Protected Monument – Bhuleshwar Shiv Mandir | संरक्षित स्मारक -भुलेश्वर शिवमंदिर.

Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

भुलेश्वर शिवमंदिर (Protected Monument)

एका भेटीत ‘भुल’ पाडणारे असे आहे ‘भुलेश्वर मंदिर (Protected Monument – Bhuleshwar Shiv Temple) .’ तेराव्या शतकात बांधलेले हे शिवाचे मंदिर एका उंच टेकडीवर आहे. पुण्यापासून ४५ किलोमीटर तर पुणे-सोलापुर मार्गावरून १० किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून हे ‘इस्लामी’ बांधकाम शैलीचे असून, आतून मात्र ते हिंदू शैलीचे आहे. परकिय आक्रमणांपासून संरक्षण व्हावे हा यामागचा हेतू असावा. त्यासाठी हा बदल केलेला असावा का ? असे वाटते. कैलासावर विवाह करण्यासाठी जाण्यापुर्वी माता पार्वतीने याठिकाणी नृत्य केले होते अशी आख्यायिका सांगितली जाते. यावरूनच या ठिकाणाच्या प्राचीनत्वाची प्रचीती येते.मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता क्षणीच येथील दिव्य वातावरणाची आपल्याला अनुभूती येते हे नक्की.

Protected Monument
Protected Monument

तेराव्या शतकात देवगिरी यादवांच्या काळात अशी अनेक ‘हेमाडपंथीय’ मंदिरे महाराष्ट्रात बांधण्यात आली होती. याच शतकाच्या मध्यास हे मंदिर बांधण्यात आले असावे असा अंदाज बांधण्यात येतो. १६३४ मध्ये विजापुरचा सरदार ‘मुरार जगदेव’ याने या ठिकाणी ‘मंगलगड’ नावाचा किल्ला बांधला होता. आजही मंदिराकडे जाताना या किल्ल्याचे भग्न अवशेष आपल्याला पहायला मिळतात. मूरार जगदेव याने हा किल्ला सर्व शहरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असल्याचे सांगण्यात येते. मात्र आज या किल्ल्याच्या उरल्यासुरल्या भग्न खुणाच पर्यटकांच्या दृष्टीस पडतात.

लांबूनच टेकडीवरील या मंदिराचे दोन कळस आपले लक्ष वेधून घेतात. काळ्या आणि पिवळसर पांढऱ्या रंगातील असे हे कळस मंदिराविषयीची उत्सुकता वाढवतात. अखंड काळ्या दगडात बांधण्यात आलेले हे मंदिर त्यावरील कोरीव काम आणि मूर्ती घडणावळासाठी प्रसिद्ध आहे. येथील भींतींवर कोरलेल्या सर्व मूर्ती या स्रीरूपात असून, स्री रूपातील गणेश मूर्ती ही गणेश्वरी, लंबोदरी या नावाने प्रसिद्ध आहे.

Protected Monument
Protected Monument

भींतीवरील अनेक दृष्ये ही महाभारतकालीन, पौराणिक कथांवर आधारित आहेत. मंदिरांवर ज्या शिल्पकारांनी कोरीवकाम केले आहे त्यांनी त्यांचे ओळखचिन्हे म्हणून नागांची उलटी चित्रे कोरून ठेवलेली आहेत.

Protected Monument

मंदिराच्या बाहेरील आवार

सुरूवातीला सांगितल्या प्रमाणे याठिकाणी किल्लाही बांधण्यात आलेला होता. त्यामुळे मुख्य मंदिरात प्रवेश करण्याआधी बाहेरचा  बराच मोठा परिसर फिरावा लागतो. निसर्गसंपन्न आणि  आजही एखाद्या गडावर आपण फिरत असल्यासारखा हा परिसर भासतो. मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एका मार्गाने वाहने जाऊ शकतात तर घाटाच्या अलिकडील मार्गाने जाण्यासाठी काही अंतरावर वाहने लावून काही पायऱ्या, चढण चढून जावे लागते. वर चढून गेल्यावर मंदिराचा ऐसपैस परिसर, कोरलेले शिल्प नजरेस पडतात.

Protected Monument
Protected Monument

एका दरवाजातून आत प्रवेश करताच काही पायऱ्या चढून वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करावा लागतो अशी याची अनोखी रचना आहे. एकदा का तुम्ही येथे प्रवेश केला की शिल्प आणि मूर्तींच्या अनोख्या दुनियेत तुम्ही प्रवेश केल्याची जाणीव होते.

मंदिराची रचना

अर्धखुला मंडप आणि गर्भगृह असा या मंदिराचा विस्तार केलेला आहे. या मंदिरासमोर नंदिमंडपही आहे. या मंदिराची वास्तूशैली दक्षिणेकडील ‘होयसळ’ मंदिरा प्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश्य आहे. याचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. हा नंदी सुमारे पुरूषभर उंचीचा असून अगदी भव्य आहे. समोरच शिवलिंग गाभारा आहे. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या भींतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती असे प्राणी, रामायण, महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. देशातील असंख्य मंदिरांच्या मानाने याठिकाणी महाभारतातील प्रसंग अधिक ठसठशीत व रेखीव कोरलेले असल्याचे जाणवते. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम अशी कथाशिल्पे येथील शिल्पकलेचे वेगळेपण अधोरेखीत करतात.  

यादव साम्राज्याच्या भरभराटीचा काळ संपुष्टात आल्या नंतर यवनांच्या आक्रमणांमध्ये या मंदिराची अतोनात हानी झाल्याचे दिसून येते. मात्र सध्या या मंदिरीतील ज्याकाही शिल्पांचे जतन करण्यात आले आहे तेही डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत. या मंदिराला जर तुम्ही सकाळी १२च्या आत भेट दिली तर सकाळच्या कोवळ्या ऊन्हात येथील शिल्प जास्त मनोहारी भासतात. अनेक दुर्मीळ वैशिष्ट्यांमुळे हे प्राचीन स्मारक १९५८च्या २४व्या प्राचीन स्मारके आणि पुरात्वीय स्थळे व अवशेष अधिनियमान्वये ‘राष्ट्रीय महत्त्वाचे’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ज्योती भालेराव.

2 thoughts on “Protected Monument – Bhuleshwar Shiv Mandir | संरक्षित स्मारक -भुलेश्वर शिवमंदिर.”

Leave a Reply