Nuremberg Documentation Center – History of the Nazi Party Rally – (1933 to 1938)

Nuremberg Documentation Center
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

Table of Contents

न्युरेमबर्ग डॉक्युमेंटेशन सेंटर – नाझी पार्टी रॅलीचा इतिहास – ( १९३३ ते १९३८ )

मी सुमारे दिड वर्ष झाले जर्मनीत रहात आहे. या देशाचा इतिहास पूर्वी वाचला होताच, पण प्रत्यक्ष हा देश पाहिल्यावर, येथील संस्कृती अनुभवल्यावर एक गोष्ट सतत जाणवते की, या देशाने किती आणि काय काय राजकीय आघात सहन केले आहेत. किती अपमान, विध्वंस पचवले आहेत. अनेक पातळ्यांवरचं नुकसान सहन करूनही हा देश दिमाखाने परत उभा तर राहीला.

पण हिटलरसारख्या एककल्ली, हेकेखोर आणि क्रूरकर्मा हुकुमशहाच्या कह्यात येथील सुजाण, शिस्तबद्ध जनता कशी गेली असेल ? हिटलर आणि त्याच्या नाझी पक्षाने असे काय प्रोपोगंडे निर्माण केले असतील ? की त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात या माणसाला या देशात त्यावेळी पाठिंबा मिळाला, असा विचार मी कायम करत असायचे. या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले ते ‘न्युरेमबर्ग’ या शहरातील न्युरेमबर्ग डॉक्युमेंटेशन सेंटर ( Nuremberg Documentation Center ) संग्रहालयाला भेट दिल्यानंतर. नाझी पक्ष आणि हिटलरची ताकद काय होती ? हे आपल्याला येथील नाझी पार्टीच्या भव्य इमारतीचे अवशेष पाहून लक्षात येते.

न्यरेमबर्ग डॉक्युमेंटेशन संग्रहालय (Nuremberg Documentation Center ) उभारण्याचा हेतू !

दुसऱ्या महायुद्धासाठी जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर याची राक्षसी राजकीय आकांक्षा कारणीभूत होती. संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवण्याची अभिलाषा तो बाळगून होता. त्यासाठी त्याने कशा राजकीय रणनीती आखल्या, आपल्या पक्षाचा अजेंडा लोकांच्या मनावर कसा बिंबवला हा सगळा इतिहास जाणून घेणे येणाऱ्या पिढ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठीच जर्मनीतील न्युरेमबर्ग या शहरात नाझी काँग्रेस पार्टीच्या इमारतीजवळ त्यांच्या कागदपत्रांचे (Nuremberg Documentation Center ) संग्रहालय उभारण्यात आले आहे. ‘न्युरेमबर्ग डॉक्यूमेंटेशन सेंटर’ असे या संग्रहायलाचे नाव आहे.

Nuremberg Documentation Center

न्युरेमबर्ग डॉक्युमेंटेशन सेंटरची पार्श्वभूमी – (Nuremberg Documentation Center )

ज्या हिटलरच्या रणनीतीने जर्मनीला त्यावेळी नेस्तनाबूत केले त्याचं नाव आज जर्मनीत घेणे गुन्हा मानला जातो . त्याच्या पक्षाचे, त्याच्या चिन्हाचे कुठेही प्रदर्शन होणार नाही याकडे आज या देशात कटाक्षाने लक्ष दिले जाते. असे सगळे असले तरी येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि जगभरातील पर्यटक, अभ्यासकांसाठी नाझीवाद आणि त्यांनी राबवलेले कार्यक्रम कसे होते हे समजण्यासाठी जर्मनीतील ‘न्युरेमबर्ग’ या शहरात नाझी पक्षाच्या कागदपत्रांचे (Nuremberg Documentation Center ) हे अनोखे प्रदर्शन बघायला मिळते.

खरं तर असे काही प्रदर्शन असू शकते, तेही जर्मनीच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या घटनांविषयी हेच एक मोठे आश्चर्य आहे. पण खरोखर या देशातील सरकारने ते बनवले आहे हे कौतुकास्पद म्हणावे लागेल. तर काय आणि कसे आहे हे संग्रहालय, त्याची अनोखी इमारत ते आपण ‘मिसलेनियस वर्ल्डच्या’ माध्यमातून जाणून घेऊ.

संग्रहालयाची इमारत (Nuremberg Documentation Center ).

नाझी रॅली ग्राऊंड ज्या ठिकाणी आहे त्या परिसरात या संग्रहालयाची इमारत आहे. मुख्य रस्त्यालगत तुम्हाला या संग्रहालयाच्या नावाची भली मोठी पाटी एका मोठ्या स्तंभावर लावलेली दिसते. आतमध्ये एका इमारती बाहेर तिकीट खिडकी आहे. ठराविक शूल्क संग्रहालयाला भेट देण्यासाठी आकारले जाते. हे संग्रहालय इतक्या गंभीर विषयाचे आहे त्याची जाणीव तुम्हाला आत प्रवेश करताच होते. आत पिवळसर अंधूक प्रकाशात तुमचा प्रवास सुरू होतो.

अनेक मोठ्या फलकांवर लावलेली माहिती, छायाचित्रं, काचेच्या कपाटांमध्ये ठेवलेल्या वस्तू याचे तुम्हाला दर्शन होते. संग्रहालयाचा आवाका लहान आहे परंतू त्यात साठवलेली माहिती, ऐतिहासिक पुरावे फार महत्त्वाचे आहे. हिटलर आणि त्याची नाझी राजवट यांचे अनेक न उलगडलेले पदर याठिकाणी आपल्याला समजतात.

या संग्रहलयाला (Nuremberg Documentation Center ) भेट देण्यापूर्वी आपल्याला दुसरे महायुद्ध, हिटलर आणि त्याचा नाझी पक्ष, त्यांची राजकीय भूमिका यांविषयीची माहिती, एसएस आणि गेस्टापो म्हणजे काय? नाझी रॅली ग्राऊंड म्हणजे काय ? या सगळ्यांची तोंड ओळख असणे आवश्यक आहे

Nuremberg Documentation Center

दुसरे महायुद्ध !

दुसऱ्या महायुद्धाच्यापूर्वी आणि युद्धादरम्यान संपूर्ण जगभरात भरपूर राजकीय घडामोडी सुरू होत्या. जगभरातील महत्त्वाचे देश त्यांच्या राजकीय भूमिका ठरवण्यात व्यग्र होते. त्याच दरम्यान संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवायची अभिलाषा बाळगून ॲडॉल्फ हिटलर हा सुद्धा आपल्या राजकीय व्युहरचना आखत होता त्यातूनच त्याने सर्वात पहिले पोलंडवर हल्ला केला आणि दुसऱ्या महायुद्धाची नांदी सुरू झाली. १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे दुसऱ्यामहायुद्धाला सुरूवात झाली होती. या संग्रहालयात (Nuremberg Documentation Center ) या युद्धादरम्यानचे अनेक फोटोज, पत्रं बघायला मिळतात.

नॅशनल सोशलीस्ट जर्मन वर्कर्स पार्टी – नाझी पार्टी !

जर्मन वंशाचेच माणसं कसे सर्वात श्रेष्ठ मानव आहेत हा विचार जगावर बिंबवणे आणि जर्मनीला जगात सर्वात उच्च स्थानावर पोहोचवण्याचा ॲडॉल्फ हिटलर याने ध्यास घेतला होता. या ध्यासातूनच त्याने जर्मन कामगार पक्षात (नाझी पक्षात ) सप्टेंबर १९१८ला प्रवेश केला आणि कालांतराने त्याचा सर्वेसर्वा झाला. त्यानंतर काही वर्षातच हिटलरने आपल्या पक्षाचे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आपल्या पक्षातील सैनिकांना घेऊन एक रॅली काढण्याचे आयोजन केले. त्याची सुरुवात प्रथम म्युनिक या शहरात करण्यात आली. परंतु सर्वात मोठ्या भव्य अशा रॅलीचे आयोजन न्युरेमबर्ग येथे करण्यात आले.

न्युरेमबर्ग येथे नाझी पक्षाच्या प्रचारार्थ सर्वप्रथम हिटलरने एक रॅली आयोजित केली होती. पहिली अशी रॅली 1923 ला म्यनिक या शहरात काढण्यात आली होती. पुढे नाझी पक्षाचा जसजसा विस्तार होत गेला तसतशा अनेक भव्य रॅलींचे असे आयोजन करण्यात यायचे. दिवसेंदिवस या रॅलींमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली होती. नाझींच्या नियंत्रणाखाली असलेल्या एकसंध आणि मजबूत जर्मनीला संदेश देण्यासाठी या रॅलींचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असे.

नाझी पक्षाच्या प्रचार कामांसाठी या अशा रॅलीची महत्त्वाची भूमिका असे. पुढे 1933 ला ॲडॉल्फ हिटरल जर्मनीचा सर्वेसर्वा बनला आणि या रॅलींना एका राष्ट्रीय कार्यक्रमांचा दर्जा मिळाला.

Nuremberg Documentation Center

नाझी हुकुमशाही, तिचे देशावर असणारे नियंत्रण आणि परिणाम देशात तसेच जगभरात पोहचवण्यासाठी नाझी पक्षाकडून अशा रॅलींचे चित्रिकरण करण्यात येऊ लागले. यावरून अशा रॅलींचे महत्त्व समजून येते. इ.स. १९३३ आणि १९३४ या दोन वर्षी जर्मन चित्रपट निर्माते रीफेनस्टाहल यांनी या रॅलींच्या चित्रिकरणाचे काम केले होते. हे दोन्ही चित्रिकरण न्युरेमबर्गजवळील नाझी पार्टीच्या रॅलीच्या मैदानावर चित्रित करण्यात आले.

१९३३ ते १९३८ या दरम्यान नाझी पक्षाने न्युरेमबर्ग येथे त्यांच्या पक्षाच्या रॅली काढल्या. या रॅलींचे आयोजन कसे करण्यात येत असे, त्यावेळचे फोटोग्राफ्स, कागदपत्रे आदीं अनेक गोष्टी या संग्रहालयात आहे. येथे अशा रॅलींच्या चित्रणाचे काही व्हिडियोही आपल्याला बघायला मिळतात. त्यांनी बांधलेल्या प्रचंड भव्य अशा वास्तूचे अवशेष आणि कागदपत्रांचे हे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. येथे सध्या बांधकाम सुरू आहे. २०२५ पर्यंत ते पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येते.

नाझी रॅली मैदानाचा इतिहास .

१९२७ पासून हिटलरने न्युरेमबर्ग हे शहर तिसऱ्या नाझी रॅली चे केंद्र म्हणून निश्चित केले. हे शहर निवडण्यामागे हिटलरच्या डोक्यात अनेक कारणं असू शकतात. या शहराचा संबंध एतिहासिक अशा पवित्र रोमन साम्राज्याशी आहे. या शहराचाही पूर्वी या नाझी काँग्रेस पार्टीशी संबध होता. या शहराशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूनेही येथे हिटलरने आपल्या पक्षाचे बस्तान बसवण्यास सुरूवात केली. तसेच या शहरातून संपूर्ण देशाशी संपर्कात रहाणे सोपे असल्याने नाझी रॅलीसाठी न्युरेमबर्ग शहराची निवड करण्यात आली. अनेक चित्रपट, डॉक्युमेंटरी यात हिटलरची भाषणे, चित्रफिती तुम्ही जर पाहील्या असतील तर त्यातील सर्वात जास्त चित्रफीती या न्यरेमबर्गच्या नाझी मैदानवरील आहेत. इतके हे ठिकाण नाझींच्या राजकीय प्रवासाचे मुख्य साक्षीदार म्हणता येईल.

Nuremberg Documentation Center
Nuremberg Documentation Center

नाझी पक्षाची मुख्य इमारत.

हिटलरला त्याच्या देशासह जगभरावर अधिराज्य प्रस्थापित करण्याची घाई होती. त्याच्या नाझी पक्षाचे एक मोठे केंद्र असावे या आकांक्षेने त्याला पुरते झपाटले होते. या केंद्राच्या निर्मीतीसाठी त्याने फार मोठ्या, कल्पक योजना आखल्या होत्या. त्यातूनच येथील भव्यदिव्य असे नाझी केंद्र उभे राहिले होते. हिटलरने जशी योजना आखली होती त्याप्रमाणे तर हे बांधकाम पूर्ण झाले नाही. जे झाले तेही डोळे दिपवणारे आहे. दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांनी जर्मनीचे बरेच नुकसान केले. अनेक शहरांवर बॉम्बफेक केली, परंतु येथील बराच भाग सुरक्षित राहील्याने तो आज आपल्याला पहायला मिळतो. आजची इमारत ग्रेट काँग्रेस हॉल न्युरेमबर्ग संग्रहालय (Nuremberg Documentation Center ) म्हणून आपल्याला पहायला मिळते.

Nuremberg Documentation Center

एसएस आणि गेस्टापोच्या कामांचे तपशिल.

या संग्रहालयात (Nuremberg Documentation Center ) तुम्हाला एसएस आणि गेस्टापो या हिटलरच्या अखत्यारितील सर्वात बलवान खात्यांविषयीचे सर्व तपशील बघायला मिळतील. नाझी पार्टीच्या रॅलींच्या आयोजनासाठी हिटलरने कशा योजना आखल्या, त्याच्या डोक्यातून किती क्लिष्ट गोष्टी येत असे आणि त्या नाझी पक्षाकडून कशा पूर्ण केल्या जात असे याचे सर्व तपशिल पहायला मिळतात.

नाझींची शक्ती दिवसेंदिवस कशी वाढत गेली याची माहीती त्याकाळच्या कागदपत्रांसह येथे आपल्याला बघायला मिळतात. अनेक छायाचित्र, कागदपत्र, पत्रव्यवहार यांच्या माध्यमातून आपल्याला नाझींचा काळाकूट्ट, विनाशकारी इतिहास समजतो. नाझींच्या बाजूने असणाऱ्या आणि नाझींकडून छळ करून मारले गेलेल्या अशा दोन्हींच्या बाजूचे अनेक कागदपत्रं, छायाचित्रं बघून आपण स्तिमीत होतो.

एसएस आणि गेस्टापो म्हणजे काय ?

“Waffen-ss” जर्मन उच्चार होतो वॅफेन एस एस – ही नाझी पक्षाच्या निमलष्करी संरक्षण संघटनेची लढाऊ शाखा होती. या शाखेच्या निर्मितीमध्ये जर्मनीतील सामान्य पुरूष, नाझी पक्षातील स्वयंसेवक, जर्मनी व्याप्त आणि बिनव्याप्त युरोपखंडातील सैनिकांचा समावेश होता. नाझी पक्षासाठी हिटलरच्या नेतृत्वाखाली हे सैनिक काम करत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत याच्या ३८ पेक्षा जास्त रेजिमेंट तयार झाल्या. लढाऊ सैनिक आणि पोलीस असे दोन्हींची कामे एकत्र मिळून केली जात. सुरूवातीला यात फक्त जर्मन वंशांच्या सैनिकांना प्रवेश दिला जात असे.

दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर या नियमात थोडी शिथिलता आणली गेली आणि परदेशी नागरिकांचाही समावेश यात केला जाऊ लागला. वॅफेन एसएस चा सहभाग अनेक गुन्हेगारी कृत्यात सहभाग होता. होलोकॉस्ट, पोराजमोस, नागरी लोकांविरूद्ध असंख्य गुन्हे, मानवी प्रयोग, सामुहिक हत्या अशा गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग असल्याने १९४६ ला न्युरेमबर्ग येथील आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायाधिकरणाने याला गुन्हेगारी संघटना म्हणून घोषित केले होते.

गेस्टापो- हे हिटलरच्या नाझी पक्षासाठी काम करणारे पोलीसी हेर खाते होते. नागरी प्रश्न तसेच आंतरराष्ट्रीय कामांसाठी यातील पोलीस कर्मचारी काम करत असत.

आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाच्या प्रक्रियेची (न्यूरेमबर्गस ट्रायल्स) वास्तू.

या ठिकाणाचे आणखी एक महत्त्व म्हणजे या ठिकाणीच दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाची प्रक्रिया पार पडली. न्युरेमबर्ग ट्रायल्स म्हणूनच ही घटना इतिहासात प्रसिद्ध आहे. या द्वारे अनेक नाझी नेत्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा ठोठावण्यात आली.

Nuremberg Documentation Center

मूळ चित्रफिती, पत्रं,वस्तूंचा संचय.

सध्याच्या जर्मनीमध्ये नाझी पक्ष, हिटलर किंवा हिटलर संबंधीच्या कुठल्याही गोष्टींचा उल्लेखही सार्वजनिक जीवनात करणे गुन्हा ठरावा इतके येथे त्यांच्याविषयीचे बोलणे टाळले जाते. मात्र आपण येथे भेट दिल्यावर हिटलरच्या भाषणांचे मूळ व्हिडीयो बघू शकतो. त्याच्या सह्यांसकटचे मूळ कागदपत्रे वाचू शकतो, त्याच्या अनेक सहकाऱ्यांचे फोटो, पत्रव्यवहार बघू शकतो.

जर्मन आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये वाचण्याची सोय येथे केली आहे. मूळ प्रत आणि त्याच्या जोडीला इंग्लिश मजकूर असे त्यांचे स्वरूप आहे. नाझी रॅलीचा इतिहास एकण्यासाठी ऑडियोची सोय येथे करण्यात आलेली आहे. तेव्हा भरपूर वेळ काढूनच येथे भेट द्या.

Nuremberg Documentation Center

नाझी रॅली ग्राऊंड.

हे संग्रहालय (Nuremberg Documentation Center ) ज्या इमारतीत आहे त्याच्या बाहेर पडल्यावर आपल्याला एक रस्ता एका भव्य भिंतीच्या पलिकडे नेतो. तिथे जातानाच इतिहासाच्या पाऊलखुणांमुळे तुम्ही काही क्षण स्तब्ध होता. याच ठिकाणी हिटलरच्या अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती या जाणीवेने तुम्ही फार अस्वस्थ होता. आतील परिसर, नाझी रॅली ग्राऊंडचा परिसर फार विस्तिर्ण आहे.

Nuremberg Documentation Center

येथील अनेक ठिकाणी आज दुरूस्तीची कामे सुरू आहेत. जे काही अस्तित्वात आहे त्यावरून येथील परिसराच्या भव्यतेची सहज कल्पना येते. हिटलर भाषणे देत असतानाच्या अनेक चित्रफिती अनेक चित्रपट, लघुपट यांमधून आपण पाहिल्या असतिल, त्यातील बऱ्याच चित्रफिती या याच भव्य मैदानातील आहेत. हा संपूर्ण परिसर सुंदर अशा विस्तिर्ण जलाशयाने वेढला आहे. त्यात विहार करणारे बदक ,इतर पक्षी पहात येथे बसता येते.

येथे कसे जाल ?

जर्मनीची वाहतूक सुविधा फारच आरामदायी आणि सोयिस्कर आहे. त्यामुळे तुम्ही जर्मनीतील कुठल्या शहरातून न्युरेमबर्गला जाणार आहात, त्यानुसार वाहतूक सुविधा निवडावी. एकदा का न्युरेमबर्गला तुम्ही पोहोचला की, रेल्वेस्टेशनपासून हे डॉक्युमेंटेशन सेंटर (Nuremberg Documentation Center ) चालत जाण्याच्या अंतरावर आहे. त्यासाठीच्या दिशादर्शक खुणासुद्धा आहेत. संध्याकाळच्या आत लवकर येथे भेट द्या.

आज शांत, सुंदर दिसत असणारा हा परिसर एकेकाळी विध्वंसक योजनांच्या अंमलबजावणीचे मुख्य ठिकाण होते याची मनात उजळणी करत आपण बराच काळ येथे घालवतो. अशा ठिकाणांना भेट देणे खरंतर पर्यटक म्हणून फार कठिण वाटते. तरी अशा संग्रहालयाला भेट देऊन, इतिहासात घडून गेलेल्या चुकांचा अभ्यास करत आपला समाज, देश घडत असतो. त्यासाठी अशा ऐतिहासिक संग्रहालयांची (Nuremberg Documentation Center ) भूमिका महत्त्वाची आहे.

संपूर्ण युरोप खंड पर्यटनासाठी, येथील निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेच, मात्र जर्मनीच्या या भूमीवर घडलेला हा इतिहास जाणून घ्यायलाच हवा असा आहे. इतिहास प्रेमींसाठी येथे फार मोठा ऐतिहासिक दस्तावेज आहे. जर्मनीत असाल तर येथे नक्कीच भेट द्या.

Leave a Reply