Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी पहाटे बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली. विमानतळ सुरक्षादलाने कारवाई केली. धावपट्टीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पुणे : 27/11/2025
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्या दिसल्याची घटना समोर आल्यानंतर विमानतळ प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. या अनपेक्षित घटनेनंतर सुरक्षा प्रोटोकॉलमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विमानांच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या शिडीचा वापर तातडीने बंद करण्यात आला आहे. विमानतळ परिसरात अतिरिक्त सुरक्षा घेराबंदी कऱण्यात आली असून, एटीसीपासून ग्राउंड स्टाफपर्यंत सर्व यंत्रणा सतर्क मोडवर ठेवण्यात आल्या आहेत.
घटनेनुसार विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी आणि मंगळवारी पहाटे बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच विमानतळ सुरक्षादलाने कारवाई केली. धावपट्टीवर गस्त वाढविण्यात आली आणि सर्व विमानांच्या हालचाली काही काळासाठी नियंत्रित करण्यात आल्या. नुकतीच या विमानतळावरील विमानवाहतुक वाढविण्यात आली आहे. धावपट्टीवर नियमित वर्दळ सुरू असते. त्यामुळे अशा ठिकाणी बिबट्याचा वावर असणे हे मोठ्या धोक्याची सूचना मानली जात आहे.
वनविभागाकडून विशेष कारवाई (Pune Airport Leopard News)
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसराची पाहणी केली असून, बिबट्या शिरकाव कुठून झाला याचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. परिसराभोवतीच्या कुंपणांची तपासणी, सापळे लावणे तसेच रात्रीच्या वेळी कॅमेऱ्याद्वारे गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
वनविभागाचे अधिकारी म्हणाले की, विमानतळ परिसरात वन्यप्राणी आढळणे अत्यंत अपवादात्मक आहे मात्र आसपास असलेल्या मोकळ्या जागेमुळे आणि डोंगराळ पट्ट्यामुळे कधीकधी या प्राण्यांचा वावर होऊ शकतो. सुरक्षा दृष्टीने विमानतळ प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.