Navratra – Navdurgancha Jagar (Ghatsthapana) – (2021)

नवरात्र -नवदुर्गांचा जागर – (घटस्थापना) – (२०२१)

आपण अनेक सण साजरे करतो ते कशाविषयी तरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच. त्यातही अनेक सण समारंभ असे आहेत, ज्यात निसर्गाविषयी आपण आदर व्यक्त करण्यासाठी तो सण, उत्सव साजरा करत असतो. असाच एक मोठा उत्सव म्हणजे घटस्थापना अर्थात नवरात्र उत्सव (Navratra) होय. हा उत्सव प्राचीन काळापासून साजरा होत असल्याचे दिसून येते. फार पूर्वी हा उत्सव कृषीविषयक लोकोत्सव असावा. मात्र नंतर त्याचे स्वरूप बदलत गेल्याचे दिसून येते.

पूर्वी कसा साजरा होत असे हा सण ? त्याचे बदललेले स्वरूप काय आहे ? ही माहिती जाणून घेणे रंजक आहे.  आपली संस्कृती, सण, समारंभ किती प्रगल्भतेने साजरे केले जातात हेच आपल्या प्रत्येक उत्सवातून दिसून येते.

कृषिविषयक उत्सव.

फार पूर्वी हा उत्सव शेतकरी आपल्या शेतात आलेल्या नवीन पिकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करत असत. पावसाळ्यात पेरलेलं बियाणं दमदार पिकांच्या रूपात घरात आल्यावर त्या आनंदा प्रित्यर्थ शेतकरी बांधव हा उत्सव साजरा करायचे.  घटस्थापनेच्या दिवशी घरात नऊ धान्यांची पेरणी करून नऊ दिवसांनंतर दसऱ्याच्या दिवशी ऊगवलेले अंकुर काढून ते देवाला अर्पण करण्याची प्रथा होती.

Navratra Ghatsthapna

यातून शेतकरी निसर्गाविषयीची आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. यातूनच या उत्सवाचे कृषीविषयक महत्त्व समजते. पुढे निसर्गासह याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. नवरात्राला (Navratra) देवीच्या उपासनेचे स्वरूप आले. त्याचेही महत्त्व आपण  जाणून घेणार आहोत.

नवरात्राचा उत्सव कसा साजरा होतो ?

या दिवसात सर्वत्र देवीची उपासना करतात. हिंदू धर्मात चैत्र आणि अश्विन या दोन पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना केली जाते. नवरात्राला (Navratra) अकालबोधन नवरात्र असेही म्हटले जाते. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची तयारी करून घटस्थापना करण्यात येते.

सप्तशती चरित्रातील हा पुढील श्लेक देवींच्या नऊ रूपांचे आणि त्याचे महात्म्य सांगतो.

प्रथम शैलपुत्री ती, द्वितीयं ब्रह्मचारिणी

तृतीयं चंद्रघण्टेती, कुष्मांण्डेती ती चतुर्थकम

पंचम स्कंदमातेती षष्ठं कात्यायनीती च

सप्तमं कालरात्रीच महागौरी ती चाष्टकम

नवमं सिद्धिरात्री च नवदुर्गाः प्रकीर्तीताः

याचा अर्थ असा की – भगवती देवीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री, दुसऱ्या रूपाला ब्रम्हचारिणी, तिसऱ्याला चन्द्रघण्टा, चौथ्याला कृष्मांडा, पाचव्याला स्कंदमाता, सहाव्याला कात्यायनी, सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी आणि नवव्याला सिद्धीदात्री अशा या नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते.

या काळात आपल्या घरात तिचे जे मंगलमय वास्तव्य असते त्यात कोणी तिच्या आराधनेसाठी नऊ दिवस उपवास करतात. नऊ कुमारिकेचे पूजन, सप्तशती पाठ, कुंकुमार्जन, श्रीसुक्त पाठ, ललीतासहस्र नामावली अशा अनेक भक्तीमार्गाच्या गोष्टी केल्या जातात. याशिवाय आपल्या घराण्यात ज्या काही परंपरा आहेत त्यानुसार देवीची आराधना केली जाते.

नवरात्रात यज्ञ, हवन आदी करण्याची मोठी परंपरा आहे. कारण श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्या प्रमाणे यज्ञ केल्यास आणि त्याठिकाणी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्या यज्ञाचे फळ फार मोठे असते. म्हणूनच नवरात्रात (Navratra) जास्त यज्ञयाग केले जातात.

भक्तीमार्ग, कृषीविषयक दृष्टीकोनासह या उत्सवामध्ये आपल्या संस्कृतीत मुलींनाही अनन्यसाधारण महत्त्व दिले गेल्याचे बघायला मिळते. या काळात लहान मुली,कुमारिका यांचे मनोभावे पूजन केले जाते. कमीत कमी दोन वर्षांच्या कन्येचे पूजन केले जाते. तीन वर्षांच्या कन्येला त्रिमुर्ती, चार वर्षांच्या कुमारिकेला कल्याणी,पाच वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा आणि दहा वर्षाच्या कुमारिकेला सुभद्रा संबोधले जाते. कुमारिकेचे पूजन केल्याने दुःख दारिद्र्य दूर होते असे मानले जाते.

मात्र यातून भारतीय संस्कृतीत स्रीला देण्यात येणारे महत्त्व लक्षात येते. वर सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मात देवीची आराधना वर्षातून दोनदा करण्यात येते. वासंतिक नवरात्रात (Navratra) चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.

शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणजे शरद ऋतुत प्रारंभी येते ते शारदीय नवरात्र. आपल्या देशात संपूर्ण भारत वर्षात नवरात्र हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि विविध पद्धतीने साजरा केला जातो.

घटस्थापनेचा सोपा अर्थ म्हणजे, अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. यालात नवरात्रोत्सव (Navratra) म्हटले जाते. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा, आराधना केल्यानंतर दहाव्या दिवशी अश्विन शुद्ध विजयादशमीला त्याची सांगता केली जाते. त्यालाच दसरा असे संबोधतात. या दिवसाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. त्यालाच नवरात्रीच्या समाप्तिचा दिवस असेही म्हणतात.

नवरात्राच्या (Navratra) काही पौराणिक कथा आणि इतर महत्त्व.

काही पुराण कथांमधे सांगण्यात येते की, चामुंडा देवीने महिषसुर राक्षसाशी नऊ दिवस युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला होता. दसरा हा सण विजयाचे प्रतिकही समजले जाते. म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हटले जाते. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची उपासना केली, आणि त्या देवीच्या उपासनेने त्याला विशेष शक्ती प्राप्त झाली व तो रावणाचा वध करू शकला तो दिवसही विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, असे मानतात.

या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करून रामाचा हा विजय दिवस साजरा केला जातो. याशिवाय पौराणिक काळ सोडला तर १८ व्या शतकात दसरा हा सण पेशवेकालीन सत्तेत महत्त्वाचा मानला जात असे. पेशवे आणि त्यांचे सरदार कुटुंब मोठ्या थाटाने हा सण साजरा करत असत. दसरा सण साजरा करून मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करत.

नवरात्रीच्या नऊ माळांचे महत्त्व.

नवरात्रीच्या (Navratra) नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला विविध फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे. पहिल्या माळेला शेवंती किंवा सोनचाफ्याच्या पिवळ्या फुलांची माळ असते. दुसऱ्या दिवशी अनंत मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ असते. तिसऱ्या दिवशी निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा देवीला अर्पण करतात. चौथ्या दिवशी केशरी अथवा भगवी फुले असतात देवीच्या माळेसाठी. जसे की अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची वाहतात. सहावी माळ कर्दळीच्या फुलांची करतात.सातवी माळ झेंडूसारख्या नारंगी फुलांची करतात. आठवी माळ तांबडी फुले जसे की कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची वाहतात. नवव्या दिवशी देवीला कुंकुमार्जन हा विधी केला जातो. अशा प्रकारे नवरात्राचे नऊ दिवस देवीला निसर्गातील विविध फुलांच्या माळांपासबन सजवले जाते.

नवरात्राचे (Navratra) नऊ रंग.

अलिकडील काही वर्षात सर्वच सण, उत्सवांना समाजाने स्वतःची अशी एक संकल्पना दिली असल्याचे लक्षात येते. ज्येतिषशास्राने प्रत्येक वारानुरूप रंग ठरवून दिलेले आहेत. त्या वाराच्या रंगाची साडी देवीला नेसवली जाते. नवरात्राच्या (Navratra) नऊ दिवासात त्या त्या दिवसाच्या प्रमाने रंग ठरवून त्या रंगानुसार आपला पेहेराव करण्याची एक प्रथाही नागरिकांमध्ये अस्तित्वात आली आहे. ही प्रथा निश्चित कधी सुरू झाली हे सांगता येणे कठिण.

साधारण सामान्यांमधे हा ट्रेंड २००४ पासून सुरू झाल्याचे दिसून येते. मात्र सर्व वयोगटातील भाविक हे यादिवसात हौसेने हे पाळतात हे विशेष. अलिकडे वृत्तपत्रांसह इतर माध्यमांनी ही संकल्पना रूढ केली असली तरी, पेशवाईपासून हा वारांच्या रंगांचा ट्रेंड अस्तित्वात आहे.

हे रंग कसे ठरवले जातात ?

उगवत्या सुर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी , चंद्र पांढरा आणि सोमवारचे प्रतिक म्हणून सोमवारी पांढरा रंग, मंगळ ग्रह लाल म्हणून मंगळवारी लाल रंग, अशा पद्धतीने बुधवारी निळा, गुरूवारी पिवळा, शुक्रवारी हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवड्याचे सात रंग आणि नवरात्र (Navratra) तर नऊ दिवस, म्हणून उरलेल्या दोन दिवसासाठी मोरपंखी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग साधारणपणे ठरवले जातात.

भोंडला, गरबा, दांडीया

पूर्वी महाराष्ट्रात भोंडला तर गुजरात मधे गरबा हा प्रकार नवरात्राच्या नऊ दिवसात मुली स्रियां खेळत असत. सध्या महाराष्ट्रातील भोंडल्याची प्रथा फार दिसत नसली तरी टिकून आहे हे निश्चित. तसेही नवरात्र (Navratra) हा सण सुफलीकरणाचे प्रतिक म्हणून साजरा होतो. हस्त नक्षत्राचे प्रतिक म्हणून हत्तीचे चित्र पाटावर काढून ते मधोमध ठेवले जाते आणि त्याच्या भोवती मुली फेर धरून नाचून आनंद साजरा करतात. भोंडल्याचे विविध पारंपारिक गाणी असतात. खास रचलेल्या गाण्यांनी हा सामुहिक नृत्याचा कार्यक्रम रंगला जातो.

navaratra

असाच लोकप्रिय प्रकार म्हणजे गरबा, दांडिया हा होय. गुजरात कडे  प्रसिद्ध असणारा हा प्रकार आता संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही जोमाने वाढलेला आहे. अगदी सध्या त्याला व्यावसायिक स्वरूपही आले आहे. अनेक मान्यवरांच्या, कलाकारांच्या उपस्थितीत याचे कार्यक्रम आखले जातात.

अशा प्रकारे निसर्गाशी नाते सांगणारा, त्याचे ऋण माननारा आणि स्री शक्तीला नमन करणारा असा हा नवरात्र, घटस्थापनेचा उत्सव होय. देशातील सर्वच भागात आपापल्या प्रथा, परंपरांनुसार साजरा केला जातो.  

ज्योती भालेराव.

* सर्व छायाचित्रे – साभार गुगल वेबसाईट.

3 thoughts on “Navratra – Navdurgancha Jagar (Ghatsthapana) – (2021)”

  1. I was recommended this website by my cousin I am not sure whether this post is written by him as nobody else know such detailed about my trouble You are amazing Thanks

    Reply

Leave a Reply