Naigaon Child Accident : वसई पूर्वेकडील नायगाव मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका 4 वर्षीय मुलीचा 12 व्या मजल्यावरून पडून करूण अंत झाला आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या बाबत पालकांनी किती सावधानता बाळगायला हवी, याची सर्वत्र चर्चा होत आहे. जाणून घेऊ या घटनेविषयी.
वसई : 25/07/2025
वसई पूर्वेकडील नायगाव या ठिकाणी असणाऱ्या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून खाली पडून एका 4 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी 22 जुलैला रात्री 8 ते 8:30 च्या सुमारास ही घटना घडली. अन्विका प्रजापती (वय 4 ) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने नायगाव परिसर हादरला आहे. यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
काय घडले चिमुकलीसोबत (Naigaon Child Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजापती कुटुंब नायगाव पूर्वेकडील ‘नवकार फेज वन’ या इमारतीत, बी-2 विंगमध्ये रहात होते. मंगळवारी रात्री अन्विका याच सोसायटीतील आपल्या मावशीच्या घरी बी-3 विंगमध्ये असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. यावेळी ही दुर्घेटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
मंगळवारी रात्री अन्विका तिच्या आईसोबत सोसायटीतील बी-३ विंगमध्ये असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. ते घरी जाण्यासाठी निघाले असताना अन्विका ही घराबाहेर खेळत होती. यामुळे तिच्या आईने तिला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर बसवले होते. यानंतर खेळता खेळता अन्विका स्टँडवर चढून खिडकीजवळ गेली. दुर्दैवाने, तिचा अचानक तोल गेला आणि काही समजण्याच्या आतच ती 12 व्या मजल्यावरून खाली पडली. ही संपूर्ण घटना इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटनेनंतर तत्काळ इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी अन्विकाला उपचारासाठी वसईतील महापालिकेच्या सर डी.एम.पेटिट रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वी मृत घोषित केले. या घटनेमुळे नायगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे प्रजापती कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू(Naigaon Child Accident)
या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलांना डोळ्यात तेल घालून जपावे, असे सांगितले जात आहे.
या घटनेबाबत इमारतीमधील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या 14 मजली इमारतीममधील बहुतांश इमारतींच्या खिडक्यांना आणि गॅलरीला कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा जाळ्या नाहीत. तसेच अन्य ठिकाणीही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. जर सुरक्षा जाळ्या असत्या तर ही चिमुकली खाली पडली नसती, अशी प्रतिक्रिया इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी दिली आहे. सुरक्षा उपायांच्या अभावामुळे एका चिमुकल्या जीवाचा बळी गेल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.