New Traffic Rule In Goa : वाहतूक सुरक्षित आणि सुरळित व्हावी या हेतूने गोव्यात एक नवीन वाहतूक विषयक नियम लागू करण्यात आला आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
गोवा : 2025-06-21
रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी या हेतूने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा चार ते सहा मार्गिका असलेल्या रस्त्यांच्या बाहेरील बाजूच्या मार्गिकांवर कायम स्वरुपी गाड्या पार्क केलेल्या आढळून येतात. अशा पार्किंगमुळे रस्ते मोठे असूनही त्यांचा प्रत्यक्ष वाहतुकीसाठी वापर करता येत नाही. हीच समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बेवारस पडलेल्या गाड्या, बेकायदेशीपणे होणारं पार्किंग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अडथळा ठरणाऱ्या वाहनांसंदर्भात हा मोठा निर्णय घेण्यात आलाय तो महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा राज्यात!
बेवारस घोषित केलं जाणार ते वाहन
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वाहतुकीच्या नियमांसंदर्भातील बदलांची नुकतीच घोषणा केली आहे. या पैकी सर्वात महत्त्वाचा नियम हा पार्किंगसंदर्भातील आहे. नव्या नियमानुसार, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आठ दिवसांपेक्षा अधिक काळ एकाच जागी वाहन पार्क करुन ठेवलेलं असेल तर ते ‘बेवारस’ घोषित केलं जाणार आहे. तसेच अशी वाहनं थेट भंगारात काढली जाणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. नव्या, जुन्या सर्वच वाहनांना हा नियम लागू असल्याने अगदी नवीन गाडी बऱ्याच दिवस सार्वजनिक ठिकाणी एकाच जागी पार्क करुन ठेवल्यास ती सुद्धा भंगारात जाऊ शकते
आधी नोटीस आणि मग त्यानंतर…
“गाडी ताब्यात घेतल्यानंतर मालकाला नोटीस पाठवली जाईल. मालकाने कोणताही प्रतिसाद दिला नाही तर वाहन भंगारात काढलं जाईल. मालकाला या वाहनावर दावा सांगता येणार नाही,” असं सावंत यांनी सांगितलं आहे. गोव्याची राजधानी पणजीमध्ये 250 हून अधिक अशी बेवारस वाहनं असून ती ताब्यात घेण्यात आली आहेत. आता अशी कारवाई राज्यभरात होणार आहे. रस्ते मोकळे करुन वाहतूक सुरळीत करण्याचा या मोहिमेमागील हेतू आहे.
भाड्याने वाहनं देणाऱ्यांवरही विशेष नजर
बेकायदेशीरपणे वाहने भाडेतत्वावर देणाऱ्यांविरोधातही राज्य सरकारने कंबर कसली आहे. परवाना न घेता भाडेतत्वावर वाहनं देणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत बेकायदेशीरपणे भाडेतत्वावर घेण्यात आणि देण्यात आलेल्या 550 खासगी वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांसंदर्भातील परवाने रद्द करण्यासाठी परिवहन कार्यालयाला सूचना करण्यात आल्या आहेत. भाडेतत्वावरील गाड्यांचा अपघात होऊन वर्षभरात गोव्यामध्ये 365 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी हा विषय फारच गंभीर असल्याचं म्हटलं आहे. अशा अपघातांमध्ये बळी पडलेल्यांपैकी 70 टक्के लोकांचा काहीच दोष नसतो. मृतांपैकी 50 टक्के लोक हे पादचारी असतात.