Medha Kulkarni : पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
पुणे : 25/06/2025
भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. पुणे रेल्वे स्थानकाला नाव बदलून बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची त्यांची मागणी होती. मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून बरीच टीका करणे सुरू आहे. त्यातच आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर बॅनरच्या माध्यमातून टीका केली आहे.
काय आहे पोस्टरवर ?
“कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर, बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा” अशा आशयांचे बॅनर शहरात विविध ठिकाणी झळकले आहेत. बाजीराव पेशवे यांचे वास्तव्य ज्या वाड्यात होते, त्या शनिवारवाड्याच्या बाहेरच हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टर आणि मेधा कुलकर्णी यांच्या मागणीची सध्या शहरात जोरात चर्चा सुरू आहे.
मेधा कुलकर्णी यांनी का केली मागणी ?
सोमवारी 23 जूनला पुणे आणि सोलापूर रेल्वे डिवीडनची बैठक बोलावण्यात आली होती. अनेक संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशनच नाव बदलून बाजीराव पेशवे करण्याची मागणी केली आहे, ‘मी फक्त त्या मागणीचा पुनरूच्चार केला’ असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. लोकांना पुण्याचा गौरवशाली इतिहास माहित व्हावा, हा आपला त्या मागणीमागे उद्देश आहे, असे खासदार मेधा कुलकुर्णी म्हणाल्या.