Why do we celebrate Gudi Padwa? The method and story of the celebration ! 13 April 2021

भारतासारख्या लोकशाही देशात अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक रहातात. त्या सर्वांचे विविध सण, प्रथा, परंपरा आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार  प्रत्येकजण हे सण, परंपरा पाळत असतात. त्यातील अनेक सण समारंभ साजरे करण्याचे स्वरुप कालानुरुप बदलले आहे, तर काहींचे पालन आजही परंपरेप्रमाणेच होताना दिसते. प्रत्येक धर्माचे सण साजरे करण्याच्या पाठीमागे विविध कथा, दंतकथा आणि काही विशेष कारणं आहेत. मात्र बऱ्याचदा आपल्या संस्कृतीत हे सण का साजरे होतात हे पूर्णपणे माहित करून घेतले जात नाही. सर्व जातीधर्मातील हे सण का साजरे होतात याची माहिती होण्यासाठीच मिसलेनियस भारतच्या माध्यमातून आपले ‘सण-समारंभ’ यातून एकत्रित देणार आहोत. 

आपण गुढीपाडवा (Gudi Padwa) का साजरा करतो? उत्सवाची पद्धत आणि कथा !

गुढीपाडवा (Gudi Padwa) हा एक भारतीय सण आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. शालिवाहन संवस्तराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्या प्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. यादिवशी महाराष्ट्रासह भारताच्या काही भागांमध्ये गुढी (प्रतिकात्मक काठी) उभारून हा सण साजरा केला जातो.

शुभ मुहूर्त – Shubha Muhurta

पण हे साडे तिन मुहूर्त कोणते आहेत. हे बऱ्याच वेळा माहित नसते. हिंदू पंचांगानुसार  दसरा, गुडीपाडवा (Gudi Padwa), अक्षयतृतीया हे तीन दिवस हिंदू धर्मामध्ये पुर्ण मुहूर्त म्हणून ओळखले जातात तर दिवाळीला येणारा पाडवा म्हणजे किर्तिक शुद्ध प्रतिपदेचा पाडवा हा अर्ध मुहूर्त समजला जातो. कोणतेही शुभकार्य करण्याकरिता या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते असे मानले जाते. 

महाराष्ट्रीयन लोकांसह कोंकणी, कानडी आणि तेलगू भाषिक लोक हा सण उत्साहाने साजरा करताना दिसतात. वसंत ऋतुचं आगमन या दिवसापासुन होतं. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासुन सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन व्यवसायाची सुरूवात केली जाते.  सोन्याची खरेदी, नव्या वास्तुत गृहप्रवेश, अश्या महत्वाच्या गोष्टींसाठी गुढीपाडवा या दिवसाची निवड करण्यात येते कारण हा एक उत्तम दिवस आहे.  

महाराष्ट्रात गुढीपाडवा (Gudi Padwa) म्हणून साजरा होणारा हा सण भारतातील इतर भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जाते. गौतमीपुत्राची सत्ता असलेले राज्य कर्नाटक व आंध्रप्रदेश मधे स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद साजरा करण्याकरता या दिवशी संवत्सर पाडवो व उगादी या निराळया नावांनी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात. 

गुढीपाडवा (Gudi Padwa) का साजरा करतात ? त्याच्या काही कथा.

प्रभु रामचंद्राचं अयोध्येत आगमन – हिंदु समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते.ही प्रथा का सुरू झाली असावी याची कथा सांगताना प्रभू श्रीरामांचा उल्लेख करण्यात येतो. 

चौदा वर्षांचा वनवास संपवुन रावणासारख्या बलाढय शत्रुचा आणि इतर राक्षसांचा पराभव करून रामाने अयोध्यानगरीत प्रवेश केला तो हाच दिवस होता. त्यांच्या आगमना प्रित्यर्थ अयोध्या वासियांनी आपापल्या दारात गुढया उभारून त्यांचे स्वागत केले होते. या गुढीपाडव्यापासुन राम जन्मोत्सवाला देखील सुरूवात होते आणि रामनवमीच्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते.

काठी पूजन –

काठीपूजन ही मानवी इतिहासात विविध समूदायात, विविध पद्धतीने करण्यात येत असल्याचे दिसून येते. त्याला एक विशेष पूजा परंपरा आहे. अगदी नॉर्वेजियातील चर्च, इस्त्रायलमधेही अशा काठीपूजनाच्या पद्धती प्रचलित असल्याचे दिसते. भारतीय उपखंडात बलुचिस्तानच्या हिंगलाज देवीस काठीसह यात्रेने जाण्याची प्रथा आहे. मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे. याशिवाय अनेक आदिवासी भागांमध्ये ही परंपरा आहे. महाराष्ट्रातील अनेक छोट्या गावांमध्ये काठी पूजनाच्या प्रथा दिसून येतात. गुढी पाडव्याला (Gudi Padwa) उभारण्यात येणारी गुढी हाही एक काठी पूजनाचीच एक प्रथा आहे.

अशी उभारतात गुढी –

शुभशकुनाच्या या गुढीत एक स्वच्छ काठी, त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र (साडी, किंवा रेशमी रूमाल,) लावण्यात येते. त्यावर टोकाला एक तांब्याचा, चांदीचा अथवा स्टीलचा तांब्या (गडवा)  पालथा लावण्यात येतो. त्या तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून त्याच्या बाजूनं साखरेची  गाठी, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ घालून ही गुढी सजवली जाते. पाटावर ही गुढी उभारून त्या गुढीच्या भोवती रांगोळी काढली जाते. दुपारी गोड धोडाचा नैवेद्य दाखविला जातो, पूजा करून, आरती केली जाते. संध्याकाळी सुर्यास्तापुर्वी हळदकुंकु अक्षता वाहुन गुढी उतरवली जाते. साधारण महाराष्ट्रात थोड्याफार फरकाने अशीच गुढी उभारण्यात येते. हिंदू बांधव एकमेकांना नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात.

आरोग्याच्या दृष्टीने गुढीपाडव्याचे महत्व – Heath Importance of Gudi Padwa

चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व आहे. या दिवशी मीठ, हिंग, ओवा, मिरी, गुळ आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून त्याची चटणी आथवा गोळी तयार केली जाते आणि तीचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे आरोग्य सुधारते त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे. कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान करणे चांगले मानले जाते. पुढील काळातील उन्हापासून होणार्‍या विकारांपासून संरक्षण व्हावे यासाठी हे उपाय महत्त्वाचे समजले जातात. 

पुराणातील कथा – Gudi Padwa Pauranik Katha

आपल्याकडे कुठल्याही सणांचे अनेक संदर्भ सापडतात. अनेक आख्यायिका, कथा सांगितल्या जातात. अशाच काही या कथा.  पुराणात लिहुन ठेवल्यानुसार एका शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्याकरता सहा हजार मातिचे पुतळे बनविले आणि त्यात प्राण फुंकले. यांच्या सहाय्याने शकांचा पराभव करण्यात आला. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू होण्याची परंपरा तेव्हांपासुनच सुरू झाली अशी कथा सांगण्यात येते.  

दुसरी कथा आहे देवी पार्वती आणि महादेवाच्या विवाहाची. त्यांचा विवाह  पाडव्याच्याच दिवशी ठरला असल्याची ही कथा आहे. पाडव्यापासुन (Gudi Padwa) लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आणि तृतियेला त्यांचा विवाह संपन्न झाला. म्हणूनच पाडव्याच्या दिवशी देवी पार्वतीची आदिशक्तीची पुजा करण्याची देखील प्रथा आहे. त्याला चैत्र नवरात्र देखील म्हणतात.

विवाहानंतर देवी पार्वती महिन्याभरा करिता माहेरी येते. तिचा कौतुक सोहळा म्हणुन हळदीकुंकु आयोजित केले जाते. देवी पार्वती अक्षयतृतियेला सासरी निघते…महाराष्ट्रातील घराघरात होणारे चैत्र गौरीचे पूजन आणि हळदिकूंकू हेच होय. त्याचा संदर्भ गुढीपाडव्याशी आहे. याशिवाय त्या त्या प्रांतानुसार अनेक दंताकथा प्रचिलित आहेत. 

गुढीपाडवाच्या (Gudi Padwa) अशा सांगोवांगी कथा कितीही सांगितल्या जात असल्या तरी खरं तर हा दिवस विजयाचे, सकारात्मकतेचे प्रतिक आहे हे निश्चित. बदलणाऱ्या ऋतुमानाची जाणीव करून देत आहारात काय बदल करावेत हे सांगणारा हा सुंदर सण. त्यातील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आशय समजून उमजून साजरा करायला हवा.  

Author

ज्योती भालेराव.

2 thoughts on “Why do we celebrate Gudi Padwa? The method and story of the celebration ! 13 April 2021”

 1. ज्योती बेटी, विलक्षण माहीती पूर्ण लेख. सर्वांग सुंदर.
  आपले सणवार, त्यामागील आध्यात्मिक, सामाजिक तथा पौराणिक तर्कशास्त्र काय आहे हे समझविण्या सोबत शुभमुहुर्तांची वर्गवारी, पाडव्याच्या काठी पूजना मागील संकल्पना , विधी, त्या दिवशी गोड नैवेद्या मध्ये मिश्रण केलेले इतर आर्युवेदिक पदार्थ, या सर्व गोष्टींचा धांडोळा घेऊन हा लेख परिपूर्ण केला आहे.
  खूप सुंदर.
  ॥ शुभम भवतु ॥
  ॥ श्री स्वामी समर्थ ॥
  टीप : यात नमूद केलेला स्टीलचा गडू टाळावा कारण आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या निषिद्ध आहे त्याजागी
  तांब्याचा अथवा पंचधातू किंवा पितळेचा गडू असा उल्लेख करावा.

  Reply

Leave a Reply