X

Translate :

Sponsored

World Braille Day : 4 January 2019

जागतिक ब्रेल दिवस :  ४ जानेवारी २०१९

जगभरातील अंध व्यक्तींच्या सक्षमीकरणार्थ ज्यांनी ब्रेल लीपीचा शोध लावला अशा लुईल ब्रेल यांची आठवण म्हणून जागतिक ब्रेल दिवस  (World Braille Day) साजरा केला जातो. दरवर्षी चार जानेवारीला हा दिवस संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा करतात. आज या दिवसा संबधीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

जागतिक ब्रेल (Braille) दिवस सुरूवात कशी आणि कधी झाली ?

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ६ नोव्हेंबर २०१८ च्या एका बैठकीत एक प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्यात प्रत्येक वर्षीच्या ४ जानेवारीला ब्रेल लीपीचा शोध लावणाऱ्या लुईस ब्रेल यांचा जन्मदिवस ब्रेल दिवस (World Braille Day)  म्हणून साजरा करण्यात यावा. या प्रस्तावाला मान्यता मिळून त्याच्या पुढच्या वर्षापासून म्हणजे ४ जानेवारी २०१९ पासून जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.

ब्रेल लीपीचा शोध लावणाऱ्या लुईस ब्रेल यांच्याविषयी ;

लुई ब्रेल (Braille) यांचा जन्म फ्रांस मधील एका छोट्या गावात ४ जानेवारी १८०९ ला झाला. त्यांचा मृत्यू ६ जानेवारी १८५२ मध्ये झाला. म्हणजे उणापुऱ्या ४३ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जगातील प्रत्येक अंध व्यक्तींसाठी इतके महान कार्य करून ठेवले.

जन्मतः लुई अंध नव्हता. आयुष्यात त्याला अंधत्व आले ते अपघाताने, मात्र त्याने या दुर्दैवाचा उपयोग इतर अंध व्यक्तींसाठी केला हे फार महान आहे.

लुईचे वडील  साइमन रेले ब्रेल हे शाही घोड्यांसाठी घोगीर आणि काठ्या तयार करण्याचे काम करत असत. छोटा लुई त्यांना मदत करायला त्यांच्या कारखान्यात जात असे. एकदा त्याचे वडील कोणाशीतरी बोलत बाहेर गेले असताना, लुईने वडीलांच्या हत्यारांना खेळताना हात लावला. अपघाताने एक सुरी त्याच्या डोळ्याला लागली. पुढे त्याच्यावर बरेच उपचार करण्यात आले. मात्र वर्षभरात त्याच्या दोन्ही डोळ्यांना संसर्ग होऊन, त्याला कायमचे अंधत्व आले.

पुढे जाऊन फ्रांसमधील चर्चचे फादर बैलन्टाईन यांच्या मार्फत लुईचे शिक्षण येथील रॉयल इन्स्टिट्युट फॉर ब्लाइन्डस येथे झाले. याच दरम्यान लुईला समजले की शाही सेनेमध्ये रात्रीच्या अंधारात काम करताना सैनिकांसाठी विशिष्ट सांकेतिक लिपीचा वापर केला जातो. याचा शोधकर्ता होता ‘कॅप्टन चार्लस बार्बर’. लुईने यांची भेट घेऊन या सांकेतिक लिपीत काही सुधारणा सुचवल्या आणि तो अशाच प्रकारच्या लिपीचा वापर अंध बांधवांसाठी करण्याचा विचार करू लागला.

 पुढे सलग आठ वर्षे अथक परिश्रम करून एक लिपी तयार केली. शेवटी १८२९ ला त्याने सहा बिंदूंच्या वापरातून एक लिपी तयार केली ज्याला आज आपण ब्रेल लीपी म्हणून ओळखतो. खरं तर लुईच्या जीवंतपणी त्याला या लिपीचा शोधकर्ता म्हणून मान सन्मान मिळाला नाही. त्याच्या या शोधाची तेव्हा खिल्लीच उडवली गेली होती. मात्र त्याच्या मृत्युपश्चात अंध व्यक्तींमध्ये या लिपीला फार लोकप्रियता मिळायला लागली.

शिक्षण क्षेत्रात या लिपीचे महत्त्व जाणून त्यासंबंधीचे उपयोग करणे सुरू झाले. जिवंतपणी त्याच्या देशात त्याची बरीच अवहेलना केली गेली होती. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर एकशे एक वर्षाने देशाला त्यांच्याविषयी केल्या गेलेल्या चुकीची जाणीव झाली. आणि त्यांच्या पार्थिव शरीर जिथे दफन केले होते, ते सन्मानपूर्वक बाहेर काढून त्यांना राष्ट्रिय सन्मान प्रदान करून मानवंदना देण्यात आली होती.

अशा प्रकारे त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या जन्मभूमीनेच नाही तर अवघ्या जगाने त्यांच्या सन्मानार्थ ब्रेल दिवस साजरा करून त्यांना आदरांजली वाहीली आहे. भारत सरकारने ४ जानेवारी २००९ म्हणजे त्यांच्या द्वीशताब्दीच्या वर्षी लुई ब्रेल (Braille) यांच्या सन्मानार्थ डाक तिकिट (पोस्टाचे तिकिट ) काढले.      असे हे लुई ब्रेल, ज्यांनी इतक्या लहान वयात अपघाताने आलेल्या अंधत्वाचा अशारितीने इतरांना उपयोग करून दिला. त्यांच्या या कार्यासाठी फक्त अंध व्यक्तींनींच नाही तर अखिल मानवजातीने त्यांचे आभार मानले पाहिजे.

ब्रेल (Braille) लिपी कशी असते ?

ब्रेल (Braille) लिपी म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असणारी भाषा आहे. सहा थोडे फुगवटे असणारे गोल (डॉट) यासाठी वापरले जातात. या गोलांना स्पर्श करून त्यांच्यापासून तयार केलेल्या आकारावरून ही लिपी वाचली जाते. एका आयताकार कागदावर १२ गोलांना दोन ओळींमध्ये सहा सहा असे वापरून ही लिपी बनवली जाते.

    या पद्धतीने ६४ अक्षरं बनवली जातात. आज जगभरात याच लिपिचा वापर करून अंध व्यक्ती सर्वप्रकारचे वाचन करू शकतात. कथा, कादंबऱ्या, शैक्षणिक पुस्तकं, गणित, संगीत, विज्ञान , व्यावहारिक कामे अशा सर्व वाचनाचा यात समावेश आहे. या लिपीमुळे अंध व्यक्तींना कार्यालयीन कामे,हॉटेल, विद्यापीठं, सरकारी सुविधा सोपे होते.  

जगातील समस्त अंधांचे कल्याण करणारे लुईस ब्रेल आणि त्यांची ही लिपी यांना अभिवादन करण्याचा हा दिवस जगभरात साजरा होत आहे.

ज्योती भालेराव.

This post was last modified on January 3, 2025 7:58 pm

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored