श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवारपेठ, पुणे (Shree Trishund Ganapati Temple Pune)

पुण्यात अनेक पेशवेकालीन  एतिहासिक वास्तूंचे उत्तम नमुने आजही चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र शनिवारवाडा, पर्वती, आगाखान पॅलेस अशा मोजक्याच वारसास्थळांची लोकांना माहिती असते. जरा आवडीने भटकंती केली की प्रत्येक शहरात फार प्रसिद्ध नसणाऱ्या मात्र तरीही अलौकिक अशा अनेक वास्तू, मंदिरे सापडतात. शासन आणि स्थानिक नागरिक यांच्या उदासिनतेमुळे अशी वारसास्थळं खरं तर प्रसिद्धीस येत नाहीत. हे त्या वास्तूंचे दुर्दैवच. असेच एक वास्तूशैलीचा उत्तम नमुना असलेले मात्र तरीही अपरिचित असणारे असे एक मंदिर म्हणजे ‘श्री त्रिशुंड गणेश मंदिर’ होय. शहराच्या मध्यवस्तीमध्ये सोमवार पेठेत असलेले हे मंदिर वेरूळच्या लेण्यांसारखे भासते. फार पुर्वी या ठिकाणच्या आसपास असणाऱ्या स्मशानामुळे हे मंदिर लोकांपासून अलिप्त राहिले असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे.

Ganpati Temple Pune
त्रिशुंड गणपती मंदिर, मुख्य प्रवेशद्वार

१७५४ ते १७७० यादरम्यान या मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या चौकटीवर तीन शिलालेख (shilalekh) आढळतात. संस्कृत आणि फारसी भाषांमधील मजकुर या शिलालेखांवर लिहिलेला आहे. आजही त्याची अवस्था  चांगली असल्याचे दिसून येते.पहिल्या संस्कृत शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काळ तर दुसऱ्या शिलालेखात गीतेतील आरंभीचा व नमनाचा श्लोक कोरलेला आहे. फार्सी शिलालेखात हे स्थान गुरूदेव दत्तांचे असल्याचा उल्लेख आढळतो. राजस्थानी, माळवा व दाक्षिणात्य अशा तीनही वास्तुशैलीचा वापर बांधकामात केलेला आहे.

Ganpati Temple Pune
संस्कृत आणि फारसी भाषेतील शिलालेख

संपुर्ण दगडी बांधकामाचे हे मंदिर, पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर पुर्वाभिमुख उभे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या चौकटीवर धारदार कमान असून वरच्या बाजूला शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. यक्ष,किन्नर,लक्ष्मी मंत्र, मोर,पोपट,भैरव,मंगलकलश,दशावतार,गजान्तलक्ष्मी अशी अनेक मांगल्याची चिन्हे प्रवेशद्वाराच्या भींतीवर कोरलेली आहेत. आजुबाजुला टिपीकल पुण्यातील पेठांमधील काही जुनी नवी घरे, इमारती आणि मधे हे मंदिर हे वातावरणच आगळेवेगळे वाटते.

Ganpati Temple Pune
मुख्य मूर्तीच्यी पाठीमागील बाजूचे शेषशायी विष्णूचे शिल्प

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेची मूर्ती कोरलेली असून त्या खाली गणेशचक्र (Ganeshchakra) आहे. प्रदक्षिणेच्या वाटेवर दक्षिणेकडील भिंतीत नटराजाची कोरीव मूर्ती आहे, तर उत्तरेकडील बाजूला विष्णू आणि काळभैरवाच्या सुरेख मूर्ती आहेत. दक्षिणेकडील भिंतीत दुर्मीळ असे शिवलिंग आहे. या शिवप्रतिमेत फक्त शाळुंका असून त्यावर वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह,व शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशी प्रतिमा आहे.

गर्भगृहातील गणेश मूर्ती नेहमीपेक्षा वेगळ्या स्वरूपातील आहे. एक मुख, तीन सोंडा,सहा हात असलेली काळ्या पाषाणातील मूर्ती मोरावर आरूढ आहे. उजवी सोंड मोदक पात्रास स्पर्श करत असून, मधली सोंड उंदरावर आहे तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेच्या हनुवटीला स्पर्श करणारी आहे. मूर्तीच्या मागिल बाजूच्या भींतीवर शेषशायी विष्णूची प्रतिमा कोरलेली असून, गणेशयंत्र कोरलेले आहे. खरे तर मंदिराच्या एकुण रचनेवरून असा अंदाज येतो की,  सुरूवातीला शिवमंदिराच्या स्वरूपात स्थापन झालेल्या या मंदिरात कालांतराने शाक्तपंथियांनी श्रीगणेशाची स्थापना केलेली असावी. मात्र मूर्तीच्या प्रतिष्ठापणेचा निश्चित काळ आणि संदर्भ सापडत नाहित.

Trishund Ganpati Temple Pune
तीन सोंड, सहा हातांची गणेशमूर्ती

हे मंदिर जितके जमिनीच्या वर व्यापलेले आहे, तितक्याच आकारात ते जमिनीच्या खाली म्हणजे तळघरात आहे. तिथे जिवंत पाण्याचा झरा असल्यामुळे येथे पाणी भरलेले असते. दरवर्षी गुरूपौर्णिमेस हे तळघर भाविकांसाठी उघडण्यात येते. याठिकाणी गोसावी सत्पुरूषांची समाधी आहे. मंदिराची रचना अशी करण्यात आलेली आहे की, मुख्य मंदिरातील गणेश मूर्तीला करण्यात येणारा अभिषेक तळघरातील समाधीलाही होतो.

Ganpati Temple Pune
मंदिराच्या तळघराकडे जाण्याचा मार्ग

या मंदिराची आणखी एक खासियत अशी की, या ठिकाणी तत्कालिन राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे शिल्प कोरण्यात आलेले आहे. ब्रिटीशांनी १७५७ मध्ये बंगाल आणि आसामवर सत्ता प्रस्थापित केली होती. त्याचे प्रतिकात्मक रूप साकारलेले आहे. एक इंग्रज शिपाई बंगाल व आसामचे प्रतिक असणार्या गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहे. याशिवाय याठिकाणी एक शिंगी गेंड्याचे शिल्य कोरलेले आहे. अशा अनेक आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यासह हे मंदिर आजही दिमाखात उभे आहे. शिल्पशैली आणि कोरीव कामाच्या दृष्टीने हे मंदिर पुण्यातील महत्त्वाचे वारसास्थळ आहे. शासन आणि नागरिक दोघांच्या सहभागातून या मंदिराला पर्यटनाच्या अनुषंगाने प्रसिद्धीस आणायला हवे. सध्याच्या गजबजलेल्या शहराच्या मध्यवस्तीमधे इतके सुंदर, शांत, प्रसन्न मंदिर आहे याचा अनुभव फार आनंद देऊन जातो.   

ज्योती भालेराव.

1 thought on “श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवारपेठ, पुणे (Shree Trishund Ganapati Temple Pune)”

Leave a Reply

%d bloggers like this: