Vaishanavi Case : पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या घटनेनंतर लग्नात होणाऱ्या अतिरिक्त खर्चावर चर्चा सुरू आहे. यातूनच आता पुणे आणि इतर ठिकाणच्या ग्रामस्थांनी काही विधायक निर्णय घेतेले आहेत. ग्रामसभेत हुंडाबंदी, प्री-वेडींग शूटिंग बंदी, कमी खर्चात लग्न असे काही ठराव करण्यात आले आहेत.
पुणे : 2025-06-02
वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagwane Case )ही तरूणी हुंडाबळीची शिकार ठरली. समाजात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. आजही एका मुलीचा हुंडा, लग्नातील मानपान, अतिरिक्त हौसेमौजेच्या मागणीने जीव घेतला जातो, हे दुर्दैवी आहे. हुंडा पद्धतीने कोणाचा जीव जात असेल तर हे सुन्न करणारे आहे. हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी पुण्यातील काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
प्रिवेडींग करू नका, मानपान, सत्कार हे काही न करता साधेपणाने लग्न करण्यात यावेत. एकवेळ पत्रिका पाहू नका, मात्र आरोग्य तपासणी करा. असे काही चांगले निर्णय पुण्यातील धायरी येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या प्रकरणानंतर हुंडाबंदीसह लग्नातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील धायरी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. धायरी येथे ग्रामस्थांनी ग्रामसभा आयोजीत केली होती. यावेळी मराठा, बहुजनांसह अठरापगड जातीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत सहभाग घेतला होता. सर्वांनी हुंडा न देणे आणि हुंडा न घेण्याचा ठराव मंजूर केला.
ग्रामस्थांनी घेतलेले निर्णय
- हुंड्यावरून छळ होऊ द्यायचा नाही आणि सहन करायचा नाही.
- हुंड्यावरून मुलीचा छळ होत असल्यास, तिला परत सासरी पाठवायचे नाही.
- साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी करून खर्च वाचवायचा,
- कमी खर्चात आणि कमी लोकांमध्ये लग्न करावीत.
- लग्न वेळतेच लागवीत.
- जेवणामध्ये मोजकेच पदार्थ करावेत.
- मिरवणुका , गर्दी टाळावी.
- प्रि व्हिडीयो शूटींग आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जाणारा वेळ वाचवावा.
असे आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा सन्मान करण्यात यावा. या ठरावांचे फलक गावात लावण्यात यावेत. असा ठराव गावऱ्यांनी मिळून पास केला आहे.