Museums in Pune : Reserve Bank of India Records Museum: 2010, Land Records Museum: 2004, Mahatma Phule Museum: 1875

Museums in Pune

पुणे शहरात वेगवेगळ्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले अनेक संग्रहालयं आहेत. त्यातील भारतीय रिझर्व्ह बँकेचे अभिलेख संग्रहालय, (Reserve Bank of India Records Museums in Pune)भूमी अभिलेख विभागाचे भूमी अभिलेख संग्रहालय (Land Records Museums in Pune) आणि तंत्रज्ञानावर आधारित असणारे महात्मा फुले संग्रहालयं (Mahatma Phule Museums in Pune)खुप वेगळे आहेत. येथे मिळणारी माहिती बरीचशी कागदपत्रे, काही वस्तू आणि जुन्या दस्तएवजातून आपल्यासमोर येते. आज अशाच पुण्यातील तीन फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या मात्र ज्ञानार्जनाबाबतीत उल्लेखनिय अशा संग्रहालयांची माहिती करून घेणार आहोत.

भारतीय रिझर्व्ह बँक अभिलेख संग्रहालय,पुणे,स्थापना – १ जून २०१० (Reserve Bank of India Records Museums in Pune)

Reserve Bank of India Records Museums in Pune

भारतीय रिझर्व्ह बँकेने अभिलेख संग्रहालयाची (Reserve Bank of India Records Museum) स्थापना पुण्यात दि. १ जून २०१० ला केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या पुण्यातील शाखेतील अभिलेखागाराच्या परिसरात हे संग्रहालय सूरू केले आहे. हे एक वेगळ्या धाटणीचे संग्रहालय आहे. याठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपासूनचा इतिहास, त्याची दुर्मिळ कागदपत्रे आदी एवज संग्रहित केले आहेत. याठिकाणी एकुण २६ हजार फाईल, १२ हजार रजिस्टर, ७ हजार ३०० प्रकाशने, ५ हजार छायाचित्रे,१ हजार ५०० माईक्रो फिल्म रोल आणि १ हजार इलेक्ट्रॉनिक अभिलेख असा ऐवज या संग्रहालयात काळजीपूर्वक जपून ठेवलेला आहे. 

हे मुख्यतः कागदपत्रांचे संग्रहालय आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपासून म्हणजे १९३५ ते २०१० पर्यंतचा ऐतिहासिक प्रवास इथे मांडलेला आहे. काही कागदपत्रे १९२६ च्या काळातीलही आहेत. या संग्रहालयाद्वारे बँकेबाबतच्या अशा अनेक रोचक गोष्टी लोकांना समजण्यास मदत होते. येथील अशा काही वस्तू आहेत ज्या भारतीय स्वातंत्र्यापूर्वी तसेच नंतरच्या आहेत,ज्या रिझर्व्ह बँकेच्या भारतातील योगदान दर्शवतात. 

भारताच्या आर्थिक प्रगतीत जे मंत्री, नेते आणि अधिकाऱ्यांचे योगदान आहे अशा सगळ्यांचे दुर्मिळ पत्रव्यवहारही येथे आहेत. येथील वस्तू न वस्तू आणि प्रत्येक कागद म्हणजे पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलेला वारसा आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख येथे नवीन पिढीसाठी मोलाचा ठरतो. 

या ठिकाणचे सगळे दस्तावेज जतन करण्यासाठी संस्थेचे स्वतःचे व्हॅक्युम फ्युमिंगेशन मशिन आहे ज्याद्वारे दुर्मिळ कागदपत्रांची दुरूस्ती आणि जपणूक केली जाते. हे संग्रहालय सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते ५ यावेळेत पर्यटकांसाठी खुले असते. आजपर्यंत होऊन गेलेल्या सगळ्या गव्हर्नरची छायाचित्रं, जुन्या नोटा, नाण्यांची छायाचित्रे, सोन्याची तुला करण्याचा तराजू असे बरेच काही येथे पाहण्यासारखे आहे. हा वारसा एकदा तरी पहावा असा आहे. 

भूमी अभिलेख संग्रहालय , पुणे , स्थापना २००४ (Land Records Museum in Pune )

Land Records Museum in Pune
Land Records Museum in Pune

माहितीपूर्ण आणि वेगळ्या धाटणीवर उभारण्यात आलेले ‘भूमी अभिलेख संग्रहालय’ (Land Records Museum in Pune) हे पुण्यातील एक महत्त्वाचे संग्रहालय आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक यांच्या कार्यालयाला महाराष्ट्र सरकारने जमिनीची पद्धतशीर मोजणी करणे, नकाशे बनवणे, जमिनीची प्रतवारी, करआकारणी आणि भूमी अभिलेखांचे जतन यांचे अधिकार दिलेले आहेत. त्या जतन करण्यात आलेल्या कागदपत्रातून, नकाशातून हे संग्रहालय उभे राहिले आहे. 

फार पूर्वी म्हणजे अगदी १७०० सालात मुंबईतील रस्ते कसे होते, १०० वर्षांपूर्वी पुण्यातील पेठांचा भाग कसा होता किंवा मग आत्ताचे फेमस हिल स्टेशन पूर्वी हॉटेल नव्हते तेव्हा कसे दिसत होते या सगळ्याचा अंदाज आपल्याला हे संग्रहालय बघताना येतो. 

या संग्रहालयाद्वारे जमाबंदी विभागाचा इतिहास, पूर्वी झालेली महत्त्वाची सर्वेक्षणे आणि या विभागात झालेले काळानुरुप बदल, नव्या युगातील सर्वेक्षण पद्धती, तसेच जमाबंदी विभागाच्या संग्रहातील जुने आणि ऐतिहासिक नकाशे, सर्वेक्षण साधने यांची माहिती आपल्याला मिळते. याशिवाय इंग्रजांच्या काळापासून जमीन मोजण्याचे तंत्र कसे विकसित करण्यात आले, त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य अशा अनेक वैविध्यपूर्ण वस्तू येथे पाहायला मिळतात. 

भारतातील हे एकमेव असे संग्रहालय आहे असे सांगण्यात येते. विद्यार्थी आणि संशोधक यांचे आकर्षण केंद्र असणारे हे संग्रहालय काहीसे दुर्लक्षीत म्हणता येईल. पुण्यातील विधानभवनाच्या समोरील इमारतीत हे संग्रहालय आहे. दुपारी तीन ते संध्याकाळी सहा यावेळेत ते सर्वांसाठी निःशुल्क खुले असते.

महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, पुणे  – स्थापना इ.स.१८७५ (Mahatma Phule Museum in Pune)

Mahatma Phule Museum in Pune
Mahatma Phule Museum

पुण्यातील घोले पाटील रस्त्यावर असलेले महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (Mahatma Phule Museum in Pune) हे एका वेगळ्या विषयावरचे वस्तुसंग्रहालय आहे. यंत्रे, चित्र, तक्ते, चित्रफिती, प्रतिकृती, प्रदर्शनीय वस्तू, विज्ञानाच्या विविध शाखांचे उगमस्थान, त्यांची प्रगती, त्यांचे आजच्या व्यवहारातील स्थान आणि त्या शाखांचा उद्योग, शेती आणि वाणिज्य क्षेत्रांमध्ये होणारा उपयोग आणि आर्थिक प्रगती यांचे दर्शन घडवणारे असे ठिकाण होय. 

मृत प्राण्यांच्या शरीरात भुसा भरून रासायनिक प्रक्रियेद्वारे जतन केलेले त्यांचे शरीराचे अवशेष हे या संग्रहालयाचे आकर्षण म्हणता येईल. याशिवाय विविध क्षेत्राविषयी यंत्रे, कापडाचे प्रकार, हत्यारांचे प्रकार, शस्रास्रे, देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती, विविध क्षेत्रातील यंत्रे, कापडाचे प्रकार, हत्यारांचे प्रकार, शस्रास्रे, देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती, विविध प्रकारची भांडी अशा अनेक विविधांगी वस्तूंचा खजिना येथे पहायला मिळतो. 

पुणे औद्योगिक वस्तूसंग्रहालय या नावाने प्रथम हे संग्रहालय इ.स.१८७५मध्ये सूरू झाले. त्यानंतर इ.स. १८८५मध्ये लॉर्ड रे औद्योगिक वस्तूसंग्रहालय असे त्याचे नामकरण करण्यात आले. यानंतरच्या कालावधीत वस्तूसंग्रहालयाचा वेगाने विकास होऊन महाराष्ट्र शासनाने १९६८ मध्ये महात्मा फुले वस्तूसंग्रहालय असे नामकरण करून याचे रूपांतर एका बहुआयामी संग्रहालयात केले. 

हे संग्रहालय ७५०० चौरस फुटांमध्ये बांधलेले असून,यात १५०० चौरस फुटांच्या चार दालनांचा समावेश आहे. ग्रंथालयासाठी एक खास दालन उभारण्यात आलेले आहे. सगळ्याच क्षेत्रांमधील अमूल्य ठेवा जपणारे हे वस्तूसंग्रहालय पर्यटकांबरोबरच अभ्यासकांसाठीही महत्त्वाचे वारसा स्थळ आहे. आठवड्यातील सातही दिवस हे संग्रहालय पर्यटकांसाठी खुले असते. 

पुणे शहरातील हे तीनही संग्रहालयं शासकीय अखत्यारितील आहेत. येथील वस्तूंची देखभाल, दालनांमधील स्वच्छता उत्तम ठेवण्यात आलेली आहे. निःशुल्क असूनही येथे पर्यटकांची फार गर्दी दिसून येत नाही. इतका महत्त्वाचा वारसा असूनही लोकांमध्ये या संग्रहालयाविषयी फार माहिती नसल्याचे दिसून येते. मात्र शालेय विद्यार्थी, लहान मुलांमध्ये अनेक तांत्रिक गोष्टींविषयीचे असणारे कुतूहल शमवण्यासाठी या तीनही ठिकाणांना भेट देणे उपयोगी पडणारे आहे. प्रात्यक्षिकासह ज्ञानार्जन करून देणारे असे हे तीन ठिकाणं आहेत. एक दिवसाचा वेळ काढून या तिनही ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकतात.

याठिकाणांना भेट द्यायला कसे जाल ?

Author ज्योती भालेराव.

2 thoughts on “Museums in Pune : Reserve Bank of India Records Museum: 2010, Land Records Museum: 2004, Mahatma Phule Museum: 1875”

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!