PMPML App News : पुणेकरांनी पीएमपीएमल ॲपला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांतच हजारो पुणेकरांनी हे ॲप डाऊनलोड करून तिकिट बुकिंग आणि बस ट्रॅकिंगसाठी याचा वापर केला आहे.
पुणे : 30-04-2026
महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी बसमधील सीटमागे ॲप (PMPML App News) डाऊनलोड करण्यासाठी क्यूआर कोड (स्कॅनर) लावण्यात आले होते. या संकल्पनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 1 ते 26 या 26 दिवसांच्या कालावधीत 75 हजार प्रवाशांनी ‘आपले पीएमपीएमल’ ॲप डाऊनलोड केले आहे. सध्या या ॲपचे एकूण 30 लाख नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.
पीएमपीएमएल स्वतःच्या आणि ठेकेदारांच्या मिळून एकूण 1 हजार 961 बसेसमध्ये हे स्कॅनर लावण्यात आले होते. 26 दिवसांत ॲप डाऊनलोड करणाऱ्यांमध्ये 60 हजार अँड्रॉइड वापरकर्ते आणि 15 हजार ॲपलच्या वापरकर्त्यांचा समावेश आहे. सरासरी आकडेवारीनुसार, दररोज 900 ते 1000 अँड्रॉइड वापरकर्ते आणि 500 ते 600 ॲपल वापरकर्ते हे ॲप डाऊनलोड करत आहेत.
‘आपले पीएमपीएमल’ ॲपचे फायदे (PMPML App News)
बस सध्या कुठे आहे, हे प्रत्यक्ष पाहता येते.
ऑनलाईन तिकीट व पास काढता येतो.
तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
बसचा मार्ग, क्रमांक आणि बस येण्याची अचूक वेळ समजते.
डिजिटल पेमेंटमुळे रोख व्यवहारांची गरज उरत नाही आणि व्यवहार सुरक्षित होतात.
ॲप कसे डाऊनलोड करायचे ? (PMPML App News)
प्रवासी प्ले स्टोअर वरून आपले पीएमपीएमल ॲप सर्च करून हे ॲप डाऊनलोड करू शकतात. तसेच बसमधील सीटमागील क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट डाऊनलोड लिंक मिळवता येते.
एकूण 30 लाख वापरकर्ते (PMPML App News)
आतापर्यंत ‘आपले पीएमपीएमएल’ ॲप वापरणाऱ्यांची एकूण संख्या साधारण 30 लाख इतकी झाली आहे. यामध्ये अँड्रॉइड मोबाईलचे 22 लाख 90 हजार, तर ॲपला मोबाईलचे 7 लाख वापरकर्ते आहेत.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी सांगितले की, स्कॅनर लावल्यापासून 75 हजार प्रवाशांनी ‘आपले पीएमपीएमल’ ॲप डाऊनलोड केले आहे. दररोज सरासरी 1 हजार 500 प्रवासी हे ॲप डाऊनलोड करत आहेत. भविष्यात 50 लाख प्रवाशांपर्यंत हे ॲप पोहोचवण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.