Pune Metro News : पुणेकरांसाठी आता दररोजचा प्रवास आणखी सुरळीत होणार आहे. पूर्व आणि दक्षिण पुण्याचा विकास वेगाने होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
पुणे : 05/11/2025
पुणे मेट्रोच्या (Pune Metro News) टप्पा-2 अंतर्गत हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो-सासवड रस्ता या दोन महत्त्वाच्या मेट्रो उपमार्गिकांना अखेर राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या दोन प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाची माहिती दिली. दोन्ही उपमार्गिकांची एकत्रित लांबी सुमारे 16 किलोमीटर असून, एकुण 14 उन्नत मेट्रो स्थानकांचा यात समावेश असेल. या संपूर्ण उन्नत मेट्रो प्रकल्पांसाठी 5 हजार 704 कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही मार्गांची अंमलबजावणी महामेट्रो मार्फत करण्यात येणार आहे.
या मंजूरीनंतर पूर्व व दक्षिण पुण्यातील विस्तारणाऱ्या उपनगरांना मेट्रोची जोड मिळणार आहे. हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड परिसरातील नागरिकांना या मेट्रोमुळे मध्यवर्ती पुण्यात सहज पोहोचता येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल तसेच प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येईल.
महामेट्रोचा प्रकल्प विस्तार काय असणार ? (Pune Metro News)
महामेट्रोकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल हा 2023 मध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यासोबत सखोल चर्चा झाली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पुणे-महानगर पालिकेच्या स्थायी समितीने या योजनेला मंजुरी दिली.
या संपूर्ण मेट्रो-2 अंतर्गत खडकवासला -स्वारगेट-हडपसर-खराडी असा 31-64 किमीचा विस्तृत मार्ग प्रस्तावित आहे. संबंधित प्रकल्प अहवाल मार्च २०२५ मध्ये केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, सध्या केंद्र शासनाच्या मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, राज्य शासनाने जमीन अधिग्रहण, पर्यावरण मंजूरी आणि निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत होणार असून, पूर्व आणि दक्षिण पुण्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वास अजित पवार यांनी या निर्णयाची माहिती देतांना व्यक्त केला.