Pune Traffic Route : आजपासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. या उत्सवासाठी पुणे शहरातही भक्तांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी होते. शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळित होऊ नये यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले आहेत. काय आहेत ते बदल जाणून घ्या.
पुणे : 22/09/2025
आज सोमवार पासून संपूर्ण देशात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. हा उत्सव पुण्यातही मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. पुणे शहरातही देवीची अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. दर्शनासाठी भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत.
सोमवारी 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत असणाऱ्या या नवरात्र उत्सवासाठी चतुःश्रुंगी देवी, भवानी माता, तांबडी जोगेश्वरी आणि सारसबाग स्थित महालक्ष्मी मंदिराच्या आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वळवण्यात आलेली आहे. पुणे वाहतूर पोलीसांनी हा बदल नागरिकांच्या सोयीसाठी केला आहे.
अप्पा बळवंत चौकात एकेरी वाहतूक सुरू (Pune Traffic Route )
नवरात्रीच्या दिवसात अप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठ चौक हा मार्ग बंद रहाणार आहे. मात्र बुधवार पेठ चौक ते अप्पा बळवंत चौक हा एकेरी मार्ग खुला असणार आहे.
महात्मा फुले रस्त्यावरची वाहतूक बंद ( Pune Traffic Route )
नागरिकांनी गाडीतळ पुतळ्यावरून छत्रपति शिवाजी महाराज रस्त्याचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. भवानी माता मंदिर परिसर, रामोशी गेट चौक, जुना मोटर स्टँडपासून महात्मा फुले रस्ता वाहतूकीसाठी संपूर्णपणे बंद असणार आहे. हा मार्ग फक्त इमर्जन्सि सेवा देणाऱ्यांसाठी खुला असणार आहे.
या ठिकाणी पार्किंगसुविधा सुद्धा बंद असणार आहे. पीएमपीएमएल बस, सेवन लेन चौक, गोळीबार मैदान चौक आणि खानेमारूती चौक या मार्गावर वाहतूक व्यवस्था वळवण्यात आली आहे. वाहन चालकांसाठी संत कबीर चौक, ए डी कॅम्प चौक, भारत सिनेमा, भगवान बाहुबली चौक या मार्गाने वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात लक्ष्मी रोडवरील गणपती चौक पासून तांबडी जोगेश्वरी मंदिर दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी संपूर्ण बंद असणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर पासून तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश मिळणार नाहीत. वाहनचालक सेवा सदन चौका-बाजीराव रस्ता-शनिवारवाडा या मार्गे जाऊ शकतात.