Santa Tukaram Maharaj Palakhi History : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. या भूमीत अनेक संतकवी होऊन गेले, ज्यांनी या महाराष्ट्राला घडवले, अध्यात्मिक वारसा दिला. अशाच या संत परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत तुकाराम महाराज. चला तर मग त्यांच्याविषयी, त्यांच्या पालखी सोहळ्याविषयीची माहिती जाणून घेऊ.
जून महिना सुरू झाला की जसे पावसाचे वेध लागतात, तसेच वेध लागतात ते आषढी वारीचे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी देण आहे. जगात कुठेही अशी परंपरा दिसत नाही. या परंपरेतील सर्वात मोठ्या दोन पालख्या आहेत, ज्या पंढरपूरला निघतात ते आपल्या लाडक्या दैवताला विठूरायाला भेटण्यासाठी. शेकडो वर्षांची ही सुंदर प्रथा सुरू कशी झाली, कोण होते त्याचे जनक ?
Table of Contents
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची सुरुवात कधी झाली ? ( Saint Tukaram Maharaj Palakhi History )
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची सुरुवात सुमारे 338 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी 1685 मध्ये देहू येथून पालखी घेऊन पंढरपूरला जाण्याची प्रथा सुरू केली. त्यांनी पालखीत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका ठेवून, ज्ञानोबारायांच्या पादुकांसह ही पालखी घेऊन, पंढरपूरला जाण्यास सुरूवात केली. इतक्या वर्षांनंतरही या दोन्ही पालख्यांचा हा सोहळा निरंतर सुरू आहे. या दोन्ही पालख्यांच्या साथीने महाराष्ट्रासह भारतातील अनेक वारकरी आपला पंढरपूरचा प्रवास पूर्ण करतात.
संत तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण बाबा यांच्याविषयी –
संत तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण बाब यांना पालखी सोहळ्याचे जनक असेही म्हणतात. त्यांनी देहू येथून पंढरपूरला पालखी सोहळ्याची सुरुवात केली. संत तुकाराम महाराजांच्या निधनानंतर नारायण महाराजांनी 1865 मध्ये देहू येथून पंढरपूरकडे जाण्यासाठी पालखी सोहळ्याची सुरूवात केली. संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेवून त्यांनी त्या पंढरपूरला नेल्या. जाताना ते मार्गात भजन, किर्तन करत असत. खरं तर तुकाराम महाराजांच्या पूर्वजांमध्ये पंढरीच्या वारीची परंपरा अखंड चालू होती.
तुकाराम महाराजांचे घराणे आणि वारी
विश्वंभर बाबा हे या घराण्याचे मुळ पुरूष. त्यांच्या आधीपासून त्यांच्या घरात पंढरपूरला जाण्याची प्रथा होती. याच विश्वंभर बाबांनी विठ्ठल रूक्मिणीची एकत्र स्वयंभू मूर्ती आपल्या वाड्यात स्थिपित केली होती. त्यांच्या पूर्वजांमध्ये एकट्याने पंढरपूरला जाण्याची प्रथा असली तरी, त्याला थोडे विस्तारित स्वरूप दिले ते तुकाराम महाराजांनी. तुकोबांनी दिंडी सोहळ्याच्या स्वरूपात त्यांचे चौदा टाळकरी आणि काही वारकऱ्यांसह ही प्रथा सुरू ठेवली. पुढे तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर कान्होबारायांनी आणि तुकोबारायांचे पुत्र महादेवबुवा यांनी हा पंढरीला जाण्याचा वारसा सुरूच ठेवला. ते थकल्यानंतर, त्यांच्या धाकट्या बंधूनी नारायण महाराजांनी ही प्रथा पुढे नेली.
पालखी सोहळ्याची संकल्पना
पंढरपूरच्या वारीची प्रथा सुरू असतानाच नारायण बाबांना काही वर्षांनंतर वाटले की, या प्रवासात वारकरी संप्रदायाचे दोन मुख्य शिलेदार ज्ञानोबा माऊली आणि तुकोबाराया सोबत असतील तर ही वारी अधिक अर्थपूर्ण होईल. या कल्पनेतून त्यांनी पालखी सोहळा सुरू केला. नारायण महाराजांना संत तुकाराम महाराजांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला नाही. मात्र तरीही त्यांनी आपल्या पित्याची विठ्ठल भक्ती किती आत्मसाद केली होती याचे प्रत्यंतर येते. संत तुकारामांच्या पादुका घेऊन ते आधी आळंदीला जात. तेथून माऊलींच्या पादुका घेऊन त्या ते पालखीत ठेवत. एकाच पालखीत दोन जगतगुरूंच्या पादुका ठेवून ते पंढरपूरला प्रस्थान करत. आजही हा सोहळा मोठ्या भक्तीभावाने सुरू आहे. काही काळानंतर तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या पालख्या वेगळ्या दिवशी मार्गस्थ होत असल्या, तरी त्यांचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे विठ्ठ्ल भक्ती.
जात-धर्म या पलिकडे जाऊन अखंड भक्तीचा हा प्रवाह निरंतर असाच सुरू आहे. कोणत्याही कालखंडात या प्रथेला खंड पडला नाही हे विशेष.