Want to know the stages of human history and culture? So visit the Deccan College’s Archaeology Museum.

मानवी इतिहास आणि संस्कृतीचे टप्पे जाणून घ्यायचे आहेत ? तर भेट द्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व (Archaeology) संग्रहालयाला.

पुणे शहरातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं शहराच्या मध्यवर्तीभागात आहेत. शहराची जान असणाऱ्या पेठांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक स्थळं, संग्रहालय आहेत, ज्यांना पुणे दर्शन करायला येणार्यांकडून वरचेवर भेट दिली जाते.

मात्र काही महत्वाची पर्यटन स्थळ आहेत जी सध्याच्या शहराच्या झालेल्या विस्तारामुळे शहराच्या बाजूला पडल्या सारखी वाटतात. अशीच एक महत्त्वाची वास्तू आहे डेक्कन महाविद्यालयाच्या आवारात. विद्यार्थी, पालक आणि आपल्या संस्कृतीविषयी ज्यांना उत्सुकता आहे अशा सर्वांसाठी ही जागा फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी असणारे पुरातत्व (Archaeology) विभागाचे पुरातत्व संग्रहालय आवर्जून भेट देण्यासारखे आहे.

मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या विविध प्रगत अवस्था व संक्रमणाचे टप्पे दर्शवणारे पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे हे पुरातत्त्व (Archaeology) संग्रहालय मानवी इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे.

या संग्रहालयामध्ये प्रागैतिहास,इतिहासपूर्व पाषाणयुग, ताम्रपाषाण युग, लोहयुग, ऐतिहासिक काळ, भारतीय कला, नाणकशास्र, पुराभिलेख, वांशिक पुरातत्व (Archaeology) अशा अनेक टप्प्यांमधील उत्त्खननात आढळलेल्या वस्तू व अवशेषांचा संग्रह आहे.

हे संग्रहालय उभारताना घेण्यात आलेली मेहनत वाखाणण्यासारखी आहे. पुरातत्वातच्या (Archaeology) टप्प्यानुसार आणि वस्तूंप्रमाणे येथील विभाग सजवण्यात आलेले आहेत. आपल्याला ज्या विभागाचे, वस्तूंचे सर्वात जास्त आकर्षण आहे त्यानुसार याची सैर करणे सोपे जाते.

भारतीय पुरातत्वात (Archaeology) ज्यांचे मोलाचे योगदान आहे, अशा प्राध्यापक ह.धी. सांकलिया यांचा स्वतंत्र कक्ष येथे आहे. यात त्यांच्या संशोधनाचे अहवाल, त्यांनी उत्खनन केलेल्या ठिकाणी मिळालेल्या वस्तू आदि गोष्टी पाहता येतात. येथील शिल्पकलेच्या दालनातील मूर्ती विशेष पाहण्यासारख्या आहेत.

उत्खननात सापडलेल्या वस्तू आणि मानवी शरिराचे सांगाडे काचेच्या बंद कपाटात अत्यंत काळजीपूर्वक ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येक वस्तू किंवा अवशेषांच्या कपाटांच्या शेजारी त्याविषयीच्या सविस्तर माहितीचे फलक लावण्यात आलेले आहे.

हा विभाग इ.स.१९३९ला सुरूवात करण्यात आला होता. येथे सुरू करण्यात आलेले हे पुरातत्व संग्रहालय (Archaeology Museum) आशियातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय आहे. याची उभारणी आणि देखभाल प्राध्यापक सांकलिया यांच्या देखरेखेखाली करण्यात आलेली आहे.  

मोठमोठ्या हॉलमध्ये ठेवलेल्या भव्य स्वरूपातील पुरातन, आदिमानव काळातील वस्तू पाहून मानववंशशास्राविषयीचे आपले कुतूहल नक्कीच जागे होते.

हसमुख धिरजलाल सांकलिया  (Hasmukh Dheerajlal Sankaliya )

हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म १० डिसेंबर इ.स. १९०८ला मुंबई येथे झाला. आणि त्यांचा मृत्यु २८ जानेवारी इ.स. १९८९, पुणे येथे झाला. हे भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे एक पुरातत्ववेत्ते होते. सांकलिया यांचा जन्म मुंबई येथे झाला. एका गुजराथचा पुरातत्वीय अभ्यास या विषयावर लंडन विद्यापिठाची आचार्य (पीएच.डी.) ही पदवी मिळवली.

हसमुख धीरजलाल सांकलिया यांनी भारतात ठिकठिकाणी उत्खनने घडवून आणली. पेहेलगाम,नाशिक,अहमदाबादजवळ लांघणज,जोर्वे,नेवासे, पुण्याजवळील इनामगाव, कोल्हापुरजवळ, ब्रह्नपूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनने केली. या उत्खननातून मानवी सांगाडे घरांचे नमुने,नाणी, हत्यारे,दागिने,धान्यांचे अवशेष असे अनेक प्रकार त्यांना मिळाले. त्यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांनी अनेक संस्कृती प्रकाशात आणल्या. ब्रह्मपूरचा रोमशी होते असलेला व्यापार सांकलिया दाखवून दिला. रावणाची लंका म्हणजे श्रीलंका देश नव्हे असे मतही त्यांनी मांडले. पुरातत्वशास्रातल्या मौलिक योगदानाबद्दल सांकलियांना भारत सरकारने इ.स. १९७४ ला पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते.

महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या  शनिवारी व  रविवारच्या सुट्ट्यांखेरीज हे संग्रहालय विनामूल्य खुले असते. या संग्रहालयामार्फत अनेक प्रदर्शने भरवली जातात. येरवड्यात बॉम्बेसाप्रस रस्त्याच्या जवळ डेक्कन कॉलेजचे हे पुरातत्व संग्रहालय (Archaeology Museum ) आहे.

अगदी रस्त्यालगत असणारे हे महाविद्यालय, त्याची वास्तू आणि हे संग्रहालय आपल्या ज्ञानात फार महत्त्वाची भर घालते. तेव्हा पुण्याच्या आळंदी, विश्रांतवाडी, येरवडा याठिकाणी जाणार असाल तर रस्त्याच्या लगत असणाऱ्या या वास्तूला भेट द्यायला विसरू नका.

पुरातत्वशास्राविषयीची माहिती –  पुरातत्वशास्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचे अध्ययन आहे. ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन व त्यांचे सखोल निरीक्षण करावे लागते. निरिक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात. त्यासाठी त्या जुनिया कालखंडातील हवामान,भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकुणच तत्कालिन पर्यावरण विचारात घेतात. यांत अनेक गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे हे शास्र विज्ञान व मानवशास्र अशा दोन्ही विभागात समजले जाऊ शकते. प्राचीन भारतीय इतिहासाचे पुरावे हे पुरातत्व अभ्यासाच्या आधारे मिळालेले आहेत ज्या प्रमाणे सिंधू संस्कृती हडप्पाकालीन स्थळे या सर्व घटकांचा अभ्यास पुरातत्व शास्राच्या माध्यमातून केला गेलेला आहे.

 पुरातत्वशास्र हे मानव जातीचा इतिहास शोधते. सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी अफ्रिकेत मानवाने प्रथम तयार केलेल्या दगडी हत्यारापासून ते नजिकच्या काही दशकांपर्यंतच्या काळाचा अभ्यास या विषयात येतो. त्याकाळचा आभास करण्यास इतिहासकारांना काहीच साधन लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. हा काळ मानवी इतिहासाच्या एकुण काळापैकी सुमारे ९९ टक्के आहे. म्हणजे प्रागैतिहासिक ते साक्षरतेचा प्रसार होईपर्यंतचा काळ पुरातत्वशास्राचा उद्देश मानवी उत्क्रांतीपासून ते सांस्कृतिक उत्क्रांतीपर्यंतचा इतिहास जाणून घेणे हा आहे. निरिक्षण, सर्वेक्षण, उत्खनन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्खननानंतरचे विश्लेषण या गोष्टींचा पुरातत्व शास्रात अंतर्भाव होतो.

डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातत्व विभागाच्या या संग्रहालयात मानवी इतिहासाचे अनेक पैलू उलगडलेले आपल्याला बघायला मिळतात. हा विषयच खुप उत्सुकता आणि अभ्यासाचा आहेय यावर अनेक चांगली पुस्तके आहेत. ती वाचून आपल्याला याविषयाची आणखी सखोल माहिती मिळण्यात मदत होते. या लेखाच्या खाली त्यातील काही पुस्तके दाखवण्यात आलेली आहे.

How to reach Deccan College’s Archaeology Museum.

Authorज्योती भालेराव.

Leave a Reply