Damadi Masjid, the wonder of architecture ! (Established, 1567, Ahmednagar)

Damadi Masjid
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

कामगारांनी दमडी जमवून बांधलेली आणि स्थापत्यशास्त्राचा अदभुत नमुना असणारी अहमदनगरची  दमडी मशीद (स्थापना, इ.स. १५६७, अहमदनगर)

आपल्या देशात अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना असनाऱ्या वास्तू आहेत. अनेक राजवाडे, महाल, मंदिर, मशिदी, कबरी, विविध लेणी या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. या सगळ्याला एक इतिहास आहे. या वास्तुंच्या वैभव संपन्नतेच्या, त्या बांधण्यासाठी आलेल्या खर्चाच्या अनेक कहाण्या प्रचलित आहेत. 

मुघलकालीन वास्तूशैलीच्या खर्चा संबधाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. मुघलांनी, निजामानी अनेक मशिदी, किल्ले आणि महाल बांधले. त्या प्रत्येकाच्या बांधकामाची, त्यासाठी वापरलेल्या संपत्ती विषयीच्या  बऱ्याच चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील अहमदनगर या शहरात निजामकालीन  काळात बांधण्यात आलेली एक अशी मशीद (Masjid) आहे, जी काही कामगारांनी मिळून एक एक दमडी  जमवून बांधली होती. आणि विशेष म्हणजे या मशिदीचे नाव आजही दमडी मशीद म्हणूनच इतिहासात प्रसिद्ध पावले आहे.

अशी साकारली गेली कारागिरांच्या कल्पनेतील मशीद (Masjid)–  काय होती मशीद बांधण्यामागची खरी प्रेरणा –

अहमदनगर येथील किल्ल्याचे काम सुरु असताना त्या कामासाठी जे हात राबत होते अशा काही कामगारांना वाटले कि आपण या राजामहाराजांसाठी महाल बांधतो. त्यातून त्यांचे नाव इतिहासात अजरामर होत असते, मात्र आपले नामोनिशाण रहात नाही. आपण एक कलाकार असूनही आपण जी कला या महालात दाखवणार आहोत त्यातही या राजांचाच उल्लेख आढळणार आहे. त्यांच्या संपत्तीतुन बांधलेल्या या वास्तु अर्थातच त्यांच्या नावाने ओळखल्या जाणार आहेत. तसेच किल्ल्याचे काम सुरु असताना याठिकाणी त्यांच्या नमाजासाठी मशीद (Masjid) नव्हती. या दोन्हीच्या गरजेतून मशीद (Masjid) बांधावी अशी कल्पना पुढे येऊ लागली. जर आपल्याला आपल्या कलेतून जिवंत राहायचे असेल, तर आपल्या पैशातून काहीतरी निर्माण करायला हवे. या भावनेतून ही मशीद उभी राहिली आहे.

त्यावेळी या परिसरात एक ‘साहिर खान’ नावाचे फकीर राहात होते. त्यांनी विचार केला अहमदनगर किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी याठिकाणी एकसे बढकर एक कारागीर जमलेले आहेत. प्रत्येकाच्या हातात विशेष कला आहे. त्यांच्या कारागिरीचा नमुना जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. त्यासाठी हे सर्व कारागीर एकत्र आले. परंतु,कोणतीही वास्तू निर्माण करायची तर त्यासाठी पैसा आवश्यक असतो. त्याचे काय करायचे असा प्रश्न जेव्हा पुढे आला तेव्हा असे ठरले कि साहिर खान बाबाकडे प्रत्येकाने रोजच्या आपल्या मजुरीतुन एक दमडी त्यांच्याकडे जमा करायची. अशाप्रकारे मशीदीच्या बांधकामासाठी पैसा उभा करण्यात आला.

बांधकामातील सर्व प्रकारच्या कामातील कारागिरांचा त्यात समावेश होता. त्या बरहुकूम त्यांनी आपली कामे वाटून घेतली होती. आजही ही मशीद (Masjid) पाहताना त्यातील स्थापत्यशास्त्रातील वेगळेपण आपल्याला जाणवते. त्याकाळी बांधकामशैलीसाठीही वेगवेगळे घराणे प्रचिलित होते. त्यानुसार या मशिदीच्या बांधकामातही आपल्या वाट्याचे काम या कारागिरांनी वाटून घेतले होते. मशिदीचा कोणता भाग आपण आपल्या कारागिरी ने सजावणार आहोत ते ठरवून त्यातील सारखेपणा, समतोल साधला असल्याचे दिसून येते. मशीद (Masjid) पाहिली तर आकाराने फार मोठी नाही. पण लहान आकारातही कारागिरांनी आपले कौशल्य दाखवल्याचे दिसून येते.

अहमदनगरमाधील ज्याकाही पुरातन वास्तु आहेत त्यासर्व निजामशाहीतील वास्तुशैली दर्शवतात. मुग़लकालीन वास्तुशैली भिन्न तर निजामशाहीतील वास्तुकला भिन्न असल्याचे दिसुन येते. या मशीदीची अनेक वैशिष्ट्ये सांगण्यात येतात. त्यातील एक म्हणजे या मशिदीच्या (Masjid) छताला कुठलाही जोड देण्यात आलेला नाही. अगदी सलग एका दगडात हे छत बांधले असल्याचे दिसून येते. त्याकाळातील हे इंजिनीयरिंग खरोखर थक्क करणारे आहे. भारतावर्षातील त्याकाळच्या स्थापत्यशास्त्राचे हे एका उत्तम उदाहरण म्हणता येईल. 

दमडी म्हणजे काय ? 

अश्रफी या सोन्याच्या असत, दिनार चांदीची तर दमडी ही तांब्याचे नाणे असे. सोने आणि चांदीच्या नाण्यांना देशविदेशातही तितकेच महत्त्व होते. थोडाक्यात श्रीमंतांसाठीचे ते चलन होते. मात्र दमडी हे स्थानिक लोकांच्या खर्चासाठीचे चलन म्हणता येईल. याच दमडीतुन ही मशीद उभी राहिलेली आहे.

ही मशीद (Masjid) प्रत्येक ठिकाणी निजामशाहीची झलक कशी ठसवता येईल याकडे संपूर्ण लक्ष दिले असल्याचे जाणवते. चार दगडी खांबावर ही मशीद उभी आहे. वेगवेगळ्या दगडांवर कोरीव काम करून ते दगड एकत्र करून ही मशीद साकारण्यात आली आहे. सुरुवातीला  कारागिरांकडे फक्त या मशीदीचा नकाशा आणि ती किती काळात पूर्ण करायची त्याची वेळ एवढेच हातात होते. त्यानंतर प्रत्येकाने विविध दगडावर आपल्या शैलीचे कोरीव काम केले. नंतर हे सर्व दगड एकत्र करून मशिदीच्या भिंती तयार करण्यात आल्या. या मशिदीच्या फरशीवर जसे आकार आहे, तसेच आकार छतावर कोरण्यात आलेले आहे. याशिवाय खिडक्या, फुलांचे नक्षीकाम अप्रतिम असे आहे. 

पर्यावरणाचा विचार करून हे बांधकाम करण्यात आलेले आहे. आजही या मशिदीच्या परिसरात आणि छताच्यावर पक्षांना बसण्यासाठी, पाण्यासाठीची सोय करण्यात आल्याचे बघायला मिळते. मशिदीच्या मुख्य भिंतीच्या अगदी मधोमध संगमरवरामध्ये अरबी भाषेत काही करीवकाम रेखाटलेले आहे. याशिवाय बाजूला दगडातही कुराणातील काही ओळी कोरलेल्या आहेत. अशा प्रकारची स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असणारी ही मशीद पाहण्यासाठी देशातूनच नाही तर विदेशातूनही लोक येतात. 

Damadi Masjid

या बांधकामशैलीचा, येथील कोरीवकामाचा अभ्यास करण्यासाठी येथे पर्यटक भेट देत असतात. अहमदनगर शहर हे आर्मीसाठी ओळखले जाते. ही मशीदही (Masjid) किल्ल्यापासून जवळच आहे. हा संपूर्ण परिसर आर्मीच्या अखत्यारीत येतो. मशीदीच्या बाजूला बरीच दाट झाडेझुडपे आहेत. मुख्य मशीदीच्या गेटच्या बाहेर काही ब्रिटिश आणि निजामशाहीतील लोकांच्या कबरी आहेत. एकूण परिसर बराच शांत असल्याने येथे रेंगाळत राहावे वाटते. मशीदीचा एकूण आकार लहान असला तरी तिच्या समोर उभे राहून पाहिल्यास तिच्या पुरातनपणाची आणि भव्यतेची जाणीव आपल्याला होते. इतक्या पुरातन वास्तूच्या जवळ उभे असताना आपण शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असल्याचा आपल्याला विसर पडतो. 

अहमदनगर शहराला निजामशाहीचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे या शहरात ठिकठिकाणी अनेक लहान मोठ्या ऐतिहासिक वास्तू आपल्याला सापडतात. काही चांगल्या अवस्थेत आहेत तर काहींची कालानुरूप पडझड झालेली बघायला मिळते. मात्र खरा इतिहासप्रेमी या वास्तू कशाही अवस्थेत असो तिकडे भेट देण्यासाठी जातोच. 

ही मशीद (Masjid) आणि कशी बांधण्यात आली हे आपण पाहिले. जो किल्ला बांधताना या मशीदीची कल्पना समोर आली तो अहमदनगरचा भुईकोट किल्ला आणि अहमदनगरशहराच्या इतिहासाविषयी जाणून घेऊ.

 

अहमदनगरचा इतिहास – 

मध्ययुगीन भारतात म्हणजे साधारण १३४७ ते १५१८  या काळात दक्षिणेकडील भारतात बहामनी (Bhamani satta) या मुस्लिम सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. अल्लाउद्दीन बहमन शहा (Allaudin Bahaman Shaha) हा त्याचा संस्थापक. पुढे १५१८ मध्ये या सत्तेचे विघटन होऊन त्याची पाच शकले झाली. त्यातून अहमदनगरची निजामशाही (Nijamshahi), वर्हाडातील इमादशाही (Imadshahi),बीदर येथील बरीदशाही (Bridshahi), विजापुरातील आदिलशाही (Aadilashahi) आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही (Kutubshahi) ही सत्ताकेंद्रे प्रस्थापित झाली.

निजामशीहीचा संस्थापक मलिक अहमद निजामशहा याने प्रथम जुन्नर येथे आणि नंतर सीना नदीच्या (sina river) परिसरात आपली राजधानी निर्माण केली. या भागाला त्याने आपल्या नावावरून अहमदनगर असे नाव दिले. त्यानेच येथे भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली. त्याच्या कल्पनेनुसार हा अंडाकृती किल्ला बांधला गेला. तत्कालीन कालखंडात या किल्ल्याच्या आजूबाजूला एका स्वतंत्र शहराची निर्मिती करण्यात आली होती.पुढे हुसेन निजामशहा याच्या काळात १५५९ ते १५६२ या दरम्यान  या किल्ल्याचा विस्तार करण्यात आला .

अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहे. त्यापैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे ही राजसत्ता टिकली. या १२५ वर्षाच्या काळात या शहराचे आणि या किल्ल्याचे युद्धानीतीसाठीचे  महत्त्व आबाधीत होते. याच्या सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या यामुळे  शत्रुच्या दृष्टिपथात न येण्यासारखी याची बांधणी करण्यात आलेली आहे. या खंदकांमध्ये शत्रुला हल्ला करता येऊ नये यासाठी मगरी सोडण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते.

वर्तुळाकार असणाऱ्या या किल्ल्याला २२ बरूजे आहेत. १८ मीटर उंचीच्या याच्या भींती आहेत. संपुर्ण परीघ सुमारे १.७० किलोमीटरचा आहे. मलिक अहमद निजामशहाने या बुरूजांना आपल्या कर्तबगार प्रधान, सेनापतींची नावे  देऊन त्यांचा सन्मान केला होता. तटबंदीच्या आत एकुण सहा राजमहाल  होते. सोनमहल,मुल्क आबाद,गगन महल, मीना महल,बगदाद महल अशी त्यांची काही नावे होती. अशा या वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्याच्या बांधकामासाठी तितकेच कुशल कारागीर जमवन्यात आले होते. या कारागिरांना रोजच्या नमाजासाठी एका मशिदीची गरज भासत होती. याशिवाय आपल्याच कारागिरीतून आणि पैशातून ही मशीद बांधली जावी अशी कल्पना पुढे आली. आणि दमडी मशीद (Masjid) आकाराला आली. 

दमडी मशीद (Masjid) ठिकाण आहे जे आपल्याला भुरळ पाडते. येथील कोरीव कामाचे नमुने पाहण्यासाठी येथे नक्की भेट द्यायला हवी. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही वास्तू आजही चांगल्या अवस्थेत उभी आहे. आजपर्यंत आपण राजा रानी, त्यांचे राजवाड़े यांच्या कहान्या एकल्या आहेत मात्र  कारागिरांच्या पैशातून आणि कष्टातून निर्माण झालेली ही कलाकृती एकदा बघायलाच हवी. अहमदनगरला कधी गेला तर सहज येथे भेट देण्यासारखे हे ठिकाण आहे हे विसरू नका. 

या ठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?

Author ज्योती भालेराव.

Leave a Reply