Residence of early revolutionary Vasudev Balwant Phadke – Nrusinha Temple, Sadashivpeth, Pune (1865 to 1879)

revolutionary Vasudev Balwant Phadke
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

आद्य क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडक्यांच्या वास्तव्याचे ठिकाण  – नृसींह मंदिर, सदाशिवपेठ, पुणे (इ.स. १८६५ ते १८७९)

पुणे शहराच्या सदाशीव पेठेतील रस्त्यावरून जाताना एक वाडा सदृश मंदिर आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराच्या बाहेरच्या सज्जावर महापालिकेकडून पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती या उपक्रमाअंतर्गत  निळी गोल आकाराची पाटी लावलेली दिसते. त्यावरची अक्षरे आहेत, आद्य  क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake )  येथे रहात होते. ( वास्तव्याचा काळ – इ.स. १८६५ ते १८७९)

हे वाचून आपण आपली गाडी तेथे पार्क करून आपली पावले मंदिराकडे  वळवतो. शालेय पाठ्यपुस्तकात कधीतरी वाचलेल्या या महापुरूषाचे वास्तव्य या शांत मंदिरात होते हे ऐकून मंदिर आणि या परिसराविषयीची उत्सूकता निर्माण होते.

धार्मिक आणि ऐतिहासिक असे दुहेरी महत्त्व असणाऱ्या या मंदिराला सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. सुरूवातीला आपण या मंदिराच्या निर्मीतीचा इतिहास जाणून घेऊ. आणि त्यानंतर या पवित्र धार्मिक स्थळाला आपल्या वास्तव्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या वासूदेव बळवंत फडक्यांच्या संपुर्ण कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत.

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर

अडीचशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा – हे मंदिर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. अगदी रस्त्याच्या लगत असणाऱ्या या मंदिराची फार कमी जणांना कल्पना असल्याचे जाणवते. जुना कारकोळपुरा किंवा नरसिंगपुरा म्हणजे आजच्या सदाशिव पेठेचा भाग होय. १४२०, सदाशिव पेठेत खजिना विहिरीजवळ असणाऱ्या या मंदिरातील संगमरवरी देखणी मूर्ती २५० वर्षांपूर्वी काशी येथून पुण्यात आणण्यात आलेली आहे.

इसवीसन १७७४ मध्ये गणेशभट जोशी यांनी हे मंदिर बांधले. रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर येथून चरितार्थासाठी जोशी पुण्यात आले. मात्र कुलदैवताच्या आठवणीने ते व्याकूळ होत असत. त्यातच त्यांना दृष्टांत झाला, की मी काशी येथे निवडुंगात आहे. कष्टप्रद प्रवास करून जोशी दांपत्य काशी येथे गेले आणि त्यांना निवडुंगाच्या झुडुपात ही देखणी विष्णूमूर्ती  म्हणजे नृसिंह मूर्ती मिळाली. अशी या मंदिरातील दैवताची कथा सांगण्यात येते.

ही मूर्ती पुण्यात आणल्या नंतर पुण्यात सर्वत्र या सुंदर मूर्तीचा लौकिक झाला. खुद्द् पेशव्यांनी हे मंदिर बांधून देण्याची आणि त्याच्या पुढील सोयीची व्यवस्था करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र गणेशभट जोशी यांनी माझ्या प्रमाणेच माझा देवही साधेपणाने राहिल असे सांगितले. पुढे स्वतःच त्यांनी हे मंदिर उभे केले.

मंदिराचे वैशिष्ट्य –

आजही या मंदिराचे पुरातन साधेपण टिकून आहे. येथील लाकडी सभामंडप, जुने प्रवेशद्वार आणि मुळ गर्भगृह पूर्वीप्रमाणेच टिकून आहे. गाभाऱ्यात सुंदर मूर्ती असून नित्यनेमाने पूजाअर्चा आदि कार्यक्रम केले जातात.

सध्या जोशी यांची दहावी पिढी या मंदिराचा कारभार पहाते. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच बाहेरील शहरी गजबजटापासून आपला संपर्क तुटतो. बाहेर औदुंबराचा मोठा वृक्ष, शांत परिसर, जुन्या मंदिरात नेहमी भासणारा गारवा आपल्याला येथे रेंगाळायला लावतो. येथील असिम शांत वातावरणाचा आपण अनुभव घेतो. मंदिराच्या पावित्र्यासह येथे एका एतिहासिक, शूर पुरूषाचे वास्तव्य होते या विचाराने आपण भारावून जातो. या मंदिराच्या खिडक्या, बाजूचे लाकडी सज्जे, ऐसपैस सभामंडप पाहण्यासारखा आहे.

वासूदेव बळवंत फडके यांच्या विषयी ( Revolutionary Vasudev Balvanta Fadake)

वासूदेव बळवंत फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake ) यांचा जन्म महाराष्ट्रातील ‘शिरढोण’ या गावी ४ नोव्हेंबर इ.स. १८४५ ला झाला. हे भारतीय क्रांतीकारक म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतीकारक किंवा सशस्र क्रांतीचे जनक अशीच त्यांची ओळख आहे.

रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लढाऊबाणा त्यांच्याकडे परंपरेने असल्याचे दिसून येते. लहाणपणापासूनच फडक्यांना कुस्ती,घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले होते.

revolutionary Vasudev Balwant Phadke

फडके आपले माध्यमिक शिक्षण संपल्यावर पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. त्याकाळी पुणे हे राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान होते. अनेक मान्यवर राजकीय नेत्यांचा उदय या शहरातून झालेला बघायला मिळतो. अशा या शहरातून त्यांना ब्रिटिशांच्या स्वार्थी  आणि अन्यायकारक राजकीय धोरणांची जाणीव झालेली दिसून येते. येथे असतानाच त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला आणि भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीला ब्रिटिशांची आर्थिक धोरणे जबाबदार असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  

याच काळात ते क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्याही प्रभावाखाली होते. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि त्यात इतर जातींनाही सामावून घेण्याची गरज साळवेंनी त्यांना पटवून दिली. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या लढ्याची रणनीती आखल्याचे दिसून येते.  ब्रिटिशांविरूद्धच्या सशस्र लढ्याची ठिणगी पुण्यातील या नरसिंह मंदिराच्या त्यांच्या वास्तव्यात असल्याने याठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

क्रांतीचा पाया –

आपल्या अंथरूणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने रजा देण्यास टाळाटाळ केली. फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake ) रजा घेऊन घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा मृत्यु झाला होता.

संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरूद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरूवात केली. १८७०च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा सुरू केली.

सशस्र क्रांतीची तयारी –

इ.स. १८७९ नंतर फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake ) यांच्या प्रत्यक्ष कार्याला सूरूवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. त्यातून त्यांना फक्त तीन हजार रूपये मिळाले. त्यानंतर त्यांनी जवळपासच्या काही गावांवर असेच दरोडे टाकून लूटमार केली.

५ मार्च १८७९ ला जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. यातून त्यांना चार बंदुका, तीनशे रूपये व शंभर रूपयाचे कापड इतका ऐवज मिळाला. या मिळालेल्या संपत्तीमधून त्यांनी ब्रिटिशांविरूद्धच्या सशस्र उठावाची तयारी सुरू केली. त्यांनी सुरूवातीला पुणे, मुंबई व इतर शहरातील धनाढ्य लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. मात्र त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. फडक्यांनी मग महाराष्ट्रातील मातंग,रामोशी, धनगर, कोळी या समाजातील तरूणांना एकत्र केले, त्यांना शस्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केले.अशा आपल्या छोट्याश्या सैन्याच्या तुकडीसह त्यांनी ब्रिटिशांच्या विरूद्ध युद्ध पुकारले होते. शिरूर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. ब्रिटिशांनी फडक्यांना पकडून देणाऱ्यास इनामसुद्धा जाहिर केले होते, यावरून त्यांचा आणि त्यांच्या सैन्याचा ब्रिटिशांना झालेला उपद्रव लक्षात येतो.

घानूर येथे झालेल्या लढाई नंतर फडके अरब आणि रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैद्राबाद संस्थानात गेले. तेथील निजमाच्या सेवेत असणाऱ्या अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम डॅनियल या अधिकाऱ्यांनी फडक्यांना पुन्हा महाराष्ट्रात जाण्यासाठी भाग पाडले.

क्रांतिवीरावर चाललेला खटला आणि मृत्यू –

२३ जुलै, १८७९ च्या दिवशी विजापूर जवळील देवर नावडगी या गावच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना वासूदेव बळवंत फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake ) यांना अटक करण्यात आली आणि पुण्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यावेळी पुण्यातील सार्वजनिक काकांनी त्यांचे वकिलपत्र घेतले होते.

उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. त्यांना येमेन देशातील एडन येथील तुरूंगात पाठवण्यात आले होते. तेथील आपल्या कोठडीचे दार बिजागर्यांसह उचकटून काढून तेथून त्यांनी पळ काढला. मात्र काही दिवसातच त्यांना पुन्हा अटक झाली. कोठडीत मिळत असलेल्या वागणुकिविरूद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यू  झाला.

शैक्षणिक कार्य –

वासूदेव बळवंत फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake ) हे पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची त्यांनी शपथ घेतली होती. समाजात समानता, एक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी एक्यवर्धीनी संस्था सुरू केली. पुण्यामध्ये इ.स. १८७४ मध्ये पुना नेटिव्ह इनस्टिट्यूशन ही शाळा सुरू केली. त्यातून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचे त्यांचे प्रयोजन दिसून येते.

आद्यक्रांतीकारक वासूदेव बळवंत फडके (Revolutionary Vasudev Balvanta Fadake ) यांचे संपुर्ण जीवनकार्यच शौर्य, थरार आणि देशभक्तीने भारलेले आहे. त्यांच्या या थरारक देशसेवेच्या  कार्याची सुरूवात पुणे शहरातून झालेली आहे. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाविषयी  सखोल माहिती जाणून घेण्यासाठी पुढील काही पुस्तके वाचण्यासारखी आहेत. आद्य क्रांतिकारक वासूदेव बळवंत फडके (लेखक-डॉ.कृ.ज्ञा.भिंगारकर) आणि आद्य क्रांतिकारक वासूदेव बळवंत फडके (लेखक –विष्णू श्रीधर जोशी ) ही काही पुस्तकांची नावे आहेत.

काही वास्तूंना जितके महत्त्व प्राप्त मिळायला हवे तितके मिळताना दिसून येत नाही. यासाठी जितके शासन जबाबदार असते त्यापेक्षा जास्त जबाबदार आपल्या इतिहासाविषयी अनुस्तुक असणाऱ्या नागरिकांनाही जबाबदार धरायला हवे. अशा क्रांतिकार, समाजसेवक महापुरूषांच्या वास्तव्याची ठिकाणेच पुढील पीढीसाठीची प्रेरणास्थान असणार आहेत. यासाठी अशा वास्तू वारसा म्हणून सांभाळायला हव्यात. वारसांचे जतन, संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टिने त्यांचा विकास नक्कीच व्हायला हवा.

How to Reach …

 

1 thought on “Residence of early revolutionary Vasudev Balwant Phadke – Nrusinha Temple, Sadashivpeth, Pune (1865 to 1879)”

Leave a Reply