Mumbai Water News : मुंबईत 15 मेपासून पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात लागू होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही आठवड्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.
मुंबई : 29-04-2026
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांवर पाणीटंचाईचे (Mumbai Water News) संकट ओढवणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने येत्या 15 मे पासून संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण आणि बाष्पीभवन होत असल्याने सद्यस्थितीत या धरणांमध्ये केवळ 27 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास शहराला पाणीटंचाई भासू नये, यासाठी खबरदारी म्हणून पाण्याचे नियोजन कऱण्यास सुरूवात केली आहे.
Table of Contents
मुंबई महापालिका प्रशासनाचे आवाहन (Mumbai Water News)
पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठी पुरवून वापरणे आवश्यक आहे.
त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
15 मे पासून ही कपात होणार असल्याने इमारतींमधील टाक्या भरताना किंवा दैनंदिन वापरावेळी मुंबईकरांना नियोजित कपातीचा सामना करावा लागणार आहे, असे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.
- 3,850 – दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज सात धरणातून
- 237 – दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची गरज
- 27 % – सध्याचा पाणी साठा
राज्य सरकारकडे मदतीची धाव (Mumbai Water News)
मुंबईची तहान भागवण्यासाठी पालिकेने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि वैतरणा चरणांतील राखीव साठ्यातून 237 दशलक्ष लिटर पाणी मिळावे, अशी विनंती केली आहे. या संदर्भात पालिकेने सरकारला अधिकृत पत्र पाठवले असून, हा राखीव साठा उपलब्ध झाल्यास मुंबईकरांना पाणीकपातीपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
तलावांमध्ये केवळ 28 टक्के पाणी, साठी जुलैपर्यंत पुरेल (Mumbai Water News)
मुंबईला पाणीपुरवठा कऱणाऱ्या सात तलावांमध्ये भटसा,तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा, तुळसी आणि विहार – एकत्रितपणे 28.35 टक्के पाणीपुरवठा आहे. हे प्रमाण 6 जुलैपर्यंत पुरेसे आहे. भिडे यांनी स्पष्ट केले की, वाढलेले बाष्पीभवन आणि उष्णतेमुळे पाण्याची वाढती मागणी यामुळे परिस्थिती बिकट होत आहे. बीएमसी दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करते. तर मागणी 4,300 दशलक्ष लिटर आहे.
एल निनोमुळे मान्सूनला धोका (Mumbai Water News)
भारतीय हवामान विभागाने (IMD) एल निनो हवामान चक्रामुळे यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा कमी राहील असा अंदाज वर्तवला आहे. या चक्रामुले पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान असामान्यपणे वाढते, ज्याचा परिणाम भारतातील पावसावर होतो. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पाणी वाचवण्यासाठी बीएमसीने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनपूर्व आढावा बैठकीनंतर अश्विनी भिडे म्हणाल्या की, पाणी कपात न केल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाण्याची पातळी संपू शकते.