Subodh Bhave-Tejashree Pradhan : नुकताच झी मराठीवर एक प्रोमो झळकला आहे. सुरूवातीला त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, मात्र नंतर प्रेक्षकांकडून त्यावर नाराजी आणि टिका होताना दिसत आहे. काय आहे असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये. ते जाणून घेऊ.
मुंबई : 25/06/2025
झी मराठी या वाहिनीवर लवकरच जुन्या मालिकांची सद्दी संपून, नव्या मालिका येणार आहेत. अशातच दोन दिवसांपासून एक प्रोमो रिलिज करण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि मालिकाविश्वाची क्विन समजली जाणारी तेजश्री प्रधान या प्रोमोत दिसत आहे. मालिकेचा प्रोमो पाहिल्यावर मात्र प्रेक्षकांना तो कोणत्या जुन्या हिंदी मालिकेची कॉपी आहे, ते समजण्यास वेळ लागलेला नाही. एकेकाळी सोनी वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या राम कपूर आणि साक्षी तन्वर यांची ‘बडे अच्छे लगते है’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानची ही नविन मालिका तंतोतंत त्याची कॉपी असल्याची कुणकुण प्रेक्षकांना एका प्रोमोतूनच आली आहे. या नविन मराठी मालिकेचे नाव आहे, ‘विण दोघांतली ही तुटेना’
तेच तेच प्रेक्षकांच्या माथी का मारताय?
मालिका विश्वात तसंही आजकाल तेचतेच दळण दळले जात असल्याचे पहायला मिळते. कोणत्याही मालिकांमधून समाजाला काहीही भरीव मिळत नसल्याची ओरड एकू येत असते. ना निखळ मनोरंजन ना वैचारिक खाद्य अशी आजकालच्या सर्व मालिकांची गत आहे. त्यात आता सर्व मालिका या कुठल्यातरी हिंदी, कन्नड अथवा इतर एखाद्या प्रादेशिक भाषेतील गाजलेल्या मालिकांचे कॉपी व्हर्जन असल्याचे दिसून येते. मराठी लेखकांकडे मराठीतील कोणतेच कथानक राहिले नाहीये का ? असा प्रश्न सुजाण प्रेक्षक विचारत आहे.
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे हे दोघेही कसलेले कलाकार आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमधून काम केले आहे. तेव्हा कथानक प्रेक्षकांना माहित असले तरी, या कलाकारांचा अभिनय काही जादू करू शकेल का? हे आता मालिका सुरू झाल्यावर समजणार आहे.