Table of Contents
चॅप्लिन्स् वर्ल्ड , स्वित्झर्लंड – ( निर्मिती २०१६ )
आपल्या मूकचित्रपट आणि विनोदी अभिनयाने संपूर्ण जगावर गारूड करणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे चार्ली चॅप्लिन. या जगप्रसिद्ध अभिनेत्याच्या गत-आयुष्याची एक अनोखी दुनिया स्वित्झर्लंडमधे वसवण्यात आलेली आहे. ‘चॅप्लिन्स् वर्ल्ड’ ( Chaplins world ) म्हणजेच चॅप्लिनचे जग म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. मिसलेनियस वर्ल्डच्या या भागात आपण ‘चॅप्लिन्स् वर्ल्ड’ची सफर करणार आहोत.
कोठे आहे चॅप्लिन्स वर्ल्ड ? ( Chaplins world )
चार्ली चॅप्लिन यांच्या चित्रपटांशी आणि आयुष्याशी निगडीत असे हे चॅप्लिन्स वर्ल्ड ( Chaplins world ) स्वित्झर्लंडमधील कँटोन्टमेंट मधील कोर्सियर-सुर-वेवी येथे उघडलेले एक संग्रहालय आहे. येथील मनोइर दे बान या व्हिलामध्ये या चॅप्लीन्स वर्ल्ड ( Chaplins world ) चा एक भाग आहे. आणि उर्वरित भाग हा या बंगल्याच्या आवारात बांधलेल्या इमारतीत आहे.
चार्ली चॅप्लिन यांच्या चित्रपटांशी आणि आयुष्याशी निगडीत असे हे चॅप्लिन्स वर्ल्ड ( Chaplins world )
स्वित्झर्लंडमधील लेक जिनिव्हा कँटोन्टमेंट मधील कोर्सियर-सुर-वेवी येथे उघडलेले हे सुंदर संग्रहालय आहे. येथील ‘मनोइर दे बान’ या व्हिलामध्ये या ‘चॅप्लीन्स वर्ल्ड’ ( Chaplins world ) चा एक भाग आहे. आणि उर्वरित भाग हा या बंगल्याच्या आवारात बांधलेल्या इमारतीत आहे.

अमेरिकेतून चार्ली चॅप्लीन स्वित्झर्लंड मध्ये कसे आले ?
चार्ली चॅप्लीन यांचा जन्म जरी ब्रिटन मधील लंडनमध्ये झाला, मात्र आपली अभिनयाची संपूर्ण कारकिर्द त्यांनी अमेरिकेत घालवली. चित्रपटांच्या निर्मीती कार्याच्या निमित्ताने आयुष्याचा मोठा काळ चॅप्लिन अमेरिकेत वास्तव्यास होते. मात्र १९५२च्या दरम्यान ते एका व्यावसायिक भेटीसाठी लंडनला गेले. त्या भेटी आधी त्यांनी रशियन युद्धसैनिकांसाठी एक भाषण केले होते. त्याभाषणामुळे अमेकिरन सरकारने चॅप्लिन हा कम्युनिस्ट असल्याचा आरोप केला. तसेच इतर काही राजकीय घटनांमुळे आणि त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले नसल्याने अमेरिकेन सरकारने त्यांना तो देश सोडण्यास भाग पाडले.
तडकाफडकी असा निर्णय झाल्याने चार्ली चॅप्लिन यांना लंडनमधूनच स्वित्झर्लंडमध्ये स्थलांतर करावे लागले. त्यांना पुढचे संपूर्ण आयुष्य युरोपमध्येच व्यतीत करावे लागले. स्वित्झर्लंडमधील लेक जिनिव्हा येथे त्यांनी ३७ एकराची प्रॉपर्टी विकत घेतली. आणि शेवटपर्यंत ते तिथेच राहिले.
अमेरिकेत त्यांच्या अभिनयाची कारकिर्द घडली मात्र चॅप्लिन यांच्या आयुष्याची संध्याकाळ स्वित्झर्लंडमधील एका हवेलीसदृश्य घरात व्यतीत झाली. आर्थिक कारणांमुळे आणि हवामानामुळे ते स्वित्झर्लंडमध्ये त्यांच्या कुटुंबासह स्थायिक झाले.
रहाते घर ते संग्रहालय ( Chaplins world ) हा प्रवास –
जानेवारी १९५३ मध्ये चॅप्लिन कुटुंब मॅनोइर डी-बानमध्ये गेले आणि साधारण एक महिन्यानंतर हा व्हिला खरेदी केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते येथेच राहिले. चार्ली चॅप्लिन यांच्या मृत्यूनंतर, त्यांची पत्नी उना ओनील याही त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९१ पर्यंत याच व्हिला मध्ये राहिल्या. उना ओनील यांच्या निधनानंतर हे घर अनेक वर्ष रिकामे होते. चॅप्लिन कुटुंबियांपैकी त्यांची मुले युजीन आणि मायकेल यांचे वास्तव्य हे या कुटुंबियांपैकी शेवटचे वास्तव्य होते.
त्यानंतर या मालमत्तेवर चॅप्लिन संग्रहालय ( Chaplins world ) उभारण्याची कल्पना २००० च्या वर्षापासून सुरू झाली. या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी सुरुवातीला स्विस वास्तूविशारद फिलिप मेलन आणि क्युबेकमधील संग्रहालयशास्रज्ञ यवेस ड्युरंड यांचा महत्त्वाचा सहभाग होता. संग्रहालयाच्या ( Chaplins world ) या प्रकल्पाला चॅप्लिन कुटुंबियांचा पाठिंबा होता.

. या संपूर्ण प्रकल्पासाठी वॉड कॅन्टोंनमेंटकडून १ कोटी स्विस फ्रँक कर्ज मिळाले. २०११ मध्ये या संग्रहालय प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. आणि पाच वर्षांनंतर म्हणजे २०१६ ला चार्ली चॅप्लिन यांच्या १२७ व्या वाढदिवसानिमित्त चॅप्लिन्स वर्ल्ड ( Chaplins world ) या संग्रहालयाचे उद्घाटन झाले.
चॅप्लिन्स वर्ल्ड प्रकल्पाची एकुण किंमत –
चॅप्लिन्स वर्ल्ड ही अनोखी दुनिया उभी करण्यासाठी एकुण ६० दशलक्ष स्विस फ्रँक होती. इतक्या मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीत स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि कॅनडामधील गुंतवणूकदार होते.
चॅप्लिन्स वर्ल्डची संकल्पना
चॅप्लिन्स वर्ल्डची ( Chaplins world ) ही दुनिया खरोखर अद्भूत आहे. लहानमोठ्या सर्वांनाच येथे भेट द्यायला आवडेल, असे हे संग्रहालय उभे करण्यात आले आहे. चार्ली चॅप्लिन हे त्यांच्या चित्रपटांद्वारे सर्वांनाच माहित आहेत. मात्र हे संग्रहालय बघितल्यावर चॅप्लिन यांच्या आयुष्याविषयी, त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या प्रकियेविषयी आणि त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांविषयी आपल्याला बारिकसारिक माहिती मिळते.
चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांची पुस्तके, नोटस् असा असंख्य कागदरूपी खजिना येथे आहे. आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात त्यांना मिळालेला मानाचा ऑस्कर पुरस्कारही येथे मांडण्यात आलेला आहे.

चार्ली चॅप्लिन्स वर्ल्डचे महत्त्वाचे आकर्षण
येथे भेट दिल्यावर तुम्ही जेव्हा तिकिट काढून आत प्रवेश करता तेव्हा तुम्हाला या प्रांगणाचे दोन भाग दिसतात. एक त्यांचे वास्तव्य असलेले घर आणि दुसरा भाग म्हणजे चार्ली चॅप्लिन्स स्टुडियो आणि त्यांच्याशी निगडीत मिळणाऱ्या वस्तूंचे दूकान. येथे दर पंधरा वीस मीनिटाच्या अंतराने चॅप्लिन यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवरची छोटीसी डॉक्युमेंटरी दाखवण्यात येते. आणि ही डॉक्युमेंटरी संपली की सुरू होतो चॅप्लिन्स वर्ल्डचा अनोखा प्रवास.
खरोखर हा प्रवास करणे म्हणजे पुढचे दोन-चार तास तुम्ही चित्रपटांच्या आणि चॅप्लिनच्या दुनियेत ( Chaplins world ) रममाण होता. डॉक्युमेंटरी संपल्यावर पडदा वर जातो आणि समोर तुम्हाला समोर दिसते ते छोट्या चार्लीचे जग. मोठ्या दगडी भिंती, भाज्या-फळांचे दुकानं, लंडनमधील एक छोटीसी गल्ली आणि घर असं बरच काही. त्याच्या बाजूला वॅक्सचा चार्लीच्या आईचा पुतळा आणि मागे छोटा चार्ली. आणि येथूनच सुरू होतो, चॅप्लिनच्या आयुष्याचा आपला प्रवास.
















येथील वॅक्सचे पुतळे म्हणजे खरोखर माणसं उभी असल्याचा आभास होतो, इतकी ती सुंदर घडवण्यात आली आहेत. चार्ली चॅप्लीनने साकारलेली सुरुवातीची नाटके, त्या नाटकांच्या संचात काम केलेले नट-नट्या, दिग्दर्शक, नाटक-चित्रपटांतील प्रसंग पुतळ्यांच्या सहाय्याने उभारण्यात आले आहे. एका दालनात त्याकाळच्या फिल्मचे संग्रह ठेवण्यात आले आहेत. जुने कॅमेरे ठेवण्यात आले आहेत.
त्यापुढील दालनांमध्ये चार्ली चॅप्लिन यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या प्रसंगांचे वॅक्सच्या पुतळ्यांच्या सहाय्याने चित्रण करण्यात आले आहे. एक एक दालन फार सुंदर आहेत. शेवटच्या भागात चार्ली चॅप्लिन यांना मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराची बाहुली आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे एका काचेच्या कपाटात ठेवण्यात आले आहे. शेवटी अनेक चित्रपटांच्या पोस्टरांनी या स्टुडियोची सांगता करण्यात आलेली आहे.
येथून तुम्ही बाहेर पडून चॅप्लिन यांच्या प्रत्यक्ष निवासस्थानाकडे ( Chaplins world ) जाऊ शकता. या स्टुडियोत एकुण 30 पेक्षा जास्त मेणाचे पुतळे आहेत.चॅप्लिनच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्य अशा दोन भागात चित्रण करत हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.
चार्ली चॅप्लिन यांचे निवासस्थान (Chaplins world)
चार्ली चॅप्लिन यांचे निवासस्थान तीन मजली आहे. या प्रत्येक मजल्यावरील प्रत्येक खोलीत चार्ली यांच्या कुटुंबाचे भूतकाळातील जीवन साकारण्यात आले आहे. दिवाणखाना, जेवणाची खोली, लायब्ररी, लिखाणाची खोली, बेडरूम असे सर्व काही जसेच्यातसे मांडून ठेवलेले आहे. येथील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे येथे ठेवण्यात आलेल्या खाण्याच्या वस्तू. अगदी खऱ्या वाटाव्यात अशा त्या बनवण्यात आलेल्या आहेत.
या घरात एक दालन खास आहे. चॅप्लिन यांना जगभरातून अनेक कलाकार, नेते, संस्थानिक भेटायला येत असे. त्यांच्या त्या भेटीच्या फोटोजचे एक सुंदर दालन आहे. या दालनाच्या सर्व भींती आरशांच्या आहेत. कोठुनही पाहिले तरी हे फोटो आपल्याला दिसतात.
आणखी एक दालन आहे ते खास, ते म्हणजे थोर शास्रज्ञ अलर्ब्ट आईन्टाईन यांचे एक छोटे दालन. त्यांचा आरशातील जीभ काढून बघतानाचा फोटो आहे, त्याच्या बाजूला चार्ली चॅप्लीन यांनी आईनस्टाईन यांच्याविषयी काढलेले उद्गार लावलेले आहे. अनेक दालनांनी सजवलेले हे निवासस्थानातील संग्रहालय लाजवाब आहे. चार्ली चॅप्लिन आणि त्यांच्या पत्नी यांचे फोटोज हाही येथील एक सुंदर खजिना आहे. हे संपूर्ण संग्रहालय (Chaplins world) बघण्यासाठी तुमच्याकडे कमीतकमी चार ते पाच तास असायला हवेत.





















चॅप्लिनच्या चित्रपटांमधील महत्त्वाच्या वस्तू –
या संग्रहालयात चॅप्लिन यांनी त्यांच्या चित्रपटांत वापरलेल्या अनेक प्रसिद्ध आणि वास्तू आपल्याला पहायला मिळतात. तुम्ही जर चॅप्लिन चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्हाला या वस्तू परिचित असतिल. त्यांच्या प्रसिद्ध ‘द ट्रॅम्प’ या पात्रासाठी वापरलेले पोशाख, टोपी, काठी, कोट,बूट सर्व काही आहे. चॅप्लिनचा पियानो, त्याचे व्हायोलिनही बघायला मिळतो.
एक दालन आहे जेथे चॅप्लिन यांच्याविषयीच्या बातम्या छापून आलेले मासिकं, वर्तमानपत्रं आहेत. या संग्रहालयातील सर्व वस्तू या चॅप्लिन वर्ल्डच्या ट्रस्टने अनेक ठिकाणाहून मिळवलेल्या आहेत. मात्र त्यांची घेण्यात आली निगा हा आभ्यासाचा विषय ठरू शकतो. एकुणच या संग्रहालयाची मांडणी फार अभ्यासपूर्ण आणि आकर्षक आहे.








घराच्या परिसरातील बाग –
चार्ली चॅप्लिन यांच्या कुटुंबाचे वास्तव्य जेव्हा येथे होते, तेव्हा या घराच्या बाजूचा परिसर हा चॅप्लिन यांच्या भावविश्वाचा एक महत्त्वाचा भाग होता. येथे चॅप्लिन बसून कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचे येथे नमूद करण्यात आले आहे.
या व्हिल्याचा परिसर आणि बाजूचे वातावरण बघितल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते की, अमेरिकेसारख्या कायम गजबजाट आणि तामझाम असणाऱ्या देशातून येऊन हे कुटुंब या एका खेड्यात कसे स्थिरावले असेल. इतका मोठा सामाजिक गोतावळा सोडून असं एकांतात रहालया येणं आणि पुन्हा नव्याने येथे आपलं भावविश्व निर्माण करणं हे खरोखर विशेष म्हणता येईल. हे संपूर्ण संग्रहालय फिरून पहाताना, चार्ली चॅप्लिन यांच्या प्रसिद्धीभरल्या आणि एकांतातील अशा दोन्ही आयुष्याचा आपण विचार करत रहातो.

या संग्रहालयाला भेट द्यायला कसे जाल ?
स्वित्झर्लंडची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फार उत्तम आहे. तुम्ही कोणत्या शहरातून प्रवास करत आहात हे महत्त्वाचे. झुरीज शहरापासून चॅप्लिन वर्ल्डला जाण्यासाठी अडीच तास लागतात. जाण्या येण्याचे सुमारे पाच सहा तास आणि संग्रहालय फिरण्यासाठीते चार तास असे मिळून तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तरच हे संग्रहालय पहाण्यासाठी जाणे सोयीचे होते.
येथे भेट देण्यासाठी तुम्ही या संग्रहलायाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन बुकींग करून तिकिट बुकिंग करू शकता.
चार्ली चॅप्लिन यांच्याविषयी थोडक्यात –
- चार्ली चॅप्लीन यांचे पूर्ण नाव – सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर
- जन्म – 16 एप्रिल 1889
- मृत्यू – 25 डिसेंबर 1977
- जन्मस्थान – लंडन
- आईचे नाव -हॅनाह चॅप्लिन
- वडिलांचे नाव -चार्ल्स चॅप्लिन
- सावत्र भावाचे नाव – सिडनी जॉहन हिल
- प्रथम पत्नी – मिल्ग्रेड हरीस
- द्वितीय पत्नी – लिटा ग्रे
- तृतीय पत्नी – पॉलेट गोडार्ड
- चौथी पत्नी – उना ओ नील
- चार्ली चॅप्लीन यांची मुले – नॉर्मन स्पेन्सर चॅप्लिन
- चार्ल्स स्पेन्सर चॅप्लीन
- सिडनी स्पेन्सर चॅप्लीन
- गेराल्डाईन लिह् चॅप्लिन
- मिशायल जॉहन चॅप्लिन
- जोसेफिन हानह चॅप्लिन
- व्हिक्टोरीया चॅप्लिन
- ऑयजीन ॲन्थनी चॅप्लिन
- जेन सेसिल चॅप्लिन
- अँन्टी एमिली चॅप्लिन
- ख्रिस्तोफर जेम्स चॅप्लिन
चार्लीचे बालपण –
चार्ली चॅप्लिन यांचे बालपण अत्यंत दारिद्र्य आणि दुःखात व्यतित झाले. त्यांच्या बालपणीच त्यांचे वडील त्यांना सोडून, दुसरा विवाह करून वेगळे रहात होते. आईने त्यांना नाटक आणि गाणे सादर करून वाढवले. मात्र अचानक आईचा स्टेजवर गाताना, आवाज गेल्याने त्यांच्यावर दारिद्र्याचे दिवस ओढवले. पुढे त्यांच्या आईने शिवणकाम करून दोन्ही मुलांना वाढवले.
चार्लीच्या नवव्यावर्षापर्यंत त्याच्यावर लंडनमधील ‘वर्क हाऊस’ (सरकारी अनाथालय) मध्ये जाऊन रहाण्याची वेळ आली. यादरम्यान त्याच्या आईला दोनदा नैराश्याचा झटका आल्याने वेड्याच्या इस्पितळात भरती व्हावे लागले. इतक्या सगळ्या संकटांचा सामना करून चार्ली मोठा होत होता. त्याने वयाच्या फार लवकर काम करण्यास सुरूवात केली. वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून त्याने सांगतिक कार्यक्रम आणि नंतर नाटकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली.

वयाच्या १९ व्या वर्षी त्याने त्याचे पहिले मोठे व्यावसायिक नाटक साईन केले आणि त्यासाठी फ्रेड कारनो कंपनीशी करार केला. आणि याच दिवसापासून चार्लीचे नशिब पालटले. फ्रेड कारनो कंपनीने त्याला युनायटेड स्टेटस अर्थात अमेरिकेत नेले. आणि मग चार्ली चॅप्लिनच्या नाटक आणि चित्रपटांचा प्रवास सुरू झाला. फ्रेड कारनो कंपनीसोबत काही वर्ष नाटकांत काम करून पुढे चार्ली ने १९१४ ला किस्टोन स्टुडिओ या फिल्प कंपनीसोबत काम करण्यास सुरूवात केली.
येथूनच त्याच्या जगप्रसिद्ध पात्राची ‘ट्रॅम्प’ची निर्मीती झाली. पुढे १९१९ मध्ये चॅप्लिनने स्वतःची युनायटेड आर्टिस्ट नावाची डिस्ट्रिब्युशन कंपनी स्थापन केली. या कंपनीमुळे त्याच्या चित्रपटांच्या वितरणावर त्याचा कंट्रोल रहाण्यास मदत झाली. त्याच्या मोठ्या लांबीच्या चित्रपटांची सुरवात याच दरम्यान झाली.
चार्ली चॅप्लिनचे गाजलेले चित्रपट –
- १. द किड – १९२१
- २. अ वुमन ऑफ पॅरिस – १९२३
- ३. द गोल्ड रश – १९२५
- ४. द सर्कस -१९२८
- ५. सिटी लाईटस -१९३१
- ६. मॉडर्न टाईमस – १९३६
- ७. द डिक्टेटर – १९४० हा चित्रपट चॅप्लिन यांचा पहिला बोलपट ठरला.
इ.स. १९४० नंतर चॅप्लिन यांच्या कारकिर्दीली उतरतीकळा लागल्याचे दिसून येते. त्यांच्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यात वादळे आली. त्यांच्यावर वैयक्तिक आणि व्यावसायिक असे आरोप झाले. त्यांच्यावर रशियाच्या बाजूने भाषण करून कम्युनिस्टांच्या बाजूने असण्याचा आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे त्यांच्यावर वयाने लहान मुलींशी लग्न केल्यामुळे पितृत्वाच्या बाबत एक खटला दाखल करण्यात आला.
या सगळ्यात अमेरिकेतील प्रेस आणि काही लोकांनी त्यांना बरेच बदनाम केले. यातून त्यांना मोठ्या न्यायालयिन चौकशीला सामोरे जावे लागले. त्यातून निर्दोष सुटका झाली तरी, दुसऱ्या महायुद्धाच्या राजकीय पार्श्वभूमिवर त्यांना अमेरिकन सरकारने अमेरिका सोडण्यास भाग पाडले. अमेरिकन एफबीआयच्या चौकशीचा ससेमारा त्यांच्या मागे लागला. लंडनला चित्रपटाच्या प्रिमियरसाठी गेलेल्या चॅप्लिनला आपण अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारले नसल्याने आता आपले अमेरिकेत जाणे कठिण करण्यात आल्याचे वेळीच समजले होते.
पुढे त्यांनी शांत, निसर्गरम्य आणि प्रसिद्धीपासून दूर अशा ठिकाणि स्वित्झर्लंडमध्ये रहाण्याचे ठरवले. चार्ली चॅप्लिन यांनी त्यांच्या पुढील काळातील चित्रपटांमध्ये द ट्रम्प हे पात्र साकारण्याचे सोडून दिले. अमेरिकेने अपमानित करून देश सोडायला लावल्याने त्यांच्यावर त्याचा कायमचा प्रभाव पडला. . द ट्रॅम्प हे पात्र नसणाऱ्या चित्रपटांमध्ये मोन्युझर व्हरड्युक्स (१९४७), लाईमलाईट (१९५२), अ किंग इन न्युयॉर्क (१९५७) आणि अ काऊंन्टेस फ्रॉम हाँगकाँग (१९६७) या चित्रपटांचा समावेश आहे.
चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्याचा आणि चित्रपटांचा हा प्रवास तुम्हाला प्रत्यक्ष त्यांच्या वस्तू, छायाचित्रं, मेणाचे पुतळे यांच्या स्वरूपात अनुभवायचे असेल तर या संग्रहालयाला नक्की भेट द्या. एरवी स्वित्झर्लंड म्हटलं की तेथील निसर्ग, बर्फाच्छादित पर्वत आणि तेथीस सुंदर शहरं-गावं यांचाच विचार होतो. पण याच स्वित्झर्लंड मध्ये एका महानायकाचे घर आहे. हे घर नुसते घर नसून मूकचित्रपटांचा जिताजागता इतिहास म्हणता येईल. संधी मिळेल तेव्हा त्याला नक्की भेट द्या.

- ज्योती भालेराव