मुरूड जंजिरा हा किल्ला जलदुर्ग आहे. कायम अजिंक्य राहिलेला असा हा किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास, याचे वास्तूवैशिष्ट्य आणि या किल्ल्याच्या सत्ताधिशांविषयीची माहिती मोठी रंजक आहे. ३३० वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व आजही टिकून आहे.
महाराष्ट्रात कुठे आहे हा किल्ला (Murud Janjira)–
रायगड (Raygad) जिल्ह्यातील ‘मुरूड-जजिंरा’ हा एक अभेद्य किल्ला आहे. चारी बाजूंनी अरबी समुद्राला लागूनच मुरूड तालुक्यात मुरूड नावाचे गाव आहे. मुरूडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही समुद्रकिनारी असलेली गावे आहेत. मुरूडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरूड-जंजिरा हा किल्ला वसलेला आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. याशिवाय इतर भागांमधून या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीची सोयही केलेली आहे.


किल्ल्याच्या निर्मितीविषयी –
जंजिराचा अर्थ ‘समुद्राने वेढलेला किल्ला’. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील ‘जझीरा’ या शब्दावरून तो आलेला आहे. जझीरा म्हणजे ‘बेट.’ या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. मेढेकोट म्हणजे लाकडाच्या मोठ्या ओंडक्यांनी तयार केलेली संरक्षित जागा. त्याकाळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाचांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर लाकडी ओंढक्यांचा मेढेकोट उभारण्यात आला होता. त्यावेळी त्यांचा प्रमुख राम पाटील हा होता.
या पाटलाचा बंदोबस्त करण्यासाठी त्यावेळच्या निजामशीहीतील ठाणेदाराने पिरामखानाची नेमणुक केली होती. याने पाटील आणि त्याच्या लोकांना दारूच्या पिंपांची भेट देऊन त्यांचा घात केला आणि याठिकाणी कब्जा केला.
नंतरच्या काळात पिरामखानाच्या जागेवर ‘बुऱ्हाणखानाची’(Burhankhan) नेमणुक झाली. त्याने निजामाकडुन (Nijham) याठिकाणी भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी मिळवली. आजही या किल्ल्यावर बांधकामाचे जे अवशेष आपल्याला पहायला मिळतात ते याच बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वत्रंत सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरूष समजला जातो. पुढे सुमारे ३३० वर्षे या किल्ल्यावरील आपली सत्ता आबाधित ठेवण्यात जन्मतःच कणखर आणि काटक असणाऱ्या सिद्दी वंशाच्या मलिक अंबर आणि त्याच्या वंशजांचा मोठा सहभाग होता असे म्हणता येईल. सिद्दी वंशाच्या या मलिक अंबर (Malik Ambar) आणि सिद्दी (Siddi) म्हणजे कोण याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे

सिद्दी मलिक अंबर (Siddi Malik Ambar) – सुमारे तिसऱ्या शतकात कोकणातील सोपारा, कल्याण, महाड जवळील चौल आणि पाल ही अरब व्यापाऱ्यांची व्यापर केंद्र होती. त्यासोबतच अफ्रिकेच्या (Africa) पुर्व किनारपट्टीवरील गेर्दोशिया (आताचा बलुचिस्तान, पाकिस्तान) इथून जवळ असलेल्या आखाती देशांशी (पुर्वीचा पर्शियन गल्फ) त्यांचा व्यापार चालायचा. त्या त्या प्रदेशातील प्रसिद्ध वस्तूंसह गुलाम सुद्धा विकले जायचे. गुलाम खरेदीसाठी अफ्रिकन खंडातील माणसांना जास्त मागणी होती. हे गुलाम आताच्या सोमालिया आणि इथिओपिया (जुने हॉर्न ऑफ आफ्रिका) येथील होते.
सहाव्या शतकापर्यंत भारतीय किनारपट्टीवरुन गुलामांचा व्यापार करण्यात अरब चांगलाचे तरबेज झाले होते. १३ व्या शतकात त्याचे प्रमाण अधिकच वाढत गेले. या खरेदी करून भारतात आणलेल्या अफ्रिकन गुलामांना हबशी किंवा सिद्दी म्हटले जायचे. ऍम्बेशिया भागातील हबशींची खाजगी अंगरक्षक किंवा सैन्य म्हणून मागणी वाढू लागली होती. अनुवंशीकतेने शारिरीकदृष्ट्या कणखर, सहनशील असणाऱ्या सिद्दींमध्ये शारिरीक कष्टाची कामे करण्याची क्षमता अधिक होती.
अरबांसोबत पोर्तूगिज, ब्रिटीश यांनी सुद्धा आफ्रिकन गुलामांनी भरलेली जहाजं भारतीय किनाऱ्यांवर आणली. यातील अनेक गुलामांना भारतातील राजे स्वतःचे अंगरक्षक म्हणून ठेऊन घ्यायचे.
मलिक अंबर हा असाच एक गुलाम म्हणुन आणला गेलेला सिद्दी होय. इथिओपिया येथील मुळ असलेल्या मलिक अंबरचा जन्म इ.स. १५४९ ला झाला होता. गुलाम म्हणुन सुरू झालेला त्याचा प्रवास पुढे जाऊन ‘मूर्तझा निजामशहा दुसरा’ या अहमदनगरच्या निजामशहाचा प्रधान होण्यापर्यंतच्या उच्च पदापर्यंत पोहोचला. युद्धशास्त्र आणि प्रशासनात तो पारंगत होता. दख्खन प्रांतातील महसुल व्यवस्थेची घडी त्याने बसवली. औरंगाबाद या शहराची स्थापना मलिक अंबरनेच केलेली आहे.
किल्ल्याविषयीची काही ऐतिहासिक वैशिष्ट्य –
इ.स. १६१७ ते इ.स. १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा किल्ला (Murud Janjira) अजिंक्य राहिलेला आहे. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय मुरूड-जंजिराच्या (Murud Janjira) तटावर ५७२ तोफा होत्या. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. पुढे संभाजी महाराजांनी हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबुत किल्ला उभारला होता. पण तरीही हा किल्ला स्वराज्यात सामिल होऊ शकला नाही.

किल्ल्याची वास्तूवैशिष्ट्ये –
जंजिऱ्याचे (Murud Janjira) प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. याठिकाणी आपल्याला आधी बोटीने आणि त्यातून छोट्या होड्यांमधे उतरवून आपल्याला जंजिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उतरवले जाते. मुख्य दाराच्या आत आणखी एक उपद्वार आहे. या द्वारावर एक शिल्प कोरलेले आहे. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. याचा अर्थ बुर्हाणखान इतर सत्ताधिशांना सांगतो आहे की या किल्ल्यावर कब्जा करण्याचा प्रयत्नही करू नका.



किल्ल्यामध्ये प्रवेश करताच दरवाजावरील नगारखाना दिसतो. तिथे संगमरवरी दगडांवर अरबी भाषेत शिलालेख कोरलेले आहेत. पुढे ‘पीर पंचायतन’ हे एक धार्मिक स्थळ आहे. किल्ल्याला सागराच्या दिशेनेही एक दरवाजा आहे. एकूण एकोणीस बुरूज किल्ल्याला आहेत आणि दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षाही जास्त आहे.

तटबंदीवर जाण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटबंदीतील प्रत्येक कमानी मध्ये तोफा ठेवलेल्या आहेत. प्रत्येत कमानी मधून समुद्राचे दिसणारे दृष्य अवर्णनीय आहे. जंजिऱ्यावर जवळपास ५१४ तोफा असल्याचा उल्लेख सापडतो. प्रसिध्द अशा कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही येथे पाहायला मिळतात. उत्तरेकडील बुरुजांच्या दिशेला एक चोर दरवाजाही आहे.

(Murud Janjira) किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा भव्य वाडा आज भग्न अवस्थेत आहे. याच्या बाजूला दोन मोठे गोड्या पाण्याचे तलाव आहेत. या किल्ल्यावर पुर्वी एकुण तीन मोहोल्ल्यात (विभागात) लोक रहात असत. दोन मुसलमानांचे आणि एक इतर समाजाचे अशी या मोहोल्ल्यांची विभागणी होती. याठिकाणी मोठी वस्ती वास्तव्यास होती. जोपर्यंत राजाश्रय होता तोपर्यंत ते लोक येथेच रहात होते. मात्र राजाश्रय गेल्यावर ही वस्ती उठून किल्ल्याच्या आसपास स्थायिक झाली.

आजही या (Murud Janjira) किल्ल्यावर त्याकाळी वस्ती असणाऱ्या लोकांचे वंशज इतर कामे करतात. पर्यटनाशी संबधीत जी काही कामे आहेत जसे की होड्या चालवणे, गाईडची कामे करणे त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. किल्ला पाहताना सतत याचे आश्चर्य वाटत रहाते की त्याकाळी इतके भव्य बांधकाम समुद्राच्या मधे कसे करण्यात आले असेल.



हा (Murud Janjira) किल्ला फिरून पाहताना हाताशी जरा जास्त वेळ असायला हवा. याच्या प्रत्येक तटबंदीवरून समुद्राचा विस्तृत, शांत, परिसर आपल्याला दिसतो. येथुनच पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड दिसतात. किल्ल्याच्या मुख्य दरवाजापासूनच हा किल्ला आपल्याला एका वेगळ्या गुढ विश्वात घेऊन आला आहे याची जाणिव होते. संपुर्ण किल्ला बघताना ती जाणिव कायम आपल्यासोबत रहाते.







ज्योती भालेराव.
2 thoughts on “Murud Janjira Fort – मुरूड जंजिरा किल्ला”
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Thank you for your feedback and keeping us motivated 🙂