायम खोकताना, शिंकताना आणि बोलताना तोंडावर रूमाल धरला पाहिजे. तसेच गर्दीच्या ठिकाणी, उघड्यावर थुंकणे टाळले पाहिजे.
  • स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.
  • ताजे फळं, भाज्या, कर्बोदके, प्रथिनं, चरबीयुक्त आहाराचे सेवन करून आपली प्रतिकारक्षमता वाढवली पाहिजे. जर आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते आणि त्यामुळे क्षय रोगासारख्या आजारांचे संक्रमण होण्याचा धोका कमी होतो.

हेनरिक हर्मन रॉबर्ट कोच यांच्याविषयी

होनरिक हर्मन रॉबर्ट कोच यांचा जन्म ११ डिसेंबर १८४३ ला क्लॉस्टलमध्ये झाला. तर मृत्यू २७ मे १९१० ला बाडेन-बाडेन येथे झाला. हे एक जर्मन फिजिशियन, सूक्ष्मजीवशास्रज्ञ आणि स्वच्छताशास्रज्ञ म्हणून ओळखले जातात. १९ व्या शतकातील हे एक औषध संशोधक म्हणूननही नावारूपाला आले होते.

१८७६ मध्ये रॉबर्ट कोच यांना मानवी अवयवांच्या बाहेर अँथ्रँक्स जीवाणूची वाढ करून त्या जीवणूच्या जीवनचक्राविषयीचे विश्लेषण करण्यात यश आले. एखाद्या रोगकारक जिवाणूच्या जीवनचक्राची अशी भूमिका वर्णन करण्याची ही पहिलीच वेळ होती.  त्यानंतर १८८२ मध्ये त्यांनी क्षयरोगाच्या जिवाणूचा (मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ) शोध लावला.

Tuberculosis

१९०५ मध्ये त्यांना शरिरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. प्रसिद्ध शास्रज्ञ लुई पाश्चर यांच्यासह त्यांनी आधुनिक बॅक्टेरियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी तसेच इम्युनोलॉजी आणि ॲलर्जी विषयक संस्थेचे संस्थापक झाले. विषाणूशास्राच्या क्षेत्रातही ते यशस्वी होते. संसर्गाच्या सिद्धांतात आणि उष्ण ट्रॉपिकल औषधांच्या विकासात मूलभूत योगदान दिले. अशा या शास्रज्ञाच्या महान शोधामुळे मानवी जीवनावर किती मोलाची भर घातली आणि क्षय रोगासारख्या जीवघेण्या आजारापासून संरक्षण होण्यास मदत झाली.

आजही जगातील अनेक भागात क्षय रोग हा एखाद्या साथीच्या आजाराप्रमाणे आहे. ज्यामुळे दरवर्षी सुमारे दिड दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. हा मृत्यूदर कमी व्हावा आणि क्षयाचे जीवाणू नष्ट व्हावे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जगभरात क्षय रोग दिवस २४ मार्च ला साजरा केला जातो. तुम्हीही यासाठी सोशल मीडियावरून किंवा अन्य कोणत्या मार्गाने जनजागृती करू शकता. विशेषतः ग्रामिण भागातील लोकांसाठी किंवा कष्टकरी समाजातील जनतेसाठी ही जागृती फार महत्त्वाची ठरू शकते.

  • ज्योती भालेराव

1 thought on “World Tuberculosis Day 24th March – (Started – 24th March 1882)”

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!