Brandenburg Gate a symbol of unity – Berlin – (built 1788 to 1791)

Brandenburg Gate
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

ब्रान्डेनबर्ग गेट (Brandenburg Gate) – बर्लिन – ( निर्मितीकाळ १७८८ ते १७९१)

मिसलेनियस भारत या आमच्या पर्यटन आणि वारसास्थळांविषयी माहिती देणाऱ्या वेबसाईटच्या अंतर्गत आम्ही आमच्या वाचकांसाठी भारताबाहेरील पर्यटन स्थळांची माहिती, व्हिडीयो आणि छायाचित्रांचा नजराणा घेऊन येत आहोत. मिसलेनियस भारतच्या अंतर्गतच ‘मिसलेनियस वर्ल्ड’या विभागात तुम्हाला हे सर्व वाचायला मिळेल.

जगाच्या या भ्रमंतीमध्ये पहिले पर्यटन स्थळ आहे ‘जर्मनी’ देशातील बर्लिन शहरातील ब्रान्डेनबर्ग गेट . युरोपमधील जर्मनी या देशाविषयी वर्षानुवर्षे बाहेरील जगाला उत्सुकता, आकर्षण राहिले आहे. दुसऱ्या महायुद्धापासून या देशाने ज्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उलथापालथी बघितल्या आहेत. त्यामुळे या देशाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रवास फार रंजक मात्र वेदनादायीही आहे.

अनेक राजकीय वळणं घेत, बदल पचवत आज हा देश आधुनिक पद्धतीने उभा आहे. मात्र येथे आधुनिकतेबरोबरच जुन्या वास्तू, रस्ते, संग्रहालयं अत्यंत चांगल्यापद्धतीने जपण्यात आले आहेत. जर्मनीच्या राजधानीचे शहर असणाऱ्या बर्लिनमधे ‘ब्राडेनबर्ग गेट’ (Brandenburg Gate) हे जगप्रसिद्ध स्मारक आहे. या स्मारकाची माहिती घेण्याआधी थोडी बर्लिन शहराविषयीची माहिती घेऊ.

Brandenburg Gate

बर्लिन शहराविषयी.

जर्मनी देशाची राजधानी आहे हे शहर. बर्लिन शहर फिरण्यासाठी फार सुंदर आहे. येथील सार्वजनीक वाहतूक फार सुरळीत आहे. ट्राम, ट्रेन, बस अगदी सहज आणि योग्य दरात आपल्याला वापरता येतात. मोठ मोठे दगडी रस्ते, रूंद आणि स्वच्छ फुटपाथ, त्याला लागून असणारे कॅफे, जुन्या नव्यांची सांगड घालून बांधण्यात आलेली घरे, गल्ल्या, हे सगळंच येथील पर्यटनात येतं. संध्याकाळच्यावेळीतर विविध रंगांच्या रोषणाईत एकाच वेळी शांत, संथ पण तरीही उत्साहित वाटणारे असे हे शहर. अनेक सुंदर वास्तू, चर्च आपल्याला येथे जागोजागी बघायला मिळतात.

पर्यटनासाठीच्या सुविधा.

संपूर्ण बर्लिन शहर फिरण्यासाठी अनेक कंपन्यांच्या डबलडेकर बसची सुविधा आहेत. बसच्या वरील उघड्या भागातून संपूर्ण शहराची आपल्याला सैर करता येते. बर्लिनच्या भिंतीने पूर्वी विभागले गेलेले पूर्व आणि पश्चिम बर्लिन पाहण्यासाठी त्या मार्गांची निवड करून आपण पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो. अशा या ऐतिहासिक बर्लिन शहरातील ‘ब्रान्डेनबर्ग गेट’ (Brandenburg Gate) एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या गेटला बर्लिन शहराची ओळख समजतात.

ब्रान्डेनबर्ग गेट (Brandenburg Gate) एक स्मारक.

दुसरे महायुद्ध संपून जेव्हा शीत युद्धाच्या काळात जर्मनीचे जे विभाजन करण्यात आले होते त्याचे प्रतिक म्हणजे हे स्मारक आहे. जर्मनीच्या विभाजनाचे दुःख, त्यांच्या वेदना याची आठवण आजच्या काळातही हे स्मारक करून देते. हे स्मारक जगाला शांतता, एकता आणि समानतेचा संदेश देते. दोनशे वर्षांच्या इतिहासासह हे स्मारक इतिहासाची एक महत्त्वाची आठवण आहे.

Brandenburg Gate

ब्रान्डेनबर्ग गेट (Brandenburg Gate) स्मारकाच्या निर्मीतीची कथा.

बर्लिन शहराच्या मध्यभागी हे स्मारक उभारण्यात आलेले आहे. एखाद्या शहराची किंवा गावाची वेस (कमान) जशी असते तसे हे स्मारक दिसते. सँन्ड स्टोनमध्ये बांधण्यात आलेले हे स्मारक भव्य आहे. याच्या छताच्या आत काही प्रमाणात मूर्तीकाम केलेले आहे. हा भव्य दरवाजा ( कमान ) बांधण्याचा आदेश १७८८ मध्ये ‘प्रशियाचा’ राजा फ्रेडरिक विल्यम याने दिले होते. जर्मन साम्राज्यातील एक प्रमुख राज्य अशी ‘प्रशियाची’ओळख आहे.

१७९१ मध्ये या ‘ब्रान्डेनबर्गचे’ (Brandenburg Gate) बांधकाम पूर्ण झाले. या दरवाजापासूनच बर्लिन शहर ते ब्रँडबर्ग या गावापर्यंतचा रस्ता तयार करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनी बर्लिन शहरासह जेव्हा जर्मनी देश पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला, तेव्हाही या ब्रँन्डेनबर्ग गेटने मध्याची भूमिकी निभावली होती. फार पूर्वी याला ‘पिस गेट’ अर्थात शांततेचा दरवाजा असेही संबोधण्यात येत असे.

Brandenburg Gate

ब्रान्डेनबर्ग (Brandenburg Gate) दरवाजाची वास्तूशैली.

बारा भव्य स्तंभांवर या दरवाजाची कमान उभारण्यात आलेली आहे. प्रत्येक बाजूला सहा असे भव्य स्तंभ असून त्यातून पाच मार्ग तयार करण्यात आले आहे. सध्या त्यापैकी नागरिकांना दोनच मार्ग वापरण्याची परवानगी आहे. त्याची रचना अथेन्समधील एक्रोपोलिसचे प्रवेशद्वार असलेल्या प्रोपिलियासारख्या रचनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येते. दरवाजाच्या या कमानीच्या आतीलबाजूस काही युरोपीयन शैलीतील भव्य शिल्प आहेत. चार घोड्यांचा रथात विराजमान असलेली रोमन विजयाची देवी असे एक भव्य शिल्प सर्वात वरच्या भागावर कोरण्यात आलेले आहे.

खरं तर हे स्मारक त्याच्या शैलीपेक्षाही त्याच्या ऐतिहासिक घटनेसाठी जास्त ओळखले जाते, त्यातच त्याचे खरे महत्त्व सामावलेले आहे. बर्लिनची भिंत पाडल्यानंतर हे गेट या देशाच्या एकि‍करणाचे प्रतिक समजले जाते. या गेटच्या बाजूने बांधण्यात आलेली प्रसिद्ध बर्लिनची काँक्रिटची भिंत १९९० मध्ये टप्प्याटप्प्याने पाडून पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकत्रिकरण करण्यात आले. ज्यावेळी हे घडले तेव्हा दोन्ही बाजूच्या नागरिकांनी येथूनच भिंत पाडल्याचा जल्लोष केला होता. आणि हे गेट तेव्हापासून बर्लिनमधिल एक महत्त्वाचे सामाजिक ठिकाण झाले आहे.

जर्मनीच्या एकत्रीकरणाचा इतिहास.

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर दोस्त राष्ट्रांनी ( युनायटेड किंग्डम, सोव्हिएत संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीन यांचा यात समावेश होता. याशिवाय फ्रांस हे दुय्यम राष्ट्र होते,तर कॅनडा व ऑस्ट्रेलिया ही अनुक्रमे युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेच्या अधिपत्याखाली लढणारी राष्ट्रे होती तर पोलंड व चेकोस्लोव्हेकिया यांनी छुप्या पद्धतीने युद्धात सहभाग घेतला होता ) या सर्व राष्ट्रांनी मिळून जर्मनीच्या पराभवानंतर जर्मन राष्ट्राची पूर्व व पश्चिम जर्मन हे दोन स्वतंत्र देश निर्माण केले होते. त्यासह बर्लिन शहराचे दोन तुकडे करण्यात आले.

यापैकी पूर्व जर्मनीवर सोव्हिएत संघाच्या छत्रछायेखाली कम्युनिस्ट पद्धतीचा स्विकार केला तर पश्चिम जर्मनी इतर पाश्चिमात्य देशांप्रमाणे लोकशाही देश बनला. यासर्व राजकीय उलथापालथी नंतर पूर्व जर्मनीतून सतत येथील नागरिक पश्चिम जर्मनीकडे पलायन करत असत. पश्चिम राष्ट्रांच्या अधिपत्याखाली या भागात जास्त विकास, स्वातंत्र्य अनुभवायला मिळत असल्याने असे नागरिक करत असत. हे पलायन थांबवण्यासाठी एक भिंत बांधली. हिच भिंत शीत युद्धाची एक महत्त्वाची खूण मानली जात असे.

१९८० च्या उत्तरार्धात सोव्हिएत संघात आर्थिक मंदी आल्यानंतर पूर्व युरोपमधील अनेक कम्युनिस्ट राजवटी पडल्या. १९८९ ला पूर्व जर्मनीमध्ये कम्युनिस्ट विरोधी शांततापूर्वक चळवळी केल्या गेल्या ज्यांची परिणती म्हणून ९ नोव्हेंबर १९८९ रोजी बर्लिनची भिंत पाडून टाकली गेली. १९९० सालच्या अनेक वाटाघाटीनंतर पूर्व व पश्चिम जर्मन नेत्यांनी एकत्र व्हायचे ठरवले. आणि या आनंदाच्या प्रसंगी जेव्हा बर्लिनची भींत पाडण्यात आली होती. हा दिवस होता ३ ऑक्टोबर १९९०. याच ब्रान्डेनबर्ग (Brandenburg Gate) गेटपाशी जाऊन जर्मन नागरिकांनी या स्वातंत्र्य आणि एकात्मतेचा आनंद साजरा केला होता, म्हणून या स्मारकाला स्वातंत्र्य स्मारकाचे स्वरूप आले आहे.

Brandenburg Gate

देशाच्या एकरुपतेचे प्रतिक.

देशपातळवीवरील कोणताही उत्सव किंवा विजय साजरा करण्यासाठी, सण, उत्सवांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे जमतात. हजारो पर्यटक दररोज याठिकाणाला भेट देत असतात. या परिसराच्या बाजूलाच बर्लिनमधिल काही प्रशासकिय इमारती आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसरालाच खूप महत्त्व आहे.

कोणत्यावेळी येथे भेट द्यावी ?

बर्लिन शहराला दरवर्षी जगातून लाखो पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे हे शहर फिरण्यासाठी ज्या बसची सुविधा आहे त्यांचे बुकिंग करून मगच येथे जाणे सोयिस्कर आहे. त्यामुळे तुमचा बराच वेळ वाचतो.

या दरवाजाच्या भव्यतेमुळे येथे सेल्फि, फोटो घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. कोणाला या गेटच्या भव्यतेची भूरळ पडते, तर कोणाला याच्यामागच्या इतिहासाची. म्हणूनच या स्थळाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व फार मोठे आहे. जर्मनीच्या ताटातुटीची आणि एकत्रिकरणाची साक्ष देणारे असे हे ‘ब्रान्डेनबर्ग गेट’ जगाला स्वातंत्र्य आणि समतेचा संदेश देत उभे आहे.

Leave a Reply