X

Translate :

Sponsored

Village of Books “Bhilar” – Established – 1st May 2017

पुस्तकांचे भिलार गाव – स्थापना – १ मे २०१७ (Village of Books)

‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने’, या उक्तीचा पुरेपुर अनुभव आपल्याला येतो, तो महाराष्ट्रातील एका छोट्या पण सुंदर अशा भिलार या गावाला भेट दिल्यावर. निसर्गरम्य अशा स्ट्रॉबेरीच्या गावात आपण प्रवेश करताच आपल्याला उत्सुकता लागलेली असते की,काय असेल ‘पुस्तकाचं गाव’ ही संकल्पना?

भिलार (Village of Books) हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. ह्या गावात महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे जगातील दुसरे असे गाव आहे ज्याला पुस्तकांचे गाव अशी ओळख मिळालेली आहे. ब्रिटन मधील ‘हे ओन वे’ गाव हे पहिले गाव आहे जे पुस्तकांच्या संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. मात्र भिलार (Village of Books) हे गाव आशियाखंडातील पहिलेच पुस्तकांचे असे गाव आहे. 

लहान रस्ते आणि आजुबाजूचे शेतं पार करत आपण या गावात पोहोचतो. गावातील मुख्य चौकात ग्रामपंचायतीची इमारत लागते. तिच्या भिंतींवरच या गावाची पुस्तकांचे ओळख करून देण्यात आलेली आहे.त्यानंतर येथील प्रत्येक घरातील पुस्तकांना भेट देण्यासाठी आपण चालू लागतो. याठिकाणी  प्रत्येक रस्त्यावर, गल्ली बोळामधे जाताना पुस्तकांच्या प्रकारानुसार नावांच्या, बाण दाखवलेले मार्गदर्शक फलक दिसतात. आपल्याला वाटेल त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकतो.

भौगोलिक स्थान आणि लोकसंख्या –

भिलार (Village of Books) हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील ४३२ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. छोटे आणि टुमदार असे हे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६०२ कुटुंबे व एकुण २८०७ इतकी लोकसंख्या आहे. येथून जवळच पाचगणी हे लहान शहर ८ किलोमीटर अंतरावर आहे. 

एक अभिनव संकल्पना –

पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर असलेल्या भिलार गावात  एक अभिनव संकल्पना पुस्तकप्रेमींसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही पुस्तकाच्या गावाची (Village of Books) संकल्पना तशी साधी आहे पण अनोखी आहे.. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा.. ते देखील अगदी मोफत. थोडी थोडकी नव्हे तर जवळ जवळ १२००० ते १५००० पुस्तके या गावात आहेत.  या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या २२ ठिकाणी केली आहे. यातील काही ठिकाणी तुम्ही निवास करू शकता, चहा – कॉफीचे घुटके मारत पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता. मात्र पुस्तकांसाठी जरी तुम्हाला शुल्क आकारले जात नसले तरी, बाकी खाद्यपदार्थांची सोय, निवासाची सोय मात्र मोफत नाही, त्यासाठी तुम्हाला शुल्क मोजावे लागते.

ज्या परदेशातील गावावरून ही संकल्पना घेतली त्याविषयी – हे-ऑन-वे ( Hay on Wye)

हे-ऑन-वे हे यूनाइटेड किंगडममधील एक छोटेसे गाव आहे. ग्रंथसंपदेसाठी हे गाव खुप प्रसिद्ध आहे. या गावात दोन डझनपेक्षा जास्त पुस्तक विक्रीची दुकाने आहेत. याशिवाय अनेक पुस्तक विक्रेते विशेतज्ञ आहेत. रिचर्ड बूथने तिथे 1962 मध्ये ओल्ड फायर स्टेशन नावाचे पहिले दुकान उघडले. त्यानंतर ते जगातील पहिले पुस्तकांचे गाव (Village of Books) म्हणून प्रसिद्ध झाले.

असे साकारले भिलार पुस्तकांचे गाव – Village of Books

महाराष्ट्र राज्याचे माजी मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री मा. श्री. विनोद तावडे यांनी दि. २७ फेब्रुवारी, २०१५ रोजी एका समारंभात बोलताना इंग्लंडमधील ‘हे ऑन वे’ या पुस्तकाच्या गावाचा संदर्भ देऊन, महाराष्ट्रातही असे ‘पुस्तकांचं गाव’ (Village of Books) नक्की आकाराला येऊ शकेल, असा विचार मांडला होता. या नव्या, अनोख्या, कल्पक व उत्साहवर्धक विचाराचे प्रसारमाध्यमे, साहित्यिक आणि सामान्य जनतेनेही स्वागत केले. याबाबत अनेक लेख व बातम्या छापल्या गेल्या. विविध समारंभ-संमेलनांतून विचार मांडले गेले. प्रकाशक, साहित्यिक व विचारवंतांशी याबद्दल चर्चा केली. अन या साऱ्यातूनच १ मे २०१७ रोजी भिलार पुस्तकांचे गाव म्हणून नावारुपाला आले.

येथे असणाऱ्या पुस्तकांची वर्गवारी – कथा, कादंबरी, कविता, ललित, बालसाहित्य, संतसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारातील सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त पुस्तके या ठिकाणी त्यांच्या विषयावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

भिलारची लोकसंख्या तीन-साडेतीन हजार आहे. साधारण साडेपाचशे उंबऱ्यांचं हे गाव. सुरूवातीला सात घरं, सहा लॉज, तीन मंदिरं, दोन शाळा अन् एक खासगी कार्यालय या प्रकल्पात सामील झाले आहेत. आज या पुस्तकाच्या गावामध्ये (Village of Books) २५ घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास याचे प्रत्येक घरात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालन उभी केली आहेत.

निवडलेल्या २५ घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड;मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते.

या गावातील वैशिष्ट्य –

  • २५ घरात १५ हजार पुस्तकांचा खजिना.
  • पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध.
  • चित्रांच्या संगतीनुसार पुस्तकांची मांडणी.
  • गावात कथाकथन अन् कविता वाचनाचे आयोजन.
  • पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक.
  • अंधांसाठी इ-बुकची उपलब्धता.
  • पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे.

महाबळेश्वर, पाचगणीला जेव्हा कधी फिरण्यासाठी जाल तेव्हा यादोन्ही शहरांच्या मधे असणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गावाला नक्की भेट द्या. पुस्तकांचं वेड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी या गावाची भेट म्हणजे एक मस्त मेजवानी ठरू शकते. विषयानुसार वर्गवारी करून ठेवण्यात आलेली पुस्तके हे येथील खास वैशिष्ट्य म्हणता येईल. तेव्हा आशिया खंडातील एकमेव पुस्तकांच्या भिलार या गावाला जरूर भेट द्या.

ज्योती भालेराव.

This post was last modified on April 23, 2021 5:07 pm

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored