Akshaya Tritiya (अक्षय्य तृतीया ) One of the three and a half auspicious moments-2021

अक्षय्य तृतीया (२०२१) – साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त 

अक्षय्य तृतीया हा सण मराठी महिन्यातील दुसऱ्या महिन्यात म्हणजे, वैशाख महिन्यात साजरा करण्यात येतो. अक्षय्य म्हणजे कायम, निरंतर रहाणारे. म्हणूनच यादिवशी तुम्ही ज्या कामाला सुरूवात करतात ते काम, ती गोष्ट निरंतर टिकते असे मानले जाते.  त्यामुळे आजच्या दिवशी नवीन कामांना सुरूवात करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. 

हिंदू दिनदर्शीके प्रमाणे तीन पूर्ण आणि एक अर्धा दिवस असे मीळून साडे तीन शुभ मूहूर्त मानले जातात. त्यातील दसरा, अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा हे पूर्ण तीन आणि दिवाळीतील पाडवा हा अर्धा दिवस शुभ मुहूर्त मानला जातो. यातील अक्षय्य तृतीया यादिवसाचे महत्त्व आपण पाहू. खरं तर आपल्या संस्कृतीत अनेक महत्त्वाचे दिवस, सण असे आहेत की त्याचे जसे धार्मिक, सांस्कृतीक महत्त्व आहे तसेच महत्त्व सामाजिक दृष्टीनेही सांगण्यात आलेले आहे.

सांस्कृतिक महत्त्व –

महाराष्ट्रातील स्रीया या चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना करून घरी हळदीकुंकवाचा समारंभ करून छोटासा कार्यक्रम करतात. अक्षय्यतृतीयेच्या दिवस हा  समारंभ करण्यासाठीचा शेवटचा दिवस समजला जातो. 

शेतीसंबंधी प्रथा – 

अक्षय्यतृतीयचा दिवस असाच शेतीविषयक कामांसाठीही खास आहे. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा केली जाते. गुढी पाडव्याच्या दिवशी जमिनी नांगरण्यास आपला बळीराजा सुरूवात करतो. त्या जमिनीची मशागत करण्याचे काम अक्षय्यतृतीयेला सुरू करण्यात येते. तर कोकणासारख्या भागात आजच्या दिवशी जमिनीत बियाणे पेरतात तर, देशावर पुढील काळात पेरणी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करण्यात आलेल्या पेरणीमुळे विपूल धान्य निर्मीती होते असे समजले जाते. यामागे खरं तर शेतीचे शास्त्र आहे. त्याचा पूर्वापार किती विचार करण्यात आलेला आहे हे समजते. 

कोकण परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने एकदा पावसाला सुरूवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील ओलसर मातीमधे आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य नसते त्यांमुळे अक्षय्यतृतीयेपासून बियाणांची पेरणी केली जाते तर देशावर जमिनीच्या मशागतीस सुरूवात करतात. याच दिवसापासून शुभमुहूर्तावर फळबागांसाठीचे वृक्षारोपण करण्यात येते. औषधी वनस्पती लावण्यात येतात. 

धार्मिक महत्त्व – 

हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे. अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोक दान करतात.  सोने-चांदी खरेदी केले जाते. मान्यता आहे की, या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, संपत्ती अक्षय्य रहाते असे समजले जाते.  या दिवशी भगवान विष्णूचे नर-नारायण, हयाग्रीव आणि परशुराम हे आवतार झाले होते. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी नारायण आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी त्रेतायुगला सुरुवात झाली. असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य शुभ परिणाम देते, म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया आणि आखा तीज या नावांनी ओळखला जातो.

भारताच्याविविध प्रांतात अक्षय्य तृतीया सणाचे स्वरूप –

  • उत्तर भारत  – या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो.गंगा नदीमध्ये स्नान करणे,तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.
  • ओरिसा –  या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.
  • दक्षिण भारत -ल  महाविष्णु आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते.मंदिरात दर्शनाला जाणे,अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.
  • पश्चिम भारत – या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.
  • राजस्थान –  राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात.. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.

भारत हा विविधतेत एक असणारा देश आहे हे खरोखर आपल्या प्रथेपरंपरांवरून दिसून येते. विविध राज्य, जात-धर्म येथे गुण्यागोविंदाने नांदतात. विविध राज्यांमधिल भाषा, वेशभूषा, प्रथा परंपरा वेगळ्या असल्यातरी येथील असे अनेक सण आहेत, ज्यांची नावे वेगळ्या राज्यात वेगळे आहेत, मात्र त्याचे महत्त्व मात्र सारखेच आहेत. अक्षय्य तृतीया हा सणही असाच नावं वेगळे मात्र त्याचे शुभ मुहुर्ताचे महत्त्व सर्वत्र सारखेच आहे. 

Author ज्योती भालेराव.

Leave a Reply