Indian Army Day – 15th January is a day to Celebrate the Bravery and Sacrifice of Indian soldiers.

Indian Army Day

भारतीय सैनिकांच्या साहस आणि त्यागाच्या गौरवाचा दिवस म्हणजे भारतीय सैन्य दिन – (सुरूवात १५ जानेवारी १९५० )

आपला भारत देश आज सुरक्षित आणि भक्कमपणे उभा आहे तो आपल्या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांमुळे. याच सैनिकांच्या शैर्याची, त्यागाची आठवण म्हणून, भारतीय सैन्य दलाच्या स्वायत्ततेचे प्रतिक म्हणून दरवर्षी १५ जानेवारी ला भारतीय सैन्य दिन ( Indian Army Day ) साजरा केला जातो. या दिवसाची सुरूवात कधी झाली, त्याचे महत्त्व, भारतीय सैन्याचा इतिहास हे सर्व आपण मिसलेनियस भारतच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

भारतीय सैन्य दिनाचा ( Indian Army Day )   इतिहास –

आपला भारत देश ब्रिटीश राज्यकर्त्यांपासून स्वतंत्र झाला ते वर्ष होते १९४७. देश ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला असला तरी १९४९ पर्यंत भारताचे सैन्यदल ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्यानंतर जनरल के.एम. करिअप्पा हे भारतीय लष्कराचे पहिले सेना प्रमुख  (कमांडर इन चीफ) बनले.

१५ जानेवारी १९४९ ला जनरल करिअप्पा यांनी जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून आपल्या पदाची अधिकृत सुत्रे स्विकारली आणि भारतीय सैन्यातील ब्रिटीशांचा उरलासुरला हस्तक्षेपही संपुष्टात आला. ही घटना भारताच्या स्वातंत्र्याचे मोठे प्रतिक समजली जाते. याचे राजकीय आणि लष्करी महत्त्व फार मोठे आहे.

Indian Army Day

स्वातंत्र्यानंतर देश सर्वच आघाड्यांवर लढत होता. देशाला रोजगार, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रातमध्ये आपला ठसा उमटवायचा होता. या सगळ्यात देशाच्या सुरक्षिततेला सर्वात जास्त महत्त्व देणे आवश्यक होते. आणि याचवेळी भारतीय लष्कराच्या उभारणीत जनरल के.एम. करिअप्पा यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले.

१९४७-४८च्या वेळच्या कश्मिरच्या प्रश्नप्रसंगी त्यांच्या नेतृत्वाने भारतीय सैन्याला नवे धैर्य आणि दिशा दिली. भारतीय लष्करी इतिहासासाठी १५ जानेवारी १९४९ चा दिवस फार महत्त्वाचा होता. या महत्त्वपूर्ण क्षणाचा गौरव करण्यासाठी १९५० मध्ये प्रथम लष्कर दिन ( Indian Army Day )  साजरा करण्यास सुरूवात झाली. दरवर्षी भारतीय सैन्यदल आणि संपूर्ण देश आपला समृद्ध इतिहास, शौर्य आणि आपल्या सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी भारतीय लष्कर दिन ( Indian Army Day )  साजरा करतात.

जनरल कोडंडेरा मडप्पा करिअप्पा यांच्या जीवनकार्याविषयी  –

भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून जनरल कोडंडेरा मडप्पा करिअप्पा यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म २८ जानेवारी १८९९ ला कर्नाटक मधील कूर्ग प्रांतात झाला. त्यांचे प्रार्थमिक शिक्षण मदिकारातील सेंट्रेल हाय स्कूल मधून झाले. पुढील शिक्षण त्यांनी मद्रासमधील प्रेसीडेंसी महाविद्यालयातून पूर्ण केले.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांना माहिती मिळाली होती की, भारतीयांना त्यावेळच्या ब्रिटीश सैन्यात भरती करून घेतले जात आहे. त्यांनी अर्ज केला आणि त्यांची निवड होऊन त्यांचे इंदौरच्या डेली कॅडेट महाविद्यालयात प्रशिक्षण सुरू झाले. त्यांनी तेथेच लष्करातील कमीशन घेतले, असे कमीशन मिळणारे ते पहिले भारतीय होते.

पुढे त्यांनी इराक (१९२०-२१), वायव्य सरहद्द प्रांत (१९२२-२५, १९२८-३० आणि १९४६) या लष्करी कारवायांमध्ये सहभाग घेतला. क्वेटा येथील स्टाफ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. दुसऱ्या महायुद्धातही त्यांचा सहभाग होता. इराक, सिरिया आणि इराण (१९४१-४२ ) , ब्रम्हदेशातील आराकान (१९४३-४४) येथील लष्करी मोहीमांमध्ये ते सहभागी होते. १९४७ ला लंडन येथील इंपिरियल डिफेन्स कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले.

स्वतंत्र भारतात त्यांनी १९४९ ते १९५३ या दरम्यान भारताचे लष्करप्रमुख म्हणून काम केले. अमेकिरेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी लीजन ऑफ मेरीट, डिग्री ऑफ चीफ कमांडर असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्रदान केले. नेपाळच्या राजाने त्यांना आपल्या लष्करासाठी मानसेवी जनरलचा हुद्दाही बहाल केला होता. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रिलिया आणि न्युझिलंड येथील भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. (१९५३-५६) सेवानिवृत्ती नंतरही ते अनेक समाजसेवी कामांमध्ये ते सक्रिय होते. . निवृत्त सैनिकांच्या समस्या निवारणासाठी ते कायम काम करत राहिले. वयाच्या ९४ वर्षी त्यांचे बंगळुर येथे निधन झाले.  

भारतीय लष्कर दिन ( Indian Army Day ) कसा साजरा होतो ?

  • बलिदानाचे स्मरण आणि सन्मान –  भारतीय सैन्य दिन ( Indian Army Day )  आपल्याला भारतीय म्हणून आपल्या देशासाठी शहिद झालेल्या सैनिकांच्या महान बलिदानाची आठवण करून देतो. फक्त लष्कराचा इतिहास जाणून घेणे इतकाच मर्यादित हेतू हा दिन साजरा करण्यामागे नाही.
  • सैनिकांच्या समस्या जाणून घेणे – देश-विदेशच्या भूभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या सैनिकांना भेडसावणाऱ्या समस्या, आव्हाने जाणून घेऊन त्यासाठी उपाययोजना करणे हेही हा ( Indian Army Day )  दिन साजरा करण्याचा मोठा उद्देश आहे.
  • शौर्याचे स्मरण –  युद्धादरम्यान आणि जगभरातील अनेक शांतता मोहिमांमध्ये सैनिकांनी दाखवलेले शौर्य महत्त्वाचा घटक होते. आणि याच शौर्याला सलाम करणे हा सैन्य दिनाचा ( Indian Army Day )  महत्त्वाचा उद्देश आहे. सैनिकांच्या कामाचे कौतुक करणे हाही त्यामगचा उद्देश्य आहे.
  • नागरिक आणि लष्करामधील संबंध मजबूत करणे –  भारतीय सैन्य दिन ( Indian Army Day )  साजरा केल्यामुळे सामान्य नागरिक आणि भारतीय लष्कर यांच्यात मजबूत बंध निर्माण करण्यास सहाय्य होते. आपण ज्या सुरक्षित देशात रहातो त्या सुरक्षिततेमागे लष्करातील आपल्या या सैनिकांचे किती कष्ट, त्याग आहे याची आठवण नागरिकांना या दिनाच्या ( Indian Army Day )  माध्यमातून होते.
  • देशभक्ती आणि एकोपा – सैन्य दिन ( Indian Army Day )  म्हणजे देशातील नागरिकांना राष्ट्रीय प्रेम आणि देशाभिमान अंगी बाणवण्याची एक संधी समजली जाते. त्यांना त्यांच्या स्वातंत्र्य, एकता आणि सुरक्षिततेच्या सामायिक मुल्यांची आठवण करून देणारा असा हा सैन्य दिन ( Indian Army Day )   आहे.

कसा साजरा केला जातो भारतीय सैन्य दिन ( Indian Army Day )   

  • भव्य परेड – भारतीय सैन्य दिनाचा मुख्य कार्यक्रम असतो तो नवी दिल्लीतील इंडीया गेट येथील अमर जवान ज्योती येथे आयोजित करण्यात येणारी भव्य लष्करी परेड. या कार्यक्रमात सैन्याच्या विविध रेजिमेंट, त्यांचे पराक्रम आणि त्यांची उपकरणे यांचे प्रदर्शन भरवले जाते. लष्कराचे जवान परेडद्वारे त्यांचे कौशल्य आणि शौर्य दाखवतात.
  • सांस्कृतिक कार्यप्रदर्शन – विविध लष्करी आस्थापनांमध्ये पारंपरिक आणि आधुनिक कला कार्यक्रम आयोजीत केले जातात. या कार्यक्रमांमधून भारताच्या विविध कलासंस्कृतीचे दर्शन घडवले जाते. विविध भागातील सैनिकांच्या सांस्कृतिक वारशांचे दर्शन त्यातून जगाला होते.  
  • सैन्य दलाच्या भूमिका दर्शवणारे कार्यक्रम – आपल्या सैन्य दलाच्या देशाच्या संरक्षणाविषयीच्या भूमिका, कार्य यांविषयी माहिती देणारे अनेक कार्यक्रम  विविध ठिकाणी आयोजित केले जातात. शाळा, विद्यापिठे आणि स्थानिक संस्था देशभक्तीला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांद्वारे देशातील तरूण पिढीला भारतीय सैन्याच्या इतिहासाबद्‌दल माहिती मिळते. त्यातून त्यांनाही देशकार्यासाठी निश्चित अशी दिशा मिळते.
  • शहिदांना श्रद्धांजली – या दिवशी देशासाठी आपल्या जीवनाचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. युद्ध स्मारकांवर पुष्पहार अर्पण करणे हा या दिवसाचा एक महत्त्वाचा आणि भावनाप्रधान कार्यक्रम असतो.
  • भारतीय सैन्य दिवस ( Indian Army Day )   म्हणून १५ जानेवारीच्या दिनाचे महत्त्व आहे.

भारतीय सैन्य दिनाची संक्षिप्त माहिती/ निष्कर्ष –

१५ जानेवारीला भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो, कारण  या दिवशी जनरल के.एम.करिअप्पा यांनी लष्कर प्रमुख म्हणून कामाची सुत्रे घेतली होती. १९४९ मध्ये भारतीय लष्कराचे पहिले  लष्कर प्रमुख (कमांडर इन चिफ ) म्हणून करिअप्पा यांची नियुक्ती झाली. हा दिवस भारतीय लष्कराचा ब्रिटीश अधिपत्याकडून भारतीय नेतृत्वाकडे संक्रमित होण्याचे प्रतिक आहे. भारताच्या लष्करी इतिहासातील हा एक नवा अध्याय आहे.

या दिवसापासून भारतीय अधिकाऱ्यांनी संपूर्ण स्वायत्तत्ता आणि आत्मनिर्भरता सुनिश्चित करून भारतीय सैन्याचे नेतृत्व करण्यास सुरूवात केली. म्हणून १५ जानेवारी हा दिवस ( Indian Army Day )  भारतीय लष्करासाठी खास मानला जातो.

भारतीय सैन्य दिन ( Indian Army Day )  हा भारतातील नागरिकांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या, दिवसरात्र कष्ट घेणाऱ्या शूर सैनिकांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. नागरिकांमध्ये एकता, अभिमान आणि देशभक्तीचे बीज रूजवण्यासाठीदेखील हा दिवस महत्त्वाचा आहे.

देशाच्या सुरक्षिततेसाठी भारतीय लष्कराच्या भूमिकेचे स्मरण करून देणारा हा दिवस. एखाद्या उत्सवाप्रमाणे हा दिवस संपूर्ण देशात साजरा केला पाहिजे. आपल्या लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांच्या शौर्य आणि त्यागाला मिसलेनियस भारततर्फे मानाचा मुजरा आणि समस्त भारतीयांना भारतीय लष्करी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

ज्योती भालेराव    

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!