Pankaj Dheer Death : बी.आर, चोप्रा यांच्या गाजलेल्या महाभारत या मालिकेतील कर्ण हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता पंकज धीर यांचे निधन झाले आहे.
मुंबई : 15/10/2025
एकेकाळी अतिशय गाजलेल्या बी.आर.चोप्रा यांच्या धार्मिक टिव्ही सिरीयल ‘महाभारत’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. कर्ण हे पात्र साकारणाऱ्या पंकज धीर यांचे (Pankaj Dheer Death) निधन झाले आहे. बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट सृष्टी आणि टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. पंकड धीर यांनी कर्ण या पात्राला अशा पद्धतीने साकारले की, आजही त्यांची ही भूमिका लोकांच्या स्मरणात आहे. कर्णाची त्यांनी साकारलेली भूमीका आजही घराघरात लक्षात आहे.
पंकज धीर यांनी कर्णाची ही भूमीका इतकी जीवंत केली होती, की खऱ्या आयुष्यातही त्यांना लोकं कर्ण याच नावाने ओळखत असत. त्यांचे मित्र आणि महाभारतात अर्जूनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता फिरोज खान यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त केला आहे. फिरोज खान म्हणाले की मी एक सच्चा मित्र गमावला आहे.
पंकज धीर यांना सुरूवातीला महाभारतातील अर्जूनाची भूमिका ऑफर झाली होती. मात्र त्यांनी त्यांच्या मिशांमुळे ही भूमिका नाकारली. त्यानंतर त्यांना कर्ण हे पात्र साकारण्याची संधी मिळाली. या एका रोल ने त्यांचे आयुष्य एका रात्रीतून बदलले.
टिव्ही आणि चित्रपटांतून विविध भूमिका (Pankaj Dheer Death)
महाभारत या लोकप्रिय सिरियलनंतर पंकज धीर यांनी अनेक टिव्ही सिरीयल आणि चित्रपटांतून भूमिका साकारल्या. त्यांनी चंद्रकांता या लोकप्रिय सिरियल मध्ये शिवदत्त ही भूमिका साकारली होती. अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटातून त्यांनी सहाय्यक भूमिका केल्या असल्या, तरी कर्ण या भूमिकेची छाप ते कधीही पूसू शकले नाहीत.
पंकज धीर यांचा मुलगा हाही एक अभिनेता आहे. निकितन धीर हे बॉलिवूडच्या चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहेत. पंकज धीर यांच्या निधनामुळे एका टिव्ही इंडस्ट्रीतल्या एका पर्वाचा अंत झाल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर त्यांना लोकं आदरांजली वहात आहेत.