Pune Archives Department

पुणे पुरालेखागार – Pune Archives

‘पुणे पुरालेखागार’ (Pune Archives) विभाग म्हणजे मराठा व पेशवेकालीन कागदपत्रांच्या जतनातून इतिहास जिवंत ठेवणारी अशी ही इमारत होय. पुणे पुरालेखागार पुणे हा विभाग पूर्वी ‘पेशवे दफ्तर’ म्हणूनही ओळखला जात असे. या इमारतीला सव्वाशे वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. दिनांक १ सप्टेंबर १८९१ रोजी ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे. प्रदिर्घ कालावधीनंतरही ही इमारत अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. त्याची बांधकामशैली फारच प्रभावित करणारी आहे. या दोन मजली इमारतीचे बांधकाम ६७ बाय ३४ चौरस फुटाचे आहे. आठ मोठे हॉल व चार लहान खोल्या असा या इमारतीचा भव्य विस्तार असून, तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर प्रत्येकी चार मोठे हॉल व दोन लहान खोल्या अशी नेटकी विभागणी केली आहे.

Pune Archives

शहरातील मध्यवर्ती आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाच्या बंडगार्डन परिसरात ही इमारत विराजमान आहे. पुणे (Pune) विधानभवनाच्या विरूद्ध बाजूला झाडांमध्ये ही इमारत सहज दिसून येत नाही. परंतु एकदा दृष्टीस पडल्यावर तिचा भक्कमपणा आणि वेगळी वास्तूशैली पाहून नकळत त्याविषयीची उत्सूकता वाढते. या इमारतीची माहिती तितकीच रंजक आहे.

पुराभिलेख इमारतीच्या बांधकामासाठी सव्वाशे वर्षांपूर्वी अंदाजे १ लाख ५१ हजार ८९६ इतका खर्च आला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तसेच आग विझवण्यासाठी दूरदृष्टीकोन ठेवून इ.स. १८९१ पासून येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीच्या मागे आपत्कालीन परिस्थितीत पाणी भिंतीवर चढवण्याचे येथील तंत्र चकित करणारे आहे. मध्यभागी चबुतर्याच्या आतून एक जिना असून, तिथे पाण्याची टाकी आहे. दस्तावेज सुरक्षित रहावेत या हेतूने कागदपत्रे जतन केलेल्या खोल्यांच्या छताला तारांच्या लोखंडी पहारवजा रॉड लावण्यात आल्या आहेत. स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणूनही या इमारतीचे महत्त्व अधोरेखित करावे लागेल. इ.स. १८ व्या व १९ व्या शतकात मराठा साम्राज्याचा विस्तार भारतभर झाला होता. या विस्तिर्ण साम्राज्याचे दस्तावेज येथे आहेत.

पुराभिलेख विभागाचा इतिहास आणि कार्य  –

राज्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाची कागतपत्रे, इतिहासकालिन पत्र व्यवहार, शासन व्यवस्थेतले तसेच लोकांच्या खाजगी संग्रहातले महत्त्वाचे अभिलेख अशा अनेक कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि जतन राज्याचा पुराभिलेख विभाग करीत असतो. १८२१ मध्ये स्थापन झालेला पूरालेखागार विभागाने शिवकालीन, पेशवेकालीन, ब्रिटीशकालीन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची अनेक महत्त्वाची कागदपत्रे जतन करून ठेवली आहेत.

ब्रिटीशांनी भारतात इ.स.१६०० ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. सुरूवातीला व्यापाराच्या उद्देशाने आलेल्या ब्रिटीशांनी १७५७ च्या प्लासीच्या युद्धानंतर  येथे राजकीय दृष्ट्या आपले बस्तान बसवले आणि या देशाचा कारभार  १८१८ पर्यंत आपल्या हातात  घेतला. इतक्या मोठ्या कालावधीत देशाच्या कारभारासंबधीत जी कागदपत्रे निर्माण झाली ते जतन करण्यासाठी त्यांनी सुरूवातीला एक यंत्रणा उभी केली होती. ब्रिटीशांनी १८१८ ला मद्रासमध्ये, १८१९ ला कलकत्त्यामध्ये आणि मुंबईमध्ये १ सप्टेंबर १८२१ मध्ये पुराभिलेख विभागाची स्थापना केली होती. म्हणुनच हा विभाग सर्वात जुना विभाग म्हणता येईल. या विभागालाच आता पुराभिलेख संचलनालय असे नाव दिलेले आहे. स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही सर्व कागदपत्रे मुंबईमध्ये होती. नंतर याचा दुसरा भाग पुणे (Pune)येथे हलवण्यात आला. आज येथे शिवकालापासून पेशव्यांच्या कालखंडापर्यंतचे दस्तावेज आहेत.

पुणे (Pune) शहरातील या अभिलेखागारात एकुण ३९ हजार रूमालांमध्ये प्रत्येकी १८०० – २००० कागदपत्रे आहेत. कालानुरूप यात भर पडून त्यांची संख्या बदलत असते.  ही सगळी कागदपत्रे मोडी लिपीतील असून, त्यातील काही दस्तावेज हे इंग्रजी, गुजराथी, पर्शियन व कन्नड तर काही इतर भाषांमध्ये आहेत. याठिकाणी संस्थेतर्फे नियमित मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग, अभिलेख व्यवस्थापन कार्यशाळा आणि ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित केली जातात. अशी ही १२५ वर्षे पूर्ण केलेली इमारत पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा आहे.

ज्योती भालेराव.

Leave a Reply