Mahatma Gandhi Monuments (30 January 1948) – Rajghat, Delhi

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) समाधी (३० जानेवारी १९४८)  – राज घाट, दिल्ली

 ‘महात्मा गांधी’ (Mahatma Gandhi) हे नाव माहित नाही अशी व्यक्ती देशातच नाही तर संपूर्ण जगात सापडणे अवघड आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक आग्रणी नेते, जगाला अहिंसेचे महत्त्व आणि शिकवण देणारे असे ते आधुनिक संतच होते. अशा या महात्म्याची समाधी दिल्ली येथील राजघाटावर आहे.

ही अशी जागा आहे जिथे देशविदेशातील राजकीय नेते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक दर्शनासाठी येत असतात. देशाच्या स्वातंत्र्यदिवसासह, २ ऑक्टोबर या महात्मा गांधींच्या जयंतीला आणि ३० जानेवारी या त्यांच्या पुण्यतिथीला देशाच्या पंतप्रधानांसह राष्ट्रपती आणि इतर अनेक राजकीय नेते बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जातात. ही एक अलिखित परंपराच आहे. याशिवाय विदेशातून येणारे अनेक राजकीय, अराजकीय मोठ्या व्यक्ती आपल्या देशाच्या दौर्यावर आल्या तर त्यांना महात्मा गांधींच्या समाधीच्या दर्शनाला नेण्याचा प्रघात आहे.

महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) समाधीची काही वैशिष्ट्य –

ही समाधी काळ्या दगडात निर्माण करण्यात आलेली आहे. याच ठिकाणी बापूंचे अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत त्यामुळे याठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

३० जानेवारी १९४८ला गांधीजींची हत्या करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी त्यांचे अंतिम संस्कार करून हे स्मारक तयार करण्यात आले. या समाधीच्या शेजारी कायम एक मशाल प्रज्वलित करण्यात आलेली आहे.

यमुना नदीच्या (Yamuna River) किनारी राजघाट आहे. विस्तिर्ण भूप्रदेशावर राजघाट वसवलेला आहे. महात्मा गांधी समाधी आणि बाजूने मोठे उद्यान असे या स्थळाचे स्वरुप आहे.

याठिकाणी विदेशातील अनेक मोठ्या व्यक्तींनी वृक्षारोपण केलेले आहे. त्या प्रत्येक वृक्षावर त्यांचे नाव लिहिण्यात आलेले आहेत.  यात एलिझाबेथ (दुसर्या), अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रोनाल्ड रेगन, वियतनामचे नेते हो-चिन-मिन,ऑस्ट्रियाचे प्रधानमंत्री राफ टिडरमन अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

या स्मारकाच्या वास्तूशिल्पाचे आरेखन  बानू जी भाटू यांनी तयार केले आहे. या समाधीच्या रचनेत वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत.

Mahatma Gandhi Samadhi

या स्मारकाच्या बाजूने बाग फुलवलेली आहे. त्याच्या बाजूने सुंदर फिकट गुलाबी रंगाच्या दगडी भींतींवर महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) विचार कोरण्यात आलेले आहे. संपुर्ण समाधी परिसर फिरताना हे विचार वाचणे हे या स्मारकाचे मुख्य आकर्षण वाटते. मुख्य समाधी पर्यंत पोहोचण्याचा मार्ग अत्यंत सुरेख आखिवरेखीव बांधण्यात आलेला आहे.  या समाधीच्या सर्व बाजूने हिरवळ आणि  मधून दगडी फरशीच्या पायवाटा समाधीपर्यंत जाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. काळ्या संगमरवरी समाधी स्थळावर हे राम असे शब्द कोरलेले आहेत. महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) हत्या झाली तेव्हा त्यांचे अखेरचे शब्द हे राम हे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हेच शब्द त्यांच्या समाधीवर कोरलेले आहेत. मुख्य समाधीपाशी आल्यावर प्रत्येकजण नतमस्तक होतो.  

Mahatma Gandhi Samadhi Rajghat

दिल्लीमधील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे दररोज हजोरोंच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात.

गांधीजींच्या मृत्यूविषयी – (Mahatma Gandhi ‘s Death )

३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते. त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते. गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी – (Mahatma Gandhi Biography)

मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २इ.स. १८६९ – जानेवारी ३०इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. 

सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. इ.स. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. 

इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.

 गांधी आजीवन सांप्रदायीकतावादाचे (संप्रदायांवर राजकारण करणे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. 

इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. 

इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. 

ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची “अर्धनग्न फकीर” म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.

त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले. अशा या अहिंसेच्या मार्गावरून चालणार्या फकिराच्या आयुष्याची अखेर एका माथेफिरूने हिंसात्मक मार्गाने केली.

आजही  सर्वांचे बापू आणि राष्ट्रपिता असणारे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) त्यांच्या विचारातून, शिकवणूकीतून आणि या राजघाटावरील त्यांच्या स्माराकाच्या रूपाने जिवंतच आहेत.

Author ज्योती भालेराव.

6 thoughts on “Mahatma Gandhi Monuments (30 January 1948) – Rajghat, Delhi”

Leave a Reply