शिवनेरी किल्ला म्हटल की छत्रपती शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु या शिवनेरी किल्ल्याचा संपुर्ण इतिहाससुद्धा तितकाच रंजक आहे. शिवनेरी किल्ला कोणी बांधला, त्यानंतरची त्याची राजकीय स्थित्यंतरे ते शिवरायांच्या (Shivaji Maharaj) जन्मस्थानापर्यंतचा आणि त्यानंतरचा या किल्ल्याचा ऐतिहासिक प्रवास बराच मोठा आहे.
महाराष्ट्रातील जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून व्यापार आणि राजकीयदृष्ट्या प्रसिद्ध आहे. हे गाव म्हणजे ‘शक राजा नहपानाची’ राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. याच मार्गातील ‘नाणेघाट’ हा फार पुर्वीपासून व्यापारीमार्ग म्हणून प्रसिद्ध होता. याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात व्यापारविषयक वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर अनेक दुर्गांची निर्मिती करण्यात आली. त्यातीलच एक म्हणजे हा शिवनेरी किल्ला होय.
सातवाहनांनंतर शिवनेरी गड चालुक्य आणि राष्ट्रकुट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे हा किल्ला बहमनी राजवटीखाली आला. मधल्या काळात अनेक चढाया या गडावर झाल्या. त्यानंतर इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली.
निजामशाहीच्या स्थापनेनंतरच या किल्ल्याचे भवितव्य बदलुन गेले. या ठिकाणी असणारी राजधानी या गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजी राजे आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडचे लखुजीराव जाधव यांची कन्या जिजाबाई यांचा विवाह संपुर्ण मराठी साम्राज्यासाठी एक मोठी आशादायक ठरणारी घटना होती. मात्र जिजाबाईंचे वडील लखूजीराव जाधव यांच्या हत्येनंतर अनेक राजकीय गणिते बदलली. त्यातुन अनेक तंटे बखेडे निर्माण झाल्याने पुढे १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना सुरक्षिततेसाठी शहाजी राजांनी त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर आणले .
मराठ्यांचे साम्राज्य स्थापन व्हावे हे स्वप्न जिजाऊंनी ऊराशी बाळगले होते. त्यासाठी त्यांनी शिवनेरी गडावरील श्रीभवानीमाता शिवाई ला नवस केला जर आपल्याला पराक्रमी पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याप्रमाणे १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३० ला जिजाऊंना पुत्रप्राप्ती झाली आणि शिवनेरीला कायमस्वरूपी शिवरायांचे जन्मस्थान अशी ओळख मिळाली.
इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईंनी बाल शिवाजीसह (Shivaji Maharaj) गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. मात्र यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न राजे शिवाजींनी केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी परत एकदा अयशस्वी प्रयत्न केला. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणून पेशव्यांकडे हस्तांतरित केला होता. अशा प्रकारे मराठी साम्राज्याचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान शिवनेरी किल्ला अखेरपर्यंत मराठी साम्राज्याला हुलकावणी देत राहिला.
क्रमशः
– ज्योती भालेराव
This post was last modified on %s = human-readable time difference 5:23 pm