Navaratra Colour Theme Secret : गेल्या काही वर्षांपासून नवरात्र उत्सवादरम्यान एक नवीन प्रथा डोकावू लागली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांना नऊ वेगवेगळ्या रंगात वाटून घेण्यात येते. त्या त्या दिवशी त्या रंगाच्या साडी, कपडे परिधान करण्याची ही प्रथा नक्की कधी सुरू झाली ? जाणून घेऊ यामागची गंमत.
प्रासंगिक लेख : 22/09/2025
नवरात्र उत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतो देवीचा जागर, नऊ दिवस करण्यात येणारे उपवास, काही भागात खेळला जाणारा भोंडला, गरबा किंवा दांडीया. मात्र अलिकडच्या काही वर्षात एक नविन प्रथा पाळली जाताना दिसून येते. ती प्रथा म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक वारानुरूप रंग ठरवून, त्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. अर्थात या प्रथेला अगदी मनापासून पाळणाऱ्या आहेत त्या महिला. परंतु ही प्रथा (Navaratra Colour Theme ) काही फार वर्षांपासून चालत आलेली आहे असे नाही. शिवाय या गोष्टीला कोणताही धार्मिक, शास्रीय आधार सुद्धा नाही. तरीही ही पद्धत इतकी लोकप्रिय झाली आणि आज नवरात्र म्हटलं की, महिला आधी कोणत्या दिवशी कोणता रंग आहे हे पाहून ठेवतात. तेव्हा अशा या आगळ्यावेगळ्या प्रथेच्या सुरूवातीचा उगम काय आहे ? ते जाणून घेऊ.
खरं तर नवरात्रीतले नऊ रंग धार्मिकतेतून ठरवण्यात आलेले नाहीत. हा खरं तर एक मार्केटिंगचा फंडा होता. साधारण 2003 मध्ये एका वर्तमानपत्राने आपला खप वाढवण्यासाठी एकाच रंगाच्या साडी नेसून महिलावर्गाचे फोटो छापण्यास सुरूवात केली. त्यासह विविध सिरियलच्या हिरॉईन, मॉडेलकडून आपल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर त्यादिवशीच्या रंगाचा पेहेराव करून खास फोटोशूट करून छापण्यास सुरूवात केली. अनेक शाळा, बँका, संस्था येथे काम करणाऱ्या महिला वर्गाला असे ग्रुप फोटो पाठवण्याचे आवाहनही सुरू करण्यात आले. त्यातून पुढे हा ट्रेंड जनमानसात रूजला असल्याचे दिसून येते. कोणी असेही सांगतात की, 2004 ला मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातील देवीला त्यावर्षी नऊ दिवस नऊ रंगांच्या साडी नेसवल्या गेल्या होत्या. ते पाहून त्यावर्षी महिलांनी तसेच करून त्याला प्रतिसाद दिला आणि हा ट्रेंड रूळला.
खरं तर हे रंग निवडण्यामागेही फार कोणते धार्मिक निकष नाहीत. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ देवींना समर्पित करून हे रंग ठरवण्यात येत असावेत. शिवाय आपल्याकडे ज्योतिषशास्रानुसार आठवड्यातील वारांनुसार आणि त्यांच्याशी संबंधिक देवतांनुसार विशिष्ट रंग निश्चित केले आहेत. प्रत्येक वार हा एका देवाला समर्पित आहे. त्या रंगानुसार नवरात्रीतील नऊ दिवसांचे रंग ठरवण्यात येतात. जसे की, सोमवार : पांढरा, मंगळवार : लाल, बुधवार : हिरवा, गुरुवार : पिवळा, शुक्रवार : गुलाबी, शनिवार : काळा किंवा निळा आणि रविवार : नारंगी किंवा केशरी. त्या त्या दिवशीचे हे रंग केवळ शुभ मानले जात नाहीत तर त्यांच्या आपल्या मानसिक आणि शारिरिक आरोग्यावरही परिणान होतो असे ज्योतिषविद्या जाणणारे सांगतात. म्हणून या सर्वांचा विचार करून नवरात्रात नऊ दिवसांचे रंग ठरवून त्याप्रमाणे महिला आणि काही प्रमाणात पुरूषसुद्धा ही रंगाची थिम करताना दिसतात.
रोजच्या दैनंदिन कंटाळवाण्या आयुष्यात महिलांना थोडा विरंगुळा मिळावा आणि त्यातून अध्यात्मिक आणि धार्मिक समाधानही मिळावे या हेतून सध्या नवरात्रीच्या या नऊ रंगांचा ट्रेंड जोमात असल्याचेच दिसून येतो.
यावर्षी 2025 च्या नवरात्र उत्सवासाठी कोणत्या दिवशी कोणता रंग आहे ते जाणून घ्या. (Navaratra Colour Theme)
- 22 सप्टेंबर 2025, सोमवार – पांढरा
- 23 सप्टेंबर 2025, मंगळवार – लाल
- 24 सप्टेंबर 2025, बुधवार – निळा
- 25 सप्टेंबर 2025 , गुरूवार – पिवळा
- 26 सप्टेंबर 2025, शुक्रवार – हिरवा
- 27 सप्टेंबर 2025, शनिवार – करडा
- 28 सप्टेंबर 2025, रविवार – नारंगी
- 29 सप्टेंबर 2025, सोमवार- मोरपंखी
- 30 सप्टेंबर 2025, मंगळवार – गुलाबी