Table of Contents
रामन सायन्स सेंटर – नागपुर (स्थापना – ७ मार्च १९९२)
भारत देशाला तरूणांचा देश म्हणून ओळखले जाते. आपल्या देशात लहान मुले आणि तरूण यांची संख्या जास्त आहे. ग्रामिण भागासह देशाच्या कानाकोपर्यात खुप टॅलेंट सापडते. मात्र आपल्या देशात लहान वयापासूनच प्रयोगशील शिक्षण देण्याचा अभाव दिसून येतो. प्रत्यक्ष प्रयोग करून बघत शिकल्याने मुलांना शिक्षणाचा निखळ आनंद मिळतो. विज्ञान विषयासाठी तर ही पद्धत जास्त उपयोगी समजली जाते. मात्र देशात त्यासाठीच्या प्रयोगशाळा अथवा विज्ञानाशी निगडित संग्रहालयांची संख्या फार कमी आहे. मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र हे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. या केंद्राच्याच संलग्न असणारे आणखी एक विज्ञान केंद्र ऑरेंजसिटी अशी ओळख सांगणाऱ्या नागपूर शहरात आहे (Raman science center in Nagpur). रामन विज्ञान केंद्र असे या वैशिष्ट्यपूर्ण विज्ञान केंद्राचे नाव आहे. आबालवृद्धांसह सर्वांसाठीच येथे ज्ञानाचा खजिना साठवलेला आहे. येथे भेट देऊन हा ज्ञानाचा खजिना आपण पाहिजे तितका लुटू शकतो.
रामन विज्ञान केंद्राविषयीची माहिती – Information About Raman science center in Nagpur.
गांधीसागर तलावाच्या काठावर वसलेले रामन विज्ञान केंद्र हे एक उत्कंठावर्धक स्थळ आहे. येथे फक्त विज्ञानाच विषयी माहिती मिळते असे नाही तर येथून जाताना आपण एक अतिशय नाविन्यपूर्ण अनुभव घेऊन जातो. हसत खेळत विज्ञान ही संकल्पना येथे प्रत्यक्षात उतरल्याचा अनुभव आपल्याला येईल. १६ एकर जागेवर पसरलेल्या या नयनरम्य परिसरात आपण मोकळेपणाने विविध प्रयोग स्वतः हाताळून पाहू शकता. एखादी तरफ दाबून, चाक, फिरवून, दोर खेचून, कळ फिरवून आपणांस येथील प्रादर्श हाताळता तर येईलच सोबत अन्योन्यक्रिसेद्वारे त्यात दडलेल्या विज्ञानाचे आकलन सुद्धा होईल आणि त्यातून आपल्याला अपूर्व आनंद मिळतो. या जागेवर काही काळ व्यतीत केल्यावर विज्ञान ही संकल्पना अगम्य नसून ती एक आनंदमय यात्रा आहे याची आपल्याला अनुभुती येते.
निसर्गरम्य आणि विस्तिर्ण जागेमध्ये पसरलेल्या तसेच हिरवाईने नटलेल्या विज्ञान बागेच्या रमणीय परिसरात येणाऱ्या प्रेक्षकांना शहरातील धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा प्राप्त होतो. येथे मुलांना खेळण्यासाठी विविध प्रादर्श लावण्यात आलेले आहेत त्याद्वारे पदार्थविज्ञानातील संकल्पना सहज त्यांना समजतात. रामन विज्ञान केंद्र, नागपुर (Raman science center in Nagpur) हे मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राचे समन्वयक केंद्र आहे. या केंद्राची उभारणी ही विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, त्यांच्यात विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून करण्यात आलेली आहे.
प्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेते भारतीय भौतिक शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या वरून या विज्ञान केंद्राचे नाव ठेवण्यात आले आहे. रामन विज्ञान केंद्राचे (Raman science center in Nagpur) उद्धाटन ७ मार्च १९९२ ला करण्यात आले तर येथील रामन तारामंडलची सुरुवात ५ जानेवारी १९९७ ला झालेली आहे.
याठिकाणी विज्ञान अनुभवण्यासाठी कोण कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत –
१) रामन विज्ञान केंद्र (Raman science center in Nagpur)
२) मनोरंजक विज्ञान विभाग
३) विविध वैज्ञानिक अविष्कार विभाग
४) विज्ञान बगिचा
५) प्रागैतिहसिक प्राणी उद्यान
६) ३डी विज्ञान शो
७)तारामंडल
८) मोठ्या गोलकावरील विज्ञान शो
८) विज्ञान प्रदर्शन
रामन विज्ञान केंद्र (Raman science center in Nagpur) म्हणजे खरोखर एक रोमांचकारी दुनिया आहे. येथे आल्यानंतर समजते की विज्ञान हा काही फक्त अभ्यासक्रमातील विषय नसून अनुभव घेण्याचे एक साधन आहे. येथे येऊन लोक विज्ञानाच्या संकल्पनांशी खेळायला शिकतात आणि त्यातून विज्ञानाच्या अनेक किचकट गोष्टी समजून घेतात. येथाल प्रदर्शनात ठेवलेल्या गोष्टी वापरून जसे की लोखंडी पहार, चेंडू, तारा अशा अनेक साधनांशी खेळून, त्यांची बटनं दाबून त्याचा आनंद घेतात.
तुम्ही याठिकाणाला कधी भेट देऊ शकता ? Timings to visit Raman science center in Nagpur
येथे पर्यटक संपुर्ण दिवस थांबून विज्ञानाच्या अनोख्य़ा दुनियेचा आनंद घेऊ शकतात. दिवाळी आणि होळी सोडल्यास हे केंद्र दररोज खुले असते.
सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे विज्ञान केंद्र सर्वांसाठी काही शुल्क आकारून खुले असते.
येथे असणाऱ्या काही विशेष विभागांविषयी –
मनोरंजक विज्ञान – या ठिकाणी एक प्रदर्शन आहे. विज्ञानातील सिद्धांतांचे प्रात्यक्षिक येथील उपकरणांच्या माध्यमातून अनुभवायला मिळते. ध्वनींच्या लहरींचा अभ्यास करण्यासाठी असलेला मोठा पियानो, कोरीओलीस फोर्स, प्लाज्मा ग्लोब, आरशांचा भुलभुलैया, खाली पडणारी नाणी, आपल्याच पाठीचे दिसणारे प्रतिबींब, ध्वनीचा प्रतिबींबीत होणारा ध्वनी अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी येथे अनुभवायला मिळतात. या सर्व उपकरणातून आपल्याला अनेक एरवी अवघड वाटणाऱ्या विज्ञान संकल्पनां समजतात.
मानवाने टप्प्याटप्प्याने केलेली प्रगतीचा अविष्कार – आदिमानवाच्या काळापासूनचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की मानवाने आपले जीवन सुसह्य व्हावे यासाठी अगणित शोध लावले. त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याने विविध उपकरणांची निर्मीती केली. अग्नी, चाक, पेन्सिल ते आजच्या युगातील कंम्प्युटर पर्यंतचा हा दिर्घ प्रवास आहे. अतिशय वैशिष्ट्यपुर्ण रितीने येथील उपकरणे मांडण्यात आलेली आहेत. येथील नव्या जुन्या मशिनरी कशा प्रकारे काम करतात, त्यांचा पुर्वी आणि आता कसा उपयोग केला जातो अशा सर्व प्रश्नांचे निराकारण येथे होते. शिलाई मशिन, रेडियो, सायकल, वाफेवरील रेल्वे इंजिन आदि अशा अनेक उपकरणांचा इतिहास आपल्याला अनुभवता येतो. अग्नीचा शोध ते इंटरनेट पर्यंतच्या मानवाच्या प्रगतीचा लेखाजोगा मांडणारा असा हा विभाग आहे.
जल – जीवनाचे अमृत – या प्रदर्शनामधे पाण्याविषयीची विस्तृत माहिती सांगण्यात आलेली आहे. जसे की आपल्या पृथ्वीसह कुठल्या ग्रहावर किती पाणी उपलब्ध आहे. त्यातील किती पाणी पिण्यायोग्य आहे आणि किती नाही, त्यांचे जलचक्र अशा अनेक पैलूंची माहिती येथे मिळते.
विज्ञान बगिचा – या बागेमधे अनेक प्रकारचे पशू पक्षी आहेत. भरपूर झाडी, औषधी वनस्पतींनी भरलेले असे हे उद्यान आहे. खुल्या अवकाशात येथे मुलांना अनेक वैज्ञानिक खेळण्यांद्वारा विज्ञान शिकण्याची आणि खेळण्याची संधी मिळते.
प्रागैतिहासिक प्राणी उद्यान – दोन एकर जागेत वसवलेल्या या उद्यानात विविध प्रकारच्या जनावरांची, प्राण्यांची माहिती मिळते, पाचशे ते दहा लाख वर्षांपूर्वी जमिनीवर, पाण्यात अस्तित्वात असणारे हे प्राणी आत्ताच्या काळात पुन्हा निर्माण करून पर्यटकांना विस्मयकारी अनुभव देण्यात येतो.
३डी सायन्स शो – विशिष्ट प्रकारच्या चष्म्यातून विज्ञानाशी निगडीत दुनिया याठिकाणा दाखवण्यात येते. ३डी इफेक्ट मुळे मुलांना वस्तू, प्राणी आपल्या अगदी नाका पाशी असल्याचा भास होतो. हा अनुभव मुलांसाठी रोमांचकारी ठरतो.
तारामंडल – मनुष्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर जसे अनेक शोध लावले तसेच त्याने गहन अभ्यास करून आकाशातील ग्रह ताऱ्यांचाही खुप अभ्यास केला. त्यातूनच खगोल शास्त्राचा विकास होत गेला.याठिकाणी अत्याधुनिक उपकरणाच्या माध्यमातून ब्रम्हांडाचा अनुभव देण्यात येतो. या विज्ञान केंद्राचे हे प्रमुख आकर्षण म्हणता येईल. यासाठी येथे ठराविक वेळी तारामंडल शोंचे आयोजन करण्यात येते.
भव्य गोलकावरील विज्ञान शो – फ्लॅट स्क्रिनवर आजपर्यंत आपण अनेक माहितीपट पाहिलेले आहेत. मात्र येथे एका भव्य गोलावर उच्च रिजोल्युशनचा वापर करून माहितीपट दाखवण्यात येतात. यासाठीही ठराविक वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. याशिवाय याठिकाणी वैज्ञानिक विषयांवर तज्ञांना बोलावून व्याख्याने आयोजित केली जातात.
चंद्रशेखर वेंकटरामन (C.V. Raman) यांच्याविषयी –
चंद्रशेखर वेंकटरामन (जन्म : ७ नोव्हेंबर १८८८; मृत्यू : २१ नोव्हेंबर १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. सी.व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन् हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. सी.व्ही रामन (C.V.Raman) यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला आणि या खनिजांच्या प्रकाश-विकिरणाच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्या देशभरातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी.व्ही रामन अनेकदा लहान हाताळण्याएवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असत.
हिंदू तमिळ ब्राह्मण पालकांच्या पोटी जन्मलेला रमण हा एक अनमोल मुलगा होता. त्याने सेंट अलॉयसियसच्या अँग्लो-इंडियन हायस्कूलमधून अनुक्रमे ११ आणि १३ वर्षांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १६ व्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्रात मद्रास विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. पदवीधर विद्यार्थी असताना १९०६ साली त्यांचा पहिला संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आला. पुढच्या वर्षी त्यांनी एम.ए. ची पदवी मिळवली. कोलकाता येथील इंडियन फायनान्स सर्व्हिसमध्ये असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले तेव्हा ते १९ वर्षांचे होते. तेथे त्यांची इंडियन असोसिएशन फॉर द अप्लाइन्शन ऑफ सायन्स (आयएसएस) या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेशी ओळख झाली, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली आणि ध्वनी आणि ऑप्टिक्समध्ये त्यांनी मोठे योगदान दिले.
१९१७ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात आशुतोष मुखर्जी यांनी त्यांना भौतिकशास्त्राचे पहिले पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्याला समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी १९२६ मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली. त्याने आणि कृष्णन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी “सुधारित विखुरणे” असे संबोधले, पण त्याला रामन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. रमण १९३३ साली बेंगळुरूयेथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पहिले भारतीय संचालक बनले. तेथे त्यांनी त्याच वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसची स्थापना केली. त्यांनी १९४८ साली रामन रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. २१ नोव्हेंबर १९७०ला रात्रीनंतर रामन यांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला.
रामन यांना मिळालेले पुरस्कार –
इ.स. १९३० ला त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
इ.स. १९४१ मध्ये फ्रॅंकलिन पदक
इ.स. १९५४ मध्ये भारतरत्न पुरस्कार
इ.स. १९५७ मध्ये लेनिन शांतता पुरस्कार.
इ.स. १९९८ मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टव्हेशन ऑफ सायन्स यांनी सी.व्ही, रामन यांच्या आविष्कारावर आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लॅंडमार्क म्हणून शिक्कामोर्तब केले.
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसीत करण्यासह लोकांची विज्ञानातील रूची वाढावी, भविष्यात आपल्या देशातून मुलभूत संशोधन करणारे शास्रज्ञ घडावेत असे जर आपल्याला वाटत असेल तर देशातील शहरासह ग्रामिण भागातही अशा विज्ञान केंद्रांची उभारणी व्हायला हवी. पालकही आपल्या मुलांना अशा ठिकाणांना भेटी देऊन त्यांच्यात विज्ञानाची आवड निर्माण करू शकतात.
ज्योती भालेराव.
1 thought on “Raman Science Center in Nagpur, Established in 7th March 1992.”
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.