महाराष्ट्र : 2025-05-02
उन्हाळा (Summer Health Tips ) हा ऋतू सर्वांसाठी खास असतो. कारण घरातील बच्चेकंपनीला या दिवसात शाळांना सुट्ट्यांना असतात. सुट्ट्यांमध्ये भरपूर फिरणं, खाणं आणि दंगामस्ती करणं होतं. मात्र या दिवसात तब्येतीच्या तक्रारीही फार सुरू होतात. उन्हामुळे खाण्या पिण्यांच्या सवयीत बदल करावा लागतो तरच तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात मजामस्ती करू शकतात.
उन्हाळ्याच्या दिवसात काही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य प्रमाणात पाणी प्या , सकस आहार आणि पुरेशी झोप घ्या, आणि उन्हापासून संरक्षण मिळेल अशा सर्व गोष्टींचा वापर करा.
उन्हाळ्यात आहारात काय बदल करावा ?
उन्हाळ्यात भरपूर उन्हं तापल्यामुळे आहारात फळांचा आणि पातळ पदार्थांचा समावेश करावा.
सकाळी लवकर पोटभर न्याहारी करून, दुपारचे जेवण हलके असावे.
आहारात ताक, घरगुती सरबतं, कोकम सरबत, पन्हे, सोलकढी, नारळ पाणी अशा पदार्थांचा समावेश करा.
घरचे ताजे अन्न खा. तेलकट, तिखट अन्न टाळा. सकस सात्विक अन्न घ्या.
उन्हाळ्यात आईस्क्रिम हे सर्वात आवश्यक ठरते. मात्र त्याचा अतिरेक टाळा.
फ्रिज एवजी मातीच्या माठातील पाणी प्यावे. त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाळा, मोगऱ्याची फुले टाकून घरगुती सुवासिक पाणी तयार करू शकता.
बाहेर पडताना काय काळजी घ्याल ?
भरदुपारी उन्हात बाहेर पडताना डोक्याला स्कार्फ, टोपी याने डोके, चेहरा झाका.
योग्य सनस्क्रिन क्रिमची निवड करून, बाहेर पडण्याआधी अर्धातासतरी ते चेहरा, मान यांना लावा. तुम्ही जर बराच वेळ बाहेर रहाणार असाल तर दिवसभरात सनस्क्रिन क्रिमचा वापर परत करा.
डोळ्यांसाठी गॉगल आवश्य वापरा. त्याने उन्हामुळे डोळ्यांची होणारी जळजळ होणार नाही.
भरपूर पाणी प्या. बाहेर सारखे काही खाण्यापेक्षा फळांचा रस, ताक अशा पदार्थांना प्राधान्य द्या.
शक्यतो दुपारी 11 ते 4 यावेळी गरज नसेल तर बाहेर पडू नका.
लहान मुलांची विशेष काळजी घ्या.
उन्हातून बाहरून घरी आल्यावर गुळ-पाणी, धने जिऱ्याचे गुळ घालून पाणी आवश्य प्या.
व्यायाम
उन्हाळ्यात व्यायाम करावा का ? किती करावा याविषयी बऱ्याचदा संभ्रम दिसतात. मात्र सकाळी उन्हं सुरू होण्याआधी शक्यतो बाहेरील व्यायाम प्रकार करावेत. जास्त व्यायाम करणे टाळावे, हलके फुलके व्यायाम प्रकार करण्यास प्राधान्य द्यावे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जॉगिंग सारखे पर्याय आहेत किंवा घरात, गच्चीवर योगासनं, प्राणायम हेही उत्तम पर्याय आहेत. व्यायाम करताना योग्य पाणी पिणेही आवश्यक आहे.
खाणं, व्यायाम आणि उन्हापासून संरक्षण या काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा उन्हाळा नक्कीच सुसह्य आणि आनंदी जाईल.